Author: bittambatami.com

घ्या दोनशे… बोला मनसे ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल       

मुंबई  : घ्या दोनशे… बोला मनसे अशा शब्दात ठाकरे गटाच्या प्रवकत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे आणि मनसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ठाण्यातील शिवसेना शिंदे गट उमेदवारांच्या एका प्रचार सभेत…

मोदींचा आज मुंबईत रोड शो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या बुधवार दिनांक १५ मे रोजी मुंबईत भव्य रोड शो होणार आहे. मुंबईसह ठाणे आणि नाशिकमध्ये येत्या २० मे रोजी राज्यात शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यासाठी मतदान…

‘नेत्यांसाठी रस्ते बंद करू नका’

मलबार हिलवासियांचा अनोखा जाहीरनामा मुख्यमंत्र्यांवर रहिवासी नाराज मुंबई : नेत्यांच्या वाहनांना जागा करून देण्यासाठी परिसरात रस्ते बंद करून नका, सह्याद्री अतिथी गृह आणि वर्षा बंगल्यावर होणाऱ्या राजकीय बैठका मंत्रायलात घ्या अशा स्वरुपाच्या मागण्या मलबार हिल येथील रहिवाशांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांमुळे परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच शिंदे यांच्याबरोबरच शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्याविरोधातही नागरिकांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांना आता ठाकरे सेनेचा उमेदवार जवळचा वाटू लागला आहे. मुंबईतील सर्वात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरात मात्र वाहनतळाच्या विषयावरून नागरिक संतापले आहेत. या परिसरातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर आपला जाहीरनामा तयार केला आहे. या जाहीरनाम्यात मलबार परिसरातील विविध प्रश्नांसंबंधी मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पर्यावरण, प्रदूषण हे विषय मुख्यत्वे घेण्यात आले असून त्यानंतर वाहनतळाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. यामिनी जाधव यांची अनुपस्थिती दक्षिण मुंबईत महायुतीतर्फे शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अरविंद सावंत उभे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याच दोन उमेदवारांमध्ये ही लढाई होणार आहे. मलबार हिल हा परिसर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून त्यांना यावेळी शिवसेनेच्या दोन उमेदवारांमधून एक उमेदवार निवडावा लागणार आहे. मात्र मलबार हिलच्या रहिवाशांनी आपला जाहीरनामा देण्यासाठी यामिनी जाधव आणि सावंत यांना निमंत्रण दिले असता जाधव यांनी प्रतिसाद दिला नाही असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तर अरविंद सावंत यांनी मात्र रविवारी कमला नेहरू उद्यानात रहिवाशाची भेट घेतली. त्यामुळे भाजपच्या या मतदारांमध्ये उमेदवाराबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. जाहीरनाम्यात मागण्या कोणत्या? चांगले रस्ते, पदपथ, वाहनतळाची सुविधा, मलबार हिलमधील हिरवाई टिकवावी, मलबार हिल जलाशय जतन करावे, हॅगिंग गार्डनला धक्का लावू नये, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना कठोर दंड करावा. लोकप्रतिनिधींच्या निधीचा वापर सोयीसुविधांसाठी करावा, सुशोभिकरणासाठी नको. पाणी, रस्ते, कचऱ्याच्या तक्रारींसाठी ऑनलाईन सुविधा हवी.

सफाई कामगारांना घनकचरा विभागात हजर राहण्याचे आदेश

शिपाई, फेरीवाला हटाव पथकात काम करणाऱ्या कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागातील अनेक सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, अधिकाऱ्यांचे शिपाई, टपाल वाहक म्हणून काम करतात. रस्त्यावर झाडू मारण्यापेक्षा कार्यालयात ऐषआरामात काम करण्यास मिळत असल्याने हे कामगार वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने प्रभाग कार्यालये, पालिका मुख्यालयांमध्ये कार्यरत आहेत. अशा सर्व सफाई कामगारांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर व्हावे, असे आदेश घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सोमवारी दिले. कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्याचे अभियान यशस्वी होत आहे. या कामासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची नितांत आवश्यकता आहे. आता कार्यरत असलेले बहुतांशी सफाई कामगार हे ५० वयाच्या पुढील आहेत. त्यांची क्रयशक्ती कमी झाली आहे. सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले ३५ ते ५० वयोगटातील अनेक सफाई कामगार वर्षानुवर्ष नगरसेवक, आमदार, राजकीय नेते यांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचे दालन, यापूर्वी महापौर, सभापती यांच्या दालनात शिपाई, प्रभागात फेरीवाला हटाव पथकात वर्णी लावून घेण्यात यशस्वी झाले आहेत. रस्त्यावर काम करण्यासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची आवश्यकता असताना, ६० हून अधिक सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, साहाय्यक आयुक्तांचा शिपाई, टपाली, आवक जावक लिपिक म्हणून काम करत आहेत. सफाईचे मूळ काम सोडून त्यांना प्रशासकीय कामात सहभागी होण्याची मुभा दिली कोणी, असे प्रश्न करत काही माजी नगरसेवक, काही जागृत नागरिकांनी यासंदर्भात पालिका आयुक्त, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन उपायुक्त अतुल पाटील यांनी पालिकेच्या दहा प्रभागांमध्ये जे सफाई कामगार अन्य कामे करत आहेत. त्यांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सफाई कामगारांची बदली अन्य कोणत्याही विभागात करू नये, असे आयुक्तांचे स्पष्ट आदेश आहेत. सफाई कामगारांचे नियंत्रक म्हणून उपायुक्त घनकचरा हे नियंत्रक अधिकाऱी आहेत. असे असताना प्रभागातील साहाय्यक आयुक्त घनकचरा विभागाची परवानगी न घेता सफाई कामगारांना आपल्या अधिकारात अन्य विभागात बदली करत आहेत, असे उपायुक्त पाटील यांच्या निदर्शनास आले आहे. अशा नियमबाह्य नियुक्त सफाई कामगारांनी तातडीने सफाई कामगार म्हणून घनकचरा विभागात तातडीने हजर व्हावे, असे आदेश उपायुक्त पाटील यांनी दिले आहेत. काही दिवसापूर्वी ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील सफाई कामगार दिलीप उर्फ बुवा भंडारी यांनी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या बरोबर रेल्वे स्थानक भागात मंडप टाकण्यावरून हुज्जत घातल्याने अंगचोर सफाई कामगारांचे प्रकरण उघडकीला आले आहे. घनकचरा विभागातील सफाई कामगारांनी प्रभागात विनामंजुरी इतर विभागात सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने पदस्थापना घेतल्या असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित साहाय्यक आयुक्तांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाईल. सफाई कामगारांनी आपल्या मूळ घनकचरा आस्थापनेत तातडीने हजर व्हावे. -अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग.

माथेरानच्या जान्हवी शिंदेला सीबीएसई दहावीच्या परीक्षेत घवघवीत

माथेरान : माथेरानच्या जान्हवी सुरेश शिंदे हिने सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. जान्हवीने 94.96 टक्के गुण प्राप्त केले असून तिने ( मुंबई )परेल येथील सोशल सर्व्हिस लीग या शाळेतुन मार्च मध्ये दिल्लीच्या सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला.  शिक्षिका मिस पद्मा, मिस भूमी लालन, मिस मीना मकवाना , मिस ताहीरा, मिस जरीन या  शिक्षकांनी उत्तम रित्या अभ्यास करून घेतल्याने इतके गुण प्राप्त करू शकले अशी भावना जान्हवी हिने व्यक्त केली व डॉक्टर बनण्यासाठी भरपूर मेहनत घेणार असल्याचे तिने सांगितले  जान्हवीचे पालक  सुरेश व अंकिता शिंदे यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की आम्ही तिच्यावर अभ्यासाचे कोणतेही दडपण येऊ दिले नाही मोठ्या अपेक्षा लादल्या नाहीत तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. प्रा गवाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेंट झेव्हिएर्स शाळेचे शिक्षक योगेश जाधव, मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला अध्यक्षा प्रतिभा घावरे  , कुलदीप जाधव, वर्ष्या शिंदे , सुहासिनी दाभेकर यांनी जान्हवीचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई : शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे संपन्न झालेल्या प्रतिमापूजन प्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात आणि इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणे कुणालाही शक्य नाही!

विरोधी पक्षांकडून संविधान बदलले जाणार असल्याचे सांगत समाजाची दिशाभूल! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणे कुणालाही शक्य नसून विरोधकांकडून संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ज्या काँग्रेसने संविधान बदलून देशात आणीबाणी लावली, तीच काँग्रेस आज संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवते, हे दुर्दैवी आणि दुटप्पीपणाचे असल्याची टीकाही खासदार शिंदे यांनी केली. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बुद्धभूमी फाउंडेशनने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी विरोधकांवर हा हल्ला चढवला. याप्रसंगी बोलताना कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी गेल्या १२ वर्षांपासून होत होती. पण माझ्याकडे ही मागणी आल्यानंतर त्याचा लगेचच पाठपुरावा सुरू केला आणि जागेचे आरक्षण बदलून तिथे फक्त पुतळाच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या स्मारकात ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांनी केलेला संघर्ष, डिजिटल पुस्तके, इतकेच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवाज देखील ऐकता येणार आहे. त्यामुळे हे फक्त स्मारक नव्हे, तर ज्ञानकेंद्र असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. आज विरोधकांकडे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मुद्देच नसून त्यामुळे देशाचे संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मात्र याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांचा निवडणुकीत पराभव केला होता, हे आज विसरून चालणार नाही, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संविधान दिन साजरा करणे सुरू केले, संविधान यात्रा सुरू केली, इतकेच नव्हे, तर नवीन संसद भवनालाही संविधान भवन असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्य सरकारकडून इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जात असून लंडनमधील बाबासाहेबांच्या राहत्या घरातील स्मारकही आपले सरकार उभारत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्यांच्या आणि माथी भडकावणाऱ्यांच्या बाजूने नव्हे, तर आपल्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी समस्त समाजाला केले. कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनकडून तथागत भगवान गौतम बुद्धांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू असून भविष्यात त्यांच्या काही प्रलंबित विषयांसाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. २०१४, २०१९ मध्ये आपण मला भरभरून प्रेम दिले. आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा भन्तेजींनी मला आशीर्वाद दिला असून आपणही पाठीशी उभे राहाल याची खात्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौतम रत्न महाथेरो, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष देवचंद अंबादे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा निरीक्षक वामन म्हात्रे, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्यासह केतन रोकडे, भारत सोनवणे, सुबोध भारत, शेखर केदारे, मिलिंद सपकाळ, प्रशांत भंडारे, अशोक भोसले, संजय राक्षसकर, प्रशांत बनसोडे, राजेंद्र नितनवरे, भूषण यशवंतराव, नुपूर घाडीगावकर, रोहित डुमणे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंत मदत

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घाटकोपर दुर्घटनेतील जखमींच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट मुंबई : वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांनात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजावाडी हॉस्पिटल येथे जाऊन भेट दिली. सद्यस्थितीमध्ये राजावाडी हॉस्पिटलमध्ये १ व्यक्ती ICU मध्ये असून इतरांच्या प्रकृतीमध्ये समाधानकारक सुधारणा होत असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यामंत्री यांच्याशी चर्चा करून जखमींना कायद्यातील तरतुदींप्रमाणे योग्य तो आर्थिक मोबदला दिला जाईल, असे देखील पालकमंत्री लोढा यांनी सांगितले. ६०% पेक्षा कमी व्यंग असल्यास अशा व्यक्तींना ७५,००० रुपये तसेच ६०% पेक्षा जास्त व्यंग असल्यास, त्या व्यक्तींना अडीच लाख रुपये सरकारद्वारे देण्यात येतील. तसेच किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा यावेळी पालकमंत्री लोढा यांनी केली आहे. सदर जाहिरातीचे मोठे होर्डिंग हे पेट्रोल पंपाजवळ अनधिकृतरित्या बांधण्यात आले होते. महापालिकेने नोटीस बजावून सुद्धा होर्डिंग हटवण्यात आले नाही. त्याचे सेफ्टी ऑडिट किंवा तत्सम प्रक्रिया सुद्धा झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पोलीस पकडतील, त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. ही दुर्घटना नसून हत्या आहे असे मंत्री लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

श्रीकांत शिंदेंच्या प्रचार रॅलीत एकनाथ शिंदे होणार सहभागी!

गुरुवारी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात निघणार रॅली! डोंबिवली : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाररॅलीत सहभागी होणार आहेत. गुरुवारी १६ मे रोजी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात ही रॅली निघणार असून यावेळी राज्यातील मंत्री, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपवली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत आले होते. यानंतर आता येत्या गुरुवारी, १६ मेला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे डोंबिवलीत येत आहेत. डोंबिवलीच्या नांदीवली येथील स्वामी समर्थ चौकातून सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रचार रॅलीला सुरुवात होईल. यानंतर डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण असा ४ किमीचे मार्गक्रमण करून आजदे गावात रॅलीचा समारोप होईल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, आमदार, नेते आणि मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. तर महायुतीचे कार्यकर्तेही हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी होणार असल्याची महिती शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.

स्वच्छतासखींची आरोग्य तपासणी

जागतिक मातृदिनानिमित्त नवी मुंबई : स्वच्छतेच्या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या आरोग्याची काळजी घेणा-या स्वच्छतासखींच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी आरोग्यम् संस्थेने पुढाकार घेऊन स्वच्छताकर्मींविषयी आपुलकी दाखवत हे शिबीर आयोजित केल्याबद्दल प्रशंसा केली. नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्यम् सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नमुंमपा आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात ‘’सन्मान मातृत्वाचा, स्वच्छतासखींचा आरोग्याचा” या शिर्षकांतर्गत आयोजित स्वच्छतासखींच्या आरोग्य तपासणी शिबीराप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करित होते. यावेळी घनकचरा व्यावस्थापन विभागाचे सहा.आयुक्त श्री.जयंत जावडेकर, आरोग्यम् संस्थेच्या प्रमुख श्रीम.शमिका सुतार व डॉ. राहुल वडके उपस्थित होते. स्वच्छताकर्मी हे एक प्रकारे शहराचे आरोग्यसैनिक असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची जपणूक करणे हे कर्तव्य असून त्यादृष्टीने तसेच ‘घरातील स्त्री निरोगी असेल तर घर सुखी’ या भूमिकेतून आपल्या आईबद्दल मनात असलेली कृतज्ञतेची भावना स्वच्छतासखींची आरोग्य्‍ तपासणी करुन व्यक्त होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित शंभराहून अधिक स्वच्छतासखींची रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन पातळी अशी विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. दिनांक 15 व 16 जून रोजी आरोग्यम् मार्फत आयोजित केल्या जाणा-या मोठया स्वरूपातील आरोग्य शिबीरात पुढील चाचण्या करणे गरजेचे असलेल्या स्वच्छतासखींच्या आवश्यक चाचण्या केल्या जाणार आहेत. यावेळी उपस्थित महिलांना व्यक्तिगत स्वच्छता आणि आरोग्याविषयी नामांकित आरोग्य तज्ज्ञ डॉ. राहुल वडके यांनी मार्गदर्शन केले. आरोग्यम् संस्थेच्या प्रमुख श्रीम.शमिका सुतार यांनी नवी मुंबई शहराविषयी कृतज्ञता म्हणून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून स्वच्छतासखींसाठी मातृदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आरोग्य शिबीराचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले.