Category: क्रीडा

डाटामॅटिक्स, सेंट्रल बँकेची विजयी घोडदौड

डाटामॅटिक्स, सेंट्रल बँकेची विजयी घोडदौड इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धा मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता असलेल्या इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धेत डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ महाराष्ट्र वर तर सेंट्रल बँकेने यजमान ओरिएंटल इन्श्युरन्स संघावर विजय मिळवला. डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ महाराष्ट्राचा ९ विकेट्स शिल्लक राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना बँक ऑफ महाराष्ट्राला ९२ धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहिदास कोयंडे आणि कल्पेश सावंत यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्याची कोणतीही संधी दिली नाही. कल्पेश सावंतने १४ धावांत ४ तर रोहिदास कोयंडेने १३ धावांत ३ बळी मिळवले. त्यानंतर डाटामॅटिक्स संघाने ९.३ षटकांतच ९२ धावांचे आव्हान पार केले. भुवन पाटील याने ३० चेंडूंत केलेली ५० धावांची तर उपेंद्र यादवने २५ चेंडूंत केलेली ३६ धावांची खेळी डाटामॅटिक्सच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. एलिट गटाच्या दुसऱ्या सामन्यात सेंट्रल बँकेने ओरिएंटल इन्श्युरन्सवर २५ धावांनी विजय मिळवला. सेंट्रल बँकेने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा उभारल्या. प्रथम परमार याने तडाखेबंद ५८ धावांची खेळी साकारली. त्याला उत्तम साथ देताना गौतम साठेने २३ चेंडूंत ३६ धावांचे योगदान दिले. हे उद्दिष्ट गाठताना ओरिएंटल इन्श्युरन्सच्या फलंदाजांनी ६० धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही, परिणामी धावांची गती कमी झाल्याने त्यांना विजयासाठी २५ धावा कमी पडल्या. ओरिएंटलचा डावखुरा फलंदाज समीप मिसाळ याने ३१ चेंडूंत नाबाद ४१ धावा तर शंतनु तांडाले याने ४० धावा करत चांगला प्रतिकार केला. मात्र विजयासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. राजेश बोरकर याने दोन बळी मिळवत सेंट्रल बँकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने ६ मार्च रोजी खेळवण्यात येतील.

राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट

अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट पुण्याच्या अनुभवी बॅडमिंटनपटूंचे जागतिक स्तरावर वर्चस्व अबू धाबी, युएई – अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ मध्ये भारतीय ध्वज अभिमानाने फडकवला गेला. अनुभवी भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विविध वयोगटातील अनेक पदके पटकावली. पुण्याचे राज सिंग यांनी या मोहिमेचे नेतृत्व करताना आपल्या चिकाटीचा आणि कौशल्याचा परिचय देत तब्बल तीन पदकांवर आपले नाव कोरले. रौप्य पदकाची कमाई ६०+ पुरुष दुहेरी गटात अव्वल स्थानासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राज सिंग आणि धनंजय देशपांडे या जोडीने रौप्य पदक पटकावले. संपूर्ण स्पर्धेत या जोडीने उत्कृष्ट समन्वय आणि रणनीतीचा वापर केला. अंतिम सामन्यात थोडक्यात सुवर्णपदक हुकले असले तरी, त्यांच्या खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भरभरून कौतुक झाले. ऐतिहासिक पदार्पण आणि कांस्य विजय या स्पर्धेत रेखा धुपर यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण स्वप्नवत ठरले. ६०+ मिश्र दुहेरी गटात राज सिंग यांच्यासोबत खेळताना या जोडीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मानाचे कांस्य पदक मिळवले. इतकेच नव्हे तर, राज सिंग यांनी आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवत ४५+ पुरुष दुहेरी गटात प्रताप मेकाला यांच्यासह खेळताना आणखी एक कांस्य पदक प्राप्त केले. या गटातील उपांत्य फेरीचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला: पहिला गेम: सिंग आणि मेकाला यांनी १५-८ असा एकतर्फी विजय मिळवला. निर्णायक खेळ: दुसऱ्या सेटमध्ये १८-२० अशा अटीतटीच्या संघर्षानंतर, तिसऱ्या सेटमध्ये (९-१५) या जोडीने झुंजार खेळ करत कांस्य पदक निश्चित केले. जागतिक दर्जाचे नियोजन आणि सोयी-सुविधा मैदानातील खेळासोबतच, २०२६ च्या या स्पर्धेचे नियोजन आणि खेळाडूंना दिलेल्या सुविधांचे मोठे कौतुक झाले. आयोजकांनी खेळाडूंसाठी विशेष व्यवस्था केली होती. प्रवास सुविधा (Pick-up & Drop): खेळाडूंना निवासाच्या ठिकाणाहून मैदानापर्यंत नेण्या-आणण्यासाठी २४ तास वाहन सेवा उपलब्ध होती, ज्यामुळे खेळाडू वेळेवर आणि ताजेतवाने होऊन पोहचू शकले.…

  अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम!

अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम! सूरज पी. एच. यांचे  आंतरराष्ट्रीय रौप्यपदक! दीप रांभिया आणि सोनाली मिलखेलकर यांना सुवर्ण पदक! अबुधाबी येथे ६ ते १५ फेब्रुवारी  दरम्यान अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ४८व्या आय.एस.सी अपेक्स यूएइ ओपन बॅडमिंटन एलिट चॅम्पिअनशिप २०२६ या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला. विशेष उल्लेखनीय कामगिरी करत आयकर विभाग, मुंबई येथे कार्यरत असलेले आणि खेलो इंडिया योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेणारे सूरज पी. एच. यांनी पुरुष दुहेरी ३५+ गटात मोहम्मद रेहान यांच्यासह भारतासाठी रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्यांना माजी जागतिक क्रमांक ९ तसेच विद्यमान ३५+ पुरुष दुहेरी विश्वविजेते डॅनी बावा क्रिस्टनंता (सिंगापूर) आणि फर्नांडो कुर्नियावन (इंडोनेशिया) या जोडीविरुद्ध ११–१५, ९–१५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांच्या लढाऊ आणि शिस्तबद्ध खेळामुळे भारताला अभिमानास्पद दुसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके जिंकत ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपक्रमाची ताकद सिद्ध केली. पुरुष दुहेरी गटात दीप रांभिया यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या सरवनन कन्नन व अभीश वल्लाचीरा यांचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत देव अय्यप्पन व धिरेन अय्यप्पन (यूएई) यांना २१-१३, २१-१९ असे नमवत अंतिम फेरी गाठली; मात्र अंतिम सामन्यात भारताच्या हरिहरन व ध्रुव रावत यांच्याकडून २१-११, २१-१३ असा पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदक पटकावले. मिश्र दुहेरी प्रकारात दीप रांभिया व सोनाली मिखेलकर यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या धिरेन अय्यप्पन व अलीना काथून यांचा १२-२१, २१-१८, २१-१४ असा पराभव करत शानदार पुनरागमन केले. उपांत्य फेरीत हरिहरन व ताबिया खान यांना २१-१८, २१-१५ असे नमवले. अंतिम सामन्यात यूएईच्या अँडी मारवान हम्झा व नुरानी रुतु अझ्झाह्रा या जोडीवर १८-२१, २१-१६, २१-१२ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. महिला दुहेरी प्रकारात सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली. एकूणच दीप रांभिया व सोनाली मिखेलकर – सुवर्णपदक (मिश्र दुहेरी), दीप रांभिया – रौप्यपदक (पुरुष दुहेरी), सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर – कांस्यपदक (महिला दुहेरी) आणि सूरज पी. एच. – रौप्यपदक (पुरुष दुहेरी ३5+) अशी २ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य अशी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खात्यात जमा झाली. या सर्व यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची भक्कम प्रशिक्षण व्यवस्था, प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. ठाणे  महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त श्रीमती. मीनल पालांडे यांनी सदर खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आहे.  विशेषतः सूरज पी. एच. यांच्या रौप्यपदकामुळे आणि एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदकांमुळे ठाण्याचा क्रीडा ध्वज जागतिक व्यासपीठावर अभिमानाने फडकला आहे.

आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा

आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा मुंबई-आरंभ स्पोर्टस आणि मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने   २१ व २२ फेब्रुवारी मोरया मित्र मंडळ मैदान, चारकोप, कांदिवली (पश्चिम), येथे मल्लखांब स्पर्धा  आयोजित करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत…

 ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर

६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील जलतरणपटू सज्ज मुंबई (क्री. प्र.) : अथांग अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटांवर जलतरणपटूंच्या जिद्दीचा आणि साहसाचा थरार अनुभवण्याची वेळ आली असून, प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ‘६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी दिमाखात पार पडणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणाऱ्या या महास्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे. जलतरणपटूंच्या जिद्दीला आणि समुद्राच्या लाटांना आव्हान देणारी ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून धाडस, चिकाटी आणि कौशल्याचा उत्सव ठरणार आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात होणाऱ्या या महास्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जलतरणप्रेमींचे लक्ष लागले असून, शेकडो खेळाडू समुद्राच्या लाटांवर आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऐतिहासिक परंपरेचा जलतरण महोत्सव : प्रतिष्ठित संस्थांच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन ‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) यांच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक स्पर्धेचे नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद माने आणि सरचिटणीस राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंनी रविवारी सकाळी ७:३० वाजता रिपोर्टिंग करणे आवश्यक असून, प्रत्यक्ष शर्यतीची सुरुवात साधारणपणे १०:३० ते ११:३० या वेळेत होणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना सकाळी ९:०० वाजता बोटीने प्रस्थान करणे अनिवार्य आहे. तीन अंतरांच्या आव्हानात्मक शर्यती विविध वयोगटांसाठी १ किमी, २ किमी आणि ५ किमी अंतरांचा थरार या सागरी स्पर्धेत जलतरणपटूंना त्यांच्या क्षमतेनुसार १ किमी, २ किमी आणि ५ किमी अशा तीन अंतरांच्या शर्यतींमध्ये सहभागी होता येणार आहे.…

जय मल्हार चषक पर्व पहिले जल्लोषात

जय मल्हार चषक पर्व पहिले जल्लोषात मुकुंद रांजणे माथेरान : विविध क्षेत्रात भरारी घेत असताना यावेळी प्रथमच क्रीडा क्षेत्रात उत्तुंग झेप घेत जय मल्हार संघाने १६ ते १८ दरम्यान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलावर भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित केले होते त्यास क्रीडा प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. या सामन्यात विक्रांत संघाला विजेतेपद प्राप्त झाले असून मुकदर क्रिकेट संघाला उप विजेतेपद मिळाले आहे. प्रथम क्रमांकासाठी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या कडून रोख रक्कम रुपये ६१००० आणि आकर्षक चषक तसेच उप विजेत्या संघाला नगरसेविका प्रतिभा घावरे यांच्याकडून ३१००० ₹ रोख आणि आकर्षक चषक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, झेल, मॅन ऑफ दि मॅच असे अनेक पारितोषिक खेळाडूंना प्रदान करण्यात आली. सलग तीन दिवस येथील क्रीडा संकुलावर प्रेक्षकांची मोठया प्रमाणावर गर्दी पहावयास मिळाली.विजेत्या विक्रांत संघाचे धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण नियोजनासाठी मंगेश गोरे, रामा आखाडे,सुरेश आखाडे, किरण आखाडे,दत्ता, रवी, तुषार,ओंकार, मनोज, रमेश,संजय तसेच जय मल्हार संघाच्या समस्त पाठीराख्यांनी हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट समालोचन मंगेश मोरे, सागर जोशी, मयुरेश कदम, अनिल नाईकडे यांनी करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

शुक्रवारपासून रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार

शुक्रवारपासून रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार पनवेल : दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्‌डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवेनोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्‌डी २०२६ स्पर्धेचा उदघाटन सोहळा शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते होणार आहे. उलवे नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील रामशेठ ठाकूर मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील यांची तर  शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे,  शिव छत्रपती पुरस्कार विजेते सुर्यकांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६ वाजता पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह ऍड. आस्वाद पाटील यांची तर अर्जुन पुरस्कार विजेते शकुंतला खटावकर, अर्जुन पुरस्कार विजेते अभिलाषा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जिल्ह्यातील १९८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघ सहभागी होणार आहेत. यातून निवड झालेल्या खेळाडूंचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने जवळपास १०० पंच कार्यरत असणार आहेत. सुसज्ज अशी चार क्रीडांगणे त्याचबरोबर मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर पूरक सुविधा या ठिकाणी आहे. या स्पर्धेचा कबड्डी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह चित्राताई पाटील,  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा संयोजन समितीचे सचिव शरद कदम यांनी केले आहे.

 ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची अभूतपूर्व ‘क्लीन स्वीप’

ठाणे जिल्हा ओपन सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची अभूतपूर्व ‘क्लीन स्वीप’ गार्गी मोहितेला दुहेरी मुकुट, प्रत्येक गटात सुवर्ण वर्चस्व! कल्याण : कल्याण येथील गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल येथे ७ व ८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या योनेक्स सनराईज ठाणे जिल्हा ओपन सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या युवा खेळाडूंनी अत्यंत दर्जेदार व आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर करत संपूर्ण स्पर्धेवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्ह्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या अनेक गुणवंत खेळाडूंमध्ये ठाणे अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक वयोगटात सुवर्ण पदके जिंकत ‘क्लीन स्वीप’ साधली. या स्पर्धेतील सर्वात उजळ ठरलेली कामगिरी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची आशादायी खेळाडू गार्गी मोहिते हिने केली. तिने ११ वर्षांखालील तसेच १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात सलग प्रभावी विजय मिळवत दोन्ही गटांची अजिंक्यपदे पटकावून ‘दुहेरी मुकुट’ आपल्या नावे केला. तिचा नेटवरचा संयम, कोर्ट कव्हरेज आणि आक्रमक खेळाने ती संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेत असलेली खेळाडू ठरली. इतर गटांमध्येही ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची झलक दाखवली. ९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत विहान अनिखेंडी याने उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदक पटकावले. ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत योहान नायर याने सुवर्ण, तर वेद चौहान याने कांस्य पदक मिळवत अकॅडमीच्या यशात भर घातली. १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अल्फी मेकाडाथ याने सुवर्ण पदक जिंकले, पीयूष सुतार याने रौप्य, तर यध्नेश वारघडे यांनी कांस्य पदक पटकावले. मुलींच्या गटात ११ वर्षांखालील एकेरीत गार्गी मोहिते हिने सुवर्ण पदक मिळवले, तर एहा दीक्षित आणि सान्वी वागळे यांनी कांस्य पदकांवर आपली मोहोर उमटवली. १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत पुन्हा एकदा गार्गी मोहिते हिने सुवर्ण, तर अद्विका मोरे हिने रौप्य पदक मिळवत ठाणे अकॅडमीची पदकतालिका अधिक समृद्ध केली. या स्पर्धेतील यशामुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये सुरू असलेल्या शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धती, वैज्ञानिक सराव, मानसिक तयारी आणि दीर्घकालीन खेळाडू घडवण्याच्या दृष्टीकोनाची फलश्रुती स्पष्टपणे दिसून आली. लहान वयातच खेळाडूंमध्ये निर्माण होत असलेली स्पर्धात्मक धार, आत्मविश्वास आणि जिंकण्याची वृत्ती ही अकॅडमीच्या भक्कम पायाभरणीची साक्ष देणारी ठरली आहे. या अभूतपूर्व कामगिरीमागे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील समर्पित व अनुभवी प्रशिक्षक संघाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धती आणि खेळाडू-केंद्रित दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला आहे. अकॅडमीमध्ये प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, श्रीकांत भागवत,  एकेंद्र दर्जी, फुलचंद पासी, सुरेंद्र दिवेकर, संजय कांबळे, नरेश गुंडले, नरेंद्र वर्मा, प्रसेनजीत शिरोडकर, देवांग दलाल आणि वेदांत जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचे तांत्रिक कौशल्य, शारीरिक तयारी आणि मानसिक ताकद घडवली जात आहे. या सर्व प्रशिक्षण प्रक्रियेचे नेतृत्व प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड करत असून, त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळेच ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील ही नवी पिढी कमी वयातच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्यास सज्ज होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.…

 अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी ठाणे : अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजांनी त्याला तेवढीच तोलामोलाची साथ दिल्यामुळे मार्श संघाने स्पार्कलेक्स मशीन संघाचा ६४ धावांनी पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. मार्श संघाच्या २३९ धावांचा पाठलाग करताना स्पार्कलेक्स मशीन संघाला १७५ धावा करता आल्या.  आपल्या ८१ धावांच्या झंझावती खेळीत सात षटकार आणि तीन चौकार मारणाऱ्या अभिषेकला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय अभिषेकने आपल्या फलंदाजीने सार्थ ठरवला. संघाच्या द्विशतकी धावसंख्येचा पाया रचताना अभिषेकने केवळ ५७ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. अक्षय माजगावकरने ३५, आशुतोष घारगेने आणि आसिफ खानने ३१ धावांचे योगदान दिले. या डावात पराभूत संघाच्या करण चव्हाण, सनी जैस्वाल, जेमिन पांचाळ आत्मिक मॅथेलिया आणि प्रथमेश आंगणेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. उत्तरादाखल मार्श संघाच्या केतन खरात आणि श्रेयस केसकरने नियंत्रित गोलंदाजी करत स्पार्कलेक्सच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला.  अर्शमित सिंग पराभूत संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अर्शमितने ६८ धावा केल्या. तर दिव्यांश अरोराने २६ आणि सनी जैस्वालने २० धावा बनवल्या. केतन आणि श्रेयसने प्रत्येकी तीन गडी बाद केले. संक्षिप्त धावफलक – मार्श : ३५ षटकात ७ बाद २३९ ( अभिषेक दिसले ८१, अक्षय माजगावकर ३५, आशुतोष घारगे ३३, आसिफ खान ३१) विजयी विरुद्ध स्पार्कलेक्स मशीन : ३१.५ षटकात सर्वबाद १७५ ( अर्शमित सिंग ६८, दिव्यांश अरोरा २६, सनी जैस्वाल २०, केतन खरात ६-२४-३, श्रेयस केसकर ५.५-२५-३).

 श्री गणेश आखाड्याच्या ४ पैलवानांचा दिमाखदार विजय

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी श्री गणेश आखाड्याच्या ४ पैलवानांचा दिमाखदार विजय १८ फेब्रुवारी रोजी भिवंडी तालुक्यातील सरवली येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी व…