Author: bittambatami.com

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवाजी भांदीग्रे यांचे आकस्मित निधन

मुंबई : स्टेट बँकेचे कबड्डी खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक शिवाजी भांदीग्रे यांचे १ मे रोजी सायं. ७-०० च्या सुमारास परेल रुग्णालयात आकस्मित निधन झाले. परेलच्या बी. रघुवीर संघातून खेळणाऱ्या दादांनी महाराष्ट्र हायस्कूल नं. २ शाळेतून कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. निधना समयी ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व सूना असा परिवार आहे. ते दादा या नावाने कबड्डी वर्तुळात परिचित होते. उजवा कोपरा रक्षक असलेले दादा पायात झेप घेऊन पकड करण्यात माहीर होते. दादा चढाई देखील उत्तम करीत असत. खेळाडूच्या डोक्यावरून उडी मारण्यात ते तरबेज होते. पण खेळाडू पेक्षा ते अधिक रमले प्रशिक्षकाच्या भूमिकेत. विरोधी संघातील खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या सहकारी खेळाडू कडून संघाच्या विजया करीता करून घेण्यात त्यांना अधिक रस होता. साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब या संघाला पुनर्जीवित करून नावलौकिक मिळवून देण्यात शेखर शेट्टी यांच्या बरोबरीने दादांचा सिंहाचा वाटा होता. कित्येक कबड्डी खेळाडूंना त्यांनी स्टेट बँकेत कबड्डी खेळाडू म्हणून भरती केले. कबड्डी खेळाबद्दल ते खूप आत्मीयतेने बोलत. सद्या ते ओम् कबड्डी प्रबोधिनी या संघटनेच्या माध्यमातून तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम करीत होते. आजच रात्री १-३०च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशान भूमीत करण्यात आले.

यामिनी जाधव आणि रविंद्र वायकर यांच्याकडून अर्ज दाखल

मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

ठाण्याचा आर्यन कनोजिया ठरला  विजेता

दुबईतील आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे स्पर्धेत ठाणे – ठाण्यातील सेंट जॉन बाप्टीस्ट स्कुलमध्ये शिकत असलेला आर्यन मनोज कनोजिया हा कराटेपटू आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे स्पर्धेत देशाचं नेतृत्व करताना सुवर्णपदक विजेता ठरला आहे.…

शिवसेनेच्या फोडणीला बिचुकलेंची तेलाची धार

कल्याण लोकसभेत अभिजीत बिचुकले यांची एंट्री डोंबिवली : कल्याण मध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होत आहे. यातच शुक्रवारी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथे शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत आहे. त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो आहे असे बिचुकले यावेळी म्हटले आहे. यामुळे शिंदे व दरेकर यांच्यातील रंगतदार लढतीत बिचुकले आगीत तेल कसे टाकतात हे पहावे लागेल. कल्याण लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वादग्रस्त विधान करत नेहमीच चर्चेत राहिलेले बिचुकले आता कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कशी रंगत आणतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच त्यांनी येथे चुरशीची लढत अगोदरच आहे. त्यात तेल ओतायला मी आलो आहे असे सांगितले. तसेच सातारा येथील कामगिरी पार पडल्यानंतर पुढील 13 दिवस मी येथेच ठाण मांडून बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसिद्धीसाठी आपण निवडणूक लढता असे म्हटले जाते. यावर बिचुकले म्हणाले, 288 आमदारांपेक्षा मी नक्कीच प्रसिद्ध आहे. मला प्रसिद्धीची गरज नाही मी जन्मापासून प्रसिद्ध आहे. परडे 50 हजार, 1 लाख रुपयाचे काम सोडून जनतेसाठी मी लढतो तर जनतेला माझ्याबरोबर आले पाहिजे. माझ्याकडे काम आहे मी माझ्या स्टाईल मध्ये काम करतो. कल्याणमध्ये विकास झालेला नाही… अभिजीत बिचुकले म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी कितीही ओरडून सांगितले की विकास झाला मात्र या अडीच वर्षांत काहीही विकास झालेला नाही. त्यापू्र्वी त्यांनी विकास केला असेल त्यात दुमत नाही. मागील अडीच वर्षांत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया होत आहेत अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली आहे. कल्याण लोकसभेतून अर्ज भरला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना भूलथापा देत आहेत असं मला वाटतं. मी अधिकारवाणीने हे बोलतो आहे. लोकांची कामं होत नाहीयेत. संसदेला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या असं पत्र मी नरेंद्र मोदींना लिहिलं होतं. नरेंद्र मोदी छोट्या छोट्या लोकांना भेटतात. मात्र बाबासाहेबांचं नाव संसदेला देण्यास यांचा नकार आहे का? हा माझा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. अटल सेतू हे नाव देण्याआधीही मी त्या सेतूला माँसाहेब जिजाऊंचं द्या अशी मागणी केली होती मात्र ते नावही देण्यात आलं नाही असंही बिचुकलेंनी म्हटलं आहे. अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं? अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारलं जाणार होतं. त्या समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं? उदयनराजेंना तुम्ही तिकिट दिलंय. त्यांना छत्रपती असल्याचा अभिमान असल्याचं वाटत नाही. याच सगळ्या कारणांसाठी मी आता कल्याणमधून श्रीकांत शिंदेंविरोधात माझी उमेदवारी घोषित करतो आहे असं अभिजित बिचुकलेंनी म्हटलं आहे.

निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी केली  पूर्वतयारी पाहणी

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  २०२४ अंतर्गत मावळ मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) बुदिती राजशेखर यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत ३३ मावळ…

ठाणे प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा

सिद्धार्थ म्हात्रेचा अष्टपैलू खेळ विशाल मोरेकर ठाणे  : सिद्धार्थ म्हात्रेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एसआरएस ग्रुपने महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीचा सहा फलंदाज राखून पराभव करत महाराष्ट्र  माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रिमीयर लीग टी २०  क्रिकेट स्पर्धेत विजयी वाटचाल केली. सिद्धार्थने ९ धावांत ४ बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांना ११४ धावांवर रोखल्यावर नाबाद ५४ धावांची खेळी करत ११५ धावांसह संघाला विजयी केले. प्रथम फलंदाजी करताना  मनोज यादवने नाबाद ३२, ह्रितिक पाटीलने २२ आणि संकेत यशवंतेने १५ धावा करत महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीला मर्यादित धावसंख्येवर रोखताना सिद्धार्थसह साईराज पाटील आणि शशांक अत्तरडेने प्रत्येकी दोन, प्रथमेश डाकेने एक बळी मिळवला. उत्तरादाखल यंदा मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मुशीर खानने अवघ्या १७ धावांत ३ बळी मिळवत महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीला अडचणीत आणले. संघ नाजूक स्थितीत असताना गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीत छाप पाडणाऱ्या सिद्धार्थने दोन छोट्या भागीदारी रचत संघासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. संघाची अवस्था ३ बाद १७ धावा अशी असताना सिद्धार्थने साईराज पाटीलला हाताशी घेत चौथ्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी करत संघाला सुस्थितीत नेले, त्यानंतर सिद्धार्थने आकाशसह पाचव्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. सिद्धार्थला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संक्षिप्त धावफलक  : महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी : २० षटकांत ९ बाद ११४ ( मनोज यादव नाबाद ३२, ह्रितिक पाटील २२, संकेत यशवंते १५, सिद्धार्थ म्हात्रे ४-०-९-४ , साईराज पाटील ४-१४-२, शशांक अत्तरडे ४-१७-२, प्रथमेश डाके ४-२८-१ ) पराभूत विरुद्ध  एसआरएस ग्रुप : १६.४ षटकात ४बाद ११५ (सिद्धार्थ म्हात्रे नाबाद ५४, आकाश पारकर नाबाद २३,साईराज पाटील २१, मुशीर खान ४-१७-३) सामनावीर : सिद्धार्थ म्हात्रे.

दीर्घ कालीन क्रिकेट अधिक खेळा-वेंगसरकर

मुंबई :  १२ वर्षाखालील मुलांच्या एजिस फेडरल   इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ३५ षटकांच्या सामन्यात एक संघ केवळ ७२ धावांत बाद होणे हे चांगले लक्षण नाही.  तुम्हाला जर चांगले आणि वरच्या स्तरावरचे क्रिकेट खेळायचे असेल तर दीर्घ काळ खेळपट्टीवर राहून मोठ्या खेळी करणे, त्यासाठी स्टॅमिना आणि मनोनिग्रह या गोष्टीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी सांगितले.  या वयातच तुम्ही दोन-दोन दिवसांचे सामने खेळण्याला पसंती दिलीत तर तुमचा पाया भक्कम होईल असेही त्यांनी पुढे सांगितले.  माहुल, चेंबूर यथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने  ठाण्याच्या जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघावर ७ विकेट्सनी आरामात मात करून विजेतेपद पटकावले.  प्रतिस्पर्धी संघाला ७२ धावांत गुंडाळत त्यांनी हे आव्हान केवळ १३.३ षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघाला अचिव्हर्स क्रिकेट अकादमीच्या शौनक गावडे (११ धावांत २ बळी) आणि अमेय महाडिक (१६ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीचा सामना करणे जड गेले.   या स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा मानव पोकर (२३) आणि वेदांत आनंद (नाबाद १५) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी पार निराशा केली आणि त्यांचा डाव २५.५ षटकांत ७२ धावांतच आटोपला.  या आव्हानाचा पाठलाग करताना अचिव्हर्स क्रिकेट अकादमीने देखील २७ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या, मात्र अर्जुन संघवी (नाबाद ३२) आणि निषाद परब (नाबाद १५) या जोडीने चौथ्या विकेटसाठी ४६ धावांची अभेद्य भागी रचून संचाचा विजय साजरा केला. शौनक गावडे याची अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अचिव्हर्सच्या लक्ष्य भोर (८ बळी) याला गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम  फलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघाच्या मानव पोकर याची निवड करण्यात आली.  भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या रणजी संघाच्या निवड समितीचे सदस्य आणि माजी रणजीपटू  व  डावखुरे फिरकी गोलंदाज रवी ठाकर आणि समाजसेवक राहुल वाळुंज यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत १२ संघांचा सहभाग होता आणि त्यांची  चार गटात विभागणी करून प्रत्येक संघाला किमान दोन साखळी सामने खेळण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते. संक्षिप्त धावफलक –  जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब – २५.५ षटकांत सर्वबाद ७२ (मानव पोकर २३, वेदांत आनंद नाबाद १५ ; शौनक गावडे ११ धावांत २ बळी, अमेय महाडिक १६ धावांत २ बळी) पराभूत वि. अचिव्हर्स क्रिकेट अकादमी – १३.३ षटकांत ३ बाद ७३ (अर्जुन संघवी नाबाद ३२, निषाद परब नाबाद १५). फोटो ओळी माहुल, चेंबूर येथे झालेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या एजिस फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या रणजी संघाच्या निवड समितीचे सदस्य आणि माजी रणजीपटू  व  डावखुरे फिरकी गोलंदाज रवी ठाकर,  समाजसेवक राहुल वाळुंज आणि अकादमीचे प्रशिक्षक दिसत आहेत.

काँक्रिटीकरण ३१ मेनंतर नको, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा

आयुक्तांच्या सूचना मुंबई : मुंबईतील रस्त्यांची सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत पूर्ण करावीत. काँक्रिट रस्ते मुंबईकरांना वाहतुकीसाठी योग्य स्थितीत असतील याची खबरदारी घ्यावी. पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतेही नवीन कामे हाती घेऊ नयेत, अशा सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी पालिका प्रशासनातील सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या. मुंबई महानगरपालिका हद्दीतील ३९८ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले. यापैकी पश्चिम आणि पूर्व उपनगरात मिळून ३२५ किलोमीटर अंतरापैकी काही कामे प्रगतिपथावर आहेत. निविदेच्या अटीनुसार, सर्व रस्ते वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावेत, आवश्यक तेथे अपूर्ण रस्त्यांचे पुनर्पृष्ठिकरण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिल्या आहेत. सिमेंट काँक्रिट रस्ते बनविण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणत: ३० ते ४५ दिवसांचा कालावधी जातो. जर प्राधान्याने रस्ते पूर्ण करण्याकडे लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यादरम्यान रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आढळतात. परिणामी, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर असुविधांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत सध्या सुरू असलेली सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील, अन्यथा कंत्राटदार व अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. खड्ड्यांच्या तक्रारींसाठी अभियंत्यांची नियुक्ती खड्ड्यांसंदर्भातील तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी यंहाही २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती केली जाईल. ते निवडणूक प्रभागात प्रत्यक्ष फिरून खड्ड्यांसंदर्भात तक्रारीची स्वतःहून नोंद घेतील. तक्रार प्राप्त झाल्यावर परिमंडळनिहाय नेमलेल्या कंत्राटदारामार्फत मास्टिक अस्फाल्टद्वारे खड्डे बुजविण्यात आले आहेत का याची खातरजमा करतील, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. प्राप्त तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, असा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बॅड पॅचसाठी कंत्राटदार पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरदेखील दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) डागडुजीकामी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांची दुरुस्तीही महानगरपालिका करणार आहे. मान्सूनपूर्व कामांचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून पालिका प्रशासनाने दोष दायित्व कालावधीत समाविष्ट नसलेल्या विविध रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजीची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी ७ परिमंडळांत एकूण मिळून १४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

लोकलच्या वेगमर्यादेमुळे हार्बरवासीयांचे हाल!

वडाळा ते सीएसएमटी गाड्यांची रांग मुंबई : सीएसएमटी स्थानकात तीन दिवसांत दोनदा लोकल रुळांवरून खाली घसरण्याची घटना घडली. त्यानंतर मध्य रेल्वेने प्रशासनाने रेल्वे रुळांची दुरुस्ती केल्यानंतर खबरादारी म्हणून हार्बर मार्गावरील अपघातग्रस्त जागेवर १० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा लागू केली. त्यामुळे हार्बर मार्गावरून सीएसएमटी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल सेवा कासवगतीने ये-जा करत असल्याने लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना लेटमार्क लागला. उन्हाळ्यामुळे मुंबईकरांना लोकलच्या गर्दीचा प्रवास नकोसा वाटत आहे. त्यातच सलग दोन दिवस लोकल रुळावरून खाली घसरल्याने मुंबईकरांचे पुरते हाल झाले. पनवेल- सीएसएमटी लोकल सोमवारी (ता. २९) सीएसएमटी स्थानकात शिरताना प्लॅटफॉर्म क्रमाक दोनवर घसरली. या घटनेनंतर बुधवारी (ता. १) चाचणीदरम्यान त्याच ठिकाणी लोकलच्या एका डब्याची दोन चाके रुळावरून घसरली. यामुळे हार्बर आणि मुख्य मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. लागोपाठ दोन घटना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (ता. २) मस्जिद बंदर ते सीएसएमटी स्थानकापर्यंत लोकलची वेगमर्यादा १० किलोमीटर प्रतितास ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे सकाळपासून लोकलचे वेळापत्रक पुरते विस्कळित झाले होते. लोकलच्या रांगा हार्बर मार्गावरील लोकलचा वेग गुरुवारी (ता. २) सकाळपासून मंदावला होता. त्यामुळे वडाळा ते सीएसएमटीदरम्यान लोकलची एकामागोमाग एक रांग लागली होती. रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. अनेकांनी कंटाळून टॅक्सी आणि रिक्षाने जाणे पसंत केले. वेगमर्यादेमुळे विस्कळित झालेले वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकाळी अनेक लोकल रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागला.

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ला बसणार आळा?

राज्य सरकार करणार कठोर कारवाई मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा सध्या चिंतेचा विषय आहे. एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात. हे डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते. निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. राज्य शासनामार्फत पोलीस महासंचालकांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून पोलीस खात्यामार्फत यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानेही विपर्यस्त माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत. डिप फेक व्हिडीओ या निवडणूकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरक्षण समाप्त करण्याबद्दलचा व्हिडीओ प्रसारीत झाला. हा व्हिडीओ डिप फेक असून विरोधकांनी तो पसरवला असल्याचा आरोप अमित शहा यांनी आरोप केला. यावरुन दिल्ली पोलिसांनी काही जणांना अटक केली असून तेंलगणाचे मुख्यमंत्र्यांना समन्स जारी केले आहे.काही अभिनेत्यांचे प्रचाराचे डिप फेक व्हिडीओ प्रसारीत झाले आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधी यांचेही काही डिप फेक व्हिडीओ प्रसारीत झाले आहे.