प्रशांत मोरे-काजल कुमारी विजयी
रोटरी क्लब राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने आयोजित उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत ४ थ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम लढत आजी माजी विश्व विजेत्यांच्या रंगतदार लढतीने गाजली. माजी विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने यामध्ये बाजी मारली. अंतिम सामन्यात त्याने मुंबई उपनगरच्या विद्यमान विश्व् विजेत्या संदीप दिवेचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव केला. अंतिम फेरीत नाणेफेक जिंकलेल्या संदीपने पहिल्याच बोर्डात व्हाईट स्लॅम करून १२ गुणांची आघाडी घेतली. परंतु तरीही आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सहाव्या बोर्ड अखेरीस प्रशांतने १९-१७ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. मात्र सातव्या बोर्डात संदीपने पुन्हा व्हाईट स्लॅमची किमया करत २५-१९ अशा फरकाने पहिला सेट आपल्या खिशात घातला. त्याचा फॉर्म पाहता तोच या स्पर्धेतील विजेता ठरणार हि प्रेक्षकांची अपेक्षा प्रशांतने फोल ठरवत दुसरा सेटअगदी सहज २३-६ असा जिंकून सामन्यात रंगात निर्माण केली. या अंतिम फेरीच्या तिसऱ्या सेटने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दोनही खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावले. सातव्या बोर्ड संपल्यावर प्रशांतकडे १४-१३ अशी केवळ एका गुणांची आघाडी होती. परंतु ब्रेक त्याचा असल्याने प्रशांत हा सामना सहज जिंकेल असे सर्वाना वाटत होते. मात्र संदीपने अगदी शेवटच्या बोर्डापर्यंत झुंज दिली. प्रशांतच्या हाताखालील असलेली आपली शेवटची सोंगटी संदीपने डबल टचचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवी संदीपची सोंगटी थोडक्यात चुकली आणि प्रशांतने आपली शेवटची सोंगटी घेत बाजी मारली व रोख रुपये २५ हजारांचे ईनाम आपल्या खिशात घातले. अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या प्रशांत मोरेने उपान्त्य लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानचे आव्हान १८-१४, १६-११ असे परतवून लावले. तर संदीपने मुंबईच्या पंकज पवारला २५-१२, २२-८ असे सहज पराभूत केले होते. याउलट महिला एकेरीचा अंतिम सामना अगदी एकतर्फी झाला. मुंबईच्या काजल कुमारीने या लढतीत उदयोन्मुख समृद्धी घाडीगावकरचा २५-०, २५-१० असा सहजच पराभव करून रोख रुपये २५ हजारांचे बक्षिस मिळविले. उपांत्य लढतीत काजलने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला तीन सेटमध्ये २५-१२, १५-१८, २४-१० असे हरविले होते. तर समृद्धीने पालघरच्या श्रुती सोनावणेचा कडव्या लढतीनंतर २२-८, ९-२३, २१-८ असा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या लढतीत महम्मद घुफ्रानने पंकज पवारला २१-११, २५-१५ असे हरवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. तर महिला एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत श्रुती सोनावणेने प्राजक्ता नारायणकरवर झुंजीच्या लढतीत २५-१७, १५-२५, २५-११ असा विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे ईनाम पटकाविले. विजेत्या खेळाडूंना रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भार्गव, रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरच्या अध्यक्षा डॉ. मोनिका टंडन, चेअरमन स्पोर्ट्स विवेक पै, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांच्या शुभ हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब तर्फे प्रसाद देवरुखकर यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी खूप मेहनत घेतली.