Author: bittambatami.com

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार मुंबई  : आगामी विधानसभेपुर्वीचे शेवटचे पावसाळी अधिवेशन यंदा वादळी ठरणारी आहे. लोकसभेच्या निवडणूकीतील विजयामुळे महाविकास आघाडीचा विश्वास दुणावला आहे. तर सत्ता स्थापनेपासून विशेषता शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर…

पामबीच खाडी किनारा परिसरात स्वच्छता मोहीम

वाशी : नवी मुंबईतील स्वच्छताकार्यात तरुणाई स्वयंस्फूर्तीने सहभागी होताना दिसत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार स्वच्छता कार्यात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. या अनुषंगाने विविध विभागांमध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, तसेच उपायुक्त डॉ. अजय गडदे व डॉ. कैलास गायकवाड, घणसोली विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नेतृत्वाखाली पामबीचलगत खाडी किनारा परिसरात राबविण्यात आली. या वेळी घणसोली पामबीच खाडी किनारा परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये स्थानिक नागरिकांप्रमाणेच तेजस्व करिअर अकॅडमीच्या ७० युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकसह इतर कचरा गोळा केला. यामध्ये घणसोली विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक व स्वच्छता कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.

डोंबिवलीकरांची आरोग्यदायी मैत्रीची ‘धाव’

10 हजार नागरिक होणार सहभागी     डोंबिवली, : डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवली रनर ग्रुप यांच्या वतीने डोंबिवलीकरांसाठी आरोग्य आणि मैत्री दिनाची सांगड घालत 4 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमधील सर्वात मोठ्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024’ चे  आयोजन करण्यात आले आहे. चालणे, धावणे किंवा पळणे आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. धकाधकीच्या शहरी वातावरणात आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असं आरोग्यविज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे, धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी हा पुढाकार घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली करांसाठी आरोग्यदायी मैत्रीची धाव म्हणजेच ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी डोंबिवलीत बुधवारी मंत्री चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ही स्पर्धा 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 1.6 किमीचा फन रन अशा टप्प्यांत होणार आहे. 1.6 किमीचा फन रन हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे. यात 6 वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असेल. कल्याण डोंबिवली रनर ग्रुप 500 मॅरॅथॉनर्स असलेली संस्था गेली 9 वर्ष डोंबिवली कल्याण मध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे. डोंबिवली हे संस्कृतीक शहर तर आहेच पण या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरुस्त बनविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहे. ज्यामुळे डोंबिवली हे फिटनेस उपक्रमांचे केंद्र बनेल याची आम्ही आशा बाळगून आहोत, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला ई प्रमाणपत्र आणि सहभाग पदक मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 5 किमी ही धाव अशा उत्साही लोकांसाठी आहे ज्यांनी नुकताच धावण्याचा प्रवास सुरू केला आहे आणि त्यांना भविष्यात 10 आणि 21 हजार मी सारख्या शर्यतींमध्ये दीर्घकाळापर्यंत प्रगती करायची आहे. त्या सर्वांना शर्यत पूर्ण झाल्यावर पदक आणि ई-प्रमाणपत्र मिळतील. फन रन धाव 1 मैल ची धावरनिंग इव्हेंटचा आनंद घेण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसह ही रन मजेदार रन असेल आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांना सहभाग ई-सर्टिफिकेट मिळेल. 10 आणि 21 हजार मी या दोन श्रेणी कालबध्द शर्यती आयोजित केल्या आहेत. भारतातील सर्व प्रमुख धावण्याच्या इव्हेंटसाठी पात्रता म्हणून प्रमाणित केल्या जातील. अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व नोंदणीकृत सहभागींना स्पर्धा पूर्णत्वाचे ई-प्रमाणपत्र आणि पदक मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ०००

मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात पाण्याची चणचण

मुंबई : परीक्षेसंबंधित विविध गोंधळांमुळे मन:स्ताप सहन करणारे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी सध्या पाण्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहेत. कलिना संकुलाजवळ असणाऱ्या सांस्कृतिक भवनात पाण्याचा तुटवडा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रेही बंद आणि प्रसाधनगृहांसह इतर ठिकाणी अस्वच्छता असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर इमारतीत डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे धुळीच्या साम्राज्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. कलिना संकुलाजवळ असणाऱ्या सांस्कृतिक भवनाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर नाट्यशास्त्र विभाग, दुसऱ्या मजल्यावर संगीत विभाग, तिसऱ्या मजल्यावर लोककला अकादमी आणि चौथ्या मजल्यावर शाहीर अमरशेख अध्यासन केंद्र आहे. मात्र, बाहेरून प्रशस्त व चकचकीत दिसणारी ही इमारत आतून विविध सोयी-सुविधांपासून वंचित आहे. कलेचे धडे गिरवण्यासाठी सांस्कृतिक भवनात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या तुटवड्यामुळे हाल सोसावे लागत असून बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रेही बंद आहेत आणि प्रसाधनगृहांमध्ये हात धुण्यासाठीही पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकदा टँकरने पाणीपुरवठा केला जातो, मात्र टँकरचे पाणीही अपुरे पडते. तसेच, सांस्कृतिक भवनाच्या इमारतीत डागडुजीचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे सर्वत्र धूळ व मातीचे साम्राज्य पसरून विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. प्रसाधनगृहांमध्येही अस्वच्छता असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कोट सांस्कृतिक भवनातील गैरसोयींबाबत अद्याप कोणत्याही विद्यार्थ्याने तक्रार केलेली नाही. काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, प्रशासनाकडून तात्काळ सुधारणा करण्यात येईल. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. डॉ. बळीराम गायकवाड, कुलसचिव, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी ०००००

कचरा व्यवस्थापनात नागरिकांनी सक्रिय सहभाग गरजेचा – सौरभ राव

ठाणे-  कचऱ्याबद्दल जास्तीत जास्त नागरिकांशी संवाद वाढवावा, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या संवादासाठी स्थानिक तरूणतरुणींचे गट, स्वयंसेवी संस्था, महिलांचे गट यांनी मदत घ्यावी, असेही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नुकतेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत एक संवाद सत्र आयोजित केले होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण, त्याची विल्हेवाट, नाल्यात टाकला जाणारा कचरा या सगळ्या पैलूंबाबत जनजागृती करून कचऱ्याच्या व्यवस्थापनात नागरिकांचा सक्रिय सहभाग घेण्याची आवश्यकता यावर ठाणे महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी या संवाद सत्रात कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग यांच्याविषयी प्रास्ताविक केले. या सत्रास, समर्थ भारत व्यासपीठ, स्त्री मुक्ती संघटना, परिसर भगिनी विकास संघ, सुनिलिमा सस्टेनेबल सोल्यूशन्स, आरनिसर्ग फाउंडेशन, एलएएचएस प्रतिष्ठान, ठाणे, रोटरी क्लब, ठाणे, ॲण्टी प्लास्टिक ब्रिगेड, पर्यावरण दक्षता मंडळ, ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन, हिरवं स्वप्न, हरियाली, स्वत्व, ठाणे आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरी गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कचरा व्यवस्थापनासाठी क्षमता वृद्धी असे स्वरुप असलेल्या या सत्रात, घरगुती खत निर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण, एकल वापराच्या प्लास्टिकवरील प्रतिबंध, घनकचरा व्यवस्थापन करणारी मोठी गृहसंकुले, त्यांचे अनुभव, एनएसएसच्या विद्यार्थांच्या मदतीने शाळा, महाविद्यालयातील जागृती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर, नाल्यात कचरा न टाकण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन, या सत्रात आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी केले. 000000

 ठाणे महापालिकेला सीएसआर निधीतून चार एक्स रे मशीन झाल्या उपलब्ध

भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांच्याकडून   ठाणे  : मुंबई येथील भारत सरकारच्या टांकसाळीच्या सीएसआर फंडातून ठाणे महापालिकेस चार पोर्टेबल एक्स रे मशीन्स (क्ष किरण प्रतिमा यंत्र) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी दोन मशीन्स छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे तर उर्वरित दोन मशीन महापालिकेची आरोग्य केंद्रे व बाह्य रुग्ण तपासणी शिबिरांसाठी वापरण्यात येणार आहेत. ठाणे महापालिकेस सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे फेब्रुवारी २०२४ मध्ये मागणी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत असलेल्या भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांच्यातर्फे एक कोटी २१ लाख रुपये एवढा निधी उपलब्ध झाला. या निधीतून त्यांनी महापालिकेस चार पोर्टेबल एक्सरे मशीन उपलब्ध करून दिल्या. या मशीन्स नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल झाल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या निधी उपलब्धतेबद्दल भारत सरकार टांकसाळ यांचे आभार मानले असून या मशीन्समुळे रुग्णसेवेला फायदा होईल, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या बाह्य रुग्ण तपासणी शिबिरात एक्स रे त्वरित उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे, रुग्णाला मोफत एक्स रेसाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्र किंवा पालिकेशी संलग्न असलेल्या खाजगी लॅबमध्ये जावे लागत होते. अशा स्थितीत सुमारे ५० टक्के रुग्ण आवश्यकता असूनही एक्स रे काढणे टाळत असत. या पोर्टेबल एक्स रे मशीन्समुळे रुग्णाचा एक्स रे त्वरित लॅपटॉपवर उपलब्ध होईल आणि त्याचा रिपोर्ट प्रिंट न करता रुग्णाच्या मोबाईलवर पाठवणे शक्य होईल. त्यामुळे रुग्णांचे त्वरित निदान करणे साेपे होणार आहे. भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांनी सीएसआर निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे पोर्टेबल एक्स रे मशीन उपलब्ध झाले आहेत. त्याचा फायदा आरोग्य शिबिरांनाही होणार आहे. त्यामुळे येत्या काळात अशी आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी यांनी केले आहे.

महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांची नौपाड्यात बिल्डरांबरोबर हातमिळवणी

पक्की चाळ धोकादायक जाहीर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचा खळबळजनक आरोप     ठाणे : महापालिकेच्या नौपाडा विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिल्डरांबरोबर हातमिळवणी करून दादा पाटीलवाडीत असलेली सुस्थितीतील एक पक्की चाळ धोकादायक जाहीर केली आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून चाळीतील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. याच पद्धतीने नौपाड्यातील पक्क्या चाळी व अधिकृत सुस्थितीतील इमारती धोकादायक जाहीर करण्याचा उद्योग सुरू झाला आहे, याकडे श्री. वाघुले यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. जुने ठाणे असलेल्या नौपाडा विभागात अनेक जुन्या अधिकृत इमारती आहेत. तर काही भागात अजूनही चाळींमध्ये नागरिक वास्तव्य करीत आहेत. या भागातील जागांचे भाव गगनाला भि़डल्यामुळे काही बिल्डरांनी महापालिकेच्या नौपाडा विभागातील काही अधिकाऱ्यांबरोबर हातमिळवणी केली. त्यातून काही चाळी व मोक्याच्या ठिकाणांवरील जुन्या अधिकृत इमारतींवर बिल्डरांची नजर गेली. त्यातून चाळमालकांबरोबर संधान साधून सुस्थितीतील व दुरुस्तीयोग्य असलेल्या चाळी व इमारतींना धोकादायक म्हणून जाहीर केले जात आहे. तसेच चाळीतील रहिवाशांवर दहशत पसरवली जात आहे. या प्रकारामुळे सामान्य रहिवाशी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी श्री. संजय वाघुले यांनी केली आहे. महापालिकेच्या नियमानुसार धोकादायक चाळी व इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करणे गरजेचे असते. मात्र, जागा बळकावण्याचा हव्यास असलेल्या बिल्डरांनी नियमांची पायमल्ली सुरू केली. त्यातून दादा पाटीलवाडीतील १२ फूट उंच असलेली १० बाय २० चौरस फूटांचे रुम असलेली १० भाडोत्री राहणारी चाळ धोकादायक ठरवून पाडण्याचा घाट घातला गेला आहे. ही चाळ पाडण्यात बिल्डरांना यश आल्यास नौपाड्यातील आणखी काही चाळी व जुन्या इमारतींवरही कुऱ्हाड चालविली जाईल, अशी भीती श्री. संजय वाघुले यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सध्या नौपाड्यातील जुन्या इमारतींमधून `हक्क प्रमाणपत्र’ देतानाही हेतुपुरस्सरपणे दिरंगाई केली जात असल्याचा आरोप श्री. वाघुले यांनी केला. 000000

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

समता, बंधुता, मानवता यांची स्वकृतीतून प्रचिती देत सामाजिक न्यायाचे राज्य करणारे लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन…

प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कामगाराला सेवेत घेण्याचे ठाणे लेबर कोर्टाचे आदेश  – जगदीश खैरालिया

ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कामगार राजबीर सोनपाल चौहान यांना पूर्वलक्षी प्रभावाने कामावर हजर करून घेणे बाबत मा.ठाणे लेबर कोर्टाने आदेश पारित केले आहे, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. कम्प्लेंट (युएलपी) क्र .५५ /२०२१ नुसार ठाणे लेबर कोर्टात राजबीर चौहान यांनी दावा दाखल केला होता. अर्जदार सफाई कर्मचारी राजबीर यांना दि. २९ जानेवारी २०२१ रोजी अचानक ठेकेदार मेसर्स. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि. पुणे यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अचानक कामावरून काढून कमी केले होते. अनेक महिने प्रयत्न करूनही ठेकेदार चे मालक श्री विजय कांबळे आणि रूग्णालय प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने राजबीर चौहान यांनी शेवटी न्याय मिळण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. ठाणे मनोरूग्णालयातील कायम कर्मचाऱ्यांनी संप पुकारले असतांना कंत्राटदारांमार्फत मार्फत कार्यरत सफाई सेवकांनी मनोरूग्णांचे हित लक्षात घेऊन साफसफाईचे काम बंद केले नव्हते. तरी देखील राजबीर चौहान यांना विना कायदेशीर प्रक्रिया कोणतीही बचावाची संधी न देता अचानक कामावरून कमी केल्याने राजबीर चौहान यांनी न्यायालयात दाद मागितली होती. सुमारे साडे तीन वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर शेवटी न्याय मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.  कोर्टात राजबीर चौहान यांची बाजू ज्येष्ठ वकील नितीन शिवकर यांनी बाजू मांडली ठेकेदार तर्फे. वकील सचिन रेगे आणि रूग्णालय प्रशासनातर्फे वकील ए. के. पुराणिक यांनी बाजू मांडली होती.  ठाणे  लेबर कोर्ट येथे श्रीमती धनश्री मोरे (जज) यांनी दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी हा निकाल जाहीर केला आहे. याप्रकरणात वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांचे देखील कामगार राजबीर चौहान यांचे आभार व्यक्त केले आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार यांनी हटवादी भूमिका घेऊन राजबीर चौहान यांना कामावर हजर करून घेऊन कोर्टाचे आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर कोर्टाचे अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली जाईल असा इशारा युनियन तर्फे कामगार नेते जगदीश खैरालिया यांनी दिला आहे. 000000

झोपेची गोळी दिली नाही म्हणून खोणी-पलावातील नागरिकाची औषध दुकानातील विक्रेत्याला मारहाण

डोंबिवली : दुकानात झोपेची गोळी नाही, असे कारण औषध खरेदीसाठी आलेल्या खोणी-पलावातील एका रहिवाशाला औषध विक्रेत्याने दिल्याने त्याचा राग येऊन रहिवाशाने आपल्या साथीदार मुलासह औषध विक्रेत्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडला आहे. दीपक अमृतलाल करोडिया (५४, रा. लेकसाईड, पलावा, खोणी), दीपक यांचा मुलगा दर्शन (३२) अशी आरोपींची नावे आहेत. खोणी पलावा येथील लेकशोअर ग्रीनमधील संजीवनी मेडिकल दुकानात हा प्रकार घडला आहे. या दुकानातील अंबरनाथ कोहजगाव भागात राहणारा कामगार अजय रामचंद्र स्वामी (३२) यांनी मारहाणप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अजय स्वामी हे संजीवनी मेडिकल दुकानात ग्राहकांना औषध विक्रीची कामे करतात. सोमवारी रात्री दुकान बंंद केले जात असताना दुकानात पलावा भागात राहणारे आरोपी दीपक करोडिया आणि त्यांचा मुलगा दर्शन दुकानात आले. त्यांनी जवळ डाॅक्टरांची औषध चिठ्ठी नसताना औषध विक्रेता अजय यांना झोपेची गोळी मागितली. अजयने झोपेची गोळी नाही असे उत्तर दिले. त्याचा राग दीपक यांना आला. त्यांनी अजय यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. त्यांचा मुलगा दर्शन याने दुकानात शिरून दुकानात असलेला लाकडी दांडका घेऊन त्या दांडक्याने अजयला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय यांना दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुसळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. 00000