Author: bittambatami.com

`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले

`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसप्रवासासाठी जाहीर केलेल्या डिजिटल ओळखपत्र योजनेतील अर्ज `महा ई सेवा’ केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावेत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव व `टीएमटी’चे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांना पत्र पाठवून संजय वाघुले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज दाखल करताना होणाऱ्या अतोनात हालाकडे लक्ष वेधले. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची आग्रही मागणी केली आहे. `टीएमटी’ बसमधून ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्र देण्यात येत आहेत. त्यासाठी ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर, वागळे आगार, वृंदावन सोसायटी, लोकमान्यनगर टर्मिनस, पवारनगर टर्मिनस आणि धर्मवीर चौक  येथे अर्ज स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ओळखपत्रासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्वत: उपस्थित राहण्याची अट आहे. त्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हामध्ये रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या ठाणे स्थानकातील केंद्रावर सर्वात जास्त गर्दी होत असून, एक ते दोन तास ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते, याकडे संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या ४ ते ५ लाखांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. त्यातील निम्म्या ज्येष्ठ नागरिकांनी `टीएमटी’चे डिजिटल ओळखपत्र काढण्याचे ठरविल्यास केंद्रांवर मोठी गर्दी होईल. सध्या या योजनेसाठी केवळ ऑफलाईन अर्ज स्विकारले जात आहेत. त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून परिवहन प्रशासनाने अर्ज स्विकारल्यास ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळू शकेल, याकडे लक्ष वेधून संजय वाघुले यांनी डिजिटल ओळखपत्र योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची मागणी केली आहे.

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली – घुफ्रान जेते

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली – घुफ्रान जेते मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सारस्वत बँक पुरस्कृत १७ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला २५-१४, २५-० असे सरळ आणि सहज दोन सेटमध्ये हरवून विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या या सामन्यात घुफ्रानने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली होती. तर महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मुंबईच्या मिताली पाठकने मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-१२, २१-९ असे सहज पराभूत करून विजयावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या सागर वाघमारेला २५-०, २३-७ असे हरवले. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने बाजी मारली. तिने ठाण्याच्याच चैताली सुवारेला १७-१५, २५-११ असे सहज चीत केले. प्रमुख अतिथी लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते विजेत्या खेळाडूंना चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शिवाजी पार्क जिमखान्याचे विश्वस्थ श्रीमती लता देसाई, प्रकाश नायक, महेंद्र ठाकूर, दीपक विश्वासराव, व्हाईस चेअरमन विश्वास नेरुरकर, सरचिटणीस संजीव खानोलकर, सह चिटणीस सुनील रामचंद्रन, इनडोअर खेळ सचिव सनिल समेळ, खजिनदार सी ए विलास सोमण, कार्ड सचिव अजय पाटणकर, कॅन्टीन सचिव आशुतोष जोगळेकर व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार आणि सहसचिव केतन चिखले व डॉ अनिल नेरुरकर उपस्थित होते. पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-१७, २५-२ अभिजित त्रिपनकर ( पुणे ) वि वि झैद अहमद फारुकी ( ठाणे ) २३-१९, २५-० महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. रिंकी कुमारी ( मुंबई ) वि वि चैताली सुवारे ( ठाणे ) २५-२, २५-३ मिताली पाठक ( मुंबई ) वि वि समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) २५-१०, ५-२५, २१-८

  अमर हिंद मंडळात ‘डायनॅमिक’ खो-खोचा महासंग्राम!

कै. उमेश शेणॉय स्मृतीप्रित्यर्थ पुरुष व महिला व्यावसायिक स्पर्धा-२०२६ अमर हिंद मंडळात ‘डायनॅमिक’ खो-खोचा महासंग्राम! क्रीडांगणाला ‘अजितदादा पवार क्रीडा नगरी’ नाव शुक्रवार पासून रंगणार खो-खो क्रीडा जल्लोष मुंबईतील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच! अमर हिंद मंडळाच्या वतीने, मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने, १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर कै. उमेश शेणॉय यांच्या स्मरणार्थ डायनॅमिक प्रायोगिक व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. वेग, डावपेच, चपळाई आणि व्यावसायिक दर्जाचा थरार अनुभवण्यासाठी ही स्पर्धा क्रीडारसिकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. ‘अजित दादा पवार क्रीडा नगरी’चे नामकरण या प्रतिष्ठित स्पर्धाकालावधीत अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणाला ‘अजित दादा पवार क्रीडा नगरी’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या नामकरणामुळे स्पर्धेला अधिक भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार असून, क्रीडा क्षेत्रात नव्या पर्वाची नोंद होणार आहे.…

  दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी

शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ला सर्कल परिसरातील रस्त्यावर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः भिवंडी–कल्याण महामार्गावरील दुर्गाडी पुलाच्या उतारालगतच हे खड्डे असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात होती.  हजारो वाहने ये-जा करणाऱ्या या मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत असे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांचे जीव अक्षरशः धोक्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगतच आणि शहराच्या प्रवेशद्वारावरच अशी अवस्था असणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याचे लक्षात येताच या परिस्थितीची कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांनी तात्काळ दखल घेत परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. कोणताही विलंब न करता त्यांनी संबंधित विभागाला त्वरित सूचना देत युद्धपातळीवर दुरुस्तीचे आदेश दिले. जागरूक नागरिकांनी याबाबत परदेशी यांना सूचित करून वस्तूस्थितीकडे लक्ष वेधले होते. परदेशी यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे अवघ्या २४ तासांत पुलाच्या उतारालगत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या भोवती असलेले सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्यात आला आहे. वेळेत ही कारवाई झाली नसती, तर गंभीर अपघात अटळ होते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. वेळेवर आणि संवेदनशीलपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळले असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. प्रशासनाच्या या जलद प्रतिसादाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले आहे.

आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबलेच पाहिजे – सीटू

आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबलेच पाहिजे – सीटू अनिल ठाणेकर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागताच महाराष्ट्रातील फॅशिस्ट भाजप सरकारने शासकीय रुग्णालयांतील सर्व निःशुल्क सेवा रद्द करून प्रत्येक सेवेसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेत शासन निर्णय (जी.आर) जारी केला. या निर्णयानुसार ५ रुपया पासून ते ४० हजार रुपया पर्यंतचे दर निश्चित करणारे रेट कार्ड लागू करण्याचा आदेश होता. या रेट कार्डमध्ये ओपीडी सेवा, तपासण्या, शस्त्रक्रिया, बेड शुल्क, आयसीयू सुविधा, विशेष उपचार आणि विविध निदान चाचण्यांवर आकारणी करण्याची तरतूद करण्यात आली होती. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वालाच धक्का देणारा हा निर्णय होता. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलच्या माध्यमातून आधीच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात भांडवलदारांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज जवळपास प्रत्येक जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय तसेच शहरी डिस्पेन्सरीमध्ये पॅथॉलॉजी, डायग्नोस्टिक, ॲम्ब्युलन्स, हाऊसकिपिंग, औषध पुरवठा, डायलिसिस इत्यादी सेवा खाजगी कंत्राटदारांकडे सोपविण्यात आल्या आहेत. यामुळे सेवा महाग होणे, जबाबदारी टाळली जाणे आणि लोकांच्या हक्कांवर गदा येणे हे परिणाम स्पष्ट दिसू लागले आहेत. या प्रक्रियेतील पुढचे पाऊल म्हणून हा नवीन जी.आर. जारी करण्यात आला. मागील काही दिवसांत राज्यभरातील विविध सामाजिक व राजकीय पक्ष- संघटनांनी, आरोग्य हक्क चळवळींनी, कामगार संघटनांनी आणि नागरिक मंचांनी या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलनाचा इशाराही दिला. अनेक ठिकाणी निवेदने, निदर्शने आणि पत्रकार परिषदांद्वारे विरोध नोंदविण्यात आला. या व्यापक जन दबावामुळे सरकारला माघार घ्यावी लागली आहे. आरोग्य विभागाने “अनवधानाने दरपत्रक जोडले गेले” असे पोकळ स्पष्टीकरण दिले असले तरी अशा प्रकारचा जी.आर. तयार होणे हीच धोरणात्मक दिशा काय आहे हे दाखवते. भविष्यात असे कोणतेही धोरण पुन्हा आणले जाणार नाही याची कोणतीही ठोस हमी सरकारने दिलेली नाही.१९९१पासून काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकी करणाच्या धोरणांमुळे इतर सर्व सार्वजनिक क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रालाही भांडवलदारांच्या नफ्यासाठी खुले करण्यात आले. सार्वजनिक गुंतवणूक कमी करणे, रिक्त पदे न भरणे, पायाभूत सुविधा दुर्लक्षित ठेवणे आणि नंतर “सेवा अपुरी आहेत” या कारणावरून खाजगी क्षेत्राला प्रवेश देणे हे ठरलेले भांडवलदार धार्जिणे धोरण राबवण्यात आले आहे. २०१४ नंतर सत्तेत आलेल्या मोदी-भाजप सरकारने या प्रक्रियेला अधिक वेग देत नियोजितपणे देशभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधांचे खच्चीकरण केले आणि “कार्यक्षमता”, “गुणवत्ता” आणि “व्यवस्थापन सुधारणा” यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर खाजगी करणाचे धोरण राबवले. आरोग्य हा हक्क नसून बाजारातील सेवा आहे असा दृष्टिकोन लादण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात PPP मॉडेलद्वारे खाजगी हस्तक्षेप झपाट्याने वाढला आहे. मुंबईतील अनेक शासकीय रुग्णालयांतील डायग्नोस्टिक्स, डायलिसिस, कार्डिओलॉजी, रेडिओलॉजी आणि रक्तपेढी सेवा दीर्घकालीन करारांद्वारे खाजगी कंपन्यांकडे देण्यात आल्या आहेत. राज्यातील ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये PPP पद्धतीने कॅथलॅब सुरू करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये MRI, CT स्कॅन, डायलिसिस आणि अनेक प्रगत तपासण्या खाजगी भागीदारीत चालवल्या जात आहेत. १९ वैद्यकीय महाविद्यालयांतील रेडिओलॉजी सेवा PPP अंतर्गत आणण्यात आल्या आहेत. गोवंडी येथील शताब्दी वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, लल्लूभाई कंपाऊंड, मानखुर्द येथील नवीन रुग्णालय तसेच इतर ५ रुग्णालये आणि ससूनशी संलग्न कॅन्सर प्रकल्प PPP मॉडेल अंतर्गत आल्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, विशेष उपचार आणि निदान सेवा यांमध्ये खाजगी भांडवलाचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. दीर्घकालीन करारांमुळे सार्वजनिक नियंत्रण कमी होत असून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व धोक्यात येत आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य रुग्णांवर, कामगार-कष्टकरी वर्गावर, स्थलांतरित लोकसंख्येवर, झोपडपट्टी भागातील नागरिकांवर आणि ग्रामीण गरीबांवर होतो. मोफत सेवांच्या जागी शुल्क आकारणी, कंत्राटी व्यवस्था, आउटसोर्सिंग आणि विमा-आधारित मॉडेल यामुळे आरोग्य सेवा हक्क न राहता परवडणाऱ्या क्षमतेवर अवलंबून राहत आहे. सार्वजनिक रुग्णालये कमकुवत करून खाजगी रुग्णालयांना ग्राहक पुरविण्याची रचना उभी केली जात आहे. आज PPP मॉडेल, खाजगीकरण व एकंदरीत भांडवलशाही नफेखोर आरोग्य व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केल्याशिवाय प्रत्येकाला आरोग्याचा मूलभूत अधिकार मिळणे अशक्य आहे. मोफत, सार्वत्रिक, समताधिष्ठित आणि दर्जेदार आरोग्य सेवा ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यांमध्ये आरोग्य सेवेच्या खाजगीकरणाला जनतेचा तीव्र विरोध आहे. शुल्क आकारणीच्या निर्णयाप्रमाणेच आरोग्य सेवेचे खाजगीकरणाचे धोरण सरकारने रद्द करावे  व  प्रत्येकाला आरोग्याचा मुलभूत हक्क द्यावा अशी मागणी सीटू करीत आहे.

सानपाडा येथे प्रीमियर लीग २०२६ क्रिकेट स्पर्धा संपन्न

सानपाडा येथे प्रीमियर लीग २०२६ क्रिकेट स्पर्धा संपन्न नवी मुंबई : सानपाडा ८  क्रिकेट संघ आयोजित सानपाड़ा तरूणाईंची सर्वाधिक पसंतीचा बहुचर्चित “सानपाड़ा प्रिमियर लीग २०२६ “  चा सांगता समारंभ ८ फेब्रूवारी २०२६ रोजी संपन्न झाला.  एकंदरित १५०  खेळाडुमधून प्रत्येक संघात १४ खेळाडू अधिक एक आयकॉन खेळाडू लिलाव ( बोली )पद्धतीने विभागुन देण्यात आले होते, अशी माहिती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली. यंग एसपीएल स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख ५१ हजार रुपये (स्व. महेश तुकाराम मढवी स्मृतिचषक) तसेच द्वितीय पारितोषिक रोख ३० हजार रुपये व (स्वर्गीय मनोहर देवाराम भोईर स्मूर्तीचषक) होते. त्याचप्रमाणे  ४0+ एसपीएल स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख ३१ हजार रुपये  (स्व. जयदेव श्रावण पाटिल स्मृतिचषक) तसेच द्वितीय पारितोषिक रोख २५ हजार रुपये  (स्वर्गीय विट्ठल बुधाजी दलवी स्मूर्तीचषक) होते.स्पर्धेचा शुभारंभ सानपाडा पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास कठाले, वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय चव्हाण, नगरसेविका कोमल सोमनाथ वास्कर हयांच्या शुभहस्ते संपन्न झाला.तर  संपूर्ण स्पर्धेदरम्यान शिवसेना नेते संसदरत्न खासदार मा.नरेश  म्हस्के  , उपजिल्हाप्रमुख  अजित सावंत, शहरप्रमुख  विजय माने , उपशहरप्रमुख गणेश पावगे, मा. नगरसेवक काशिनाथ पवार , सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारूती विश्वासराव, माजी अध्यक्ष  मारूती कदम, राष्ट्रपती पदक विजेते बाबासाहेब ढाकणे, सानपाडा गार्डन ७.५० ग्रुप, वरिष्ठ पोलिस निरिक्षक  मा. कैलास डोंगरे, मा. मंडलिक , विभागप्रमुख विकास गाढवे, उपविभागप्रमुख संजय पाटिल, शाखाप्रमुख रणधीर सुर्वे,उमेश लोहोट, सामाजिक कार्यकर्त्ते सुरेश मढवी, ग्रामस्थ दिलीप मढवी, शत्रुघ्न पाटिल, बळीराम वास्कर , कमळाकर दळवी, सोपान ठाकुर, जनार्धन वास्कर, बबन ठाकुर, प्रभुदास म्हात्रे, डॉ. संजय लाड़ ,  काशीनाथ वास्कर, दत्ता वास्कर, नामदेव ठाकुर,  रवी भाई हयांची प्रमुख उपस्थिती लाभली. पारितोषिक वितरण संसदरत्न ख़ासदार मा.नरेशजी म्हस्के,  पोलिस निरीक्षक कुटे, प्रसाद महाडिक, विकास गाढवे, स्थानिक नगरसेविका  कोमल वास्कर, शत्रुघ्न पाटिल ह्यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाला.यंग एसपीएल स्पर्धेचा अंतिम विजयी संघ पाल्म फाइटर तर उपविजेपते विधिशा चैलेंजर संघाने पटकावले.  स्पर्धेतिल मालिकाविर ( स्वर्गीय लक्ष्मण अप्पा मढवी स्मुर्तीचषक ) व उत्कृष्ट गोलंदाज़ आकाश बनसोडे यांस स्वर्गीय श्रावणी विट्ठल शेट्टी स्मृतिचषकाने सन्मानित केले , व उत्कृष्ट फलंदाज़ स्वर्गीय रामदास बाला पाटिल स्मृतिचषक भरत वाढवल , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक  स्वर्गीय जयराम नथु पाटील स्मृती चषक ओमकार टोम्पे हे मानकरी ठरले. ४0+ सानपाडा प्रिनियर लीग २०२६ चे प्रथम पारितोषिक रोख ३१ हजार रुपये  साठी स्वर्गीय जयदेव श्रावण पाटिल स्मूर्तिचषक  विधी इंटरप्रायज़ेस हा संघ मानकरी ठरला तर प्रांजल इलेवन संघास उपविजेता पारितोषिक रोख २५ हजार रुपये व स्वर्गीय विट्ठल बुधाजी दळवी स्मूर्तिचषक देवुन गौरविन्यात आले. मालिकावीर – म्हणुन प्रकाश ठाकुर हा  स्वर्गीय सदानंद  बाळू पाटील स्मृतिचषकाचा मानकरी ठरला.  उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय भालचंद्र दत्तु ठाकुर स्मृतिचषक इर्शाद दांडेकर , उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय छगन मोरेश्वर वास्कर स्मृतिचषक, मुकेश बाली उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वर्गीय बलिराम हिराजी पाटिल स्मृतिचषकावर किशोर जाधव हयांनी आपले नाव कोरले.प्रत्येक सामना सामनाविर  म्हणुन बेबीबाई मधु पाटिल स्मृतिचषक बेबीबाई रमेश पाटिल स्मृतिचषक  रेवती भालचन्द्र ठाकुर स्मृतिचषक वैशाली कलझुणकर स्मृती चषक अशोक शां. अंकुश स्मृतिचषक अनिल गव्हाणे स्मृतिचषक गणेश एकनाथ घोलप स्मृतिचषका सोबत विशेष पारितोषिक तसेच लकी ड्रा, मैदाना बाहेर झेल अशी अनेकानेक पारितोषिकाच्या लयलुट सोबत अंतिम फेरी विजेत्या मालीकास स्मार्ट टीव्ही भेट म्हणुन दिले  गेले .सदर स्पर्धेनिमित्त गावदेवी मैदान सानपाडा येथे शेकडोंच्या संख्येंने  क्रीडा प्रेमीनी सानपाडा प्रिनियर लीग २०२६ पर्व ९ वे करिता उपस्थिती दर्शविली. श्री सानपाड़ा ८ चे आयोजक  भानूदास ठाकुर, निखिल पाटिल, संदेश दळवी , हेमंत दळवी, पवन मोढवे, मितेश दळवी, अरविंद ठाकुर , तसेच विशेष सहकार्य करणारे  प्रल्हाद ठाकुर, शिवसेना विभाग प्रमुख  आशिष वास्कर , रिद्धेश ठाकुर, प्रसाद गोन्दलेकर, सोमनाथ पाटिल, सागर देवकर, जयदीप पाटिल , श्री दत्त मित्र मंडल, ffc ग्रुप, वाडा बॉयज, १ नं ग्रुप, शिवसेना शाखा बॉयज यांचा सन्मान सानपाड़ा ग्रामस्त व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेच्या व्यासपीठावर एसपीएल खेळाडू प्रकाश ठाकुर, सुजय शेट्टी, आकाश बनसोडे, प्रवीण वास्कर हयांचा वाढ़दिवस केक क़ापुन साजरा करण्यात आला. तर क्रिड़ा रसिकांकरिता जेवण व्यवस्था हेमंत  दळवी,  किशोर वास्कर,  सुरेश ठाकुर,विनोद पाटिल,  केसरीनाथ ठाकुर, चिकन माया ट्रेडर्सचे माया ठाकुर,भाकरी सुविधा  वासुदेव पाटिल हयांच्या वतीने करण्यात आली.

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे  अनिल ठाणेकर मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्ज मुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

वसंत विहार विद्यालयाचा विजय

ॲड. रमाकांत ओवळेकर चषक स्पर्धा वसंत विहार विद्यालयाचा विजय आयर्न ठाकूरची हॅट्रिक, विहान सरमळकर सामनावीर ठाणे -मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने युनायटेड क्रिकेटर्स व सूर सुदान शौर्या स्वर संस्था आयोजित १४…

श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणेचा रौप्यमहोत्सवी सोहळा संपन्न

श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणेचा रौप्यमहोत्सवी सोहळा संपन्न ठाणे : राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे ७ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील मान्यताप्राप्त कथ्थक नृत्य संस्था श्री गणराज नृत्य कला निकेतन यांच्या २५ वर्षपूर्तीचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या संस्थापिका नृत्यालंकार  मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, पं. नंदकिशोर कपोते, पं. बाळासाहेब सूर्यवंशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, सुयोग पत्की, संजीव ब्रह्मे, अ‍ॅड. माधवी नाईक, गुरु डॉ. मंजिरी देव, तालमणी पं. मुकुंदराज देव आणि श्री श्रीराम देव यांसह अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली व त्यांनी संस्थेला आशीर्वाद दिले. कार्यक्रमात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध कथक नृत्यप्रस्तुती आणि थीमॅटिक सादरीकरणे केली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापिका मनाली देव, त्यांच्या वरिष्ठ शिष्य आणि साथीदार कलाकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमादरम्यान श्री गणराज नृत्य कला निकेतनचा प्रवास आणि संस्थापिका मनाली देव यांच्या कलासाधनेचा आढावा घेणारी सुमारे १५ मिनिटांची लघुचित्रफीत सादर करण्यात आली, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे महिला सक्षमीकरणावर आधारित “शक्तिरूपेण संस्थिता” हा अनोखा संगीत-नृत्य बॅले. तसेच प्रसिद्ध तबलावादक रोहित देव यांनी सादर केलेली विशेष थीमॅटिक फ्युजन संगीतरचना रसिकांना विशेष भावली. मनाली देव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “आग्र्याहून सुटका” हा प्रभावी गतभाव सादर केला, तसेच बिंदादिन महाराजांची ठुमरी सादर केली ज्याला गायनाची साथ गुरू तालमणी पं मुकुंदराज देव यांनी केली, ज्याला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कथक रचना आणि मराठी गीतांवरील नृत्यप्रस्तुतींनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे सुंदर निवेदन वृंदा दाभोळकर यांनी केले. साथसंगत कलाकार म्हणून अवधूत घेवडेकर (तबला), ओमस्वरूप कोटकर (तबला), मंदार दीक्षित (हार्मोनियम), प्राजक्ता जोशी (गायन), आकाश कुलकर्णी (कीबोर्ड) आणि सिद्धेश मडकईकर (क्लॅप बॉक्स) यांनी कार्यक्रमाला सुरेल साथ दिली. गडकरी रंगायतन उत्साही प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. संस्थेच्या काशिनाथ घाणेकर शाखेतील पालकांनी मनाली देव यांच्या छायाचित्रांनी सजवलेला सुंदर केक भेट देऊन गुरुंच्या हस्ते केक-कटिंग केले. कार्यक्रमाची सांगता लेझीम आणि कथ्थक तत्कार यांच्या अनोख्या संगमाने झाली. एकंदरीत, २५ वर्षांच्या कलासाधनेचा हा सोहळा ठाणेकर रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला आणि श्री गणराज नृत्य कला निकेतनच्या समृद्ध परंपरेची साक्ष देऊन गेला.

  जिहांश पाटीलचा डबल धमाका

जिहांश पाटीलचा डबल धमाका राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत हृदित्य, काश्वी, त्रिशानेही जिंकली पदके ठाणे : महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटनेने कोपरगाव येथे आयोजित कनिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याच्या जिहांश पाटीलने ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत १५ दिवसांपूर्वी नोंदवलेला स्वतःचाच जिल्हा विक्रम पुसून टाकताना नवा उच्चांक नोंदवला. ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स संघाच्या जिहांशसह हृदित्य कवीश्वर, काश्वी करंजकर आणि त्रिशा गाला यांनी आपल्या संघासह ठाणे जिल्ह्याला पदके जिंकून दिली. जिहांशने ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत ठाणे जिल्हा अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत रचलेला ७.५ सेकंदाचा जिल्हा विक्रम मागे टाकताना ७.३२ सेकंदाचा विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय जिहांशने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १४.२८ सेकंदासह राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे सुवर्ण पदक निश्चित केले.  कनिष्ठ गटात ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत हृदित्यने ८.७८ सेकंद अशा कामगिरीसह  अव्वल स्थान मिळवले. मुलींच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत काश्वीने १५.७ सेकंद अशी वेळ नोंदवून वैयक्तिक रौप्य पदक पक्के केले. या स्पर्धेत अवघ्या ०.०१सेकंदाने काश्वीला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.तर अवघ्या सहा महिन्यांपासून धावण्याच्या सरावास सुरुवात करणाऱ्या त्रिक्षाने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १७.८३ सेकंद अशा वेळेसह १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील कांस्य पदक जिंकले.