Author: bittambatami.com

 ‘खांदेश्वर पोलीस ठाण्यात धूळ पडलेले वाहन तुमचे तर नाही ना ? ‘

वाहन मालकांच्या प्रतीक्षेत खांदेश्र्वर पोलीस राज भंडारी       पनवेल : शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांप्रमाणेच पोलीस ठाण्यांमध्ये धूळ खात पडून असलेल्या वाहनांची मोठी समस्या आहे. या वाहनांच्या  मालकांचा शोध घेतला जातो. मात्र, गाडीमालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या आवारात अशा वाहनांचा खच लागत असून प्रदूषणासह अनेक समस्या उद्भवत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत खांदेश्र्वर पोलीस ठाण्यांमध्ये अशीच २० वाहने धूळखात पडली आहेत. त्या वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलीस ठाण्याकडून यापूर्वीही मोहीम राबवून गाड्यांच्या मालकांचा शोध घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा गाड्यांची भर पडली आहे. खांदेश्र्वर पोलीस ठाण्याच्या आवारात १६ दुचाकी, २ चारचाकी आणि २ ऑटो रिक्षा आपल्या मालकांच्या प्रतीक्षेत आहेत. सदर वाहने वाहन मालकांनी त्वरित घेवून जाण्यासाठी खांदेश्र्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाय. टी. चव्हाण यांच्या सहीचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये वाहन मालकांना आपापले वाहन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कंत्राटी कामगारांची मागण्यांसाठी १८ जुलैला ठामपा मुख्यालयावर दिंडी

अनिल ठाणेकर     ठाणे : महानगरपालिकेची कायमस्वरूपी बारामाही आणि सतत नियमितपणे चालणारी कामे कंत्राटी कामगारांच्या कडून करून घेतली जातात. मात्र वेतन, भत्ते, बोनस, भरपगारी रजेचे वेतन आणि अन्य कायदेशीर सोयी सुविधा देताना ठेकेदार लबाडी करतात. महापालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प राहून ठेकेदार यांना पाठीशी घालत असल्याने सर्व विभागातील कंत्राटी कामगार श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी येत्या १८ जुलै रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातवर दिंडी काढून महापालिका आयुक्त सौरव राव यांना साकडे घालणार आहेत. या वेळी विविध प्रमुख मागण्यांबाबत अंमलबजावणी करण्यासाठी आग्रह धरण्यात येईल, अशी माहिती महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली. आत्यावश्यक सेवेतील नियमित स्वरुपाची बारामाही सतत चालणारी कामे करणार्‍या कंत्राटी कामगारांना कायम कामगारां प्रमाणे वेतन, भत्ते व  सोयी सुविधा लागु करा. ठाणे महापालिका शाळेतील सफाई कामगार व अन्य खात्यातील कार्यरत कर्मचारी यांना वयोमानानुसार कमी करण्यात आलेले किंवा मरण पावलेल्या कामगारांना उपदान (Gratuity) ची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. कंत्राटी कामगारांना मृत्यु किंवा वयोमानानुसार कामावरुन कमी केल्यानंतर उपदानची रक्कम एका महीण्याच्या आत अदा करा, शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना दरमहा २६ दिवसाचे वेतन, मे महिना, दिवाळीच्या सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या काळात काम द्या / वेतन द्या, प्रत्येक कंत्राटी कामगारांना नियमितपणे वेळेवर कायदेशीर वेतन,गणवेश, ओळखपत्र, वेतनस्लिप, सुरक्षिततेची साधणे, पावसाळी रेनशूट , गमबूट आदी  वाटप करा, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यावर कामगारांना सुट्टी किंवा जादा कामाचा भत्ता मासिक वेतनात अदा करा, कायमस्वरुपी व अत्यावश्यक सेवेत कंत्राटी पध्दत बंद करुन सर्व कार्यरत कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावुन घ्यावे. किंवा कायम स्वरुपी कामगारांच्या सारखे वेतन व भत्ते लागु करा. आदी मागण्यांसाठी सर्व विभागातील कंत्राटी कामगार, सफाई कामगार, वाहनचालक, वाल्वमेन आदींनी मिळून श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी येत्या १८ जुलै रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातवर दिंडी काढून महापालिका आयुक्त श्री सौरव राव यांना साकडे घालणार आहेत, असेही महासचिल जगदीश खैरालिया यांनी सांगितले. अजय भोसले (कार्यकारी सचिव), सुनील दिवेकर, संतोष देशमुख, स्वाती देशमुख, अर्चना पवार (शिक्षण विभाग), भास्कर शिगवण (रस्ते सफाई), गणेश चव्हाण (पाणी पुरवठा विभाग) सूरज वाल्मिकी आदी कार्यकर्त्यांनी कामगारांना मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

वृक्षारोपण आणि संवर्धन ही सर्वांची नैतिक जबाबदारी-उमेश जंगम

माथेरान : माथेरान मध्ये सुध्दा यावर्षी उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. त्यासाठी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज निर्माण झाली असून आम्ही यांचे संगोपन करणार आहोतच परंतु सर्व नागरिकांनी…

 घोडबंदर रोडचा घेतला महपालिकेने आढावा

‘रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने सर्व यंत्रणांनी काम करावे- आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश     ठाणे : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची मालकी, कामाची जबाबदारी यापैकी कोणतीही अडचण त्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून आपले क्षेत्र खड्डेमुक्त करूया, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळ्यातील रस्ते स्थितीचा, विशेषत:  घोडबंदर रोडचा, आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत, ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, कार्यकारी अभियंता गुरुदास राठोड, मेट्रोचे समन्वयक जयंत डहाणे, कायर्कारी अभियंता सुरेंद्र शेवाळे आणि अतुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. आनंद नगर चेक नाका ते गायमुख या पट्ट्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड यावरील रस्त्याचे कोणते भाग कोणाकडे आहेत, तसेच, त्यावरील कोणत्या मार्गिकेत कोणाचे काम सुरू आहे, उड्डाणपूलांची जबाबदारी कोणाची आहे या विषयीची स्पष्टता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर त्याचे रेखांकन करावे. त्यातून रस्त्याविषयी स्पष्टता येईल आणि संदिग्ध स्थिती होणार नाही, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणांची संसाधने, मनुष्यबळ हे एकाच यंत्रणेचा भाग आहेत. त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून रस्ता कमीत कमी वेळात दुरुस्त करणे हेच आपले मुख्य उद्दीष्ट आहे. याचा पुनरुच्चार आयुक्त राव यांनी केला.…

 सर्व प्रभारी पदावरील अधिकाऱ्यांना मूळ पदावर आणा

महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनची मागणी     ठाणे : ठाणे महानगर पालिकेत सध्या सर्वच विभागांमध्ये प्रभारी अधिकाऱ्यांची चलती निर्माण झाली आहे. लिपीकांना थेट सहाय्यक आयुक्त ते उपायुक्तपदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. त्यातून ठाणे महानगर पालिकेचे नुकसानच होत आहे. त्यामुळे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पदावर आणून त्यांच्याकडून अतिरिक्त वेतनाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी केली आहे. या मागणीसाठी ते स्वातंत्र्य दिनी उपोषणाला बसणार आहेत. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी या संदर्भात ठामपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियमचे उदाहरण दिले असून या ठिकाणी नियुक्त असलेल्या अधिकारी लिपीक या संवर्गातील आहेत. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांना ही बढती दिली आहे, असा आरोप केला आहे. ठामपातील अनेक अधिकारी हे लिपीक असून त्यांना सहाय्यक आयुक्त तसेच प्रभारी उपायुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यातून ठाणे महानगर पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, स्पर्धा परीक्षा न देता हे अधिकारी मोक्याच्या जागांवर बसलेले असल्याने धोरणात्मक निर्णय घेणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी ठाणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय होत असल्याने त्या प्रभारींना मूळ पदावर आणावे. अन्यथा, येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा शिंदे यांनी दिला.

“स्‍वच्‍छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा” अभियान – रोहन घुगे

ठाणे, “स्‍वच्‍छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा” अभियान राबवण्‍यात येत असून ओला व सुका कचरा व्‍यवस्‍थापनासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे तसेच प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन अतुल पारसकर यांनी केले आहे. आपल्‍या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्‍हयात सोमवार, दिनांक 8 जुलै 2024 पासून विशेष मोहिम राबवण्‍यात येत आहे. या कालावधीत विशेष मोहिम राबविण्‍याचे निर्देश राज्‍य शासनाने दिले आहेत, त्‍यानुसार जिल्ह्यातील प्रत्‍येक गावात “स्‍वच्‍छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा” या नावाने अभियान राबवण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत ठाणे जिल्हा (ग्रा) हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रत्‍येक गावात 5 संवादकाची निवड करण्‍यात येणार असून हे संवादक गृहभेटीतून माहिती देण्‍यात येणार आहे. यासाठी  सरपंच,  उपसरंपच,  ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती,  ग्रामसेवक,  आशावर्कर,  अंगणवाडी सेविका,  स्वच्छाग्रही व बचत गटातील महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील गट विकास अधिकारी यांनी आपल्‍या तालुक्‍यातील गावांचे प्रती कुटूंब पाच या प्रमाणे संवादक तयार करून गृहभेटीचे आयोजन तसेच तालुक्‍यातील सर्व अधिकारी, विस्‍तार अधिकारी यांनी संनियंत्रण करून अंमलबजावणी करत आहेत. ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्‍यासंदर्भात तसेच नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय व त्याचा नियमित वापर आदि बाबत गृहभेटीतून माहिती देण्‍यात येणार आहे. भेटी दरम्यान शासनाच्‍या गुगल लिंकव्‍दारे  कुटुंबांची फोटोसह माहिती भरण्‍यात येणार आहे.

 म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या तिजोरीत जमा होणार १७१ कोटी

११२ दुकानांसाठी विक्रमी बोली     मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ई लिलावात १७३ पैकी ११२ दुकानांसाठी बोली लागली आहे. तर ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. असे असले तरी ११२ दुकानांच्या ई लिलावाला विक्रमी बोली लागली आहे. मुंबई मंडळाने ९७ कोटी ७४ लाख रुपये अशी बोली निश्चित केली असताना प्रत्यक्षात ११२ दुकानांसाठी १७१ कोटी ३८ लाख रुपयांची बोली लागली आहे. त्यामुळे आता या दुकानांच्या विक्रीतून मंडळाच्या तिजोरीत १७१ कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. २८ जून रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालानुसार १७३ पैकी ६१ दुकानांना प्रतिसादच न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत. तर ११२ दुकानांना बोली लावण्यात आली आहे. ११२ दुकानांसाठी मंडळाने ९७ कोटी ७४ लाखांची बोली निश्चित केली होती. पण प्रत्यक्षात मात्र १७१.३८ कोटींची बोली लागली असून ही बोली विक्रमी मानली जात आहे. मंडळाच्या निश्चित बोलीपेक्षा ७३ कोटींनी अधिक बोली लागली आहे. त्यामुळे मंडळाला १७१ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. ई लिलावानंतर आता मंडळाने दुकानांच्या वितरणाचा निर्णय घेतला असून त्यानुसार वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारपासून ११२ यशस्वी अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र वितरीत केले जाणार आहेत. त्यानंतर दुकानांच्या एकूण बोलीच्या १० टक्के रक्कम भरून घेतली जाईल. त्यानंतर उर्वरित रक्कम भरून घेत दुकानांचे वितरण यशस्वी अर्जदाराला केले जाणार आहे. ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मुंबईतील प्रतीक्षा नगर, बिंबीसारनगर, मालाड, मालावणी आदी ठिकाणच्या १७३ दुकानांच्या ई लिलावासाठी मार्चपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू होती. जूनमध्ये ही प्रक्रिया संपुष्टात आली आणि २७ जून रोजी बोली लावण्यात आली. तर २८ जून रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालानुसार १७३ पैकी ६१ दुकानांना प्रतिसादच न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत. 00000

राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी

 वरळी हिट अँड रन प्रकरण :   मुंबई : मुंबईतील वरळीच्या परिसरात रविवारी पहाटे भरधाव वेगात कार चालवत मिहीर शाह या तरुणाने दोघांना धडक दिली होती. या भीषण अपघातात कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते होते. मात्र, या प्रकरणानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली होती. यानंतर राजेश शाह यांची शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाह याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आज मिहीर शाह याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शाह याने पलायन केलं होतं. रविवारपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी मिहीर शाह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याबरोबरच आरोपी मिहीर शाह याची आई आणि दोन बहिणांनीही मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे. दरम्यान, वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. नेमकं प्रकरण काय? मुंबईमधील वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला आता अटक करण्यात आली. याशिवाय त्याची आई आणि बहिणीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा होता. दरम्यान, हा अपघात घडला त्यावेळी मिहीर शाह याने जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं, अशी माहिती समोर आली होती. यानंतर मिहीर शाह स्वतः कार चालवत होता, असा आरोप आहे. 00000

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपीचा वावर असलेल्या बारवर पालिकेचा हातोडा

अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त     मुंबई : जुहू येथील हॉटेल किंग इंटरनॅशनल लगतच्या ग्लोबल तापस बारमधील अनधिकृत बांधकाम मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी जमीनदोस्त केले.वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याने अपघातापूर्वी जुहू येथील ग्लोबल तापस बारमध्ये मित्रांसमवेत मद्यप्राशन केले होते. त्यांनतर, दारूच्या नशेत असतानाही त्याने मोटार चालविली. बेदरकारपणे मोटार चालवत असताना वरळी येथे दुचाकीला धडक देऊन वृध्द दांपत्यास चिरडले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर, कायद्याचे पालन न करता आरोपीला दारू दिल्याप्रकरणी बारवर कारवाई करण्यात येत आहे. त्यातच पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी बारमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. 00000

 विद्यार्थ्यांची प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधात कृती

 सीवूड्सच्या एसएस हायस्कुलमध्ये वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या केल्या तयार   नवी मुंबई: स्वच्छतेसोबतच पर्यावरणाला विघातक असणा-या प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा विभाग कार्यालयांमार्फत तसेच परिमंडळ स्तरावरील पथकांमार्फत राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत सद्यस्थितीत सुरू असलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या मोहिमेमध्ये नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना स्वच्छतेसोबत प्लास्टिक प्रतिबंधाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. याकरिता घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि शालेय शिक्षण विभाग संयुक्तपणे कार्यवाही करीत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे तसेच घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचा अभिनव उपक्रम एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सीवूडस या ठिकाणी परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री.  शशिकांत तांडेल आणि स्वच्छता अधिकारी श्री सूर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सीवूडस येथील विद्यार्थ्यांना प्लास्टिकपासून होणारी मानवी जीवनाची व निसर्गाची हानी विविध प्रकारची माहिती देत पटवून देण्यात आली तसेच प्लास्टिक पिशव्यांनी कापडी – कागदी पिशव्यांचा पर्यावरणपूरक पर्याय वापरात आणावा यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी वर्तमानपत्रांपासून आकर्षक कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात आले. रद्दीत जाणा-या वर्तमानपत्रांचा उपयोग पिशव्यांकरिता होत असल्याने व तोही स्वत:च्या हाताने पिशव्या बनवून केला जात असल्याने विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. थ्री आर ची संकल्पना राबविताना टाकाऊपासून टिकाऊ निर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. त्याचप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांना कच-याचे घरापासूनच 3 प्रकारे वर्गीकरण करणे, कम्पोस्ट पीटव्दारे कच-याची विल्हेवाट लावणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, थ्री आरचे महत्व अशा विविध बाबींची माहिती देण्यात आली व त्याची स्वत:पासूनच अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ नवी मुंबई यांचे बेलापूर विभाग कार्यालयाला अनमोल सहकार्य लाभले. याप्रसंगी स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधात्मक तसेच माझी वसुंधरा अभियानाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष पाटील व श्रीम. ज्योत्स्ना नायर आणि शिक्षकवृंद तसेच बेलापूर विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. 000