Author: bittambatami.com

 ठाणे स्थानकात चिखल, राडारोडा, गोण्यांच्या ढिगांमुळे प्रवाशांची कसरत

पुलांवर गर्दुल्ले, भिक्षेकऱ्यांचे ठाण ठाणे : गेले काही दिवस विविध बांधकामे, दुरुस्त्या आणि अस्वच्छतेमुळे ठाणे रेल्वे स्थानकाला बकाल रूप आले आहे. फलाटांवर आणि स्थानकाबाहेर गोण्यांमधील राडारोडा, पावसामुळे स्थानक परिसर चिखलमय झाला आहे. तर, पादचारी पूल, विश्रांतीगृह आणि तिकीट खिडक्यांलगत गर्दुल्ले, भिक्षेकरुंनी ठाण मांडल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेले काही दिवस स्थानकात पादचारी पुलांची उभारणी सुरू आहे. तर काही पुलांच्या दुरुस्तीची कामे केली जात आहेत. फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले. स्थानकाच्या पूर्वेला तिकीटघर तोडून सॅटीस पुलाची निर्मिती केली जात आहे. सध्या या साऱ्या अडथळ्यांना पार करून प्रवाशांना उपनगरी गाड्या पकडाव्या लागत आहेत. बांधकामातील टाकाऊ साहित्य (राडारोडा) स्थानक परिसरात गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात आला आहे. फलाट क्रमांक दोनजवळील विश्रांती कक्षाच्या मागील बाजूस राडारोड्याने भरलेल्या गोण्यांचा ढीग रचण्यात आला आहे. याच भागात विटा, खडी इतरत्र विखुरलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळून प्रवासी तिकीट घराच्या दिशेने जातात. सध्या राडारोड्याच्या गोण्या प्रवाशांसाठी अडथळा ठरू लागल्या आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे स्थानक भागात पाणी तुंबले होते. त्यातून सध्या प्रवाशांना वाट काढावी लागत आहे. फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या विटा, तसेच काही राडारोडा फलाटावर ठेवण्यात आला आहे. शिवाय स्थानकातील पादचारी पुलांलगत दुपारच्या वेळेत भिक्षेकरुंचा वावर वाढत चालला आहे. अनेकदा भिक्षेकरू फलाट क्रमांक दोन येथे असलेल्या विश्रांती कक्षातही शिरकाव करीत आहेत. रोज आठ लाख प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वे आणि नवी मुंबईत जाण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गाच्या रेल्वेगाड्यांची वाहतुक होत असते. ठाणे शहरात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी ठाण्यासह कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, मुलुंड, नाहूर, भांडूप या भागातील प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकात येतात. त्यामुळे स्थानकातून दररोज सुमारे सात ते आठ लाख प्रवाशी प्रवास करतात.

कल्याणमध्ये बारावे जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी फुटली

कल्याण: कल्याण पूर्व, पश्चिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावे  जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी मंगळवारी रात्री शहाड येथे फुटली. वाहिनी फुटल्याने शेकडो लीटर पाणी फुकट गेले. जलवाहिनी लगतचा परिसर जलमय झाला होता. कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन दुरुस्तीच्या कामाचे नियोजन केले. मध्यरात्री जलवाहिनी फुटल्याने काळोखात दुरुस्तीचे काम करणे अवघड होते. तसेच जलवाहिनीतील पाण्याच्या प्रवाहाला उच्चतम वेग असल्याने हे पाणी तात्काळ थांबविणे अशक्य होते. जोपर्यंत जलवाहिनीतील पाणी खाली होत नाही, तोपर्यंत पालिका पाणी पुरवठा अधिकारी, ठेकेदार यांना दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य नव्हते. सकाळी सहा वाजताच्या दरम्यान जलवाहिनीतील पाण्याचा वेगवान प्रवाह कमी झाल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनी फुटल्याचा कल्याण पूर्व, पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यावर मंगळवारी संध्याकाळपर्यंत परिणाम होईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मध्यरात्रीपासून पालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी जलवाहिनीतील पाण्याची पातळी कधी खाली होते यासाठी फुटलेल्या जलवाहिनी भागात ठिय्या देेऊन होते. उल्हास नदीतून शहाड येथे पाणी उचलून ते बारावे येथे जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते. जलवाहिनीतील अतिउच्चत दाबामुळे किंवा व्हाॅल्व्हमध्ये तांत्रिक बिघाड झाला की अशा घटना घडतात, असे अधिकारी म्हणाला. जलवाहिनीतील पाण्याची पातळी सकाळी सहा वाजता कमी झाल्यानंतर पालिका अधिकारी, ठेकेदाराने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण केले. कल्याण शहराला पाणी टंचाईची झळ बसणार नाही यादृष्टीने तात्काळ जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू केला. सकाळच्या वेळेत कल्याण शहराला पाणी पुरवठा झाला नसला तरी आता दुपार आणि संध्याकाळी नियमित पाणी पुरवठा होईल, असे अधिकारी म्हणाला.

भिवंडीत कापड गोदामाला भीषण आग

ठाणे : भिवंडी येथील गोवा नाका भागात मंगळवारी पहाटे कापड गोदामाला भीषण आग लागली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे. सहा तासांपासून येथील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य अग्निशमन दलाच्या पथकांकडून सुरू आहे. गोवा नाका येथील सरवली भागात कापड निर्मितीचे गोदाम आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या गोदामाला अचानक भीषण आग लागली. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे आग अधिकच पसरत गेली. घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर भिवंडी, कल्याण आणि ठाणे महापालिका अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाले. सकाळी उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य पथकांकडून सुरू आहे. गोदामात कोणीही अडकले नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

डोंबिवलीतील कुटुंबाला युरोपचे पर्यटन महागात पडले

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील एका कुटुंबाला युरोपातील पर्यटन महागात पडले आहे. हे कुटुंब युरोपात फिरण्यासाठी जाताच चोरट्याने या कुटुंबीयांच्या घरात चोरी करून तिजोरीतील पाच लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली आहे. सुनील मधुकर पाटणकर यांच्या मिलापनगरमधील बंंगल्यामध्ये चोरट्याने चोरी केली आहे. या चोरीप्रकरणी सुनील पाटणकर यांचे नातेवाईक राजेंद्र देवराम चौधरी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनील मधुकर पाटणकर हे आपल्या कुटुंंबीयांसमवेत युरोपमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. पाटणकर यांच्या मिलापनगरमधील बंंगल्यावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने या बंंगल्यात कोणी राहत नसल्याचा अंदाज घेतला. शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्याने सुनील पाटणकर यांच्या बंंगल्याच्या स्वयंपाक घराच्या लोखंडी जाळ्या कटरने तोडल्या. या खिडकीतून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्याने घरातील शय्या गृहातील लोखंडी कपाटाचे कुलुप तोडले. तिजोरी उघडून त्यामधील सोन्याचा ऐवज, रोख रक्कम असा एकूण पाच लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. पाटणकर यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना समजला. ही माहिती तातडीने त्यांचे नातेवाईक चौधरी यांना देण्यात आली. युरोप पर्यटनावर असलेल्या पाटणकर यांनाही माहिती देण्यात आली. मानपाडा पोलिसांना चौधरी यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी या चोरीप्रकरणी पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांंनी केली आहे. गेल्याच आठवड्यात एमआयडीसीत चोरी झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून डोंबिवली एमआयडीसीतील निवासी विभाग, कंपन्यांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने रहिवासी, उद्योजक चिंताग्रस्त आहेत.

अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे शरद उपाध्ये यांचे बालसंस्कार वर्ग

मुंबई : अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या विठ्ठल मंदिरात १५ जून २०२४ पासून बाल संस्कार वर्ग आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी काढण्याचे आयोजन आहे. या वर्गात राशीचक्रकार शरद उपाध्ये हे मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. अधिक माहितीसाठी संपर्क ९२२३५३६८८८, ९८२०१०४७७६.

सिव्हील रुग्णालयात वर्षभरात ३५०० शस्त्रक्रिया

ठाणे : रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया करायच्या झाल्या तर सर्वांनाच खर्च परवडणारा नसतो. मात्र अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालय आधारवड ठरत आहे. गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या ३५००  शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया  सिझर (LSCS) असून, त्या खालोखाल डोळे, दंत अस्थीरोग, कान, नाक, इत्यादी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपावर सिव्हील रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले. मात्र असे असताना, रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काहीवेळा या रूग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. एका महिन्याला सरासरी ३०० ते ३५० शास्त्रिक्रिया पार पडत आहेत. जून २०२३- २४  या वर्षभरात ३५०० रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून,  मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहेत. झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक सिझरच्या (LSCS) २००० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत जनरल सर्जरी ४००, स्त्रियांचे विविध अजार २०३ सोबतच डोळ्यांच्या ४५२, दंत २२९, अस्थी २३८,  या बरोबर पोट, कान, नाक, आदींच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. खाजगी रुग्णालयात न परवडणाऱ्या जोखमीच्या शस्रक्रिया आणि औषधोपचार सिव्हिल रुग्णालयामध्ये मोफत होत असून एक महिन्यांपूर्वी  अमीबियामुळे  यकृतावर आठ फोड आलेल्या गुजरात मधील एका रुग्णांवर सिव्हील रुग्णालयात  यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. सहा महिन्यापूर्वी  गरीब  कुटुंबातील एका दोन वर्षीच्या मुलीला जन्मजात मोतीबिंदू असल्याने अशी शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठी आव्हान होते. परंतु आव्हान पेलवत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमच दोन्ही डोळ्यांची अवघड मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून मुलीला दृष्टी दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी एका महिलेच्या मणक्याची जोखमी  शस्त्रक्रिया करण्यात आली होती कोट शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक  उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हील रुग्णालयात होतात. काही वेळा महात्मा ज्योतिबा फुले ह्या जन आरोग्य योजने अंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात.  दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे)

ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालय क्षेत्रांतर्गत सेक्टर 03, ऐरोली येथे घर क्र. जे-48 व जे-194 यांचे आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. तसेच घर क्र. जे-185 यांनी नमुंमपाच्या परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम केलेले आहे. या अनधिकृत बांधकामांस ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदर अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहीमेचे आयोजन करण्यात येऊन ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच सदर कारवाई अंतर्गत रू. 50,000/- दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी एकुण 08 मजूर, 01 गॅस कटर, 02 इलेक्ट्रिक हॅमर यांचा वापर करण्यात आला. ही मोहीम जी विभाग ऐरोली येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

लोकसभेच्या ५४३ नवनिर्वाचित खासदारांपैकी २५१ खासदारांवर फौजदारी गुन्हे ही अत्यंत गंभीर बाब

विशेष रमेश कृष्णराव लांजेवार देशाचे ५४३ खासदार देशांच्या १४० कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करीत असते.यात जर ४६ टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल असेल तर सर्वसामान्यांनी काय करावे?तो कोणताही गुन्हेगार असो त्याला…

साने गुरुजी

दिन विशेष श्याम ठाणेदार आज भारत मातेचे थोर सुपुत्र, स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक साने गुरुजी यांची पुण्यतिथी. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा…