Author: bittambatami.com

मतदानाच्या प्रचारासाठी नवी मुंबईत फिरताहेत लक्षवेधी ग्रीन मॅस्कॉट्स 

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत महापालिका  आयुक्त्‍ डॉ. कैलास शिेदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रसार माध्यमांचा वापर केला जात आहे. यामध्ये मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर (मॅस्कॉट्स) तयार करण्यात आले असून हे चार मॅस्कॉट्स संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरुन 20 मे रोजी होणाऱ्या ठाणे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी जनजागृती करत आहेत. हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठया आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. त्याचप्रमाणे पाठीवरील मागील भागात मतदान करण्याविषयी आवाहन करणारा फलक प्रदर्शित करण्यात आला असून त्यावर वोटर हेल्पलाईन ॲपचा क्यूआर कोड नमूद करण्यात आलेला आहे. हे मॅस्कॉट्स नागरिकांमध्ये व त्यातही मुलांमध्ये लोकप्रिय होत असून अनेकजण या मॅस्कॉटसोबत सेल्फी छायाचित्र काढून आपापल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन प्रदर्शित करीत आहेत. महापालिका निवडणुक विभागाचे उप आयुक्त्‍ श्री. शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली या मॅस्कॉट्समार्फत मतदान जनजागृती प्रचार वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक मॅस्कॉटला विभाग नेमून देण्यात आलेला आहे. संबंधित विभागांचे सहा. आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी यांचे मॅस्कॉट्सव्दारे जनजागृती कार्यावर लक्ष असणार आहे. पथनाटयांप्रमाणेच लक्ष वेधून घेणाऱ्या मॅस्कॉट्सव्दारे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या स्वीप उपक्रमास नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.

तलावपाळी येथील बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे शहरात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून मंगळवारी  तलावपाळी परिसरातील बसस्थानकांवरील प्रवाशांमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली. ‘मतदान जनजागृती’ विषयक माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या. २५ ठाणे- लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ प्रयत्नशील आहे. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप’ अंतर्गत सदर मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. मी मतदान करणारंच…. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा. या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले. तसेच बसस्थानकात स्वीप पथकाने सर्व प्रवासी नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून देत मतदानाची शपथ दिली. ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देखील यावेळी देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन तलावपाळी बसस्थानकातील सर्व प्रवासी नागरिकांना करण्यात आले.

जिल्ह्यातील पशुधनास 1 जूनपासून ईअर टॅगिंग (बिल्ला) बंधनकारक-  अशोक शिनगारे

ठाणे : प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टंगिंग (पशुधनाच्या कामात बिल्ला लावणे) करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनासंदर्भात कोणत्याही सेवा देण्यात येणार नाहीत. त्यामुळे सर्व संबंधितांनी आपल्या पशुधनाचे इअर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा तथा प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ चे सक्षम प्राधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने नॅशनलमं डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये Ear tagging (१२ अंकी चार कोड) च्या नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. प्रणालीवर संबंधीत पशुधनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यु इ. सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्व पशुधनास कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकिय संस्थामार्फत पशुधनास कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरून पशुधनामधील पशुधनामधील संसर्गीक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा सक्षम अधिकारी या नात्याने श्री. शिनगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुधनाची ई0अर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुवन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांनी 1 जून 2024 नंतर ईअर टॅगिगशिवाय पशुधनास पशुवैद्यकिय संस्था/ दवाखान्यामधून पशुवैद्यकिय सेवा देऊ नयेत. तसेच आपल्या अधिनस्त असलेल्या कत्तलखान्यामध्ये ईअर टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिग केलेली नसल्यास सर्व महसूल/वन/वीज महावितरण विभागांकडून नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. परराज्यातून येणाऱ्या पशुधनास ईअर टॅगिंग केल्याची व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी/कर्मचारी करतील. पशुधनास ईअर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी या पशुधनास ईअर टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. 1 जून 2024 नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही, असे या आदेशात नमूद केले आहे. येत्या 1 जून 2024 पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री व बैलगाडा शर्यती करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्यामुळे ईअर टॅगिंग नसलेल्या पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येवू नये व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी. तसेच सर्व ग्रामपंचायत/ महसूल विभाग गृहविभागांने ईअर टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देवू नये, असेही या आदेशात म्हटले आहे. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडून त्वरीत अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये पशुच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्याबर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा, अशाही सूचना या आदेशात दिल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे करावे, असे निर्देश श्री. शिनगारे यांनी दिले आहेत.

तृतीयपंथीय समुदायाने घेतली 100 टक्के मतदानाची शपथ

ठाणे :  ठाणे-लोकसभा मतदारसंघाअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्विप पथकाद्वारे ठाण्यातील तलावपाळी परिसरात तृतीयपंथी समुदायासोबत मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तृतीयपंथीय समुदायात मतदानाचा हक्क व त्याचे महत्व पटवून देण्यात आले.…

जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना घेणार पुढाकार

 मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाबरोबर ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध गृहनिर्माण सोसायट्या, विकासक, व्यावसायिका, औषध विक्रेते यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन आपआपल्या परिसरातील नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक संघटनांनी मतदानाचा टक्का वाढीसाठी ग्राहकांना आवाहन करतानाच त्यांना प्रोत्साहन म्हणून सवलती देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत मतदान टक्का वाढविण्यासाठी विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेण्याचे आश्वस्त केले. मतदान जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस स्वीपचे नोडल अधिकारी तथा सहसंचालक अमोल खंडारे, तहसीलदार अस्मिता मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण समितीचे नोडल अधिकारी मनोज शिवाजी सानप, नायब तहसीलदार स्मितल यादव आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीस ठाणे हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, सहकारी संस्था उपनिबंधक किशन रत्नाळे, सहकार अधिकारी वैभव काळे, औद्योगिक सुरक्षा उपसंचालक प्रवीण पाटील, उल्हासनगर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शिवनानी, कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव विरेंद्र सिंग आदी यावेळी उपस्थित होते. लोकशाही प्रक्रियेत सक्रिय नागरिकांचे महत्त्व असून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. वैद्यकीय सेवांवरील विशेष सवलत देणे, मतदारांशी जुळण्यासाठी  गुगल मिटसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे तंत्रज्ञानाचे सहाय्य घेणे, माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करणे आणि जनजागृतीपर मोहिमा राबविणे, आपल्या आस्थापनांमधील कर्मचारी, मजूर यांना मतदानासाठी प्रोत्साहित करून मतदानासाठी सुट्टी देणे अथवा सवलत देणे, मतदार जागृती मंच स्थापन करणे आदी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मतदानाचा दिवस जवळ आला आहे. येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून आता 12 ते 18 मे या कालावधीत मतदान जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. मतदानापूर्वी सुट्टी आल्यामुळे नागरिक बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संस्था, संघटनांनी मोठ्या प्रमाणात जनजागृतीवर भर द्यावा. तसेच मतदारांना आकर्षिक करण्यासाठी आपल्या दुकान, संघटनेमार्फत काही सवलती देता येतील का यावर विचार करावा, असे आवाहन यावेळी श्री. खंडारे यांनी केले. श्रीमती स्मिता मोहिते यांनी ठाणे जिल्ह्यातील मागील निवडणुकीत झालेल्या मतदानाची माहिती देऊन या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदारसंघ, क्षेत्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच समाजातील प्रत्येक पात्र मतदारांनी मतदान करावे, यासाठी प्रोत्साहित करावे, असे यावेळी ठरविण्यात आले. मतदार जनजागृतीसाठी निवडणूक विभागाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. व्हॉट्सॲप चॅटबॉट (9764348839) हा असाच एक उपक्रम असून चॅटबॉटद्वारे मतदारांना आपल्या मतदान केंद्र, मतदार यादीतील स्वतः क्रमांक, मतदारसंघ आदी माहिती उपलब्ध होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या चॅटबॉटसह इतर तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन करण्यात आले. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील पटांगण, क्लब हाऊसमध्येही मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मतदानासाठी बाहेर जाण्याचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे या सोसायट्यांमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी सर्व संस्थांनी प्रयत्न करावे, असे यावेळी श्रीमती यादव यांनी सांगितले. लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी व निवडणूक प्रक्रियेत नागरिकांनाच सहभाग वाढविण्यासाठी व ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, बांधकाम व्यावसायिक, औषध विक्रेते संघटना, गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी दिली.

कैद्यांनाही साधता येणार कुटुंबासोबत फोनवर संवाद

मुंबई : कारागृहात अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या कैद्यांना लवकरच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधता येणार आहे. राज्यभरातील कैद्यांना ई-मुलाकात आणि स्मार्ट कार्ड कॉलिंग सुविधा दिल्या जातील अशी माहिती सरकार कडून आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. तसे प्रतिज्ञापत्रात न्यायालयात सादर करण्यात आले. याची दखल घेत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने सदर याचिका निकाली काढली. जुलै २०२० मध्ये कोविडच्या काळात, कारागृहामध्ये कैद्यांसाठी व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, ही सुविधा २०२१ मध्ये अचानक बंद करण्यात आली. २०१६ साली जारी केलेल्या मॉडेल प्रिझन मॅन्युअलनुसार, प्रत्येक कारागृहाच्या अधीक्षकाने कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि वकिलांशी संपर्क साधण्यासाठी पैसे देऊन टेलिफोन आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा देण्यात आली होती. व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल सुविधा बंद करण्याचा सरकारच्या निर्णयामुळे कैद्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली तेव्हा, राज्य सरकारच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले सरकारच्या भूमिकेचे आम्ही कौतुक करतो. २३ मार्च २०२४ च्या परिपत्रकातील तरतुदीची राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये अंमलबजावणी केली जाईल अशी आशा बाळगून आम्ही याचिका निकाली काढतो असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकील ऍड रेबेका गोन्साल्विस यांनी अशीही तक्रार केली की जे कैदी पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना सुविधांमधून वगळण्यात आले होते आणि त्यांना वगळण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावर आव्हान देण्यासाठी दुसरी याचिका दाखल करण्यास सांगितले.

कुलाब्यात शनिवारी आठ तास पाणी पुरवठा बंद

मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली मुंबई : चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी येत्या शनिवारी ११ मे रोजी कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात आठ तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला फुटल्यामुळे गळती सुरू झाली आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी ११ मे रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या करणास्तव मुंबई महापालिकेने पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आठ तासांच्या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. तर, नौदलास रात्री होणारा पुरवठा दुरुस्तीनंतर म्हणजेच विलंबाने होणार आहे. महानगरपालिकेच्या ए विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदान बोगद्यातून १५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीद्वारे पुढे १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीचा उपयोग केला जातो. या जलवाहिनीवरुन होणारा पुरवठा हा कमी दाबाने तसेच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर शोध घेण्यात आला. त्यावेळी, मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो ३ चे काम सुरू असताना या १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीस गळती झाल्‍याचे निदर्शनास आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या तातडीच्या दुरूस्‍ती विभागाने घटनास्‍थळी पाहणी केली जलवाहिनीची ही गळती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागणार आहे, अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोका देखील निर्माण होवू शकतो. तसेच मंत्रालय व मरीन ड्राइव्ह हा परिसर आत्यंतिक महत्त्वाचा असल्याने महानगरपालिकेने मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधून या दुरुस्ती कामाचे प्राधान्य कळवले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन होण्याच्या दृष्टिने पालिकेने दुरुस्ती कामाची परवानगी घेतली आहे. या कामासाठी सकाळी ९ वाजल्यापासून खोदकाम सुरु केले जाईल. तर जलवाहिनीतील पाणी उपसा करुन नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी ३.३० वाजल्यापासून केले जाईल. कुलाबा, कोळीवाडा येथे शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर नौदलास रात्री १०.३० ते पहाटे २.५० या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा हा दुरूस्‍ती काम पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिन्या भारीत (चार्जिंग) करुन त्यानंतर म्हणजेच पाणीपुरवठ्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा विलंबाने होणार आहे.

परदेशी भारतीय, इच्छा असुनही लोकसभेच्या मतदानापासून वंचित

परदेशातून भारतात मतदान करण्याची सुविधा नसल्याने इच्छुकांना फटका कल्याण: परदेशात विविध देशांमध्ये नोकरी, निवृत्तीनंतर आपल्या मुलांकडे परदेशात राहत असलेल्या काही कुटुंबीयांची भारतामधील आपल्या निवास स्थान असलेल्या भागात मतदार यादीत नावे आहेत. अशा परदेशस्थांनी भारतातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा निवडणूक अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. अशा प्रकारची कोणतीही सुविधा परदेशातील भारतीय नागरिकांसाठी नसल्याचे निवडणूक विभागाकडून परदेशी भारतीय नागरिकांना कळविण्यात आले आहे. भारताच्या विविध भागातील तरूण नोकरीनिमित्त परदेशात गेले आहेत. काही कुटुंबीय आपल्या मुलाच्या सोबत किंवा काही व्यवसाय, उद्योगानिमित्त विदेशात राहत आहेत. यामधील बहुतांशी मंडळींची नावे भारतामधील मतदार यादीत आहेत. भारतात सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा महौल आहे. परदेशस्थ नागरिक, भारतीय नागरिकांचे भारतामधील निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. परदेशात राहत असलेले पण भारतात आपल्या गाव, शहरात राहत असलेल्या मतदार यादीत नाव असल्याने अनेक परदेशी भारतीय नागरिकांनी भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा तेथून संपर्क करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून माहिती घेऊन परदेशात राहत असलेल्या कोणाही भारतीय नागरिकाला टपाल किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले आहे. काही भारतीय विदेशात गेल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे त्यांची कोंडी झाली. अगोदर हे माहित असते तर विदेशात आलो नसतो, असे परदेशस्थ भारतीय सांगतात. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि त्या देशाचे आपण नागरिक आहोत, या अभिमानाने परदेशात राहत असलेल्या काही भारतीयांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची खूप इच्छा आहे. त्यांनी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू करून लोकसभेसाठी मतदान करता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे. अमेरिका, युरोप, अरब देशातील काही भारतीय नागरिकांनी काही राजकीय पक्षांशी संपर्क करून आम्हाला मतदानासाठी भारतात येण्यासाठी काही साहाय्य होऊ शकेल का, अशी विचारणा केली असल्याचे समजते. आता २० मे रोजीच्या मतदानासाठी भारतात यायचे असेल तर विमानाचे परदेशातून तात्काळ तिकीट काढावे लागेल. यासाठीचा तिकीट खर्च खूप मोठा आहे. हा खर्च निवडणूक काळात करण्यात येत असल्याने राजकीय पक्षांना त्याचा हिशेब निवडणूक आयोगाला द्यावा लागेल. चौकशीचे झंझट मागे नको म्हणून विदेश मतदारांना एक गठ्ठा भारतात मतदानाच्या दिवशी आणण्याचा काही उमेदवार, राजकीय पक्षांचा मनसुबा होता. या विचाराकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. भारतात मतदार यादीत नाव असलेल्या परदेशातील भारतीय नागरिकांसाठी टपाली किंंवा अन्य साधनाने मतदान करण्याची व्यवस्था येत्या काळात भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परदेशी भारतीय नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ठाण्याचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री अखेर मैदानात

बैठकसत्रापाठोपाठ आता प्रचार मिरवणूकांमध्ये सहभाग ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघातून शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के तर, उबाठाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुक लढवित असले तरी, येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात होणारी ही निवडणुक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात असून हा गड राखण्यासाठी बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वत: मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे आजवर वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यातील घराघरात शिवसेना पोहचविली. म्हणूनच ‘आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला’ अशी घोषणा दिली जाते. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले. शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळाले. असे असले तरी शिवसेेनेतील बंडानंतर जिल्ह्यात पहिलीच निवडणुक होत आहे. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा आपल्याकडेच ठेवण्यास मुख्यमंत्र्यांना यश आले असून याठिकाणी त्यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. जागा वाटपावरून भाजप आणि सेनेत नाराजी नाट्य रंगले होते. ते शमल्यानंतर आता महायुतीचे नेते प्रचारात उतरल्याचे दिसून येत आहे. मतदार संघातून शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के तर, उबाठाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुक लढवित असले तरी, येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही सेनेकडून ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही सेनेत आरोप-प्रत्यारोपाची लढाई रंगली आहे. त्याचबरोबर आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण यावरूनही वाद रंगला आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाण्याचा गड कोण राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी ठाणे लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात येतो. यामुळे ही निवडणुक मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपुर्वी बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर किसननगर येथील प्रचार मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ गुरुवारी नवी मुंबई येथील बेलापूर भागातील प्रचार मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर, सायंकाळी ते कोपरी पाचपखाडी येथील मिरवणुकीत सहभागी होणार होते. यामुळे बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वत: मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा प्रतिसाद

मुंबई : मुंबई दक्षिण मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार फेऱ्यांना मतदार संघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवडी आणि भायखळा विभागातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, तसेच ठिकठिकाणी महिलांनी पुढे येऊन त्यांचे औक्षण केले तर सार्वजनिक मंडळांनी फटाके वाजवून आमदारांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील महायुती शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांचा मतदार संघात जोरदार प्रचार सुरू आहे. शिवडी विभागात सकाळी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ठीकठिकाणी आमदार यामिनी जाधव यांचे महिलांनी औक्षण केले. अनेक इमारती व उत्सव मंडळांनी फटाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. यामिनी जाधव यांच्यासोबत या रॅलीत महायुतीतील नाना आंबोले व इतर नेते उपस्थित होते. त्याचप्रमाणे भायखळा विभागात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये महायुतीतील नेते मिलिंद देवरा, रोहिदास लोखंडे, मनसेचे संजय नाईक आणि शलाका हरयान आदी महायुतीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी परिसरातील मंदिरात दर्शन घेतले. अफाट गर्दी , लोकांच्या उत्साहात झालेल्या या रॅलीतही नागरिकांनी मोठ्या उत्साहात यामिनी जाधव यांचे स्वागत केले. आमदार यामिनी जाधव आल्यानंतर इमारतीमधील नागरिकांनी खाली उतरून त्यांची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिकांनी यामिनी जाधव यांना आशीर्वाद देत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्सव मंडळांनी फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले. प्रत्येक व्यक्तीचा आशावादी चेहेरा आणखी ताकदीने लढायला संघर्ष करायला ऊर्जा देत आहे, बळ देत असल्याचे यावेळी यामिनी जाधव यांनी सांगितले.