Author: bittambatami.com

ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे तर विरोधी पक्ष नेतेपदी अशरफ शानू पठाण

ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे तर विरोधी पक्ष नेतेपदी अशरफ शानू पठाण अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी शिवसेनेचे हणमंत जगदाळे तर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अशरफ ऊ शानू पठाण यांची निवड झाल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत केली. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी सभागृह नेते हणमंत जगदाळे व विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना पक्षाचे गटनेते पवन कदम, भारतीय जनता पार्टीचे गटनेते मुकेश मोकाशी, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला, एमआयएमचे सरफराज खान ऊर्फ सैफ पठान यांचेही पुष्पगुच्छ देवून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अभिनंदन केले.

स्वाभिमान व समता शिवरायांच्या स्वराज्याचे सूत्र – कैलाश देसाई

स्वाभिमान व समता शिवरायांच्या स्वराज्याचे सूत्र – कैलाश देसाई अनिल ठाणेकर सांगली – ‘बंधुता, स्वाभिमान व समता हेच शिवरायांच्या स्वराज्य पायाभरणीचे सूत्र होते. शिवरायांनी घालून दिलेली स्वराज्याची आदर्श नैतिक मूल्ये आजच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारावीत’, असे प्रतिपादन शिवशंभु प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक  कैलाश देसाई यांनी केले. मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या इतिहास विभागामार्फत आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी राजांचे सांस्कृतिक धोरण व आजची दशा’ या विषयावरील व्याख्यानामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर होते.  कैलाश देसाई पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते.  शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही.  आपल्या राजकीय विरोधकांच्या आईचा, पत्नीचा, मुलांचा, बहिणींचा आदर, सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते. परंतु आजचे राज्यकर्ते अगदी खालच्या पातळीवर येऊन विरोधकांच्या कुटुंबीयांवर टीका करतात. जाती-जाती धर्मा-धर्मात द्वेष पसरवण्याचे काम करतात. वतनदारी व जहागीरदारी व्यवस्था शिवरायांनी संपविली. परंतु आजचे राज्यकर्ते नवसरंजामदार बनले आहेत. आजची राज्यव्यवस्था शिवरायांच्या स्वराज्याच्या विचाराला व लोकशाहीला घातक आहे. राजकारण करणाऱ्यांनी शिवरायांच्या नावे मतांचा जोगवा मागू नये. सर्व जाती धर्मीयांचा मानसन्मान ठेवावा. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे आधुनिक लोकशाहीचा पायाच होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांच्या स्वराज्याचे संविधानात रूपांतर केले. शिवरायांचा ध्वज गेरू व मातीच्या रंगाचा आहे तो ध्वज वारकरी आहे. वारकरी परंपरेचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.” अध्यक्ष डॉ. बेलवटकर म्हणाले. “पर्यावरण रक्षण, शेती सुधारणा व लोककल्याणकारी कामे शिवाजी राजांनी घडवून आणली. त्यांच्या आज्ञापत्रातून स्वराज्याची आदर्श मूल्ये दिसून येतात.स्वराज्याला नैतिक अधिष्ठान शिवरायांनी मिळवून दिले. त्यांनी कधीच आत्यंतिक धर्मवाद जोपासला नाही. कर्मकांड व अंधश्रद्धा विरोध केला.”कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. राम घुले यांनी केले. या निमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कल्याणी साळुंखे, द्वितीय क्रमांक अक्षय पाटील व तृतीय क्रमांक तृप्ती गोंधळी यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षक प्रा. संध्या साठे व प्रा. स्वाती चौधरी होते. बीए भाग एकच्या विद्यार्थ्यांनी  शिवबाचा पाळणा व पोवाडा सादर केला.छत्रपती शिवाजी राजे व स्वराज्याची राजचिन्हे या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.  त्यामध्ये प्रथम क्रमांक आरती चव्हाण, द्वितीय क्रमांक श्रावणी पाटील व तृतीय क्रमांक करुणा काळे यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. शैलजा पाटील व प्रा. उत्तरा पाटील यांनी केले. प्रथम तीन क्रमांकांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व रोख रक्कम देण्यात आली. विद्यार्थिनींनी शिवकालीन वेशभूषा परिधान केली. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन करुणा काळे यांनी केले. प्रा. के. बी. पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिव पदयात्रा इस्लामपूर शहरात काढण्यात आली. प्रा वर्षा पाटील यांनी पदयात्रेचे संयोजन केले. महाविद्यालयाचा शिक्षक वर्ग व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी नवी मुंबई: स्वच्छता, सामाजिक न्याय आणि सुधारणांवर भर देणारे आधुनिक संत म्हणून नावजले गेलेल्या संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, नगरसेविका माधुरी सुतार, सायली शिंदे, शैला पाटील, प्रिती भगत, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त अमोल पालवे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, मुख्य विधी अधिकारी  अभय जाधव, कार्यकारी अभियंता  तानाजी शिंदे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

  उल्हासनगरात बुद्ध विहारांचे राष्ट्रीय अधिवेशन

उल्हासनगरात बुद्ध विहारांचे राष्ट्रीय अधिवेशन डॉ. भदंत उपगुप्त महास्थवीर अधिवेशन अध्यक्ष तर डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर प्रमुख पाहुणे ठाणे : (प्रतिनिधी) बुध्द विहार समन्वय समिती द्वारा आयोजीत बुध्द विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन २८ फेब्रुवारी आणि १ मार्च, २०२६ रोजी शहीद जनरल अरूण कुमार वैद्य टाऊन हॉल, उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे, कोंकण विभाग मध्ये आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूजनीय डॉ. भदंत उपगुप्त महास्थविर (पूर्णा जिल्हा परभणी) हे अधिवेशनाचे अध्यक्ष राहणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन, कामगार नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) चे राष्ट्रीय अध्यक्ष शामदादा गायकवाड करतील. मुख्य अतिथी भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर राहतील. अतिथी म्हणून महाबोधी बुद्ध गया मुक्ती आंदोलन नेते आकाश लामा, तामिळनाडू बौध्द नेते जी. मोहनन, राजस्थान चे विचारवंत भेरुलाल नामा, बुद्धीस्ट समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष उमेश नागदिवे राहतील. दिल्ली विद्यापीठ दिल्लीच्या प्रोफेसर डॉ. हेमलता महिश्वर महीला चर्चासत्र, पणजी (गोवा) येथील संबोधी ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. उल्हास आंबेडकर (चांदेलकर) हे युवा सत्राचे, ठाणे येथील समन संघाचे राजेश कांबळे हे डिस्कशन प्यानलचे, बुध्द विहार समन्वय समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा. घनशाम धावर्डे हे प्रतिनिधी सत्राचे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध हे समारोप सत्राचे अध्यक्ष पद भूषवणार आहेत. बुध्द विहाराचे समन्वयात महिला, युवक, युवती, धम्म प्रचारक, विचारवंत यांची भूमिका या विषयावर चर्चा होईल. मुख्य आयोजक अशोक सरस्वती बौध्द यांचे नेतृत्वात शंभर कार्यकर्त्यांची आयोजन समिती अधिवेशन यशस्वी करण्यासाठी परिश्रम करीत आहे, अशी माहिती संयोजन समिती सदस्य प्रा. राजेश सोनवणे यांनी दिली.

 अखेर पाच वर्षानंतर महिलांना मिळाला न्याय

अखेर पाच वर्षानंतर महिलांना मिळाला न्याय सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांचा पाठपुरावा मुंबई / रमेश औताडे दावडी.ता.खेड येथील जमीन गट नं ३२४/१/क व ३२४/५ मधील साडेचार एकर क्षेत्राचा ताबा गेली पाच वर्षे चांगुणाबाई गव्हाणे व राणी गव्हाणे यांना मिळत नव्हता. प्रशांत बेडसे  तहसीलदार खेड यांच्या १५ सप्टेंबर २०२३ च्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. याबाबत प्रशांत बेडसे तहसीलदार, डॉ.नितीन सुर्यवंशी भुमी-अभिलेख उप अधिक्षक खेड यांच्या सहकार्याने व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या पाठपुराव्यानुसार ताबा प्रक्रियेची अंमलबजावणी आज दावडी येथे करण्यात आली. यावेळी उप अधिक्षक भूमी-अभिलेख डॉ.नितीन सूर्यवंशी,निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे,माणिक गायकवाड मंडल अधिकारी पिंपळगाव,भुकरमापक नामदेव कोल्हे व महसूल खात्याचे कर्मचारी उपस्थित होता.खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केली होती.यावेळी चांगुणाबाई गव्हाणे व प्रतिवादींमधील वादाचे सामंजस्याने निराकरण करण्यात आले. खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचा सत्कार करताना अशोकराव टाव्हरे व ग्रामस्थ उपस्थित होते. चांगुणाबाई गव्हाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲड वासिम सामलेवाले यांचेमार्फत रिट याचिका दाखल केली होती.सरकारी अभियोक्ता यांनी १८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयास सात,दिवसात ताब्याची अंमलबजावणी करण्याबाबत लेखी पत्र दिले होते. प्रशांत बेडसे तहसीलदार खेड यांनी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्याशी चर्चा करून गव्हाणे यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. २० फेब्रुवारी रोजी हद्द दाखवून ताबा देण्याची प्रक्रीया उपअधिक्षक भूमी-अभिलेख खेड नितीन सूर्यवंशी,निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्या उपस्थितीत पुर्ण करण्यात आली.

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार देण्यात यावा

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार देण्यात यावा बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र व तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघातर्फे साजरी, शासकीय यंत्रणेला मात्र विसर पडल्याचे चित्र पोंभुर्ले – पत्रकारांचे दैवत तसेच आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ वी जयंती आज २० फेब्रुवारी रोजी पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जांभेकर यांचे पोंभुर्ले येथील वंशज सुधाकर रामचंद्र जांभेकर व कुटुंबीय उपस्थित होते. मात्र शासकीय यंत्रणेला पोंभुर्ले येथील स्मारकाच्या ठिकाणी येवून अभिवादन करण्यासाठी विसर पडल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. २० फेब्रुवारी रोजी थोर महापुरुष व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ व्या जयंती निमित्ताने पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. त्यामुळे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची जयंती शासन पातळीवर सर्वच ठिकाणी साजरी झाली पाहिजे होती. मात्र बाळशास्त्री जांभेकरांच्या मूळ गावी पोंभुर्ले येथे खरं म्हणजे शासनाच्या वतीने अभिवादन झाले पाहिजे होते, मात्र शासनाची यावेळीं उदासीनता दिसून आली. शासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी या थोर महापुरुषांच्या जन्मस्थानी फिरकले देखील नसल्याची खंत जर्नालिस्ट युनियन ऑफ  महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नारायण पांचाळ यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी हाच दिवस जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्रित आणून जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली होती. दरवर्षी येथे जयंती साजरी करण्यात येईल अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली होती. मात्र यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांना व शासकीय यंत्रणेला याचा विसर पडला अशी भावना जांभेकर कुटुंबीयांनी व्यक्त करुन याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस पत्रकार राजेंद्र साळसकर, खजिनदार सतिश साटम, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार उदय दुधवडकर, सचिव संजय खानविलकर, महाराष्ट्र जर्नालिस्ट युनियनचे सिंधुदुर्ग अध्यक्ष गणेश चव्हाण, सुनिल आचरेकर, बाजीराव जांभेकर, दळवी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत  हाटकर आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. पत्रकारितेचे संस्थापक व समाजातील सुविचारांचे व्यासपिठाचे जनक असलेले तसेच समाजाचा आरसा पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना  मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा. बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने कोकणात पत्रकारितेचे विद्यापीठ व्हावे. पोंभुर्ले गांवास जागतिक दर्जाचे प्रेक्षणीय व माहिती स्थळ म्हणून मान्यता मिळावी. अशा मागण्या शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे   जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष पांचाळ यांनी सांगितले. फोटो ओळी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मारकात त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जर्नालिस्ट युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ, राज्य सरचिटणीस राजेंद्र साळसकर, सुधाकर जांभेकर, सतीश साटम, उदय दुधवडकर, संजय खानविलकर, गणेश चव्हाण, बाजीराव जांभेकर, प्रा.प्रशांत हटकर व इतर

वन समितीच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यास मदत

वन समितीच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यास मदत मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाच्या माध्यमातून वन संरक्षण समिती कार्यरत असते. सत्ताधारी गटाच्या मर्जीतील विश्वासू कार्यकर्ते या समितीवर उत्तम प्रकारे विकास कामे करण्यासाठी नेहमीच सज्ज असतात.एकूण वीस सदस्यांची या समितीवर निवड केली जाते. जोपर्यंत सत्ताधारी गट नगरपरिषदेच्या सभागृहात अस्तित्वात असतो तोवर नेमून दिलेले कार्यकर्ते यामध्ये पन्नास टक्के महिला सदस्य असतात.ही सर्व मंडळी एकदिलाने कामे करत असतात. दस्तुरी वाहन पार्किंगच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या समितीला प्राप्त होते. त्यातूनच काहीवेळा वृक्षारोपण, ठराविक पॉईंट्सची सुरक्षा व्यवस्था, कचराकुंडी लावणे अशी महत्वपूर्ण कामे समितीचे पदाधिकारी, सदस्य करीत असतात. विशेष म्हणजे ही सर्व मोठया रक्कमेची  कामे करताना कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. समितीचे पदाधिकारी,सदस्य ह्यांच्या सामोपचारातुन कामे पूर्ण करून गावाच्या विकास कामात मदत होत असते. लाखो रुपयांची शिल्लक आजही जमा असल्याने यावेळी गावातील एकूण पाच गरजवंत महिलांना स्वच्छता कामे दिली आहेत.याकामी दर महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपये पगाराच्या रूपाने या पाच महिलांना दिला जात आहे.प्लास्टिक मुक्ती त्याचप्रमाणे अन्य कचरा गोळा करण्यासाठी वन संरक्षण समितीने पुढाकार घेतला असून स्वच्छता राखण्यासाठी मदत होत आहे.यापुढे नव्याने स्थापन होणाऱ्या समितीवर सत्ताधारी गटाने बारकाईने लक्ष केंद्रित करून गावाच्या हिताच्या दृष्टीने जी काही लाखो रुपयांची शिल्लक रक्कम आहे त्याचा सदुपयोग विकास कामांसाठी करावा अशी स्थानिकांमधून मागणी केली जात आहे.

  १३४ औद्योगिक भूखंडांवरील उद्योग बंद

१३४ औद्योगिक भूखंडांवरील उद्योग बंद विहित कालावधीत उत्पादन न झाल्यास भूखंड ताब्यात घेणार कल्याण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत उद्योजकांना औद्योगिक विकासाच्या उद्देशाने विकसित भूखंडांचे वाटप करण्यात येते. सदर भूखंड धारकांनी करारातील अटी व शर्तीप्रमाणे विहित कालावधीत आवश्यक परवानग्या प्राप्त करून उद्योग सुरू करणे व प्रत्यक्ष उत्पादनात जाणे बंधनकारक असते. या अनुषंगाने, प्रादेशिक कार्यालय, ठाणे–२ यांच्या पथकाकडून अंबरनाथ, कल्याण, भिवंडी व मुरबाड तालुक्यांतील अंतर्गत औद्योगिक क्षेत्रामध्ये पाहणी व सर्वेक्षण करण्यात आले. या पाहणीअंती एकूण १३४ भूखंडांवरील उद्योग बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित भूखंड धारकांनी अद्यापपर्यंत आवश्यक शासकीय परवानग्या प्राप्त करून उद्योग सुरू केलेला नाही किंवा उत्पादन प्रक्रिया सुरू केलेली नाही, असे आढळून आले आहे. करारनामा व लागू नियमांनुसार भूखंडाचा उद्देशपूर्ण वापर न केल्यास किंवा निर्धारित मुदतीत उत्पादन सुरू न केल्यास संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार, संबंधित भूखंड धारकांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे. विहित कालावधीत समाधानकारक खुलासा न मिळाल्यास किंवा उद्योग प्रत्यक्ष सुरू न झाल्यास, संबंधित भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ताब्यात घेणार आहे. त्यानंतर नियमावलीनुसार व पारदर्शक पद्धतीने सदर भूखंड गरजू व पात्र उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या मिलाप  पोर्टल वरून ऑनलाइन पद्धतीने पुनर्वाटप करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे औद्योगिक क्षेत्रातील निष्क्रिय भूखंडांचा प्रभावी वापर होऊन स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व औद्योगिक विकासास चालना मिळण्यास मदत होईल, अशी माहिती प्रादेशिक कार्यालय, ठाणे–२ यांच्याकडून देण्यात आली आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेत १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक

नवी मुंबई महानगरपालिकेत १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक नवी मुंबई : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(२)(ब) अन्वये नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी नामनिर्देशनाव्दारे १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक रण्यात आल्याचे जाहीर केले. या १० नामनिर्देशित सदस्यांमध्ये  कुलदिप सुरी, भरत नखाते, जगजीवन केणी, अपर्णा गवते, अमित मेढकर, लक्ष्मीकांत पाटील, व्दारकानाथ भोईर, साहिल चौगुले, सुरेश भिलारे, अंकुश कदम यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले. नियुक्त नामनिर्देशित सदस्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर  दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देउुन अभिनंदन केले.