Author: bittambatami.com

ठाणे येणाऱ्या १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कोर्ट नाका येथे बाजारात बाबासाहेबांच्या फोटो,मेसेज, सहीचे टीशर्ट आणि पेन आले असून अनुयायां मध्ये आकर्षण आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. (फोटो-प्रफुल गांगुर्डे)

कर्जत मध्ये नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन

कर्जत : भूमापन दिनानिमित्ताने भूमि अभिलेख विभाग, कर्जत उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करणेत आले. कर्जत उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात बुधवार, (दि.१० एप्रिल २०२४) रोजी भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला आहे. मोजणी साहित्य पूजन करणेत आले व यामध्ये प्लेन टेबल, ईटीएस मशीन, आत्याधुनिक रोवर मशीन इ. साहित्य पूजन करणेत आले. लोकांना, व शेतकरी यांना मोजणी साहित्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. भूमापन दिनानिमित्ताने भूमि अभिलेख विभाग, कर्जत उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करणेत आले. याप्रसंगी मुख्यालय सहाय्यक श्रीमती उज्वला अहिरे, शिरस्तेदार शैलेश जाधव, निमतानदार नंदकिशोर कोळी, छाननि लिपिक निलेश हराळ, भूकरमापक दत्तात्रय पाटील, कृष्णा गायकवाड, ऋषिकेश नाईक, यश जाधव, अण्णासाहेब सोमवशी, संजय गायकवाड, श्रीमती स्मिता भोसले , दुरुस्ती लिपिक दत्तात्रय कदम, कनिष्ठ लिपिक अश्विनी पोळ, नगर भूमापन लिपिक अपेक्षा भोईर, दप्तरबंद अविनाश पडवळ व इतर कर्मचारी तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. भूमि अभिलेख विभागाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. १० एप्रिल १८०२ रोजी त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात ब्रिटिश काळात झालेली होती. कारण तेव्हापासून १० एप्रिल भूमापन दिन म्हणून ओळखला जातो. शासनाने कर्जत कार्यालयास पहिल्या ३ व आता ५ रोवर मशीन पुरविले असून आता सर्व मोजणी कामकाज रोवर मशीनद्वारे होणार असून अत्यंत अचूक व गतीमान कामकाज होणार आहे. तसेच लवकरच कर्जत कार्यालयात ई मोजनी व्हर्जन-२ प्रणाली लागू होणार आहे. त्यात जनतेला आपला मोजणी अर्ज आपल्या घरून मोबाईलवरुन सुद्धा मोजणी अर्ज दाखल करता येणार असून ‘क’ प्रत सुद्धा अर्जदार यांना ई-मेलवर मिळणार आहे. याबाबत उपसंचालक भूमि अभिलेख कोकण प्रदेश, मुंबई जयंत निकम यांनी व्हर्जन-२ बाबत सतत आढावा घेवून तात्काळ ते जनतेला वापरासाठी उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सचिन इंगळी यांनी मार्गदर्शन केले आहे. उप अधीक्षक भूमि अभिलेख, कर्जत नितीन आटाळे यांनीही मार्गदर्शन करीत शंकांचे निरसन केले.

आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्नशील-किशन जावळे

अलिबाग : आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या जनजागृती कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे बोलत होते. जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोली भाषेतील पथ नाट्याद्वारे मतदार जन जागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सिद्धेश्वर बु.येथे या मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्याने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हा पथदर्शी उपक्रम राबविला जात आहे. आदिवासी समाजाची युवक आणि प्राथमिक शिक्षक हे पथनाट्य सादर करीत आहेत. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक सिद्धेश्वर बु. येथे आयोजित या कार्यक्रमासाठी निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसीलदार उत्तम कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, आदिवासी वाड्या वस्त्या, गावे येथील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र मतदार दूत नेमण्यात येणार आहे. या दुता मार्फत गावातील प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्वाना भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीड पणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केले. आदिवासी बहुल गावामधील मतदार काम व नोकरीसाठी कुठल्या आस्थापनांमध्ये जात असतील तरी तेथे सुट्टी देण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. सर्व आदिवासी मतदारांना भर पगारी सुट्टी किंवा सवलत देण्याबाबत कळविण्यात येईल असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. या पथनाट्याचे लेखन /दिग्दर्शक राजू लहू बांगारे यांनी केले आहे. तसेच गीतकार दामोदर शिद, वादक सतिश खाणेकर आहेत. या पथनाट्यात राजू बांगारे, दामोदर शिद, ज्ञानेश्वर शिद, गणपत पारधी, साई बांगारे, श्रेयश वारगुडे, वेदांत शिंदे यांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले. जिल्ह्यातील ११ तालुक्यातील वाडया, वस्ती, गावामध्ये पथनाट्य आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. मतदानाच्या जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाबद्दल त्यांनी माहिती दिली.

उमेदवारांच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर लक्ष ठेवा-एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : रत्नागिरी येथील जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती माध्यम कक्षाला ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी भेट देऊन कामकाजाबाबत…

नवी मुंबईतील बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद

एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय नवी मुंबई : एनएमएमटीने बस थांब्यावर लावलेले डिजिटल फलक पुन्हा बंद पडले आहेत. त्यामुळे बस संबंधित बस थांब्यांवर नेमके कधी येईल हे प्रवाशांना कळत नाही. असा प्रकार वारंवार होत आहे. त्यामुळे जोशात सुरू करण्यात आलेला चांगल्या उपक्रमात सातत्य राखण्यातील दुर्लक्षामुळे अपयश येत असल्याचा आरोप केला जात आहे. एनएमएमटी प्रशासनाने २०१८ मध्ये आयटीएमएस या प्रणालीद्वारा शहरातील १०० बस थांब्यांवर डिजिटल फलक लावण्यात आले होते. ज्यामुळे त्या बस थांब्यांवरून जाणाऱ्या सर्व एनएमएमटी बस कुठल्या मार्ग क्रमांकाची आणि किती वाजेपर्यंत येईल हे सहज समजत होते. त्यामुळे प्रवाशांना त्याचा चांगलाच फायदा होत होता. विशेष म्हणजे एखादी बस ५-७ मिनिटांत येणार असेल आणि नेमके त्याच वेळेस बेस्ट वा अन्य शहर वाहतूक बस आल्या तर प्रवासी त्या बसने जाण्याचे टाळत होते. याच कारणाने प्रवासी संख्याही वाढत होती. दोन-अडीच वर्षे हा उपक्रम व्यवस्थित सुरू होता. मात्र त्यानंतर हळूहळू करीत एक-एक डिजिटल फलक बंद पडत गेले. याबाबत २०२२ डिसेंबरमध्ये ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त आल्यावर त्याची दखल घेत एनएमएमटी प्रशासनाने ते पुन्हा सुरू केले. मात्र गेल्या काही आठवड्यापांसून अनेक बस थांब्यांवरील डिजिटल फलक पुन्हा बंद पडले आहेत. २०१८ मध्ये ९ कोटींचा खर्च करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र २०२२-२३ मध्ये हे फलक बंद पडले त्यावेळी नव्याने घेतलेल्या बसगाड्यांमध्ये फोर जी स्पेक्ट्रम प्रणाली होती आणि डिजिटल फलकासाठी वापरण्यात येणारी प्रणाली ही टू जी स्पेक्ट्रमची होती. त्यामुळे फोरजी प्रणाली टूजी प्रणालीला सहाय्यकारी ठरत नव्हती. मात्र त्यात तांत्रिक दुरुस्ती वा अद्यायावत केले जात नव्हते. याबाबत अनेक तक्रारी आल्यावर प्रणाली अद्यायावत करण्यात आली. मात्र आता पुन्हा हे फलक बंद पडले आहेत. याबाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने आता काही सांगू शकत नाही, असे सांगण्यात आले. तर व्यवस्थापक याच्याशी संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

भाजपा राज्यस्तरीय पक्षांना मगरीसारखा गिळून खातो- जितेंद्र आव्हाड

ठाणे: भाजप हा राज्यस्तरीय पक्ष टिकून देत नाही. त्यांनी ज्या ज्या पक्षांबरोबर युती केली, ते पक्ष मगरी सारखे गिळून टाकल्याची टिका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. भाजपचे चाल आणि चरीत्र फार वेगळे आहे. ते दाखवतात एक आणि करतात एक अशी त्यांची निती असल्याची टिकाही त्यांनी केली. ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टिका केली. ठाणे आणि कल्याणच्या जागेवरुन आव्हाड यांना छेडले असता त्यांनी ही टिका केली. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या रक्ताच्या आहेत, आणि त्यांना जर राजकीय फायदा घ्यायचाच असता तर त्यांनी सुप्रिया सुळे पवार असे नाव लावले असते. त्यात अशा निवडणुका या कर्तुत्वावर लढवाव्या लागतात. तुमचा लोकसभेमधील परफॉर्मस काय यावर लढविल्या जातात असेही ते म्हणाले. निवडणुकीचे काहीच मुद्दे राहिलेले नसल्याने आणि तुम्हाला आता कॉनीफडेन्स आलेला असून आता आपले काहीच चालू शकत नाही, हे कळून चुकले असल्यानेच असे मुद्दे काढत असल्याची टिकाही त्यांनी अजित पवार यांच्यावर केली. विकासाच्या मुद्यावरुन भाजपला निवडणुका लढवायच्याच नाहीत, दोन कोटी नोकऱ्या देणार होते, काय झाले? आज ८३ टक्के युवक बेरोजगार आहेत, याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केला. हिंदु, मुस्लिम सोडून भाजप कोणताच प्रचार करीत नसल्याचेही ते म्हणाले. विविध नोकºयांसाठी परप्रातींय राज्यात आलेले आहेत. मराठी माणसाला आता कुठेच स्थान राहिलेले नसल्याचे सांगत, ज्या दिवशी मराठी माणसाला ५० खोक्यांना विकले त्या दिवसापासून मराठी माणसाचे स्थानही गमावले गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाजपवाल्यांना हे लक्षात आले आहे की हे पैशांसाठी हापहापले असून त्यांना पैसे टाका आणि विकत घ्या असे सुत्र आजमावले जात असल्याचेही ते म्हणाले. निवडणुकीत खुले आम अमिषे दाखविले जात असल्याबाबत त्यांना छेडले असता, बेशीस्तपणाने भाजपवाले वागत असून निवडणुक विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. निवडणुक विभाग हे भाजपवाल्यांच्या हातचे बाहुले झाले असल्याची टिकाही त्यांनी केली. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की ही जागा आपल्यालाच मिळावी, त्यातून रुसवे फुगवे होत असतात. परंतु वरीष्ठ नेते त्यांची मनधरणी करतील असेही ते म्हणाले. तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, म्हणून शरद पवार हे संकोचित आहेत असे म्हणावे लागत असल्याचे सांगत आव्हाड यांनी प्रफुल पटेल यांच्यावर टिका केली. आजही पटेल यांना शरद पवार यांचे नाव घेऊन चर्चेत राहावे लागत असल्याचेही ते म्हणाले.

शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीम

 स्थलांतरित, असंघटित कामगारांना मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेमधील १९ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जास्तीत जास्त स्थलांतरित किंवा असंघटित कामगारांना शिधापत्रिकांचे वितरण करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम एप्रिल ते मे  या दोन महिन्यांच्या कालावधीत राबविली जात आहे. या प्रक्रियेमध्ये प्रचलित नियमानुसार पडताळणी किंवा तपासणी करून स्थलांतरित व असंघटित कामगारांना उचित शिधापत्रिका वितरित करुन शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ तत्काळ देण्यात यावेत, अशा सूचना क्षेत्रीय यंत्रणेस देण्यात आलेल्या आहेत. ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबविण्यात येत असल्याने जास्तीत जास्त स्थलांतरित व असंघटित कामगारांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण  विभागाने केले आहे.

महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद

लोकसभा निवडणूक 2024 मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांमध्ये ९८ हजार ११४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. याशिवाय १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांबरोबरच १० टक्के अधिक अशा एकूण २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या त्याचबरोबर मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात पोहोच करण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरु आहेत. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये पावणे ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे. मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

भिवंडीत तिरंगी लढत; निलेश सांबरे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित केली होती. या जागेवर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे काँग्रेसतर्फे इच्छुक होते. मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने निलेश सांबरे यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी मिळवली. वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक खात्यावरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्यासमोर आता सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले निलेश सांबरे यांचेही आव्हान उभे टाकले आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे कल्याण आणि भिवंडी या तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये कशी लढत होईल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वैशाली दरेकर…

कल्याण-डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे आदेश कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ३६० कोटींची २४ कॉँक्रीट   रस्त्यांची आणि पालिकेतर्फे सात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामधील सुरू असलेली आणि प्रस्तावित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा आणि प्रवाशांना पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा कोणताही त्रास होणार नाही असे नियोजन करा, असे आदेश आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिका, एमएमआरडीए अधिकाऱ्यांंना पालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत दिले. विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. एमएमआरडीएची सर्वाधिक कामे पालिका हद्दीत सुरू आहेत. ही कामे करताना अनेक वेळा प्रवाशांना वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. नोकरदार वर्ग, शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता सुरू असलेली काँँक्रीट रस्ते कामे, इतर रुंदीकरणाची कामे लवकर पूर्ण करा, असे आदेश आयुक्त डॉ.जाखड यांनी अधिकाऱ्यांना दिले. टिटवाळा ते हेदुटणे बाह्य वळण रस्ते मार्गातील दुर्गाडी किल्ला, गोविंदीवाडी ते मोठागाव या तिसऱ्या टप्याच्या कामातील भूसंपादन आणि अतिक्रमणे, इतर अडथळे दूर करून हे काम गतीने सुरू करा. पालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने हे काम पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. महानगर गॅसला सूचना महानगर गॅसकडून डोंबिवलीत विविध भागात वाहिनीव्दारे गॅस पुरवठा करण्यासाठी सोसायट्यांमध्ये वाहिका टाकण्याची कामे केली जात आहेत. ही कामे करताना महानगर गॅसचा ठेकेदार मनमानेल तशी खोदाई करतो. सोसायटी आवारात वाहिका टाकण्यासाठी केलेले खोदकाम, तोडकाम सुस्थितीत न करता निघून जात असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेत दाखल झाल्या आहेत. महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ठेकेदाराला ही कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याची सूचना करावी, असे आयुक्तांनी सूचित केले. रोहित्र स्थलांतर, मल, जल निस्सारणाची शहराच्या विविध भागात सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करा. पावसाळा सुरू झाल्यानंतर कोणतेही काम सुरू राहणार नाही याची काळजी घ्या, असे आयुक्त जाखड यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीला पालिका शहर अभियंता अनिता परदेशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंंता अर्जुन कोरगावकर, कार्यकारी अभियंता अरविंद ढाबे, भगवान चव्हाण, लोकेश चौसष्ठे, पालिकेचे कार्यकारी अभियंता मंगेश सांगळे, जगदिश कोरे, शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी, उपायुक्त प्रसाद बोरकर, रमेश मिसाळ, साहाय्यक आयुक्त, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार उपस्थित होते. पालिका हद्दीत सुरू असलेली, प्रस्तावित असलेली सर्व काँक्रीट रस्ते कामे आणि इतर विभागांची कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्वी पूर्ण करा. पावसाळ्यात प्रवाशांना या कामांंमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. – डॉ. इंदुराणी जाखड, आयुक्त.