Author: bittambatami.com

सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचा दोनशेहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

ठाणे-  रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, डिस्ट्रीक्ट 3142 व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार सुधागड तालुक्यातील कासारवाडी, नवघर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले होते. यावेळी कासारवाडी, जाधववाडी, नवघर, आसरे, फळसुंडे, धोंडिवली, नवघर बौध्दवाडी, आसरे बौद्धवाडी, उंबरवाडी आदिवासी वाडी गावातील सुमारे 208 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेेतला. 208 रुग्णांपैकी 7 रुग्ण विविध आजारांनी ग्रस्त आढळले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी ठाण्यात डॉ. बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. सन 2000 सालापासून सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीकडून सेक्रेटरी अमित देशपांडे, युवा व्यवस्थापक मोहन तेलंग, माजी अध्यक्ष संग्राम जोशी, अर्चना जोशी, ठाणे शहरातील नावाजलेले शल्य विशारद व सुधागड भूषण डॉक्टर श्रीपाद बोडस, डॉ. नीता पाटील  व रोटरॅक्ट आणि इंट्रॅक्टर्स यांची टीम, व मेडिकल सर्जिकल नर्सेस सोसायटीमधून प्रिया शिंदे, बाबा कराळे, प्रिया तळगावकर आदींच्या टीमने लहान मुले मुली, तरुण मुले, मुली, महिला व पुरुष, ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ पुरुष यांची आरोग्य तपासणी करून विनामूल्य औषध उपचार करण्यात आले. संग्राम जोशी यांनी रुग्णांना विनामुल्य औषधे  उपलब्ध केली. तसेच या शिबिरासाठी प्रकल्प समन्वयक सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ, ठाणे समन्वयक बळीराम निंबाळकर, उपाध्यक्ष वसंत लहाने, प्रचार व प्रसार कमिटी राजेश बामणे, अजय जाधव, भगवान तेलंगे, दत्ता सागळे, जाधववाडी गावचे दिनेश जाधव, कासारवाडी गावचे राजेश मांगले तसेच विशेष सहयोग कासारवाडी, जाधववाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, सह्याद्री मित्र मंडळ, कासारवाडी, प्राथमिक रा.जि.प. शाळा कासारवाडी आदींचे सहकार्य लाभले.

नेहरू कला दालनात कलाकृतींचे प्रदर्शन

मुंबई : नेहरू सेंटर सर्क्युलर कलादालनात सहा ललित कलाकारांच्या एकत्रित कलाकृतींचे ‘अनंत’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ॲक्रेलिक व तैलरंगातील रचनात्मक कलाकृती इथे मांडण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास आपल्या कुशल कुंचल्यातून, शिवप्रेमींसाठी आकाश हाडवळे यांनी चितारला आहे. एक अनोखा कलाविष्कार बाबाजी कदम यांच्या चित्रांतून पाहायला मिळेल. निसर्ग व रुद्र अनुभव एका अनोख्या आकृतीबंधात, वेगळ्या पोतात राजय बोंगाळे हे सादर करत आहेत. गुढता हा कलेचा अविभाज्य भाग ही दिशा मिस्त्री हिच्या चित्रांची खासियत असून, ग्रामीण जीवनाची सफर मयूर पालकर यांच्या चित्रांतून घडून येते. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित महत्त्वपूर्ण प्रसंग किरण होवाळ यांनी साकारले आहेत. कलादालनात आज  सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

आचारसंहितेच्या कचाट्यात शिष्यवृत्ती

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता लागू झालेल्या आचारसंहितेमुळे नवी मुंबई हद्दीतील जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना मागील वर्षाची शिष्यवृत्ती आता थेट पावसाळ्यात मिळणार आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका नवी मुंबईतील गरजू आणि शाळकरी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच चालू २०२४-२५ वर्षातील शिष्यवृत्तीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. धिम्या गतीने पडताळणी आणि कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे विद्यार्थी आणि पालकवर्गाला शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेतर्फे स्वःखर्चातून शहरातील विविध गरीब आणि गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या हद्दीतील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या रकमेचा लाभ मिळतो. त्याकरिता महापालिकेतर्फे दरवर्षी सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्यांत शिष्यवृत्ती योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज आणि पुरावे मागवले जातात. मात्र, २०२३ या वर्षातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच ऑनलाईन अर्जाद्वारे शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु हा निर्णय उशिराने झाल्यामुळे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने उशिरा उपलब्ध झाले. त्यामुळे अर्ज उशिरा आल्यामुळे अर्ज भरण्यासही पालक व विद्यार्थ्यांकडून उशीर झाला. उशिरा आलेल्या अर्जांची छानणी व पडताळणी करण्यात वेळ गेल्यामुळे गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना यावर्षी देण्यात येणार होता. महापालिकेकडे शिष्यवृत्तीकरिता ४० हजार अर्ज आले आहेत. या अर्जांची अद्याप समाजविकास विभागस्तरावर पडताळणी करण्याचे काम सुरू होते. त्यादरम्यान लोकसभा निवडणुकांकरिता आचारसंहिता घोषित झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कर्तव्याकरिता नियुक्त करण्यात आले. समाजविकास विभागाचे बरेचसे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे शिष्यवृत्तीच्या अर्जांची पडताळणी धिम्या गतीने सुरू आहे. तसेच आचारसंहितेमध्ये योजनेचा लाभ देता येत नाही, असे प्रशासनाने गृहित धरून ठेवल्यामुळे आता शिष्यवृत्तीचा लाभ थेट पावसाळ्यात होईल, अशी दाट शक्यता आहे. या घटकांना मिळते शिष्यवृत्ती – विधवा अथवा घटस्फोटीत महिलांच्या मुलांना – आर्थिक व दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना – मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना – महापालिका हद्दीतील प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना – महापालिकेतील आस्थापनेवरील व कंत्राटी सफाई कामगारांच्या मुलांना – शहरातील दगड खाण, बांधकाम, रेती आणि नाका कामगारांच्या मुलांना या योजनाही रखडल्या नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे शहरातील नागरिकांना वेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यापैकी कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या विधवा महिलेला २५ हजार रुपये, विधवा महिलेच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसाह्य ६५ हजार, मागासवर्गीय मुलींच्या विवाहासाठी अर्थसाह्य ५० हजार आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना अर्थसाह्य ५० हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, आचारसंहितेच्या आधी आलेल्या अर्जांवर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही न केल्यामुळे योजनेला पात्र असणाऱ्या नागरिकांचे शेकडो अर्ज विभागनिहाय रखडून पडले आहेत.

इंग्लंड-एशिया इनडोअर क्रिकेट कप स्पर्धेला श्रीलंकेत सुरुवात

भारतीय पुरुष व पुरुष मास्टर्स संघाची घोषणा कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेवर स्पर्धा संचालक म्हणून हिरान डी मेल यांची निवड झाली आहे. हि स्पर्धा इनडोअर अरीना, ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे सुरु झाली आहे. या स्पर्धेत यजमान श्रीलंकेसह, भारत, सिंगापूर असे तीन आशियायी देश व इंग्लंड सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा १८ एप्रिल रोजी या स्पर्धेतील अंतिम सामने खेळवले जातील. भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदी धनुष भास्करची तर उप कर्णधारपदी दैविक रायची (दोघेही कर्नाटक) वर्णी लागली आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी मुंबई, महाराष्ट्राच्या जयेश साळगावकरची निवड झाली आहे. जयेश साळगावकर याआधी सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. विजय गौडा, सुरज रेड्डी, अफरोज पाशा, कार्तिक सुब्रमनिअयन, एम. मल्लिकार्जुन, वैभव गुरुदत्त, अमरसिंग वर्मा, आशिक ख्रिस्त्य, जश जोशी व अधिराज जोहरी. हे सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी झालेल्या वेगवेगळ्या निवड चाचणी स्पर्धांमधून निवड केले आहेत. पुरुष मास्टर्स गटाच्या (४०+) भारतीय संघाच्या कर्णधारपदी प्रसन्ना कुमार (कर्नाटक) तर उप कर्णधारपदी प्रशांत कारीया (महाराष्ट्र) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रशांत कारीयाच्या रूपाने महाराष्ट्राला प्रथमच भारताचे उपकर्णधार पद वाट्याला आले आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी प्रकाश राठोड यांची निवड केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. नरेश खुराना, प्रो. चिरंथना नंजप्पा, अंशुल शर्मा, अभिषेक वेस्ली, केशव रेड्डी, समीर शाह, राकेश चव्हाण, गौरव कांबळी, झुबीन हकीम, डॉ. सुनील मूर्थी यांची निवड करण्यात आली आहे. या भारतीय संघाची घोषणा इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेश (IISF) चे  अध्यक्ष अजय नाईक व सचिव मिलिंद पुंजा यांनी केली.

रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशन झाले सक्रिय

मतदान जनजागृतीसाठी ठाणे : १५० ऐरोली विधानसभा मतदासंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीप (Sveep) जनजागृती कार्यक्रमांतर्गत ११ एप्रिलला त्यांच्या दालनात आयोजित बैठकीस नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.  नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशनच्या प्रतिनिधींना 150 ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रात आपल्यामार्फत मतदानासंदर्भात जनजागृती करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच असोसिएशन मार्फत जनजागृती करुन नागरिकांनाही मतदान करण्याबाबत प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांना अभिप्रेत लोकशाहीसाठी उत्तरदायी-धिरेंद्रमनी त्रिवेदी

 अशोक गायकवाड अलिबाग : संविधानकर्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांना अभिप्रेत लोकशाही साठी निवडणूक यंत्रणेतील आपण त्यांच्याप्रती उत्तरदायी आहोत, असे मत भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमनी त्रिवेदी…

भाईंदर मध्ये स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

भाईंदर : भाईंदरमध्ये दुरुस्ती कामादरम्यान घरातील स्लॅब कोसळून कंत्राटदार आणि कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरिराम चौहान (५५) आणि मखनलाल यादव (२६) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भाईंदर पूर्व येथील ‘श्री नाथ ज्योती’ या इमारतीच्या तळ मजल्यावर राहणाऱ्या विनय कुमार त्रिपाठी यांच्या घरी अंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे कंत्राट त्यांनी हरिराम चौहान यांना दिले होते. दरम्यान रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हे काम सुरु असताना किचन मधील पाण्याच्या टाकीला लागून असलेल्या भिंतीचा स्लॅब अचानक खाली कोसळला. या ढिगार्‍याखाली कंत्राटदार हरिराम चौहान आणि कामगार मखनलाल यादव व आकाश यादव अडकले होते. याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच जवानांनी तिघांना ढिगार्‍यातून काढून रुग्णालयात हलवले. मात्र यात हरीनाम चौहान आणि मखनलाल यादव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. तर आकाश यादव हा यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संरचनात्मक अहवाल सादर करण्याचे आदेश. भाईंदर मधील इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेतील इमारत ही पाच मजली असून ती फारच जुनी झाली आहे. त्यामुळे इमारतीचा संरचनात्मक अहवाल काढण्याचे आदेश मिराभाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी दिले आहेत.

अग्निशमन दिनानिमित्त शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

नवी मुंबई : अग्निविमचनाचे काम करीत असताना आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या शहीदांचा सन्मान ठेवणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या स्मृतींपासून अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते असे सांगत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहीद‌ अग्निशमन जवानांच्या  स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करीत भावपूर्ण आदरांजली दिली. नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने वाशी अग्निशमन केंद्रात अग्निशमन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आयुक्तांनी उपस्थित अग्निशमन जवानांशी संवाद साधला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 5 अग्निशमन केंद्राद्वारे शहर सुरक्षिततेची जबाबदारी आपले अग्निशमन दल पार पाडत असून आपत्तीनंतर आपत्ती निवारणाचे कार्य करण्यासोबतच आपत्ती उद्भवूच नये याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. मागील वर्षी पावसाळी कालावधीत इरशाळवाडी येथे आपत्तीप्रसंगी मदतकार्य करताना वीरगती प्राप्त झालेले नवी मुंबई महानगरपालिकेचे सहा. अग्निशमन केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांच्याही सेवाभावी समर्पित कार्याचे स्मरण याप्रसंगी आयुक्तांनी केले. यावेळी आयुक्तांप्रमाणेच उपस्थित अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार तसेच अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी श्री शिरीष आरदवाड, शहर अभियंता श्री संजय देसाई, उप मुख्य अग्निशमन अधिकारी श्री पुरुषोत्तम जाधव, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री सागर मोरे, कार्यकारी अभियंता श्री अजय संख्ये, अग्निशमन केंद्र अधिकारी श्री जे टी पाटील व श्री जी एस सुसवीरकर आणि इतर अग्निशमन अधिकारी यांनी शहीद वीरांच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये एस एस फोर्ट स्टिकीन या जहाजाला लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलातील 66 जवानांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन अग्निविमोचनाचे कार्य केले. या शहीद जवानांना तसेच त्यानंतरही अग्नीविमोचनाचे कार्य करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीद जवानांना भावपूर्ण अभिवादन करीत 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून पालन करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून 14 ते 20 एप्रिल 2024 या कालावधीत संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स, मोठ्या सोसायट्या, हॉस्पिटल्स, शाळा – महाविद्यालये, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अग्निसुरक्षतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तसेच विविध ठिकाणी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे

डॉ.‌ बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात अभिवादन

ठाणे : डॉ.‌ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी  जिल्हा परिषद ठाणे येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभाग प्रमुख संजय बागुल तसेच  समाज कल्याण विभाग, महिला व बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जोपर्यंत भारत देश अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान अबाधित राहील – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : जोपर्यंत भारत देश अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान अबाधित राहिल. भारत देशाची एकात्मता आणि अखंडता ही बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे. आजच्या दिवशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करीत असताना परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मंत्र, हा विचार अधिकाधिक प्रसारित करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना काढले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानलव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, १४ एप्रिल, २०२४ रोजी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, झेड विंग, फ्लॉवर व्हॅली कमर्शियल कॉम्प्लेक्स, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम) येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच कोर्टनाका, ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अभिवादन केले. यावेळी ‘भारतीय संविधान निर्माते डाॅ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे’, ‘डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ या राष्ट्रवादी काँग्रेस कार्याकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी कोर्ट नाका परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस रविंद्र पालव, परिवहन समिती सदस्य मोहसीन शेख, नितीन पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजय सावंत, दिनेश मेहरोल, मनोज कोकणे, अतुल कदम, संतोष सहस्त्रबुद्धे, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, समीर पेंढारे, निलेश फडतरे, शंकर कोळेकर, निलेश कापडणे, प्रभाग अध्यक्ष समीर शेख, साहिल सुर्यवंशी, महिला विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी, अरुणा पेंढारे, वंदना खानोलकर, ब्लॉक अध्यक्षा शामा भालेराव, लक्ष्मी वैती, प्रिया वाघेरा, मनिषा कांबळे, राणी कटारनवरे, पुजा खोपडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष हुसेन मणियार, सोशल मिडीया सेल अध्यक्ष कल्पेश मिठबावकर, विद्यार्थी विधानसभा अध्यक्ष केतन माने, विद्यार्थी ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, विद्यार्थी पदाधिकारी मुर्शिद खान आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.