Author: bittambatami.com

पर्यटनासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही करा-किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : जिल्ह्यातील गड किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जाणे गरजेचे आहेत. तहसील व उपविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी यासाठी गाव पातळीवरील यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, मान्सून पर्यटन आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर दुर्घटनांच्या होऊ नये यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या सहभागाने गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. या समितीद्वारे सदर गावाच्या परिसर हद्दीतील पर्यटन स्थळ, तलाव, धबधबे , समुद्रकिनारे अशा जागांवर जीवित हानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार , गटविकास अधिकारी , पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना विविध माध्यमातून सतर्क करावे असे सुचित केले.;यावेळी पोलीस अधीक्षक घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बस्टेवाड यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. मोरबे धरणाची सुरक्षा व्यवस्था, काशीद समुद्रकिनारा येथे पर्यटक सुरक्षेसाठी वॉच टॉवर उभारणे, विविध धबधबे गड-किल्ले आदीं ठिकाणी संबंधित विभागांच्या वतीने उपाययोजना करणेबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता रूपाली पाटील , कार्यकारी अभियंता महेश नामदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी बैठकीत सहभागी होत विविध माहिती दिली. मान्सून पर्यटनाच्या अनुषंगाने विविध तलाव, धबधब्याच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात पर्यटक येत असतात . या व मागील वर्षी काही ठिकाणी अपघात होवून पर्यटकांच्या मृत्यु होण्याच्या दुघटना घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रबळगडाच्या धर्तीवर इरशाळगड, पेब किल्ला, माणिक गड (रसायनी), कोथळी गड(पेठ गड), सागरगड व इतर पर्यटकांच्या गर्दी होणाऱ्या वन विभागाच्या हद्दीमधील गड-किल्ल्यावर स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देणे. पर्यटकांना स्थानिक गार्डड सोबत नेणे बंधनकारक करावे. पर्यटकांना गड-किल्ले, धबधबा, धरणे , पाणी प्रकल्प समुद्र किनारी व इतर धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास प्रतिबंध करणे बाबत चर्चा करून सूचना देण्यात आल्या. 0000

तुर्भे विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीम

नवी मुंबई : शहर प्लास्टिकमुक्त असण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध माध्यमांतून प्रयत्न करत असून नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या तसेच एकल वापर प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमाही राबविण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक फ्री मार्केट ही संकल्पना राबविली जात आहे. या मार्केटमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी कापडी पिशव्या वेंडींग मशीन लावण्यात येत आहेत. प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिम राबवताना तुर्भे विभाग कार्यालयांतर्गत सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. भरत धांडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे आणि परिमंडळ 1 चे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणा-या दोन व्यावसायिकांवर कारवाई करत प्रत्येकी रु. 5 हजार प्रमाणे एकूण रू. 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम जमा केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता पसरवणा-या दोन व्यावसायिकांविरुध्द कारवाई करुन प्रत्येकी रु. 250/- प्रमाणे एकूण रु. 500/- इतका दंड वसूल केला. या कारवाईमध्ये स्वच्छता अधिकारी श्री.जयेश पाटील आणि स्वच्छता निरीक्षक सहभागी होते. 00000

इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर यांची तपासणी व धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार !

समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांच्या तक्रारीची ठामपा आयुक्त सौरभ राव यांनी घेतली दखल अनिल ठाणेकर     ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवडा विधानसभा उपशहरप्रमुख, समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी, युवासेनेचे ओवळा माजीवडा विधानसभा सचिव सागर बैरीशेट्टी, माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, संजय मोरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना ठाण्यातील गावंडबाग क्षेत्रातील टर्फ बाजूच्या इमारतीतील वेदर शेड उडून झालेल्या अपघातामुळे ९ मुले जखमी झाल्याची दुर्घटना कानावर घालून ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी करण्याची तसेच धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याची तत्काळ दखल घेत सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांच्या घेतलेल्या बैठकीत अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते. या बैठकीत समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने चर्चा होऊन महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी तसेच धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले. ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसेच, वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे यांचीही माहिती तात्काळ घेण्यात यावी. त्याचबरोबर, सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रती तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्यात यावी.महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या ३३ फलकांचे त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलेले नाही. याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत.त्यासाठी, अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश दिले. वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले. त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी ९ मुले जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित इमारतींने पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतलेली नसल्यास त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी वर्तकनगर सहायक आयुक्तांना दिले. इमारतीवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेवून पालिका क्षेत्रातील सर्व इमारतीवरील पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जा पॅनल, मोबाईल टॉवर यांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. त्यांचे स्थिरता प्रमाणपत्र, परवानगी यांची तपासणी केली जावी. ही तपासणी करताना काय पहावे यांची एक आदर्श कार्यपद्धती मुख्यालयाकडून देण्यात येईल. त्यानुसार, ही पाहणी करावी, असे आयुक्त राव यांनी सांगितले. अतिधोकादायक इमारती रिक्त करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी प्रत्येक इमारतीनिहाय स्वतंत्र उपाययोजना करून या इमारती रिक्त होतील हे सर्व सहायक आयुक्तांनी पहावे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. नौपाडा आणि कोपरी भागातील २३ व्याप्त अतिधोकादायक इमारतींपैकी दौलत नगर येथील १४ इमारतींचा प्रश्न काही दिवसात मार्गी लागेल. तर, नवीन बांधकाम परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था केल्याने आणखी ७ इमारतीतील नागरिक इमारत रिक्त करण्यास सहकार्य करतील, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.इतर प्रभागातील ८ इमारती अती धोकादायक असून त्यांचीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार, पाणी जोडणी तोडण्यात येईल. तसेच, वीज जोडणी तोडण्यासाठी महावितरण आणि टोरंट या कंपन्यांनाही लेखी कळविण्यात येणार आहे. ज्या धोकादायक इमारतींचे मालक, रहिवासी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास तयार नसतील त्या धोकादायक इमारतींची वर्गवारी सी वनमध्ये करून त्यांना अंतिम इशारा नोटीस देवून त्या रिकाम्या कराव्यात. नागरिकांच्या जिविताच्या काळजीपोटी ही कारवाई करावी लागेल. वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाईही नोटीसांची मुदत संपताच सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. 0000

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्र.…

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी. 0000

दरड कोसळण्याच्या घटनांपासून ‘मुक्त मुंबई’ हे आमचे लक्ष्य!

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार- एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर     ठाणे : मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून  ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरात आणण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बुधवारी दुपारी घाटकोपर भागातील असाल्फ व्हिलेज येथील हनुमान टेकडी भागाला भेट दिली आणि त्याठिकाणी डोंगराला बसविण्यात येत असलेल्या सेफ्टी नेटची आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप लांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त रमाकांत बिरादार, उपायुक्त देविदास क्षीरसागर इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच हनुमान टेकडी येथे पाहणीनंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राचा सर्वे करण्यास सांगितले होते. त्यानुसार, मुंबई मध्ये एकूण ३१ दरड प्रवण क्षेत्र आहेत. त्यातील आज असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी येथील सेफ्टी नेट बसवण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. हे काम अतिशय अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे त्यासाठी स्वीस तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येत आहे. खडकाच्या आत मध्ये आठ मीटर खोल इतके सुरक्षित पद्धतीने ही नेट बसवली जाते. त्यामुळे येथील सुरक्षितता अधिक वाढणार आहे. मुंबईत सर्व ३१ ठिकाणी हे काम सुरू आहे. कोणत्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू नये हे आमचे लक्ष्य आहे.  दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई आम्हाला बनवायची आहे. त्यादिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, २००१ मध्ये याच हनुमान टेकडी येथे दरड कोसळल्याची घटना घडून ७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता अशा घटना मुंबई मध्ये कुठेच घडू नयेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे मुंबई – पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्या, तशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. त्यामुळेत याठिकाणी भेट देऊन पाहणी केली कारण, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हजारो कुटुंबे याठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले. चौकट स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदय तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी येथे पोहोचले. त्यावेळी दरड कोसळण्याच्या घटनांपासून संरक्षणासाठी ज्या सेफ्टी नेट बसवल्या आहेत. त्यामुळे जीवाचा धीका कमी झाल्याची भावना व्यक्त केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करीत सहृद स्वागत केले. चौकट असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटीवाटीने गजबजलेला आहे.हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत.पायथ्यापासून वर टेकडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंद, निमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता. थोडंसं चाललं तरी धाप लागावी असा हा मार्ग. मात्र, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन मुंबई : छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी संभाजी जाधव, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ०००००

राज्य कॅरम प्रशिक्षण केंद्र – नोंदणी प्रक्रिया सुरु

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पुढाकाराने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने दादर येथे सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडूंची  नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी ५ ते ९ दरम्यान या वातानुकूलित केंद्रात खेळाडूंना सराव करता येणार आहे. शिवाय दर शनिवारी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत राज्यातील युवा मुला मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून सरावासाठी व प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ४० खेळाडूंची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल. असोसिएशनने राज्यातील राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय विजेते तसेच छत्रपती पुरस्कारार्थी कॅरम खेळाडूंना या केंद्रात मोफत सराव करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी दिनांक २९ जुन २०२४ पर्यंत संजय बर्वे भ्रमणध्वनी क्रमांक ९१३७५७८९७८ / ९९६९६०६०८२ यांच्याशी संपर्क साधावा. ००००००

अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर कारवाई, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त – तहसीलदार अभिजित खोले

ठाणे : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशान्वये व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या निर्देशानुसार अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर कारवाई करण्यात येऊन २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली. अवैध वाळू उपसाविरोधात आज जिल्हा प्रशासनाच्या भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल्हेर ते कोन येथील खाडीपात्रात कारवाई करून 1 बार्ज, 1 संक्शन जप्त करून ते नष्ट केले. या कारवाईतील मुद्देमालाची अंदाजे किंमत २४ लाख असून, यासंबंधी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशान्वये व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या निर्देशानुसार २६ जून रोजी सकाळी ९ वा काल्हेर ते कोन येथील खाडीपात्रात खारबाव मंडळ अधिकारी व भिवंडी मंडळ अधिकारी व त्यांच्या अधिनस्त तलाठी यांच्या मार्फत संयुक्त कार्यवाही करण्यात आली या कारवाईमध्ये १ बार्ज, १ संक्शन आढळून आले. बार्जवरील कामगार पथकाची चाहूल लागताच पाण्यात उडी मारून पसार झाले. पळून जाण्यापूर्वी बार्ज वॉल काढण्यात आल्याने व बोटीच्या सहाय्याने ओढून आणणे शक्य नसल्याने तेथेच पाण्यात बुडवण्यात आला. १ सक्शन पंप बोटीच्या साहाय्याने काल्हेर बंदर आणून खाडी किनारी काढून पुन्हा वापर होऊ नये म्हणून गॅस कटर च्या सहाय्याने कट करुन नष्ट करण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली.

समाज कल्याणच्या ठाणे सहाय्यक आयुक्त कार्यालयात सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

ठाणे :  समता, बंधुता, मानवता व सामाजिक न्यायाचे राज्य करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कळवा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन व आंतराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी समाज कल्याणच्या मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचूरे, ठाण्याचे सहायक आयुक्त समाधान इंगळे, लेखक व कवी रघुनाथ देशमुख, व्याख्याते बबन सरोदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था- बार्टीच्या प्रकल्प अधिकारी मेघा पवार, समतादूत रेश्मा साळवे उपस्थित होत्या. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून यावेळी सामाजिक न्याय भवन ते पारसिक नगर, कळवा पा परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये भिवंडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. समाज कल्याण, मुंबई विभागच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराजाच्या विचारांची प्रेरणा घेवून स्वत:ची तसेच समाजाची  प्रगती कशी साधता येते यावर मार्गदर्शन केले. समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री. इंगळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना व्यसनांपासुन दूर  रहाण्याचा संदेश देवून व्यसनमुक्तीवर आपले विचार मांडले. यावेळी श्री. देशमुख यांनी व्यसनमुक्तीवर व्याख्यान दिले. ते म्हणाले की, व्यसन मुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांचे योगदान पाहिजे. छोटी-छोटी व्यसने सुध्दा आपले मोठे नुकसान करतात. व्यसनामुळे फक्त आपले नुकसान होत नसून सर्व कुटुंबाचे नुकसान होते. व्याख्याते श्री.सरोदे यांनी न्याय व सामाजिक न्याय यामधील फरक समजून सांगितला. तसेच समतादूत रेश्मा साळवे यांनी  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता अमली पदार्थ सेवन विरोधी शपथ घेवून करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक लेखाधिकारी अरुण साळुंखे यांनी केले.