Author: bittambatami.com

लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांचा मोठा सामाजिक उपक्रम

 श्री गजानन मंडळ आणि श्री गरूड गणपती मंडळ या लक्ष्मी रस्त्यावरील दोन मंडळांची सलग १० व्या वर्षी एकत्र श्री गणेश विसर्जन मिरवणूक. पुणे : पुण्यनगरीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शिरपेचात मानाचे स्थान असलेलं नारायण- सदाशिव पेठेतील लक्ष्मी रोडवरील अग्रणी मंडळ श्री गजानन मंडळ आणि श्री गरुड गणपती मंडळ. या दोन्ही मंडळांनी पुण्यनगरीच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत २०१५ रोजी दोन मंडळे एकत्र करून एकत्रितपणे काढलेली विसर्जन मिरवणूक यंदाच्या सलग १० व्या ही वर्षी मोठ्या आनंदाने काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्री गजानन मंडळाचे अध्यक्ष राकेश गाडे पाटील, कार्याध्यक्ष अमेय गाडे पाटील आणि श्री गरूड गणपती मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष सुनिल कुंजीर, मंडळाचे मयूर कडू यांनी दिली. विसर्जन मिरवणुकीत पुण्याच्या गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूकीत समाजाला एक नवी दिशा देणारे हे दोन्ही मंडळांनी सामाजिकतेचे भान ठेवले आहे. पुणे शहराचे तत्कालीन पुणे शहर पोलिस आयुक्त यांनी केलेल्या आवाहनानुसार येथील दोन्ही मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढण्याचा मानस केला, आणि तेव्हापासून आजपर्यंत सलग १० व्या वर्षी ही दोन्ही मंडळे एकत्रित मिरवणूक काढल्याने मिरवणूकीचा प्रशासनावरील ताण कमी होणार आहे. दोन गणेश मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढण्याने दोन मंडळांचे ढोल-ताशांचे पथक एकत्र राहणार आहे. दोन श्री गणरायांची मुर्ती एकाच गाड्यांवर असणार आहेत. त्यामुळे दोन मंडळामधील अंतर कमी होणार असून दोन्ही मंडळांचा खर्चावरील त्राण देखील कमी होणार आहे. दोन्ही मंडळांनी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा कायम जपली आहे. देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्यनगरीचा उल्लेख होत असताना सार्वजनिक गणेशोत्सवात अग्रणी असणार्या मंडळात श्री गजानन मंडळ आणि श्री गरूड गणपती मंडळांचे नाव मोठ्या मानाने घेतलं जातं. यंदाच्या २०२४ च्या या वर्षात हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याचे गाडे आणि कुंजीर यांनी सांगितले. त्यामुळे लक्ष्मीरोड वरील मानाचे स्थान असलेल्या हि दोन श्री गजानन मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रणी असल्याचे गाडे, कडू आणि कुंजीर यांनी सांगितले.

गुणवान महिला सायकलपट्टूंसाठी शोधमोहिम

 खेलो इंडीया ‘वुमेन्स लीग’ स्पर्धेअंतर्घत बारामती येथे रोड सायकल स्पर्धेचे आयोजन पुणे :  क्रीडा स्पर्धामधील मुलींचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मुलींसाठी ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. बारामती येथे या स्पर्धा २० ते २१ सप्टेंबर दरम्यान होतील सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने आयोजित केलेल्या या स्पर्धा बारामती येथे संत तुकराम महाराज पालखी मार्गावर होणार आहेत. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि स्पर्धेचे संघटन सचिव सचिव प्रताप जाधव, यांनी सांगितले की, या स्पर्धेच्या माध्यमातून मुलींच्या क्रीडा गुणांना वाव देणे, स्पर्धांचा सराव होणे आणि त्यामधून गुणवान महिला खळाडूंची निवड करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. प्रथम विभागीय स्तरावर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. सायकलिंग खेळाच्या ‘वुमेन्स लीग’ स्पर्धा रोड आणि ट्रॅक प्रकारात होणार आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चार विभागात या स्पर्धा होतील. पश्चिम विभागाची रोड प्रकारामधील दुसरी स्पर्धा बारामती येथे पाटस ते लिमटेक गावादरम्यान नवीन तयार होत असलेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार २० सप्टेंबर सकाळी ९:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे युवा नेते मा. जयदादा पवार यांच्या शुभहस्ते आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, २१ सप्टेंबरला सकाळी १०:०० वाजता खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते स्पर्धेठिकाणी होणार आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेच्या तांत्रिक संचालिका आणि राष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील यांनी सांगितले की या स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनीअर अशा वयोगटात होतील. स्पर्धा टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट या प्रकारात होतील. तसेच सर्व वयोगटात विदेशी किंवा भारतीय बनावटील वापरता येतील. स्पर्धेमधील विजेत्यांना एकूण १ लाख २० हजार रुपयांची पारितोषिके केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येतील. याप्रसंगी शिवछत्रपती पारोतोषिक सन्मानीत आणि स्पर्धेच्या मुख्य पंच मिनाक्षी शिंदे, मिलींद झोडगे, बिरु भोजने आदी मान्यवर हजर होते.

नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा द्या –  नितीन देशपांडे

 ठामपाच्या ५७२ कोटी रुपयांच्या नवीन इमारतीच्या आवारात   अनिल ठाणेकर ठाणे महापालिकेच्या ५७२ कोटी रुपयांची नवीन प्रस्तावित इमारतीच्या आवारात, नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा उपलब्ध करुन द्या. अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिकेची नवीन प्रस्तावित इमारत, रेमण्ड कंपनीच्या राखीव भूखंडावर उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. वर्ष-१९८२ मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर, वर्ष-१९८९ मध्ये, पाचपाखाडी येथील सध्याची इमारत कार्यान्वित झाली. मात्र, नंतरच्या काळात ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढल्याने, विद्यमान इमारतीमधून प्रशासकीय कारभार चालविणे गैरसोयीचे ठरु लागले. तसेच, विभागनिहाय कामकाज करण्यासाठी, इमारत अपुरी पडू लागली. याच पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ८ एकरच्या भूखंडावर, तब्बल ३२ मजली भव्य इमारत उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. सुमारे ५७२ कोटी रुपयांची निविदा याकामी काढण्यात येऊन, शासनाकडून २५० कोटी रुपये मंजूरही करण्यात आलेले आहेत. आजमितीस ठाणे शहराची लोकसंख्या ही, २० लाखांहून अधिक असून, नगरसेवकांची संख्या १३१ एवढी झालेली आहे. एकंदरीतच ठाणे महापालिका प्रशासनाचा कारभार हा, पूर्वीपेक्षा अधिक विस्तारित झालेला असल्याकारणाने, ठाणे शहराचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त इमारतीची आवश्यकता होतीच, ती आता नवीन प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून साध्य होईल. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठविण्यात आले असून, पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, आपल्या पत्रात आयुक्तांना सूचित केले आहे की, ठाणे महापालिकेची प्रस्तावित इमारत जरी भव्यदिव्य स्वरुपात उभारण्यात येत असली तरी, प्रशासनाचा वादग्रस्त कारभार, विकासकामांचा खोळंबा, नागरी सोयी-सुविधांचा अभाव, भ्रष्टाचार आणि इतर मुलभूत प्रलंबित प्रश्न उपस्थित राहणारच आहेत. परिणामी, करदाते-कष्टकरी ठाणेकर नागरिक व सामाजिक/राजकीय संस्था-संघटनांना, प्रशासनाच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठविण्याचा, प्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा घटनादत्त अधिकार आहे. तसा अधिकारच भारतीय लोकशाहीने सर्वसामान्य नागरिकांना दिलेला आहे. तोच अधिकार अबाधित राखण्यासाठी आणि जनतेचा आवाज, सत्ताधारी व प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने, आंदोलनकर्त्यांसाठी प्रस्तावित इमारतीच्या आवारात अधिकृतपणे जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. सदर जागा ही, ‘जनतेचे व्यासपीठ’ किंवा ‘जनता मंच’ म्हणून ओळखली जाईल. अशाप्रकारचा प्रयोग महापालिका प्रशासनाने राबविल्यास, ठाणे शहर हे, एक आदर्श शहर म्हणून नव्याने नावारुपाला तर येईलच, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना, लोकशाहीमार्गाने आंदोलनाचा, निषेध व्यक्त करण्याचा व सनदशीरपणे मोर्चा काढण्याचा अधिकार बहाल करणारी पहिलीवहिली स्वायत्त संस्था म्हणून, ठाणे महानगरपालिका ओळखली जाईल, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही. काहीवेळेस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची हातमिळवणी होऊन, घटनाविरोधी ठराव संमत होतात. अशावेळी कर्तव्यदक्ष नागरिकांनी आवाज उठविणे हे, क्रमप्राप्त ठरते. (संदर्भ : ठामपा/शाविवि/वियोग, अंक-९६०/३००० दि. २०/१०/२०१४) यासंदर्भात, मुंब्रा तलाव बुझवून, ट्रांझिस्ट कॅम्प बांधण्याचा ठराव पारित झाला होता. अर्थात, महासभेत घटनाविरोधी ठराव येतो, हे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या हातमिळवणीचे उत्तम उदाहरण असून, आदर्श लोकशाहीस धक्का देणारे आहे, याकडे नितीन देशपांडे यांनी, आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प राबविण्यात येतात किंवा प्रस्तावित असतात, अशा प्रकल्पांच्या प्रतिकृतींचे सुसज्ज असे दालनदेखील, ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीतउभारण्यात यावे, यानिमित्ताने एक चांगला आदर्शवत असा पायंडा पाडला जाईल, याचीही प्रकर्षाने नोंद घ्यावी, अशी सुचनावजा मागणी, देशपांडे यांनी आपल्या पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. याप्रकरणी आयुक्तांनी प्राधान्याने विचार करुन, ठाणे महापालिकेच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या आवारात, नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलावीत, अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे.

पर्यावरणपूरक गणरायाच्या उत्सवातून अयोध्येचे दर्शन

Photo-8   ठाणे : ठाण्यातील प्रख्यात वास्तू विशारद संजय बोबडे यांच्या निवासस्थानी आयोध्येचे दर्शन घडविणारी पर्यावरणपूरक गणरायाची मूर्ती साकारली आहे. हिरानंदानी इस्टेट येथे वास्तव्यास असलेले संजय बोबडे हे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही असतात. त्यांनी यंदा आपल्या घरात शाडूच्या मातीतून फक्त दोनच रंगांचा वापर करून मूर्ती साकारली आहे. तर मूर्तीच्या सभोवती कागदापासून महिरप तयार केली आहे. या महिरपीवर आयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीप्रमाणेच आरेखन केले आहे. अतिशय सुंदर आणि सुबक पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे परिसरात कौतूक होत आहे. 0000  

ठामपातर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत

 जय भवानी मित्र मंडळ पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा २०२४चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आझाद नगर नंबर २ येथील जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तर, सार्वजनिक उत्सव मंडळ, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास उत्कृष्ट मूर्तीकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत ठाण्यातील एकूण २१ मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण करताना मूर्ती, सजावट, विषय मांडणी, हेतुपूर्ती, शिस्त व स्वच्छता तसेच कलावंतांचे काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नादावडेकर आणि पत्रकार पंकड रोडेकर यांनी केले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविलेल्या जय भवानी मित्र मंडळाने ‘निष्काळजीपणामुळे होणारी जिवितहानी’ हा विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे. तर, द्वितीय क्रमांक महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळ यांना मिळाला आहे. त्यांनी ‘कैफियत समाधानाची’ हा विषय मांडला आहे. तृतीय क्रमांक गांधीनगर येथील शिवसम्राट मित्रमंडळ यांच्या ‘सुरक्षितता’ या विषयावरील देखाव्यास मिळाला आहे. चैतन्य मित्र मंडळ, जिजामाता नगर सोसायटी (विविध प्रकारच्या नशेचे दुष्परिणाम) यांना चौथा, सार्वजनिक उत्सव मंडळ, जय भवानी नगर (ग्लोबल वॉर्मिंग) यांना पाचवा, ओम शक्ती विनायक मित्र मंडळ, गांधीनगर (युवा भारत) यांना सहावा क्रमांक मिळाला आहे. सातवा क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ (बटणाचा देखावा) आणि आठवा क्रमांक केदारेश्वर मित्रमंडळ, आनंदनगर (काळाप्रमाणे बदललेली माणसे)  यांना मिळाला. स्वच्छता पुरस्कारात प्रथम क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ, सावरकर नगर यांना तर, द्वितीय पारितोषिक ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, म्हाडा वसाहत, तर, तिसरा क्रमांक स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ, सावरकर नगर यांना मिळाला आहे. उत्कृष्ट मूर्तीकार प्रथम पारितोषिक वुिनोद शिळकर – गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा, द्वितिय पारितोषिक राकेश घोष्टीकर – श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, तर, तृतीय पारितोषिक दिपक गोरे – कोलबाड मित्र मंडळ यांनी पटकाविले आहे. पारितोषिक वितरणाची तारिख आणि वेळ मंडळांना लवकरच कळवण्यात येईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी – रोहन घुगे

  ठाणे : प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले, कार्यकारी अभियंता कदम आणि केंद्रप्रमुख खोणी हे उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार, प्राथिमक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यात कायमर्यादित अभियान राबवणे आवश्यक आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत शाळांमध्ये DIET व VOPA यांच्या मदतीने FLN अंतर्गत प्रोजेक्ट दिशा उपक्रम विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी हाती घेतलेला आहे. प्रोजेक्ट दिशाची शाळा स्तरावरील अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काल प्रत्यक्ष कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पिंपरी, खोणी, नागाव या शाळांना भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात जुलै २०२४ व ऑगस्ट २०२४ या महिन्यामध्ये जिल्हास्तरीय शिक्षण परिषद देखील घेण्यात आलेल्या असून त्यामध्ये उपक्रम यशस्वीपणे राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या शाळा भेटीमध्ये जुलै व ऑगस्ट अखेर निश्चित करण्यात आलेल्या अध्ययन स्तराचे तुलनात्मक दृष्ट्या विश्लेषण करून आजची वस्तुस्थिती लक्षात घेऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. वैयक्तिक, शैक्षणिक कृती आराखडा तयार करताना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Management of Learning Intervention -MOLI) प्रशिक्षण/ वेध उपक्रम सहसंबंध समजावून सांगताना विषय मित्र, गट अध्ययन, सेल्फी विथ सक्सेस, आव्हान देणे, स्वयं अध्ययनास प्रेरणा, जिज्ञासू वृत्तींचा सन्मान, शिकण्याच्या गतीत वाढ व तंत्रज्ञानाचा वापर करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे शाळा भेटीमध्ये शाळा यापूर्वी शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या भाषा, गणित इत्यादी शैक्षणिक साहित्याचा वापर सकारात्मक आणि जास्तीत जास्त पद्धतीने कसा करता येईल याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. वैयक्तिक शिक्षण कृती आराखडा करताना विद्यार्थी एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे कसा संक्रमित होईल यासाठी आराखड्यामध्ये कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात या विषयी शिक्षकांची संवाद साधला.या उपक्रमाची अंमलबजावणी करताना तसेच आराखडा तयार करताना शिक्षकांच्या येणाऱ्या अडचणी देखील समजून घेतल्या आणि शिक्षकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृतींचा शनिवार या मालिकेत शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी सुचना दिल्या.

गणेश-विसर्जन मिरवणुकीत सळसळती तरुणाई साकारणार ‘ब्रो- ठाणे बदलतंय!’

 सार्वजनिक उत्सव मंडळाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठाणे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरनगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा ५४ व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त अतिशय आगळावेगळा देखावा साकारला आहे. शिवसेना गटनेते व नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या देखाव्याला ठाणेकर गणेशभक्तांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत  तरुणाईशी निगडित  विषयांवर विविध समूह आपली कला सादर करतील. यावेळी ठाणेकरांना ‘ब्रो ठाणे बदलतंय’ चलचित्र देखाव्याचा आनंद घेता येईल. सायंकाळी ५ वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून श्री विश्वेश्वर मंदिरातून विसर्जन मिरवणूक सुरू होईल.  धर्मवीर आनंद दिघे मार्ग, शिवसेना शाखा, स्वा. सावरकर नगर येथून प्रस्थान होऊन  वर्तकनगरपर्यंत ही मिरवणूक निघेल. विविध वेशभूषांनी नटलेली तरुणाई हे या मिरवणुकीचे खास आकर्षण असेल. शिवाय ठाण्यातील १२ तरुण जलतरणपटू यात सहभागी होतील, त्यांनी श्रीलंकेच्या तलाईमन्नार भारतातील रामेश्वरमचे धनुष्कोडी हे सागरी २३ किलोमीटर अंतर पार करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम केला होता. शिवाय नवी दिल्लीत   प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या वंदे भारत संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या भरतनाट्यम आणि लोकनृत्याच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला, त्या नृत्यांगना याही सहभागी होतील. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टीकमध्ये  ठसा उमटवणारे ठाणेकर खेळाडू, आरोग्यासाठी संगीताच्या तालावर विशिष्ट व्यायामप्रकार म्हणजे ॲरोबिक्सचे  प्रात्यक्षिक सादर करणारे क्रीडापटू, ठाणे ते गोवा स्केटिंग करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू,  प्रशिक्षक राहुल पंदिरकर यावेळी उपस्थित राहतील. या मिरवणूक प्रतिनिधीक स्वरूपात पोलिस, नाविक दल, पदवीधर तरुण, परंपरा-संस्कृती-कला आणि आधुनिकता यांची सांगड घालणारी तरुणाई, डॉक्टर, परिचारिका, नृत्यांगना, वकील : क्रिकेटपटू, सैनिक, विकासक,  मतदार, हवाईसुंदरी कथ्थक नर्तिका, वाचक… आदी समूह सहभाग घेतील. या आगळ्यावेगळ्या अशा ‘ब्रो ठाणे बदलतंय’ विसर्जन मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिलीप चंद्रकांत बारटक्के यांनी केले आहे. 0000

माॅरिशसचे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ यांच्या हस्ते डाॅ. दीपक दळवी संपादित मराठी – इंग्रजी आरती संग्रहाचे प्रकाशन

अनिल ठाणेकर माॅरिशस मराठी मंडळी फेडरेशन तर्फे माॅरिशस मधील ग्लेन पार्क विघ्नेश्वर मंदिर येथे गणेश चतुर्थी राष्ट्रीय सोहळा-२०२४ चे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘महाराष्ट्र जनमुद्रा’चे संपादक डाॅ. दीपक दळवी संपादित मराठी – इंग्रजी आरती संग्रहाचे प्रकाशन माॅरिशसचे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाक्वास-फिनिक्स पालिकेचे महापौर राॅय माईक मॅन्र्फेड मुंगूर, ग्लेन पार्क विघ्नेश्वर मंदिराचे अध्यक्ष प्रीयेशराव बापू, माॅरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्षअसांत गोविंद (सीएसके), माॅरिशस चे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ, माॅरिशसचे वाहतूक आणि रेल मंत्री अँलन गनू (जीसीएसके), खासदार अँशले इट्टू, माॅरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पुतळाजी, मराठी स्पिकिंग युनियनचे अध्यक्ष नितीन बापू उपस्थित होते.

रहाटाड येथील कालकथित केशव लोखंडे यांचे निधन

कर्जत : तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि.) रायगडचे विद्यमान कोषाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळाचे सक्रीय सभासद, एकता बौद्ध सेवा संघ रहाटाडचे मार्गदर्शक, बहुजन समाजात वावरणारे बहुआयामी व्यक्तिमत्व, आंबेडकरी चळवळीचे खंदे समर्थक, तळा तालुक्यातील सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील विशेषतः क्रिकेट मधील एक नावाजलेले नाव अर्थात कालकथित केशव लोखंडे यांचे शनिवार, १४ सप्टेंबरला रात्री २.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिकरीत्या कांदिवली मुंबई येथे निधन झाले आहे. मृत्यसमयी त्यांचे वय ५४ वर्षे इतके होते. केशव लोखंडे यांचा स्वभाव अतिशय शांत आणि मनमिळाऊ होता. तळा तालुक्यातील रहाटाड सारख्या छोट्याशा गावात राहून तळा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई सारख्या शहरात त्यांनी आपल अस्तित्व निर्माण केल. पदवी पर्यंत शिक्षण झाल्यावर नामांकित अश्या स्टार स्पोर्ट्स मध्ये प्रोडक्शन हेड म्हणून बरेच वर्ष नोकरी केली. ते स्वतः नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई येथे असले तरी कुटुंब गावी असल्याने व समाजाची सेवा करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने आपल्या गावाशी, तालुक्याशी तसेच क्रीडा क्षेत्राच्या निमित्ताने बहुजन वर्गाशी, क्रीडा तरुणांशी त्यांची कायम नाळ जोडली गेली होती. वीस बावीस वर्ष स्टार स्पोर्ट्स सारख्या चॅनल मध्ये नोकरी असल्याने त्यांची तरुणांमध्ये एक वेगळीच इमेज होती. या क्षेत्रात काम करत असताना अनेक तरुणांना देखील त्यांनी या मीडिया क्षेत्रात आणले व त्यांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून दिला. त्यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम होते. तळा तालुक्यात आपल्या रहाटाड या गावी नेहमी टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा स्वखर्चाने ते भरवत असत. त्यांनी वीस बावीस वर्षापूर्वी तळा तालुक्यात नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा भरविल्या होत्या आणि त्या केबल वर लाईव्ह होत्या. २० वर्षापूर्वी क्रिकेट खेळताना तळ्यातील क्रिकेटर स्क्रीन वर दिसू शकले ते फक्त केशव लोखंडे यांच्या क्रिकेट प्रेमामुळेच. तळा तालुक्यातील तरुणांनी जेव्हा मुंबईत तळा तालुका क्रिकेट असोसिएशन ची स्थापना केली तेव्हा केशव लोखंडे यांना अध्यक्ष करून त्यांचा यथोचित गौरव केला. आज तळा तालुक्यातील एक प्रेमळ, शांत, संयमी व बहुआयामी व्यक्तिमत्व हरपला. त्यांच्या जाण्याने केवळ बौद्ध समाजातच नव्हे तर बहुजन समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मालाड, मुंबई येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध समाजातील, विविध क्षेत्रातील शेकडो मित्रपरिवार, अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कालकथित केशव लोखंडे यांना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा, तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि) रायगड, त्यांचा मित्र परिवार तसेच तळा तालुकावासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अचानक झालेल्या या आघातामुळे त्यांच्या कुटुंबियांवर तसेच मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून लोखंडे कुटुंबीयांना सावरण्याचे बळ मिळो हीच बुध्दांचरणी प्रार्थना. त्यांचा पुण्यानुमोदन आणि शोकसभेचा कार्यक्रम सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या मूळ गावी लुम्बिनी बुद्धविहार, रहाटाड येथे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

संविधानामुळे स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित – प्रशांत ठाकूर

अशोक गायकवाड पनवेल : न्याय, समता आणि बंधूता हे भारतीय संविधानाचे स्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. संविधानामुळे आजही आपले स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित आहे. याचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी केले. युवकांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित आहेत. त्यानुसार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४२४ शाासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने उद्घाटन झाले. यानिमित्ताने पनवेल येथील आयटीआयमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, अनंता गायकवाड, किशोर सुरते, संस्थेचे प्राचार्य नितीन चौधरी, उपप्राचार्य विजय टिकोले, प्रा. आकाश ठाकूर, संदीप वेले, गटनिदेशक नितिन देशमुख, अजय मयेकर, प्रभाकर नगरकर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी डॉ. पराग पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान आणि आपला अभिमान या विषयावर मार्गदर्शन केले.