Author: bittambatami.com

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाची राम गर्जना

आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघासाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी महायुतीच्या नेत्यांनी मतदार संघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून त्यापाठोपाठ आता महायुतीतील भाजपने राम नवमीचे औचित्य साधून राम गर्जना गीताचे अनावरण केले आहे. नाही जगात तोड, श्रीराम बोल. प्रभु श्रीराम आमचा कणा, असे हे गीत असून या गीताच्या निमित्ताने भाजपने प्रचाराचे शंख फुकल्याची चर्चा आहे. ठाणे लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी गेल्या काही दिवसांपासून मेळाव्यांच्या माध्यमातून निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार सुरू केला असून त्याचबरोबर विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्रौत्सवात राम मंदीराचा देखावा उभारण्यात आला होता. या उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुक काळात राममंदीराचा उल्लेख करणाऱ्या भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यातच आता भाजपनेही राम नवमीचे औचित्य साधून राम गर्जना गीताचे अनावरण करत प्रचाराचे शंख फुकल्याची चर्चा आहे. प्रभु श्रीराम गर्जना या गीताचे गीतकार आणि संगीतकार प्रकाश बोर्डे आहेत. या गीताचे गायक गणेश खांडके हे आहेत. ठाणे येथील रोहन रेकॉर्डींग स्टुडिओ यांचे संगीत संयोजन आहे. भाजपचे ठाण्यातील पदाधिकारी महेश कदम यांचे गीतासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. कार सेवक असलेले भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते गीताचे अनावरण करण्यात आले आहे. प्रभु रामंचद्रांनी रामराज्याची कल्पना आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येत राम मंदीर उभारून एकप्रकारे देशात रामराज्य आणण्याचा संदेश दिला आहे. राम राज्य म्हणजे गरिबांची सेवा, सुशासन, विकास, अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी यावेळी व्यक्त केली. काय आहे गीत श्वासा श्वासात राम, ध्यासाध्यासात राम, नसानसात राम, रक्तारक्तात राम, या हद्यात रामगर्जना…तुम्ही आम्ही मिळून करू राम वंदना. निष्ठेने वागा, दिली शिकवण प्रभु श्रीरामांनी. मर्यादा पुरुषोत्तम तुम्ही आर्दश आमच्यासाठी. नाही जगात तोड, श्रीराम बोल. प्रभु श्रीराम आमचा कणा, असे हे गीत आहे.

कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये दोन लाख मतांचा महायुतीचा निश्चय

कॉंग्रेसचे नेते प्रकाश मुथा भाजपात दाखल कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये महायुतीच्या झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी केवळ कल्याणमधून दोन लाख मते मिळविण्याचा निश्चय केला आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या साह्याने घराघरांमध्ये पोचून पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचा संकल्प केला. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीत प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आधारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी उत्साहात व जल्लोषात पार पडला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री व महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंगे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माया कटारिया, उपेक्षा भोईर, वैशाली पाटील, कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील आदींसह महायुतीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसच्या इंटकचे प्रदेश अध्यक्ष व प्रदेश चिटणीस प्रकाश मुथा यांनी कॉंग्रेसचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत भाजपामध्ये प्रवेश केला. कल्याण पश्चिम मतदारसंघात महायुतीतील सर्व पक्षांची ताकद एकत्र आली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक घरापर्यंत पोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत आणि राज्यातील महायुती सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामाची माहिती द्यावी, असे आवाहन करून दोन लाख मते मिळविण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. देशातील १४० जनतेला शांत झोप लागावी. गरीबांचे कल्याण व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आपल्या देशाचे व पुढील पिढीचे भविष्य घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून द्यावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन नागरिकांना करावे. महाविकास आघाडीच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असे ते म्हणाले. कल्याण पश्चिम मतदारसंघाच्या इतिहासात नोंद होईल, असा हा भव्य मेळावा आहे. महायुतीची ताकद पाहून विरोधकांनाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. मनसेची एक लाख मतांची ताकद आपल्यासोबत आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही मोठा समर्थक वर्ग आहे. रिपब्लिकन पक्ष, रासप आदींच्या मदतीने आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघात इतिहास रचता येईल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले. कल्याण शहरात केंद्र व राज्य सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. तर महाविकास आघाडी सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगितीच दिली, अशी टीका कपिल पाटील यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचा कल्याण पश्चिममधील प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकाने महायुतीच्या विजयासाठी झटावे, असे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर व जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केले. तर कल्याण-मुरबाड रेल्वे धावणार, ही समस्त मुरबाडवासियांच्या अभिमानाची बाब असून, महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी कार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प

ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावरील वाहतुक दुरूस्ती कामासाठी बंद करण्यात आल्याने बुधवारी सकाळी त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावर झाला आहे. कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली आहे. मुंबई नाशिक महामार्ग, ढोकाळी-हायलँड रोड येथील वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. वाहतुक कोंडीसोबत उन्हाचा फटका चालकांना सहन करावा लागत आहे. कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी उशीराने घराबाहेर पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. घोडबंदर मार्गावरून हजारो वाहने दिवसाला ठाणे, भिवंडी, नाशिक आणि मुंबईच्या दिशेने वाहतुक करतात. अवजड वाहने येथील कापूरबावडी उड्ड्डाणपूलावरून प्रवेश करून वाहतुक करतात. या उड्डाणपूलावरील रस्त्याला जोडणारी लोखंडी पट्टी बदलण्याचे कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळवारी रात्री हाती घेण्यात आले होते. परंतु या पट्टीवरील सिमेंट अद्यापही सुकलेले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी देखील हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. येथील उड्डाणपुलाखालून वाहतुक सोडण्यात आली. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. घोडबंदरहून हजारो नोकरदार ठाणे, मुंबई, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करतात. परंतु या वाहन चालकांना कोंडीत अडकावे लागले. त्यामुळे कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोंडीत भर पडली. पर्यायी मार्ग म्हणून काही वाहन चालकांनी ढोकाळी, हायलँड मार्गाचा पर्याय निवडला. येथीही कोंडीचा सामना सहन करावा लागला. कोंडीमुळे मुंबई नाशिक महामार्गाची वाहतुक रोखली जात आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरही भार वाढला आहे. उड्डाणपूलावरील वाहतुक दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. उन्हाचा मारा आणि कोंडी अशा दुहेरी समस्येत वाहन चालक अडकले आहेत.

उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव

कल्याण : उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच कल्याण पू्र्व, पश्चिम भागात मंगळवार पासून विजेचा लपंडाव सुरू आहे. बुधवारी पहाटे तीन वाजता कल्याण पूर्व भागाचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. विजेच्या सततच्या लपंडावामुळे कल्याण मधील नागरिक दोन दिवस हैराण आहेत. कल्याण परिसरातील तापमानाचा पारा मागील तीन दिवसांपासून ४२ अंशच्या पुढे गेला आहे. घरात पंख्याखाली असूनही नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण आहेत. अशा परिस्थितीत कल्याण पश्चिमेत मंगळवारी दुपारपासून चिकणघर, रामबाग, खडकपाडा भागात विजेचा लपंडाव सुरू होता. रात्रीच्या वेळेत दुर्गाडी किल्ला भाग, खडकपाडा भागात वीज पुरवठा बंद झाला होता. बुधवारी कल्याण पूर्व भागाचा वीज पुरवठा पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान बंद झाला होता. अगोदरच अंगाची काहिली होत असताना त्यात वीज गेल्याने नागरिक हैराण झाले होते. अनेक नागरिक पहाटे, रात्री घराबाहेरील मोकळ्या जागेत उकाड्याची काहिली शमविण्यासाठी बसले होते. घरातील लहान मुले, बालके वीज पुरवठा बंद झाल्याने अस्वस्थ होती. घरात बिछान्याला खिळून असलेले, उपचार घेत असलेले विविध प्रकारचे रुग्ण उकाड्याने हैराण झाले होते. वीज पुरवठा बंद असल्याने घराचे दरवाजे, खिडक्या मोकळ्या हवेसाठी उघड्या ठेवल्या तर घरात डासांचा उपद्रव होईल या भीतीने कोणीही नागरिक दरवाजे, खिडक्यांची फडताळे उघडण्यास तयार नव्हता. कडक उन्हाळा सुरू होताच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत होते. वीज पुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात सतत संपर्क करणे चालू ठेवल्याने महावितरणचा सेवा संपर्क क्रमांक दोन ते तीन तास व्यस्त येत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी विचारात घेऊन महावितरणचे कर्मचारी रात्रीतून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्रीच बाहेर पडले होते. या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे टप्प्याने कल्याण पूर्व, पश्चिमेचा वीज पुरवठा टप्प्याने पूर्ववत झाला. त्यानंतर नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला. प्रमाणापेक्षा विजेची मागणी वाढल्याने असे प्रकार घडतात. किंवा तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा बंद होतो, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

संविधान बदलण्याची अफवा विरोधक पसरवत आहेत -रामदास आठवले

रमेश औताडे   मुंबई : देशाचे संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही, परंतु निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांकडून भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल अशा प्रकारच्या अफ़वा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करण्याचे काम…

निवडणूक प्रचारात व्यसनाजन्य पदार्थांचे वाटप नको

व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाची मागणी रमेश औताडे   मुंबई : निवडणुकीच्या काळात लोकांना दारूच्या नशेत ठेवून त्यांची मती गुंग करून त्यांच्याकडून मते मिळविली जातात. अनेकांना निवडणूक प्रचार काळात दारूचे व्यसन…

वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, अनेक प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करू लागले आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या महिलांच्या डब्यातून पुरूष प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांचा प्रवास सुरक्षित आणि लोकल प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी महिलांसाठी काही डबे राखीव ठेवले आहेत. तसेच वातानुकूलित लोकलचे काही डबे राखीव ठेवण्यात आले आहेत. वातानुकूलित लोकलचे डबे एकमेकांना जोडले असल्याने, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येते. महिलांचा डबा जोडून असल्याने त्यात पुरुष प्रवासी ये-जा करीत असतात. महिलांचा डबा हा प्रथम डबा असल्याने अनेक पुरुष प्रवासी त्यातन बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सामान्य लोकलच्या महिला डब्यात पुरूष फेरीवाले बिनधास्तपणे घुसखोरी करून सामग्रीची विक्री करतात. अनेक वेळा तीन ते चार पुरुष विक्रेते एकत्र येतात. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण असते. आता वातानुकूलित लोकलच्या डब्यात पुरुष प्रवासी येत असल्याने, यावर अंकुश लावणे आवश्यक आहे. यात रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, आरपीएफ प्रशासन यांनी लक्ष घालणे आवश्यक असल्याचे मत एका महिलेने व्यक्त केले.

रक्त संकलनाला निवडणूक आचारसंहितेचा फटका

मुंबई : राज्य रक्त संक्रमण परिषदेने उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी फेब्रुवारीपासूनच कंबर कसली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने एप्रिल आणि मेमध्ये पुरेसे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकारण्यांनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनातून हात आखडता घेतला आहे. परिणामी, रक्तपेढ्यांसमोर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग रक्तदानासाठी महत्त्वाचा स्राोत आहे. मात्र मार्चमध्ये शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा पार पडल्यानंतर एप्रिल आणि मेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतात. अनेक नागरिक गावाला किंवा फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक असते. तसेच अनेक रक्तदातेही बाहेरगावी जातात. रक्तदात्यांच्या अभावामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे प्रमाण कमी होते. परिणामी, दरवर्षी एप्रिल – मे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून नियोजन सुरू केले होते. स्थानक, गृहसंकुलांत संकलन शासकीय रक्तपेढ्यांनी रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये रक्त संकलन वाहन पाठवून रक्त संकलन करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असला तरी राज्यभरामध्ये दररोज साधारण पाच हजार युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्याच वेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी सामाजिक, धार्मिक संस्थांना साद घालण्याची वेळ राज्य रक्त संक्रमण परिषदेवर आली आहे. या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरातून रक्त संकलन केले जाईल. राजकीय पुढारी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतात. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय नेते मंडळींनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनात आखडता हात घेतला आहे.

उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई

ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच ठाणे : वृक्षांवरील विद्युत रोषणाईबाबत मुंबई उच्च् न्यायालयाने फटकारले असतानाही ठाणे, मिरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली भागात वृक्षांवर विद्युत रोषणाई सुरूच असल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेकडून प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविली जात असताना ठाणे जिल्ह्यामध्ये याकडे डोळे झाक होत असल्याची टीका पर्यावरणवादी कार्यकर्ते करत आहेत. मुंबई, ठाणे आणि महानगर क्षेत्रात सण- उत्सव, सामाजिक, खासगी कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. परिसर आकर्षित दिसावा म्हणून रस्त्यालगत असलेल्या वृक्षांच्या खोडांवर आणि फाद्यांवरही रोषणाई केली जात आहे. हा प्रकार मागील काही वर्षांपासून वाढू लागला आहे. या रोषणाईमुळे वृक्षांच्या वाढीवर परिणाम होतो. अनेकदा तारांमध्ये बिघाड होऊन वृक्षांना आगी लागतात. वृक्षांवर सूक्ष्म, मोठ्या आकाराचे किटक असतात. त्यांच्या प्रजनन संस्थेवर परिणाम होतो. ठाणे जिल्ह्यात स्थलांतरीत पक्षी येत असतात. या पक्ष्यांना रोषणाईमुळे दिवस आणि रात्रीचा फरक कळत नाही. असे असतानाही ठाणे, नवी मुंबई, मुंबई, मिरा भाईंदर भागात वृक्षांवर विद्युत रोषणाई सुरू होती. याबाबत काही महिन्यांपूर्वी ठाणे स्थित पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहीत जोशी यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्या मार्फत जनहीत याचिका दाखल केली होती. ही बाब जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत महापालिकांना फटकारले होते. तसेच राज्य सरकारसह मुंबई, ठाणे, आणि मिरा भाईंदर महापालिकेला नोटीस बजावली होती. उच्च न्यायालयाने नोटीस बजावूनही ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मिरा भाईंदर महापालिका ढिम्म असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील तलावपाली भागात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तलावपाली परिसरात वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठाण्यात दिवाळी, दसरा किंवा सण-उत्सवांच्या कालावधीत तलावपाली, उपवन भागात वृक्षांवर रोषणाईचे प्रकार सुरूच असतो. मिरा भाईंदर येथेही चैत्र नवरात्रौत्सवा निमित्ताने वृक्षांवर रोषणाई करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काही उपाहारगृह, ढाबे परिसरात व्यवसायिकांनी वृक्षांना प्रकाश रोषणाई करून विद्रुपीकरण केले आहे.

महाराष्ट्रत आणि सर्वत्र उष्णतेचा पारा चढत आहे हवामान खात्याने पुढील दिवसात पारा अजून चढणार असल्याचे वर्तवले आहे. ठाणे शहरात देखील सूर्य आग ओकताना दिसतोय त्यामुळे नागरिक हैराण झाले असून तहानेने जीव व्याकूळ होत आहे म्हणून लोक उन्हातून चालताना डोक्यावर ओढणी कपडा आणि पाणी पिताना दिसत आहे.. फोटो प्रफुल गांगुर्डे