Category: क्रीडा

सायकलिंगमध्ये पूजा दानोलेला सुवर्ण

मुलींच्या महाराष्ट्राला गटात सर्वसाधारण विजेतेपद रुद्रपूर : उत्तराखंड मध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलिंग खेळाच्या स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या पूजा दानोलेला ६० किमी अंतराच्या रोड मास स्टार्ट प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत महाराष्ट्राने ८ गुण घेत मुलींच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उप पथक प्रमुख उदय डोंगरे यांनी सायंकलिंग स्पर्धे दरम्यान भेट देऊन खेळाडूंचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या पूजा दानोले हिने ६० किमी रोड रेस प्रकारात १ ता. ४५ मी १०.५९० से.वेळ देत रौप्य पदक मिळवले तर गुजरातच्या मुस्कान गुप्ता हिने १ ता. ४५ मी १०.५१२ से. वेळ देत सुवर्णपदक पटावले. आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू स्वास्ती सिंग हिने १ ता. ४५ मी १०.७६९से. कांस्यपदक मिळवले. या सर्धेचे समुलींच्या गटाचे सर्वसाधारण विजेतेपद ८ गुणांसह महाराष्ट्राने पटकावले तर ५ गुणांसह गुजरात दुस-या तर राजस्थान ३ गुणांसह तिसरा स्थानी राहीले.

1 फेब्रुवारीपासून सीसीआय येथे रंगणार

एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धा माजी विंबल्डन उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या तातयाना मारिया हिला अव्वल मानांकन मुंबई, 30 जानेवारी 2025: एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या चौथ्या सत्राचे औपचारिक उद्घाटन क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथील टेनिस संकुलात 30 जानेवारी 2025 रोजी पाडले.  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 31 देशांमधील मानांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. डब्लुटीए 125000डॉलर स्पर्धा मालिकेतील एक महत्वाची स्पर्धा असलेल्या या स्पर्धेला 1 फेब्रुवारी रोजी पात्रता फेऱ्यानी प्रारंभ होणार असून मुख्य ड्रॉ चे सामने 3 फेब्रुवारी 2025 पासून रंगणार आहेत. स्पर्धेतील अंतिम फेरीचे सामने 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या या वर्षीच्या मालिकेत अनुभव आणि युवा खेळाडू यांच्यातील चुरस पाहावयास मिळणार आहे. एकेरीतील अव्वल मानांकन जागतिक क्रमवारीत 73व्या स्थानी असलेल्या तातयाना मारिया हिला देण्यात आले असून ती आपल्या कारकीर्दीतील चौथ्या विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या मारियाने यापूर्वी विंबल्डन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून जागतिक क्रमवारीत 42वे स्थान हे तिचे कारकीर्दीतील सर्वोत्तम मानांकन आहे. 2022मध्ये 34 वर्षापेक्षा अधिक वय असलेली ओपन टेनिसमधील ती केवळ सहावी महिला खेळाडू ठरली आहे. मारिया हीने 2023 व 2024मध्ये कोलंबियातील कोपा कोलसॅनिटास ही डब्लुटीए 250दर्जाची स्पर्धा जिंकली होती. गतविजेती लात्वियाची दरिया सेमेनिस्तजा ही जगातील सर्वात गुणवान खेळाडूंपैकी एक असून राफेल नदालने आपल्या अकादमी साठी निवडलेली फिलिपिन्सची अलेक्झांड्रा इयाला या दोन्ही खेळाडू विजेतेपदासह डब्लूटीए क्रमवारीत पूर्ण 125गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ) व संयोजन समितीचे अध्यक्ष ओ. पी. गुप्ता यांनी सांगितले की, एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेच्या आणखी एका सत्राचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत असून या निमित्ताने टेनिस या खेळातील अधिकाधिक पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्याची संधी साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार उत्सुक आहे. एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेच्या दर्जाच्या भरघोस पारितोषिक रक्कम असलेल्या स्पर्धा भारतीय खेळाडूंना त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि जागतिक क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच, जागतिक क्रिडा क्षेत्राच्या नकाशावर महाराष्ट्र राज्याचा ब्रँड मोठ्या प्रमाणावर पुरस्कृत करण्यासाठी हि स्पर्धा महत्वाची असून आज पर्यंतची ही सर्वात भव्य स्पर्धा ठरणार आहे. महाराष्ट्राचे प्रिंसिपल सेक्रेटरी(पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था) आणि संयोजन समितीचे खजिनदार, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रवीण दराडे यांनी सांगितले की, सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेला आर्थिक पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही मुख्य प्रायोजक लार्सन अँड टूब्रो(एल अँड टी) यांचे आभार मानतो. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धा ही भारतातील सर्वाधिक प्रतिक्षित टेनिस स्पर्धा ठरली असून यंदाची स्पर्धा सर्वाधिक वैभवशाली ठरेल. ते पुढे म्हणाले की, भारतीय खेळाडूंसाठी एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धा हे सर्वोत्तम व्यासपीठ असून गतवर्षी सहजा यमलापल्ली आणि श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती यांच्यासह महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे या खेळाडूंना या स्पर्धेचा फायदा झाला आहे. प्रार्थना ठोंबरे हीने 250दर्जाच्या स्पर्धेत दुहेरी गटात विजेतेपद देखील पटकावले. एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेचे चौथे सत्र भारतीय टेनिस क्षेत्रासाठी संस्मरणीय ठरणार असून भारतीय टेनिस प्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद घेता येणार आहे. स्पर्धेच्या उत्कृष्ट संयोजनासाठी संयोजन समिती अथक परिश्रम करत असून ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एल अँड टीच्या कॉर्पोरेट स्ट्रेटेजी व स्पेशल इनीशिएटीव्ह विभागाचे प्रमुख अनुप सहाय म्हणाले की, एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेने अल्पावधीतच एक उच्च स्तर गाठला असून भारतीय टेनिस क्षेत्राला एक नव्या आशेचे क्षितिज मिळवून दिले आहे. समृध्द परंपरा, इतिहास असलेल्या भारतीय टेनिस क्षेत्राला लार्सन अँड टूब्रो यांनी नेहमीच पाठिंबा दिला असून यंदाच्या एल अँड टी मुंबई ओपन टेनिस स्पर्धेमुळे भारतीय टेनिस व एल अँड टी यांच्या भागीदारीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. संयोजन समिती अध्यक्ष ओ.पी.गुप्ता, खजिनदार संजय खंदारे, संयोजन सचिव प्रवीण दराडे यांच्यासह अखिल भारतीय टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष भरत ओझा, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस समितीचे अध्यक्ष संजीव कोठारी, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, स्पर्धा संचालक व क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस विभागाचे सचिव लव कोठारी  या प्रसंगी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते अधिकृत पोशाखाचे अनावरण करण्यात आले.

 खो-खो स्पर्धेचा थरार शुक्रवारपासून!

 श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष व महिला गटातील दिग्गज संघांची रंगतदार लढत   ठाणे : श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच विभागीय पुरुष आणि महिला गटातील भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रोमांचक स्पर्धा ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील सामने सकाळी ८:०० ते ११:०० आणि संध्याकाळी ४:०० ते ९:०० या दोन सत्रांमध्ये रंगणार आहेत. शतक महोत्सवी वर्षात ऐतिहासिक आयोजन या ऐतिहासिक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन ३१ जानेवारी रोजी सकाळी ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर बक्षीस समारोप सोहळा १ फेब्रुवारी रोजी रात्री ९:०० वाजता उमेश साळवी (सेवानिवृत्त – मुंबई उच्च न्यायालय) यांच्या हस्ते होईल. मुंबई, उपनगर व ठाण्यातील नामवंत संघांची मोठी उपस्थिती या स्पर्धेत पुरुष गटात १६ आणि महिला गटात १२ असे एकूण २८ संघ भाग घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील श्री मावळी मंडळ, श्री आनंद भारती समाज, ग्रिफीन जिमखाना, विहंग क्रीडा केंद्र, राज क्रीडा मंडळ, धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ज्ञानविकास फाउंडेशन, वायूदूत क्रीडा केंद्र, शिवभक्त क्रीडा केंद्र, युवक क्रीडा केंद्र आणि न्यू बॉम्बे हायस्कूल हे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. मुंबई जिल्ह्यातून सरस्वती स्पोर्ट्स, अमर हिंद मंडळ, विद्यार्थी क्रीडा केंद्र, श्री समर्थ व्यायाम मंदिर आणि ओम साईश्वर सेवा मंडळ यांसारख्या मातब्बर संघांनी आपली हजेरी लावली आहे. तसेच, मुंबई उपनगरातील श्री सह्याद्री संघ, महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी आणि युवा स्पोर्ट्स क्लब हे नामवंत संघही या स्पर्धेत भाग घेत आहेत. १,००,०००/- च्या पारितोषिकांसाठी संघांमध्ये चुरस या भव्य स्पर्धेसाठी तब्बल ₹१,००,०००/- ची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. त्यामुळेच या स्पर्धेत अंतिम विजयासाठी संघांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळतील. खो-खो क्रीडाप्रेमींसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे. श्री मावळी मंडळाचे शतक महोत्सव वर्ष आणि या ऐतिहासिक स्पर्धेचे रोमांचक क्षण अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे. 00000

 युग पाटील 12 वर्षांखालील मुले वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू

  ट्रॅकनाईट ॲथलेटिक्स स्पर्धा मुंबई: एआयएम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या युग पाटीलने युनिव्हर्सिटी पॅव्हेलियन मैदानावर खेळल्या गेलेल्या ट्रॅकनाईट ॲथलेटिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीत तीन सुवर्णपदक जिंकून 12 वर्षांखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान मिळविला. 60 मीटर धावणे प्रकारात अत्यंत चुरस पाहायला मिळाली. युग पाटीलने 8.465 सेकंद वेळेसह रेस पूर्ण करताना वर्चस्व गाजवले. त्याला डीएसएसएच्या दैविक नायडूकडून (8.620 सेकंद) चांगला प्रतिकार लाभला. त्याने रौप्यपदक मिळवले. चिल्ड्रन्स ॲकॅडमी ग्रुप ऑफ स्कूलच्या (अशोक नगर) जेसन जिमीने ९.०१५ सेकंद वेळेसह तिसरे स्थान मिळवले. त्यापूर्वी, युग पाटीलने 120 मीटर धावणे प्रकारात सातत्य राखताना उल्लेखनीय वेगाचे प्रात्यक्षिक करून 15.862 सेकंदात अंतिम रेषा पार केली. या प्रकारातही दैविक नायडूने 16.973 सेकंदाच्या वेळेसह दुसरे स्थान पटकावत पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले. जीएईटीमधील आरव कुलकर्णीने 17.740 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. 300 मीटर धावण्याच्या प्रकारात युग पाटीलने 42.779 सेकंदांच्या उल्लेखनीय वेळेसह सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तसेच दिवसातील निर्विवाद स्प्रिंट किंग म्हणून स्वत: ला सिद्ध केले. यश पालवीने 47.006 सेकंदात रेस पूर्ण करताना रौप्यपदक मिळवले. जीएईटीमधील श्री कांबळीचे (47.027 सेकंद) दूसरे स्थान थोडक्यात हुकले.

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या पूजा दानोलेला सुवर्ण   रुद्रपूर : उत्तराखंड मध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलिंग खेळाच्या सुरु झालेल्या स्पर्धेत आज पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या पूजा बबन दानोले हिने सुवर्णपदक पटकावले. रुद्रपूर येथे आजपासून सुरु झालेल्या रोड सायकलिंग खेळाच्या महिलांच्या ३० टाईम ट्रायल प्रकारात पूजा दानोले हिने ४५ मि. ३३.७३४ से. वेळ देत    भारतामधील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना मागे टाकत महाराष्ट्राला सायकलिंगमधील पहिले पदक मिळवून दिले. रुद्रपूर ते पंतनगर रोडवरील १५ किमी अंतराच्या मार्गावर या स्पर्धा पार पडल्या. मूळची कोल्हापूरची असलेल्या पूजाने सायकलिंग खेळाचे प्राथमिक प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या पुणे क्रीडा प्रबोधिनी येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या कडे घेतले. नवी दिल्ली येथील सिएफआय आणि साई यांच्या संयुक्त अकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षण घेतले. पूजाने रोड, एमटीबी आणि ट्रॅक या तीनही प्रकारात आपले वर्चस्व सिद्ध केले असून सध्या रोड आणि ट्रॅकवर तीने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या स्पर्धेतील रौप्य पदक मोनिका जाट हिने ४५ मि. ४८.३५१ से.  देत जिंकले तर कर्नाटकच्या शिवलिंग हिला ४५ मि. ५१.५९४ वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रुद्रपूर येथे सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष आणि स्पर्धा संचालक प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑप महाराष्ट्रचे सचिव प्रा. संजय साठे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील, प्रशिक्षक उत्तम नाळे आदी मान्यवरांनी भेटून कौतुक आणि अभिनंदन केले. या स्पर्धेचा पदक प्रदान समारंभ रुद्रपूरचे जिल्हाधिकारी मा. नितीन भडोदीया यांच्या आणि सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे महासचिव आणि जीटीसीसी चे सदस्य मनेंदर पाल सिंग यांच्या हस्ते संपन्न झाला 0000 0000

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा षटकार, 4 रौप्य, 2 कांस्य संकेत,दीपाली,सारिका, मुकुंदला रौप्य तर आकाश, शुभमला कांस्य   डेहराडून ः उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ग्रामिण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी 6 पदकांची लयलुट केली. सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता संकेत सरगर,सांगलीची दिपाली गुरसाळे, पुण्याच्या सारिका शिनगारे व नाशिकच्या मुकुंद आहेरने रूपेरी यशाचे वजन पेलले. लातूरच्या आकाश गौड व पुण्याचा शुभम तोडकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली. पंधरा दिवसांपूर्वी गुडघ्याला व स्नायूला  मोठ्या प्रमाणात दुखापती होऊनही सांगली जिल्ह्याची खेळाडू दिपाली गुरसाळे हिने या दुखापतीवर मानसिक तंदुरुस्ती भक्कम ठेवीत मात करीत वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक पटकाविले. दीपाली हिने 45 किलो गटातील स्नॅचमध्ये 69 किलो तर  क्लीन व जर्क मध्ये 82 किलो असे एकूण 151 किलो वचन उचलले. केरळच्या सुफना जस्मिन हिने अनुक्रमे 72 व 87 असे एकूण 159 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. पुरुषांच्या 61 किलो गटात महाराष्ट्राच्या सांगलीचा राष्टकुल पदक विजेता संकेत सरगर याने स्नॅच मध्ये 117 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 142 किलो असे एकूण 259 किलो वजन उचलले आणि रौप्य पदक जिंकले. त्याचाच सहकारी पुण्याचा शुभम तोडकर याने कांस्यपदक पटकाविले. त्याने स्नॅच मध्ये 114 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 254 किलो वजन उचलले. राष्टकुल स्पर्र्धेत हुकलेले सुवर्णपदक आता जिंकयचे असल्याचे संकेत सरगर यांनी सांगितले. पुरुष गटातील 55 किलो गटात महाराष्ट्राच्या मुकुंद आहेर व आकाश गौड यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. मुकुंद आहेर याने स्नॅच मध्ये 112 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 135 असे एकूण 247 किलो वजन उचलले. आकाश गौड याने मध्ये 107 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 137 असे एकूण 244 किलो वजन उचलले. पुण्याजवळील राजगुरूनगरमधील सारिका शिनगारे हिने महिलांच्या 49 किलो गटात रुपेरी यश संपादन केले तिने स्नॅचमध्ये 79 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 100 असे एकूण 179 किलो वजन उचलले. छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने अनुक्रमे 85 व 106 असे एकूण 191 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. 26 वर्षीय सारिका रेल्वेची खेळाडू असून पुण्यातील वडगाव मावळ येथे अनिकेत निवघणे यांच्याकडून प्रशिक्षण घेते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. महिलांच्या 45 किलो गटातील  दीपाली हिने गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्नॅचमध्ये 75 किलो व एकूणाचा 164 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता यंदाही तिला राष्ट्रीय विक्रमाची अपेक्षा होती मात्र पंधरा दिवसांपूर्वी सराव करताना तिच्या गुडघ्यावर आणि स्नायूंची मोठी दुखापत झाली. त्यामुळे आपली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संधी मुकणार की काय अशी शंका तिला निर्माण झाली मात्र तिचे प्रशिक्षक संतोष सिंहासने यांनी तिला मानसिक आधार दिला त्यामुळे तिने पंधरा दिवस जमेल तसा सराव करीत येथील स्पर्धेत भाग घेतला आणि महाराष्ट्राला आणखी एक रौप्यपदकाची कमाई करून दिली. मुकुंद हा 21 वर्षीय खेळाडू रेल्वेमध्ये नोकरी करीत असून गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. तो मनमाड येथे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याच्या मेघा व वीणाताई या दोन बहिणींही राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडू आहेत. मुकुंदचे यश पहाण्यासाठी त्याचे आजोबा एकनाथ , आजी गंगुबाई, आई इंदुबाई व वडिल संतोष आहेर डेहराडून आले होतेे. लाडक्या लेकाचे पदक पाहून सार्‍याचे कुटुंबियाचे डोळे आनंदाने पाणावले होते. आता मला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे असल्याने मुकुंद यांने सांगितले. 0000

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

संयमाच्या जोरावर आर्याचे रूपेरी यश, नेमबाजीत महाराष्ट्राचे उघडले खाते   डेहराडून ः उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या आर्या बोरसे अपेक्षेप्रमाणे रूपेरी यशाचा नेम साधून नेमबाजीतील महाराष्ट्राच्या पदकाचे खाते उघडले. संयम व चिकाटी दाखवली की यश हमखास मिळते असे आपण नेहमी म्हणतो हा प्रत्यय आर्या बोरसे हिच्याबाबत दिसून आला. नेमबाजीमधील मधल्या टप्प्यात पिछाडीवर असलेल्या आर्या हिने शेवटच्या टप्प्यात अचूक नेम साधला आणि महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पदक खेचून आणले. महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशुल शूटिंग रेंजवर आर्या बोरसेने 252.5 गुणांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच पदकाला गवसणी घातली. सुवर्णपदक जिंकणार्‍या आर नर्मदा या तामिळनाडूच्या खेळाडूने 254.4 गुणांची नोंद केली. पात्रता फेरीत आर्याने दुसरे स्थान घेत अंतिम फेरीसाठी प्रवेश निश्चित केला होता. पहिल्या टप्प्यात तिने अन्य दोन खेळाडू समवेत तिने आघाडी घेतली होती. मात्र अठराव्या नेमच्या वेळी ती चौथ्या स्थानावर होती. त्यावेळी तिला पदक मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती तथापि तिने शेवटच्या चार नेम मध्ये अतिशय संयम आणि आत्मविश्वास दाखवीत पदक खेचून आणले. पदकाची खात्री होती- आर्या गतवेळच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला पदक मिळवता आले नव्हते त्याची खंत मला सतत जाणवत होती. यंदा या स्पर्धेमध्ये आपण पदक जिंकायचेच या दृष्टीने मी भरपूर सराव केला होता त्यामुळेच पदक जिंकण्याची मला खात्री झाली होती असे आर्या हिने सांगितले. यंदा जागतिक स्पर्धांसाठी होणार्‍या भारतीय संघाच्या निवड चाचणीत भाग घेत सर्वोत्तम यश मला मिळवायचे आहे अर्थात ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत पदक मिळवणे हे माझे मुख्य ध्येय आहे त्यासाठी टप्प्याटप्प्याने माझी वाटचाल असेल असे तिने सांगितले. आर्या ही 22 वर्षीय खेळाडू सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या खेलो इंडिया शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती नाशिकची असून तेथे एचपीटी महाविद्यालयात कला शाखेत ती शिकत आहे. महाविद्यालयाकडून तिला भरपूर सहकार्य मिळत आहे त्यामुळेच मी फक्त नेमबाजीच्या सरावावर लक्ष ठेवू शकते असेही तिने सांगितले. रूद्रांक्ष पाटील व पार्थ माने अंतिम फेरीत महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रूद्रांक्ष पाटील व पार्थ माने यांनी पुरुषांच्या दहा मीटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक फेरीत पाटील याने  633.8 गुणांसह अव्वल स्थान घेतले आहे तर पार्थ हा तिसर्‍या क्रमांकावर असून त्याचे 632.6 गुण झाले आहेत. 0000

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

जलतरणामध्ये महाराष्ट्राचा पदकांचा चौकार, सान्वी देशवालचे सोनेरी यश हल्दवानी –   उत्तराखंडात सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरणामध्ये सलग दुसर्‍या दिवशी  पदकांचा चौकार झळकविला. सान्वी देशवालचे सोनेरी यश संपादले. चार बाय शंभर मीटर मिडले रिले शर्यतीमधील पुरुष गटात कांस्य तर महिला गटात रौप्यपदक मिळाले तर महिलांच्या डायव्हिंग मध्ये ईशा वाघमोडे हिने रौप्य पदक जिंकले सान्वी देशवाल हिने 4 बाय 100 मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सोनेरी यश संपादन केले. तिला ही शर्यत पूर्ण करण्यास पाच मिनिटे 5.49 सेकंद वेळ लागला. पुरुषांच्या विभागात चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत कास्यपदक मिळवताना महाराष्ट्राच्या संघात ऋषभ दास, पृथ्वीराज डांगे, मिहीर आम्ब्रे हीर गितेश शहा यांचा समावेश होता. त्यांनी हे अंतर पार करण्यास तीन मिनिटे 48.31 सेकंद वेळ लागला महिलांच्या चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत महाराष्ट्राला रुपेरी यश लाभले. ऋजुता राजाज्ञ,ज्योती पाटील, प्रतिष्ठा डांगी व आदिती हेगडे यांच्या समावेश असलेल्या महाराष्ट्राने ही शर्यत चार मिनिटे 31.29 सेकंदात पार केली. मुलींच्या दहा मीटर प्लॅटफॉर्म ड्रायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिला रौप्य पदक मिळाले तिने या प्रकारात 175.50 गुणांची नोंद केली. 0000

खो-खोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोडदौड!

पुरूषांचा केरळवर तर महिलांचा पश्चिम बंगालवर विजय हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला या दोन्ही खो-खो संघांनी ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड अपेक्षेप्रमाणे सुरूच ठेवली. महाराष्ट्राच्या पुरूष संघाने केरळाचा तर महिला संघाने पश्चिम बंगालचा पराभव करीत गटात अव्वल कामगिरी केली. पुरूषांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळवर ११ गुणांनी (४७-३६) मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राकडे १० गुणांची (२४-१४) आघाडी होती. महाराष्ट्राकडून कर्णधार गजानन शेंगाळ (१.३० मि., २ मि. संरक्षण आणि २ गुण), राहूल मंडल (१.३० मि. संरक्षण व १० गुण), रामजी कश्यप (१.१० मि., १.४० मि. संरक्षण व ८ गुण), शुभम थोरात (१.४० मि., १.२५ मि. आणि २ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत झालेल्या केरळकडून निखिल बी (१.१० मि. संरक्षण व १० गुण), देवनारायण (१ मि. संरक्षण व  गुण) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. महिलांची दमदार कामगिरी महिला गटातील सामन्यात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचा एक डाव व ४ गुणांनी (२४-२०) धुव्वा उडविला. या एकतर्फी विजयात प्रियांका इंगळे (२.१५ मि., नाबाद १.५० मि. आणि ६ गुण), संपदा मोरे (१.३० मि. संरक्षण आणि ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. याचबरोबर पायल पवार (१.४० मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (२.५५ मि. व १.२५ मि. संरक्षण आणि २ गुण) यांनीही दमदार कामगिरी केली. पश्चिम बंगालकडून इशिता विश्वास (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), दिपिका चौधरी (१.१० मि. संरक्षण आणि ४ गुण) यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला.

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

नेमबाजीत आर्या बोरसेला पदकाची संधी, वॉटर पोलो-रग्बीत दणदणीत विजय डेहराडून  ः  उत्तराखंड येथे होणार्‍या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत  महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत गाठून पदकाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. दुसरीकडे वॉटर पोलोमध्ये पुरूषांनी, तर रग्बीमध्ये महिला संघाने जोरदार विजयी सलामी देत स्पर्धेत बुधवारचा दिवस गाजविला. डेहराडूनमधीलइ त्रिशूल शुटींग रेजवरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठून पदकाच्या आशा कायम ठेवल्या. आज झालेल्या प्राथमिक फेरीत तिने 634.5 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. हरियाणाची रमिता हिने 634.9 गुणांसह अव्वल स्थानी राहिली. आर्या ही नाशिकची खेळाडू असून, सध्या ती नवी दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. तिने आजपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत. उद्या देखील ती सर्वोत्तम कामगिरी करील असा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या पथकाचे प्रशिक्षक ओंकार गोसावी यांनी व्यक्त केला. रग्बीत महिलांची धडाकेबाज सुरुवात डेहराडून येथे बुधवारी रग्बी स्पर्धांना प्रारंभ झाला. महिलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूची 68-0 गोल फरकाने दाणादाण उडविली. एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पूर्वार्धात 35-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती. वॉटर पोलोमध्ये दणदणीत विजय हल्दवानी येथे सुरू असलेल्या वॉटर पोलो स्पर्धेत पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने हरियाणाला 20-0 गोल फरकाने निष्प्रभ केले. एकतर्फी झालेल्या या लढतीत महाराष्ट्राच्या भूषण पाटीलने पाच गोल केले, तर सारंग वैद्यने चार गोल केले. महाराष्ट्राने वाटर पोलो मध्ये कायमच वर्चस्व गाजविले आहे. आजही त्याचीच प्रचिती आली. सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट संगीत खेळाबरोबरच गोल नोंदविण्याबाबतही अचूकता दाखवित दणदणीत विजय मिळविला.