Author: bittambatami.com

मुंबईत सर्वाधिक घरांची विक्री

मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातील प्रमुख 8 शहरांत मिळून एकूण 1,20, 640 घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक घरांची विक्री मुंबईत झाली आहे. पहिल्या 3 महिन्यांत मुंबईत 41, 590 घरांची विक्री झाली आहे. दुस-या क्रमांकावर पुणे शहर असून…

माढ्यासाठी फडणवीस क्शन मोडमध्ये

पंढरपूर: माढा मतदारसंघात शरद पवारांनी विजयसिंह मोहीते पाटील यांना राष्ट्रवादीत दाखल करून घेतल्यामुळे मतदार संघाचे बिघडलेले गणित सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मोहिते-पाटलांच्या जाण्यामुळे माढ्यात होणारे नुकसान भरुन…

बाबासाहेबांचा पराभव करणारेच त्यांच्या नावाने मत मागतायत

अमित शाहांचा काँग्रेसवर घणाघात भंडारा : अवघा देश आज बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती साजरी करत आहे. या महामानावाचा निवडणूकीत पराभव करण्यासाठी त्यावेळी ज्या काँग्रेसने जंग जंग पछाडले आज तीच…

तीन ब्रिलियंटस माढ्यात एकत्र

सोलापुर : शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाने आज पुन्हा एकदा भाजपाप्रणीत महायुतीला धोबीपछाड दिली. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहीते पाटील हे तीन ब्रिलियंटस…

महामानवाच्या अभिवादनास लाखोंचा जनसमुदाय लोटला

मुंबई: राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी लाखोंचा समुदाय चैत्यभूमीवर लोटला. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी रविवारी चैत्यभूमी स्मारक येथे जाऊन डॉ आंबेडकरांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामूहिक त्रिशरण बुद्धवंदना करण्यात आली तसेच राज्यपालांच्या हस्ते बौद्ध भिक्खूंना चिवर दान (वस्त्र) करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी, भन्ते राहुल बोधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी मुंबई शहर कार्यालयातर्फे चैत्यभूमी येथे मतदार जागृतीसाठी आयोजित स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत राज्यपालांनी ‘मी मतदानाचा हक्क बजावणारच’ लिहिलेल्या फलकावर स्वाक्षरी केली. छाया- संतोष नागवेकर 

मोदींच्या गॅरंटीचा जाहीरनामा सादर

नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत आल्यास देशभर समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक लागू करण्यासोबतच ७० वर्षांच्या सर्व वयोवृद्धांना तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याच्या १० महत्त्वपूर्ण घोषणांची मोदींच्या…

वांगणीत पाण्यासाठी आदिवासींचा आक्रोश

बदलापूर : प्रधानमंत्री आवास योजना, हर घर जल, हर घर नल अशा अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार गावागावात पोहचवत आहेत; मात्र कासगाव-गोरेगाव या दोन्ही गावात सरकारच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या योजनेच्या कामावर ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनीच माती टाकली आहे. त्यामुळे आता पाण्यासाठी वांगणीतील आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आक्रोश करण्याची वेळ आली आहे. जलजीवन मिशनच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या योजनेअंतर्गत कासगाव व गोरेगाव येथील साधारण दोन हजार ग्रामस्थांच्या पाणी समस्येवर उपाय म्हणून २०२२ मध्ये या कासगाव येथे नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाण्याच्या टाकीपासून गावापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी एक कोटी ९८ लाख ५८ हजार म्हणजे जवळपास दोन कोटींच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. अंबरनाथ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या माध्यमातून कामाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्यानंतर संबंधित कामाचा ठेका हा मे. लीना पांडुरंग पाटील या ठेकेदाराला देण्यात आला. तसेच साहाय्य संस्था म्हणून एम.जे.एस. प्रायव्हेट लिमिटेड इंडिया या कंपनीने सहकार्य केले आहे. हे काम २९ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र अद्यापही पूर्ण झालेले नाही. उल्हास नदीच्या किनाऱ्यावरच जुन्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी नवी पाण्याची टाकी उभारण्यात आली. या टाकीतून गावागावात नळ योजना देण्यासाठी मोठमोठे पाईप टाकीला जोडून जमिनीच्या आतून गावागावात पोहोचवण्यात आले; मात्र बांधलेली नवीन टाकी आजही अपूर्णावस्थेत असून त्या टाकीचे अजिबात खोलीकरण केलेले नाही. त्यात टाकीवर छप्परच बसवलेले नाही. त्यामुळे मोकळ्या पाण्यात जीवजंतू पडण्याचा धोका आहे; मात्र तरीदेखील पाणी नळातून सोडण्यास सुरुवात झाली; पण असे होऊनही ग्रामस्थांच्या नळाला पाणी काही येत नाही. या सगळ्या कामात संबंधित ठेकेदार आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी अक्षरशः ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांची हेळसांड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कामाची पाहणी करण्यासाठी अंबरनाथ पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी शेख आले होते; मात्र त्यांनी यावेळी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. अर्ध्या फुटावरच जलवाहिनी काही महिन्यांपूर्वी गावकऱ्यांनीच टाकीतून पाणीपुरवठा करणारे पाईप जमिनीतून कशाप्रकारे सोडले आहेत हे पाहण्यासाठी जमीन खोदली. यावेळी गावकऱ्यांच्या असे निदर्शनास आले की हे पाईप जवळपास अर्धा ते एक फूट इतक्याच खोलीवर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे टाकीतले पाणी पाईपमधून पुढे जात नाही. साधारण ही जलवाहिनी जमिनीपासून चार ते पाच फूट खोल टाकण्यात येणे आवश्यक होते; मात्र अर्धा ते एक फूट खोल असणाऱ्या या वाहिनीतून पाणी येणार कसे, असा प्रश्न ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे. ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये वाद संबंधित ठेकेदार व प्रशासनाने कानाडोळा केल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी ठेकेदार व संबंधित कर्मचाऱ्यांसमोर पाण्यासाठी आक्रोश करत जाब विचारला. यावेळी ठेकेदार व ग्रामस्थांची बाचाबाचीदेखील झाली. हर घर जल योजनेचे काम अपूर्णावस्थेत असल्याने आम्ही पाण्यासाठी असेच तडफडत आयुष्य जगायचं का, असा प्रश्न या ग्रामस्थांनी विचारला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार, राजकीय नेते मतदारसंघातील सामान्य व दुर्लक्षित अशा घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न का करत नाहीत, आमच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सरकार व प्रशासन उदासीन का आहे, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. मी कासगाव या गावातील ग्रामस्थ असून मागील अनेक वर्षांपासून शासनाच्या हर घर जल, हर घर नल या योजनेचा पाठपुरावा करत आहे. या योजनेअंतर्गत कासगाव या ठिकाणी मोठा घोटाळा झाला आहे. मंजूर झालेल्या दोन कोटींच्या कामांची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, तसेच ही योजना अपूर्णावस्थेत असून जे काम झाले आहे ते दर्जाहीन आहे. अनेकदा माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करूनही या कामाच्या संदर्भात, शासकीय कर्मचारी कोणतेही उत्तर देत नाहीत. त्यामुळे आम्ही जाब विचारायचा कोणाला, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. -राकेश टेंबे, ग्रामस्थ, वांगणी

वाडा ग्रामीण रुग्णालयात फळवाटप

वाडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती आज (ता. १४) वाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप वाडा तालुका शाखेच्या वतीने वाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटण्यात आली. वाडा येथील भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, विक्रमगड विधानसभा निवडणूकप्रमुख डॉ.. हेमंत सवरा, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, नरेश आक्रे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, सरचिटणीस रोहन पाटील, कुणाल साळवी, हर्षल खांबेकर, प्रसाद सोनटक्के, राम भोईर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुडूस नाका येथेही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. घोणसई ग्रामपंचायतीत सरपंच शैला जाबर, उपसरपंच दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

ठाकुर्लीतील सरकते जिने बंद

डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकते जिने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत; मात्र स्थानकातील सरकते जिने बंद असल्याने उन्हातून थकलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातील जिने चढून जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून रहिवाशांची संख्या वाढली आहे. डोंबिवली स्थानकात होणारी गर्दी पाहता डोंबिवली, कल्याण पूर्व व ठाकुर्लीतील नागरिक ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. या ठिकाणी पूर्वेला प्रवाशांच्या सोयीसाठी सरकत्या जिन्याची सोय केली आहे; मात्र हे सरकते जिने अनेकदा बंद असल्याचे दिसून येते. उन्हातून चालून आल्यानंतर अनेकदा जिने चढताना काहींना दम लागतो, श्वास फुलतो तसेच जिने चढून जाण्याची ताकद राहत नसल्याने प्रवासी सरकत्या जिन्याचा वापर करतात; मात्र रेल्वे स्थानकात पाऊल टाकताच हे बंद सरकते जिने त्यांची निराशा करतात. यामुळे नागरिक त्रस्त असून दुरुस्तीच्या नावाखाली अनेक दिवस हे जिने बंद ठेवले जातात असा आरोप प्रवाशी करतात. तसेच स्थानकातील सरकते जिने तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

पाण्यासाठी महिला आक्रमक

पाये गावातील जलवाहिनी उखडली वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील पाये, पायगाव परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळत नसल्याने तीव्रपाणी टंचाई जाणवत असल्याने नुकतीच जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे; मात्र ठेकेदाराने मनमानीपणे व नियमानुसार काम न केल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या चैतीताई चिपाट, भारती धापशी, सुमन टोपले, मुक्ता जाधव, कमला दांडेकर, आंनदीताई आणि महिलांनी नुकतेच आंदोलन केले. या वेळी संतप्त महिलांनी सदर योजनेचा पाईप उखडून फेकून दिला. भिवंडी तालुक्यातील महिलांना एप्रिल, मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदादेखील आलखिवली, चिबिपाडा, पाये, मैदे, चाणे, चावे, डिघाशी, मोहंडूळ, राहूर, मालबिडी आदी दुर्गम भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भूजल पातळी कमालीची खाली गेल्याने विहिरीचे तळ दिसू लागले आहेत; तर विंधणविहिरीतही खडखडाट झाला आहे. सरकारने ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत; मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे या योजनाचा बोजवारा उडाला आहे. ठेकेदाराने पाये गावात केवळ अर्धा फूट टाकलेली जलवाहिनी नुकतीच श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्त्यांनी उखडून फेकून दिली आहे. पायेप्रमाणेच संपूर्ण तालुक्यातील या योजनेचे पितळ उघडे पडले आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त महिलांनी भिवंडी तालुक्यातील अपूर्ण पाणी योजनांची शोध मोहीम श्रमजीवीचा नेतृत्वाखाली सुरू केली आहे. अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे सागर देसक आणि सुनील लोणे यांनी दिली आहे.