Author: bittambatami.com

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदींचे निधन

पटणा : बिहारमधील भाजपचा चेहरा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं दीर्घ आजाराने निधन झालेय. 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील सात महिन्यापासून कॅन्सरसोबत…

देशातील कर दहशतवाद थांबवणार- उद्धव ठाकरे

मुंबई – इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येताच देशात जीएसटीच्या माध्यमातून होणारा कर दहशतवाद आम्ही थांबवू. जीएसटीमध्ये अशा घातक गोष्टी आहेत ज्यात काही चूक झाली तर सरळ जेलमध्ये टाकलं जाते. हा कर दहशतवाद आम्ही थांबवणारच असे…

सुट्टीत गावी गेलेल्या मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबईत २० मे रोजी पार पडणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि सुटीत गावी गेलेल्या मुंबईकरांनी मुंबईत येऊन मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते आर. जी. हुले आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या अलका हुले यांनी ग्रामीण भागातून ‘चलो मुंबई’चे बॅनर लावत मतदारांना मतदानासाठी आवाहन करत आहेत. मे महिन्याच्या सुटीत अनेक मुंबईकर कुटुंबासहित गावी जात असतात. काही जण मतदान असतानादेखील मुंबईत येऊन आपले कर्तव्य बजावत नसल्याने मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढण्यासाठी रायगडमधील आंबेगाव गावात ‘मतदानासाठी मुंबईत चला’, असे आवाहन बॅनरद्वारे केल्याचे आर. जी. हुले यांनी सांगितले.

डहाणूला अवकाळीने झोडपले

कासा : डहाणू तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी भातपिके, गवत व्यापारी, वीट भट्टीचालकांचे चांगलेच नुकसान झाले. मात्र, पावसाच्या माऱ्यामुळे परिसरात गारवा पसरला होता. त्यामुळे उकाड्याने अंगाची काहिली झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाऊस येईल, असा अंदाज व्यक्त केला होता; पण पावसाचे वातावरण नव्हते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा, धुळीचे लोट वाहत ढगाळ वातावरण तयार झाले. विजेचा कडकडाट होत पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी १५ मिनिटे, तर काही ठिकाणी तासभर पाऊस झाला. डहाणू तालुक्यात गंजाड, कासा, धानिवरी या भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचे प्रमाण जास्त होते. सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांवर उन्हाळी भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार झालेले पीक कापण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी पिके शेतात सुकत टाकली होती. अचानक आलेल्या पावसाने ती भिजून गेली, तर अनेक वीटभट्टीचालकांची धावपळ उडाली. कच्च्या विटांचे मोठे नुकसान झाले. तयार वीटभट्ट्यांवर सतरंज्या, ताडपत्री टाकण्यासाठी काही काळ मोठी धावपळ उडाली, तर गवत वखारीवाल्यांवरदेखील गवत भिजू नये, म्हणून ताडपत्री टाकण्याची लगबग उडाली. उन्हाळी भातकापणी सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातपिके कापून शेतात सुकण्यासाठी ठेवली होती; पण अचानक आलेल्या या पावसाने शेतात पाणी साचून भातपिके भिजून गेली. त्याचप्रमाणे वीटभट्टीचालकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ऐन हंगामात कच्च्या विटा भिजल्या असून तयार वीटभट्ट्यांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका दरवेळी वीटभट्टीचालक, तसेच गवत पावली व्यावसायिकांना बसतो. यामुळे हा व्यवसाय पूर्वी पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत होता; पण आता नुकसानीच्या भीतीने या धंद्यात उतरण्यास कोणी तयार होत नाही. तलासरीमध्ये गारांचा पाऊस तलासरीतील कोचाई गावात वादळी वारा, गारांचा पाऊस पडला. यामुळे अजय छोटू हाडल यांच्या घराचे छप्पर उडाले. पावसाळ्यापूर्वी घराचे मोठे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी होत आहे. तसेच धानिवरी येथे एका घरावर झाड पडल्याने भिंतीला तडे गेले आहेत.

शहापूरला तालुक्याला अवकाळीचा फटका

किन्हवली : शहापूर तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारा व मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लग्नाचे मंडप कोसळून पडले. गेल्या अनेक दिवसांपासून शहापूर तालुक्यातील तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांपर्यंत चढलेला होता. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही झाली होती. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्यामुळे दिलासा मिळाला असला तरी थंडोळखांब, कसारा, शेणवा, किन्हवली, टाकीपठार, सोगाव, वाशिंद आदी परिसरातील ग्रामीण भागात विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. दुपारी वादळी वारा व मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे तालुक्यातील नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी लग्न व हळदी समारंभासाठी सजावट केलेल्या नक्षीदार व आकर्षक मंडपाच्या कापडातून पाण्याच्या धारा ओघळत होत्या. मंडपात चिखल-माती झाली होती. पाहुण्यांसाठी केलेला स्वयंपाक व सोयी-सुविधा वाया गेल्याने यजमानांचे नुकसान झाले. सजावटीचे महागडे कापड, विद्युत व्यवस्था पावसात भिजून मंडप डेकोरेशनवाल्यांचेही अतोनात नुकसान झाले. तसेच पाऊस लांबलाच तर गुरांच्या वैरणीची व्यवस्था करून ठेवलेला पेंढा भिजून गेला. मंडप डेकोरेटर्सना दरवर्षी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे अतोनात नुकसान तर होतेच; परंतु प्रशासनही आमच्या नुकसानीची कधीच दखल घेत नाही. त्यामुळे व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. – चंद्रकांत देसले, मंडप डेकोरेटर्स, डोळखांब

मुंबईत १७ हजार आरोपींची तपासणी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विशेष मोहिम मुंबईः निवडणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून नये, यासाठी फरार व विविध गुन्ह्यांतील पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम मुंबईत राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत सहा हजार ६०७ फरार आरोपी व विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या १७ हजार ११४ आरोपींची यादी करण्यात आली असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय यावर्षी ९,५९३ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि परिसरातील मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदान सुरळीत व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सराईत आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. त्या अंतर्गत सहा हजार ६०७ फरार आरोपी व विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या १७ हजार ११४ आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे ३२० जामीनपात्र व ६७४ अजामिनपात्र वॉरंट असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी संवेदनशील ठिकाणे, हॉटेल याठिकाणी गस्त घालण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणी तपासणी कक्षही उभे करण्यात आले आहेत. यावर्षी प्रतिबंधात्मक कारवायांमध्येही वाढ करण्यात आली असून यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सीआरपीसी १०७ अंतर्गत सर्वाधिक म्हणजे ६,२०१ कारवाया करण्यात आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीकडून शांतता भंग होण्याची भीती असल्यास संबंधीत व्यक्तीवर सीआरपीसी १०७ अंतर्गत कारवाई केली जाते. याशिवाय सीआरपीसी कलम ११० व १५१(३) अंतर्गत अनुक्रमे २१५४ व ९१६ कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस (एमपी) कायदा कलम ५५, ५६ व ५७ अंतर्गत अनुक्रमे ३३, १९३ व ९० कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय एपीडीए कायद्यांतर्गत सहा जणांवर कारवाई केली आहे.महाराष्ट्र पोलीस कायदा (पूर्वीचा मुंबई पोलीस कायदा) ५५, ५६, ५७ अन्वये तडीपार किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. यानुसार संबंधित व्यक्ती आदेशात नमूद केलेल्या जिल्ह्यात वा परिसरात दिलेल्या कालावधीसाठी प्रवेश करू शकत नाही. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा ६८, ६९ तसेच १५१, दंड प्रक्रिया संहिता १०७, १०९,११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून केली जाते.

पावसामुळे निवडणूक प्रचाराचे वेळापत्रक कोलमडले

भिवंडी : अवकाळी पावसामुळे भिवंडीत नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर निवडणूक प्रचाराचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. पाऊस सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक ठिकाणी अंधार पसरला होता. दुपारी तीन वाजता ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर ग्रामीण भागात हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्रच वातावरणात गारवा निर्माण झाला. कडक उन्हाळ्यात हैराण झाल्याने बच्चे कंपनीने मनसोक्तपणे पावसात भिजून पहिल्या पावसाचा आनंद लुटला. तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात वीटभट्टी मालकांसह आंबा बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, भिवंडी शहरातील काही भागात गारा पडल्याचेही पाहायला मिळाल्या. शेतकऱ्यांसह वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले आहे. तर अचानक पाऊस सुरू झाल्याने शहरातील वीज गेल्याने शहरातील विविध भागात अंधार पसरला होता. यंत्रमाग कारखाने बंद झाल्याने कामगार वर्गदेखील पावसाचा गारवा अनुभवण्यासाठी बाहेर पडला.

शिक्षक, कोकण पदवीधर निवडणुकीसाठी आयोग सज्ज

एक लाख ७७ हजार मतदारांची नोंदणी, आयुक्‍त पी. वेलरासू यांनी दिली माहिती वाशी : निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. सोमवार, १० जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई शिक्षक व पदवीधर, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख ७७ हजार ३२ मतदारांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत उपायुक्त विवेक गायकवाड, उपायुक्त अमोल यादव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे उपस्थित होते. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी १५ मे रोजी अधिसूचना जारी होणार असल्‍याचे यावेळी सांगण्यात आले. बुधवार, २२ मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांनी अर्ज दाखल करणे, शुक्रवार, २४ मे रोजी अर्जाची छाननी करणे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ मेपर्यंत राहणार आहे. १० जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई शिक्षक-पदवीधर व कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी कोकण विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. मुंबई शिक्षक व पदवीधर या दोन मतदारसंघांसाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. कोकण पदवीधर मतदारसंघाकरिता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील, अशी माहिती आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. मतदारांची संख्या वाढविण्यासाठी मतदार नोंदणी १२ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदरचे अर्ज पदनिर्देशित ठिकाणी ऑनलाइन व ऑफलाइन स्वीकारले जातील. ऑनलाइनसाठी http://gterollregistration.mahait.org या लिंकचा वापर करा, असे कळविण्यात आले आहे. तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात आले आहे. चोवीस तास तक्रार निवारण कक्ष असणार आहे.

मतदान यंत्रे सीलबंद करण्याची प्रक्रिया सुरू

24 कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात 20 मे  रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे. 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाकरीता 1960 मतदान केंद्र असून, प्रत्येक मतदान केंद्रावर लागणारे ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन्स सील करण्याची प्रक्रिया आज करण्यात आली. सदरची प्रक्रिया उद्या 14 मे 2024 रोजी व  आवश्यकता भासल्यास 15 मे रोजी सुरू राहणार आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.मनोज जैन यांनी समक्ष या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते उपस्थित होत्या. सदरची प्रक्रिया ही उमेदवारांच्या राजकीय प्रतिनिधींसमक्ष करण्यात येत आहे.

टपाली मतदानाची सुविधा

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी 14 मे पासून ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात नियुक्तीस असलेल्या अत्यावश्यक सेवेतील मतदार व निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदार यांनी नमुना १२ डी भरून दिला आहे. त्यांचे मतदान पोस्टल वोटिंग सेंटर (पीव्हीसी) येथे तर त्या ज्यांनी नुमना 12 भरून दिला आहे, त्यांचे मतदान सुविधा केंद्र (एफ.सी) येथे होणार आहे. यासाठी भिवंडी लोकसभा मतदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोस्टल वोटिंग सेंटर व मतदान सुविधा केंद्र सुरू केले असून या मतदारांना दि. 14 ते 19 मे या कालावधीत मतदान करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाकडे यांच्याकडील  दिनांक 31 ऑक्टोबर 2023 परिपत्रकनुसार पोस्टल  वोटिंग व मतदान सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी 23  भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील या मतदारांच्या मतदानाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत. पोस्टल वोटिंग सेंटर 138 कल्याण पश्चिम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई युनिव्हर्सिटी उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, खडकपाडा कल्याण पश्चिम येथे दिनांक 14, 15,16 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान मतदान होणार आहे. 23 भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, एस. टी.स्टँड समोर भिवंडी येथे दिनांक 17,18,19 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान मतदान केंद्र सुविधा केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अत्यावश्यक सेवेतील मतदार, निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदारांनी या मतदान सुविधा केंद्रामध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे. ठाणे : भारत  निवडणूक आयोगाने अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 25- ठाणे लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या तसेच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दि. 14 मे 2024 ते 19 मे 2024 या कालावधीत टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली. नोंदणीकृत मतदार- पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी,अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 ड भरुन दिला आहे, त्यांचे टपाली मतदान दि. 14 मे 2024, दि. 15 मे 2024 व दि. 16 मे 2024 या कालावधीत “प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प 400601 येथे सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत होणार आहे. तसेच ‍निवडणूक कामी कर्तव्यावर असलेले व अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी ज्यांनी नमुना 12 भरुन दिला आहे, अशा कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान दि. 17 मे 2024,‍ दि. 18 मे 2024 व  दि. 19 मे 2024 या दिवशी प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प. – 400601 येथे  सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त झालेले अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांनी आपले मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे  यांनी केले आहे.