Author: bittambatami.com

जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी – रोहन घुगे

  ठाणे : प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले, कार्यकारी अभियंता कदम आणि केंद्रप्रमुख खोणी हे उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार, प्राथिमक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यात कायमर्यादित अभियान राबवणे आवश्यक आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत शाळांमध्ये DIET व VOPA यांच्या मदतीने FLN अंतर्गत प्रोजेक्ट दिशा उपक्रम विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी हाती घेतलेला आहे. प्रोजेक्ट दिशाची शाळा स्तरावरील अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काल प्रत्यक्ष कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पिंपरी, खोणी, नागाव या शाळांना भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात जुलै २०२४ व ऑगस्ट २०२४ या महिन्यामध्ये जिल्हास्तरीय शिक्षण परिषद देखील घेण्यात आलेल्या असून त्यामध्ये उपक्रम यशस्वीपणे राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या शाळा भेटीमध्ये जुलै व ऑगस्ट अखेर निश्चित करण्यात आलेल्या अध्ययन स्तराचे तुलनात्मक दृष्ट्या विश्लेषण करून आजची वस्तुस्थिती लक्षात घेऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. वैयक्तिक, शैक्षणिक कृती आराखडा तयार करताना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Management of Learning Intervention -MOLI) प्रशिक्षण/ वेध उपक्रम सहसंबंध समजावून सांगताना विषय मित्र, गट अध्ययन, सेल्फी विथ सक्सेस, आव्हान देणे, स्वयं अध्ययनास प्रेरणा, जिज्ञासू वृत्तींचा सन्मान, शिकण्याच्या गतीत वाढ व तंत्रज्ञानाचा वापर करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे शाळा भेटीमध्ये शाळा यापूर्वी शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या भाषा, गणित इत्यादी शैक्षणिक साहित्याचा वापर सकारात्मक आणि जास्तीत जास्त पद्धतीने कसा करता येईल याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. वैयक्तिक शिक्षण कृती आराखडा करताना विद्यार्थी एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे कसा संक्रमित होईल यासाठी आराखड्यामध्ये कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात या विषयी शिक्षकांची संवाद साधला.या उपक्रमाची अंमलबजावणी करताना तसेच आराखडा तयार करताना शिक्षकांच्या येणाऱ्या अडचणी देखील समजून घेतल्या आणि शिक्षकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृतींचा शनिवार या मालिकेत शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी सुचना दिल्या.

गणेश-विसर्जन मिरवणुकीत सळसळती तरुणाई साकारणार ‘ब्रो- ठाणे बदलतंय!’

 सार्वजनिक उत्सव मंडळाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठाणे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरनगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा ५४ व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त अतिशय आगळावेगळा देखावा साकारला आहे. शिवसेना गटनेते व नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या देखाव्याला ठाणेकर गणेशभक्तांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत  तरुणाईशी निगडित  विषयांवर विविध समूह आपली कला सादर करतील. यावेळी ठाणेकरांना ‘ब्रो ठाणे बदलतंय’ चलचित्र देखाव्याचा आनंद घेता येईल. सायंकाळी ५ वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून श्री विश्वेश्वर मंदिरातून विसर्जन मिरवणूक सुरू होईल.  धर्मवीर आनंद दिघे मार्ग, शिवसेना शाखा, स्वा. सावरकर नगर येथून प्रस्थान होऊन  वर्तकनगरपर्यंत ही मिरवणूक निघेल. विविध वेशभूषांनी नटलेली तरुणाई हे या मिरवणुकीचे खास आकर्षण असेल. शिवाय ठाण्यातील १२ तरुण जलतरणपटू यात सहभागी होतील, त्यांनी श्रीलंकेच्या तलाईमन्नार भारतातील रामेश्वरमचे धनुष्कोडी हे सागरी २३ किलोमीटर अंतर पार करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम केला होता. शिवाय नवी दिल्लीत   प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या वंदे भारत संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या भरतनाट्यम आणि लोकनृत्याच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला, त्या नृत्यांगना याही सहभागी होतील. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टीकमध्ये  ठसा उमटवणारे ठाणेकर खेळाडू, आरोग्यासाठी संगीताच्या तालावर विशिष्ट व्यायामप्रकार म्हणजे ॲरोबिक्सचे  प्रात्यक्षिक सादर करणारे क्रीडापटू, ठाणे ते गोवा स्केटिंग करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू,  प्रशिक्षक राहुल पंदिरकर यावेळी उपस्थित राहतील. या मिरवणूक प्रतिनिधीक स्वरूपात पोलिस, नाविक दल, पदवीधर तरुण, परंपरा-संस्कृती-कला आणि आधुनिकता यांची सांगड घालणारी तरुणाई, डॉक्टर, परिचारिका, नृत्यांगना, वकील : क्रिकेटपटू, सैनिक, विकासक,  मतदार, हवाईसुंदरी कथ्थक नर्तिका, वाचक… आदी समूह सहभाग घेतील. या आगळ्यावेगळ्या अशा ‘ब्रो ठाणे बदलतंय’ विसर्जन मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिलीप चंद्रकांत बारटक्के यांनी केले आहे. 0000

माॅरिशसचे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ यांच्या हस्ते डाॅ. दीपक दळवी संपादित मराठी – इंग्रजी आरती संग्रहाचे प्रकाशन

अनिल ठाणेकर माॅरिशस मराठी मंडळी फेडरेशन तर्फे माॅरिशस मधील ग्लेन पार्क विघ्नेश्वर मंदिर येथे गणेश चतुर्थी राष्ट्रीय सोहळा-२०२४ चे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘महाराष्ट्र जनमुद्रा’चे संपादक डाॅ. दीपक दळवी संपादित मराठी – इंग्रजी आरती संग्रहाचे प्रकाशन माॅरिशसचे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाक्वास-फिनिक्स पालिकेचे महापौर राॅय माईक मॅन्र्फेड मुंगूर, ग्लेन पार्क विघ्नेश्वर मंदिराचे अध्यक्ष प्रीयेशराव बापू, माॅरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्षअसांत गोविंद (सीएसके), माॅरिशस चे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ, माॅरिशसचे वाहतूक आणि रेल मंत्री अँलन गनू (जीसीएसके), खासदार अँशले इट्टू, माॅरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पुतळाजी, मराठी स्पिकिंग युनियनचे अध्यक्ष नितीन बापू उपस्थित होते.

रहाटाड येथील कालकथित केशव लोखंडे यांचे निधन

कर्जत : तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि.) रायगडचे विद्यमान कोषाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळाचे सक्रीय सभासद, एकता बौद्ध सेवा संघ रहाटाडचे मार्गदर्शक, बहुजन समाजात वावरणारे बहुआयामी व्यक्तिमत्व, आंबेडकरी चळवळीचे खंदे समर्थक, तळा तालुक्यातील सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील विशेषतः क्रिकेट मधील एक नावाजलेले नाव अर्थात कालकथित केशव लोखंडे यांचे शनिवार, १४ सप्टेंबरला रात्री २.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिकरीत्या कांदिवली मुंबई येथे निधन झाले आहे. मृत्यसमयी त्यांचे वय ५४ वर्षे इतके होते. केशव लोखंडे यांचा स्वभाव अतिशय शांत आणि मनमिळाऊ होता. तळा तालुक्यातील रहाटाड सारख्या छोट्याशा गावात राहून तळा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई सारख्या शहरात त्यांनी आपल अस्तित्व निर्माण केल. पदवी पर्यंत शिक्षण झाल्यावर नामांकित अश्या स्टार स्पोर्ट्स मध्ये प्रोडक्शन हेड म्हणून बरेच वर्ष नोकरी केली. ते स्वतः नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई येथे असले तरी कुटुंब गावी असल्याने व समाजाची सेवा करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने आपल्या गावाशी, तालुक्याशी तसेच क्रीडा क्षेत्राच्या निमित्ताने बहुजन वर्गाशी, क्रीडा तरुणांशी त्यांची कायम नाळ जोडली गेली होती. वीस बावीस वर्ष स्टार स्पोर्ट्स सारख्या चॅनल मध्ये नोकरी असल्याने त्यांची तरुणांमध्ये एक वेगळीच इमेज होती. या क्षेत्रात काम करत असताना अनेक तरुणांना देखील त्यांनी या मीडिया क्षेत्रात आणले व त्यांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून दिला. त्यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम होते. तळा तालुक्यात आपल्या रहाटाड या गावी नेहमी टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा स्वखर्चाने ते भरवत असत. त्यांनी वीस बावीस वर्षापूर्वी तळा तालुक्यात नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा भरविल्या होत्या आणि त्या केबल वर लाईव्ह होत्या. २० वर्षापूर्वी क्रिकेट खेळताना तळ्यातील क्रिकेटर स्क्रीन वर दिसू शकले ते फक्त केशव लोखंडे यांच्या क्रिकेट प्रेमामुळेच. तळा तालुक्यातील तरुणांनी जेव्हा मुंबईत तळा तालुका क्रिकेट असोसिएशन ची स्थापना केली तेव्हा केशव लोखंडे यांना अध्यक्ष करून त्यांचा यथोचित गौरव केला. आज तळा तालुक्यातील एक प्रेमळ, शांत, संयमी व बहुआयामी व्यक्तिमत्व हरपला. त्यांच्या जाण्याने केवळ बौद्ध समाजातच नव्हे तर बहुजन समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मालाड, मुंबई येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध समाजातील, विविध क्षेत्रातील शेकडो मित्रपरिवार, अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कालकथित केशव लोखंडे यांना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा, तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि) रायगड, त्यांचा मित्र परिवार तसेच तळा तालुकावासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अचानक झालेल्या या आघातामुळे त्यांच्या कुटुंबियांवर तसेच मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून लोखंडे कुटुंबीयांना सावरण्याचे बळ मिळो हीच बुध्दांचरणी प्रार्थना. त्यांचा पुण्यानुमोदन आणि शोकसभेचा कार्यक्रम सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या मूळ गावी लुम्बिनी बुद्धविहार, रहाटाड येथे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

संविधानामुळे स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित – प्रशांत ठाकूर

अशोक गायकवाड पनवेल : न्याय, समता आणि बंधूता हे भारतीय संविधानाचे स्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. संविधानामुळे आजही आपले स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित आहे. याचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी केले. युवकांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित आहेत. त्यानुसार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४२४ शाासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने उद्घाटन झाले. यानिमित्ताने पनवेल येथील आयटीआयमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, अनंता गायकवाड, किशोर सुरते, संस्थेचे प्राचार्य नितीन चौधरी, उपप्राचार्य विजय टिकोले, प्रा. आकाश ठाकूर, संदीप वेले, गटनिदेशक नितिन देशमुख, अजय मयेकर, प्रभाकर नगरकर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी डॉ. पराग पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान आणि आपला अभिमान या विषयावर मार्गदर्शन केले.

कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा गाळ्यांना नोटिसा

 रेल्वे मार्गातील जिना बंद करून गाळ्यांची उभारणी डोंबिवली – कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील जिन्याचा मार्ग बंद करून उभारण्यात आलेल्या तीन बेकायदा गाळ्यांना ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तातडीने नोटिसा बजावल्या आहेत. या गाळे मालकांना त्यांच्या जमीन मालकी, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्यात सांगण्यात आली आहेत. ही कागदपत्रे येत्या सात दिवसाच्या कालावधीत गाळे मालकांनी सादर केली नाहीतर तिन्ही गाळे पालिकेकडून भुईसपाट केले जाणार आहेत. कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात (आयरे परिसर) भूमाफियांनी गणपती सुट्टीच्या कालावधीत बेकायदा गाळे उभारल्या आहेत, अशा तक्रारी पालिकेच्या ग प्रभागाकडे आल्या होत्या. गणपतीची पालिकेला सुट्टी असल्याने त्याचा गैरफायदा भूमाफियांनी घेतला असल्याची चर्चा होती. या गाळ्यांना सुशोभित करून तेथे आर. के. एन्टरप्रायझेस हे घर, गाळ्यांची विक्री करणारे कार्यालय माफियांनी सुरू केले आहे. रेल्वे जिन्याच्या मार्गात, प्रवाशांच्या जाण्याच्या मार्गात बेकायदा गाळे उभारण्यात आल्याने या भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी या बेकायदा बांधकामाची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी परिमंडळ उपायुक्त व्दासे यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आदेश दिले. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून बेकायदा गाळे उभारलेल्या जागेची पाहणी केली. स्थानिकांनी हे गाळे जुने असल्याचे आणि कार्यालय सजावट आता केली असल्याचे सांगितले. या गाळ्यांचा कोणीही जमीन मालक, चालक घटनास्थळी उपस्थित नव्हता. त्यांची नावे, पत्ते देण्यास स्थानिक रहिवासी असमर्थतता दर्शवत होते. अखेर साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी तिन्ही गाळे मालकांच्या गाळ्यांवर नोटिसा लावून येत्या सात दिवसात गाळ्यांची जमीन मालकी, बांधकामांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. गाळे मालकांनी या कालावधीत पालिकेला संपर्क केला नाहीतर त्यांचे गाळे भुईसपाट करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे पालिका, रेल्वेच्या जागा हडप करून भूमाफिया या गाळ्यांमध्ये कार्यालये सुरू करतात. तेथून चाळ, इमारती मधील बेकायदा घरे, गाळ्यांची विक्री करतात, अशा तक्रारी आहेत. भूमाफियांनी आपले म्हणणे वेळेत सादर केले नाहीतर तातडीने हे बेकायदा गाळे पालिकेने जमीनदोस्त करावेत, अशी स्थानिकांची मागणी आहे. कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेले गाळे जुने असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या गाळे मालकांना जमीन मालकी, बांधकामाची परवानगी, कर पावती अशी सर्व कागदपत्रे सादर करण्याची नोटीस दिली आहे. ही कागदपत्रे गाळे मालकांनी सादर करण्यास असमर्थतता दर्शवली तर गाळे आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे तातडीने जमीनदोस्त केले जातील. संजयकुमार कुमावत , साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.    

अनंत चतुर्दशी दिनी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

नवी मुंबई  : महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेशोत्सव 7 सप्टेंबर पासून अत्यंत उत्साहात संपन्न होत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महिनाभरापूर्वींच गणेशोत्सवासंबधी आढावा बैठकीप्रसंगी ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्यातबाबत नागरिकांना केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद लाभलेला दिसून आला. पीओपी ऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यास अनेक नागरिकांनी पसंती दर्शविली. शाडूच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करणा-या गणेशभक्तांना स्वच्छता व पर्यावरणमित्र म्हणून महानगरपालिकेमार्फत प्रशस्तीपत्र देऊन सर्व विसर्जनस्थळी सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 137 इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनास मोठया प्रमाणावर पसंती दर्शविली. नवी मुंबई महानगरपालिकेने 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम अशा 159 विसर्जन स्थळांवर केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमुळे श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, पाच दिवस, गौरीसह सहा दिवस व सात दिवस अशा चारही विसर्जन दिवशी श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले. या चार विसर्जन दिवशी 35720 श्रीमूर्तीना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांच्या आकाराने मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील सर्व विसर्जन स्थळांवर अधिक सक्षम व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात स्वयंसेवक व लाईफगार्ड्स कार्यरत असणार आहेत. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यतत्पर राहणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही सर्व विसर्जन स्थळांवरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.सी.टी.व्ही. लावण्यात आले असून पोलीस विभागाचे याव्दारे गर्दीवर बारीक लक्ष असणार आहे. श्रीमूर्ती विसर्जनाकरिता विसर्जनस्थळी मध्यम व मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिफ्ट / क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. कोपरखैरणे से-19 येथील धारण तलावावर अत्याधुनिक यांत्रिकी तराफ्याची व्यवस्था करण्यात आली असून आकाराने मोठया श्रीमूर्ती विसर्जनासाठी या यांत्रिकी तराफ्याचा श्रम व वेळ वाचण्यात मोठया प्रमाणात उपयोग होणार आहे. विसर्जन स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आले असून विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करता यावी यादृष्टीने विसर्जनस्थळी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली आहे. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जन स्थळांवर सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे व गर्दीचे नियोजन करणे शक्य होत आहे नागरिकांमार्फत श्रीमूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे “सुके निर्माल्य” स्वतंत्र कलशात टाकावे, आणि कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशाप्रकारे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे व त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्यवस्तू गरजू मुलांना आणि नागरिकांना वितरण करण्यात येत आहेत. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन महानगरपालिका व पोलीस यांच्यामार्फत सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी उभारण्यात येणा-या मोठ्या मंचावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. नागरिकांकडून मिळणा-या उत्तम सहयोगामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवातील आत्तापर्यंतचे श्रीमूर्ती विसर्जन चांगल्या रितीने पार पडले असून अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा विसर्जन सोहळाही निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

गेली ६३ वर्षे अखंडपणे आयोजित करण्यात येत असलेल्या पनवेल मधील मदन कोळी व परिवार यांच्या गणेशोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत श्री. गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे कोळी परिवाराच्यावतीने स्वागत सत्कार करण्यात आले.

आशियाँ फाऊंडेशनने दिला महिला सबलीकरणाचा नारा

ठाणे : आशियाँ फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने भिवंडी तालुक्यात सध्या महिला अत्याचार, महिला सक्षमीकरण यावर जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने आशियाँ फाऊंडेशनने विविध गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात पथनाट्य सादर करून जनजागरण अभियान राबविले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिरेश उजगरे, वेदांत खोत, प्रशांत अदनवाले, रवींद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत समाजामध्ये जनजागरण व्हावे तसेच कायद्याची माहिती जनतेला मिळावी, या दृष्टिकोनातून  आशियाँ फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहसीन शेख आणि सरचिटणीस दिपा सावंत – खोत यांच्या नेतृत्वाखाली जनजागरण अभियान सुरू केले आहे. रविवारी या संस्थेच्या वतीने शाळा , कार्यालये, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे या विषयी रितेश जाधव, साक्षी मंचेकर,राहुल जगताप, सीताराम खडे, आकाश लोणारे यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नारपोली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे पथनाट्य सादर केले. या प्रसंगी बालगोपाळ मित्रमंडळ, साई प्रसन्न को. सो. नारपोलीचे अध्यक्ष घोसाळकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

६ कोटींच्या क्रीडांगण आणि खुले नाट्यगृह यांच्या लोकार्पणाची कर्जतकरांना आस- दिलीप गडकरी

Untitield-1   अशोक गायकवाड कर्जत : आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते पार पडलेल्या ६ कोटींच्या कर्जत मधील आंबराई येथे असलेले खुले नाट्यगृह व क्रीडांगण यांच्या लोकार्पणाची कर्जतकर आतुरतेने वाट पहात असल्याचे उपरोधिक वक्तव्य समाजसेवक दिलीप प्रभाकर गडकरी यांनी केले आहे. कर्जत नगरपरिषदने १९९५ मध्ये युडीआरसी अंतर्गत आंबराई येथे खुल्या नाट्यगृहाचे काम सुरू केले होते. ५२ लाख रूपये अपेक्षित खर्चापैकी कर्जत नगरपरिषदने यूडीआरसीकडून २२ लाख रुपये कर्ज घेतले होते व शासनाकडून ३० लाख रुपये अनुदान मिळाले होते.९५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतरही नोव्हेंबर २०२० पर्यंत म्हणजे २५ वर्ष अर्धवट राहिलेले काम नाट्यरसिक , क्रीडारसिक , जागृत पत्रकार , नगरसेवक यांच्या पाठपुराव्यामुळे नोव्हेंबर २०२० मध्ये खुले नाट्यगृह आणि क्रीडांगण विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ तत्कालीन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते पार पडला.या कामासाठी सुमारे ४ कोटी ९७ लाख ५५ हजार रुपये खर्च केले आहेत.म्हणजे या प्रकल्पावर जवळ जवळ सहा कोटी रुपये खर्च करून सुध्दा २९ वर्षांत ह्याचा वापर करता येऊ नये ही गंभीर बाब आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना फिरायला जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोकाट सुटलेली कुत्री , दागिने खेचून नेणारे चोरटे व सुसाट वाहनं चालवणारे चालक यांच्यापासून जीव मुठीत घेऊन ज्येष्ठ नागरिक फिरायला जातात. जर का आंबराई येथे फिरण्याची सोय झाली तर ज्येष्ठ नागरीकांना सुरक्षितपणे फिरता येईल.तसेच नाट्यगृह सुरू झाले तर तेथे ज्येष्ठ नागरिकांना छोटे मोठे कार्यक्रम करता येतील.तरी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते , आमदार , माजी आमदार , भावी आमदार (सर्व इच्छूक उमेदवार ) यांनी याबाबत गांभीर्याने विचार करून हा २९ वर्ष रेंगाळलेला प्रकल्प ताबडतोब लोकार्पण करण्यासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा असल्याचे समाजसेवक दिलीप प्रभाकर गडकरी यांनी म्हटले आहे.