आरुष कोल्हेची नाबाद शतकी खेळी
ड्रीम इलेव्हन कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा वेंगसरकर संघ गावस्कर संघाने शास्त्री संघाला २०९ धावांवर रोखले मुंबई, ३० मे : आरुष कोल्हेच्या (खेळत आहे १८३) दमदार नाबाद शतकी खेळीमुळे वेंगसरकर संघाने ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या शेवटच्या साखळी लढतीत पहिल्या दिवशी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्या दोन्ही लढतीत शतकाने हुलकावणी दिलयानंतर आज मात्र त्याने सारी कसर भरून काढण्याच्या जिद्दीने फलंदाजी केली आणि समोरून अन्य फलंदाजांची पाहिजे तेवढी साथ मिळत नसतानाही आपल्या धावांचा ओघ कायम राखला. त्याच्या नाबाद १८३ धावांमुळे वेंगसरकर संघाने पहिल्या दिवसाखेर ८६ षटकांत ७ बाद ३१९ धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या रोशन फारुकी (२२), अरहाम जैन (१८), लक्ष्मणप्रसाद विश्वकर्मा (२३) आणि दर्शन राठोड (खेळत आहे २२) यांची त्याला सुरेख साथ लाभली. तेंडुलकर संघाच्या अनुज सिंग (३५/२), मोक्ष निकम (५०/२) आणि आर्यन कुमार (४८/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. कर्नाटक स्पोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत सुनील गावस्कर संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या रवी शास्त्री संघाला ४६.४ षटकांत २०९ धावांवर रोखले. प्रवीर सिंग याने ६२ धावांत ४ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखविला तर शौर्य राणे (४४ धावांत ३ बळी) आणि शेन रझा (३४ धावांत २ बळी) यांनी देखील अचूक गोलंदाजी केली. रवी शास्त्री संघासाठी यश सिंग या सलामीवीराने (५३)केवळ ३५ चेंडूत अर्ध शतकी खेळी करताना ११ चौकार ठोकले. शाहिद खान याने ६८ तर कबीर जगताप याने नाबाद ७४ धावांची खेळी करून संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना गावस्कर संघाने ३२ षटकांत २ बाद १०३ धावा केल्या आहेत, त्यात देवाशिष घोडके याचा ४२ धावांचा वाटा होता. संक्षिप्त धावफलक : कर्नाटक स्पोर्टींग – रवी शास्त्री संघ – ४६.४ षटकांत सर्वबाद २०९ (यश सिंग ५३, शाहिद खान ६८, कबीर जगताप नाबाद ७४; शेन रझा ३४/२, शौर्य राणे ४४ धावांत ३ बळी, प्रवीर सिंग ६२ धावांत ४ बळी) वि. गावस्कर संघ – ३२ षटकांत २ बाद १०३ (वेदांग मिश्रा २४, देवाशिष घोडके ४२, अगस्त्य काशीकर खेळत आहे २५) ओव्हल मैदान – वेंगसरकर संघ – ८६ षटकांत ७ बाद ३१९ (रोशन फारुकी २२, अरहाम जैन १८, आरुष कोल्हे खेळत आहे १८३ , उज्ज्वल सिंग १५, दर्शन राठोड खेळत आहे 22; अनुज सिंग ३५ धावांत २ बळी , मोक्ष निकम ५० धावांत २ बळी, आर्यन कुमार ४८ धावांत २ बळी) वि. तेंडुलकर संघ. फोटो ओळी – पहिल्या दिवसाअखेर नाबाद १८३ धावांची खेळी करणारा वेंगसरकर संघाचा फलंदाज आरुष कोल्हे.
पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा शनिवारी
मुंबई : येत्या १ व २ जून रोजी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर जूनिअर, मास्टर्स I,II,III,IV (इक्यूप्ड) पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परळ व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ज्युनिअर गटामध्ये राष्ट्रीय विजेते हर्षदा गोळे, अमृता भगत, सेजल मकवाना, तपस्या मते, सानिका मालसुरे, तर महिला मास्टर्समध्ये डॉ. शर्वरी इनामदार, नीता मेहता, मयानी कांबळे या पुण्याच्या राष्ट्रीय विजेत्या खेळाडू आणि पुरुष मास्टर्समध्ये महेश पाटील, प्रशांत जगताप, जितेंद्र यादव, रवींद्र साळवे, आदिनाथ शेकडे हे राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू सहभागी होणार आहेत. या राज्य स्पर्धेतून १६ ते २१ जून २०२४ पतियाळा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका या इमेलवर maharashtrapowerlifting 2020@gmail.com पाठवाव्यात. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुर्यकांत गर्दे, ९८६९७३६७११, प्रशांत सरदेसाई ९८२०३७०४९७, श्री जितेंद्र यादव ९८१९५९३५९० यांच्याशी संपर्क साधावा.
९० फुटी रस्त्यावरील विजेचा लपंडाव कायम
सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकाराने ठाकुर्ली रहिवासी हैराण कल्याण : ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील गृहसंंकुलांमध्ये मागील तीन महिन्यांंपासून महावितरणच्या विजेचा लपंडाव सुरू आहे. आतातर उन्हाची काहिली, घामाच्या धारांनी नागरिक हैराण आहेत. अशा परिस्थितीत ९० फुटी रस्ता भागात पाच ते सहा तास वीज पुरवठा बंद राहत असल्याने रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. ९० फुटी रस्ता परिसरात मध्यमवर्गियांची सर्वाधिक वस्ती आहे. या भागातील अनेक नोकरदार घरातून कार्यालयीन काम करतात. काही जण विदेशातील आपल्या कार्यालयातील कामकाज घरबसल्या करतात. या सर्वांंना या खंडित वीज पुरवठ्याचा सर्वाधिक त्रास होतो. ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील विजेचा लपंडाव कायम, सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकाराने रहिवासी हैराण अनेक घरांंमध्ये बिछान्याला खिळून असलेले वृध्द, ज्येष्ठ नागरिक, लहान बाळे आहेत. वीज गेली की या मंडळींना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते. ९० फुटी रस्ता भागातील सततच्या वीज लपंडावाची समस्या कायमची मिटविण्यासाठी या भागासाठी स्वतंंत्र वीज पुरवठा यंत्रणा बसवावी, अशी मागणी खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता भागातील रहिवाशांकडून केली जात आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता गेलेली वीज दुपारी चार वाजले तरी आली नव्हती. तोपर्यंत रहिवासी घरात बटाट्यासारखे उकडून निघाले होते. अनेक नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन या सततच्या वीज लपंडावाबद्दल जाब विचारून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून सुरू आहेत. त्यांनाही या खेळखंडोब्याचा फटका बसत आहे. महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, एमएमआरडीएकडून ठाकुर्ली भागात रस्ते काम सुरू आहे. त्यांनी काम करताना जेसीबीच्या साहाय्याने महावितरणची महत्वाची वीज पुरवठा करणारी भूमिगत वाहिनी खराब केली. त्यामुळे अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. ही माहिती एमएमआरडीएच्या अधिकारी, ठेकेदारांनी तात्काळ महावितरणला देणे आवश्यक होेते. पण, एमएमआऱडीए अधिकाऱ्यांनी ही माहिती महावितरणला न देता याविषयी गुपचिळी धरून राहणे पसंंत केले. खंंबाळपाडा भागातील वीज पुरवठा खंंडित झाल्याच्या तक्रारी महावितरण कार्यालयात आल्या. त्यावेळी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेऊनही खंडित वीज पुरवठ्याचा तपास लागत नव्हता. अखेर रस्ते खोदकाम करताना झालेल्या बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे महावितरण अधिकाऱ्यांना समजले. एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महावितरणला मनस्ताप आणि नुकसानीला सामोरे जावे लागले. म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला दंड ठोठावण्याच्या हालचाली केल्या. जोपर्यंत एमएमआरडीए दंड भरत नाही, तोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न करण्याची भूमिका महावितरण अधिकाऱ्यांनी घेतली. या कलगीतुऱ्यात नागरिकांची घुसमट झाली. अखेर सामोपचाराने हा विषय मिटवून खंबाळापाडा भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. खंबाळापाडा भागातील एका सोसायटीत तांत्रिक बिघाड झाला होता. तो बिघाड काढताना एमएमआरडीएकडून रस्ते काम करताना जेबीसीकडून महावितरणची वीज वाहिनी खराब झाल्याचे निदर्शनास आले. तो बिघाड दुरुस्त करून या भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. – चंदन मोरे, साहाय्यक अभियंता, महावितरण.
डोंबिवलीतील घरडा सर्कल रस्ता मतमोजणीसाठी ४ जून रोजी बंद
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी घरडा सर्कल जवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात ४ जून रोजी होणार आहे. या कालावधीत क्रीडासंकुला बाहेरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक येण्याची शक्यता विचारात घेऊन सावळाराम महाराज क्रीडासंकुला समोरील घरडा सर्कल लगतचे सर्व रस्ते ४ जून रोजी पहाटे पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत नागरिकांनी घरडा सर्कल जवळील पर्यायी रस्ते मार्गावरून वाहतूक करण्याची सूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, प्राणवायू सिलिंडर, अग्निशमन यंत्रणा, पोलीस वाहने, हरित मार्गिका यांच्यासाठी मात्र घरडा सर्कल रस्ता खुला राहील. कल्याण-शिळफाटा, कल्याण, बदलापूर परिसरातून येणारी वाहने घरडा सर्कलमार्गे डोंबिवली शहरात प्रवेश करतात. या वाहनांच्या धावेमुळे या भागात वाहन कोंडी होण्याची शक्यता विचारातून घेऊन मतमोजणीच्या दिवशी घरडा सर्कल रस्ता वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. बंद रस्ते व पर्यायी मार्ग डोंबिवली शहरातून टिळक चौक, शेलार नाका मार्गे घरडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम रुग्णालय येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने शिवम रुग्णालय येथे उजवे वळण घेऊन डोंबिवली जीमखाना, सागर्ली मार्गे इच्छित स्थळी जातील. सुयोग हाॅटेैल, रिजन्सी अनंतम, पेंढरकर महाविद्यालय मार्गे घरडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर. आर. रुग्णालय येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने आर. आर. रुग्णालय येथे डावे वळण घेऊन मिलापनगर, कावेरी चौक येथून इच्छित स्थळी जातील. खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली रस्ता, पंचायत बावडीकडून येणाऱ्या, विको नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदिश पॅलेस हाॅटेलजवळ वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, टाटा नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. आजदेगाव, आजदेपाडा कमान येथून घरडा सर्कलकडे येणाऱ्या, बंदिश पॅलेसकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना घरडा सर्कल येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने घरडा सर्कल येथे येऊन शिवम रुग्णालयाकडे जाऊन तेथून ती डोंबिवली जीमखाना मार्गे इच्छित स्थळी जातील. विको नाकाकडून बंदिश पॅलेसकडे हाॅटेलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हाॅटेल मनीष गार्डन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मनीष गार्डनजवळ उजवे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.
अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई
बेकायदा पब, हुक्का पार्लर, डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष ठाणे : पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर जाग आलेल्या ठाणे उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात बेकायदा सुरू असलेल्या ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित केले असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांनी बेकायदा पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तसेच अशा अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या स्थानिक पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिला आहे. ठाण्यातील बेकायदा हाॅटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी यापुर्वीच ठाणे पोलिसांकडे केली होती. परंतु त्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याबद्दल केळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर ठाण्यातील बेकायदा हाॅटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार केळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन अशा व्यवसायांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरुद्ध महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून यासंदर्भात लोक चळवळही सुरू केली. यावर अधिवेशनातही आवाज उठवला. यानंतर ठाण्यातील या अवैध व्यवसायांवर कारवाई झाली. पण, त्यांनतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याची बाब आमदार केळकर यांनी आयुक्त डुंबरे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या अशा व्यवसायांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अवैध व्यवसायांवर नियमित आणि ठोस कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त डुंबरे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर अशा अवैध व्यवसायांना त्या-त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहणार असल्याचे सांगून त्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डुंबरे यांनी यावेळी दिल्याचे केळकर यांनी सांगितले. या संदर्भात ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी या अवैध व्यवसायांविरुद्ध लोकचळवळ सुरू केली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मागील काळात काही पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने काम केले, परंतु काही ठिकाणी दुर्लक्ष झाले. त्यामुळे यावर ठोस कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तांना भेटून अनेक मागण्या केल्या. त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी तातडीने करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. संजय केळकर (आमदार, ठाणे शहर)
रस्त्यावरील बालकांप्रती संवेदनशील व्हावे…!
कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत- प्रियंक कांगजू ठाणे : स्त्यावरील बालकांच्या समस्येबाबत समाजाने संवेदनशील होणे आवश्यक असून त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न समाजातील सर्व घटकांकडून होणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली चे अध्यक्ष श्री. प्रियंक कांगजू यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात श्री.कांगजू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बाल हक्क संरक्षण विषयाबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, एनसीपीसीआर, नवी दिल्ली च्या मेजर श्रीमती रुपाली बॅनर्जी, ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जे.जे.बी. मेंबर, ठाणे स्वाती रणदिवे, कामगार उपायुक्त ठाणे लक्ष्मण सावंत, महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती चारुशिला खरपडे, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, ठाणे मनपा चे दशरथ वाघमारे, सहयोग ट्रस्ट अध्यक्ष विश्वकांत लोकरे, फिरते पथक अल्ताफ काजमी, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या तेजश्री शिंदे, महिला व बाल कल्याण विकास प्रतिनिधी जि.प.ज्योती प्रकाश महाडीक आदि मान्यवर उपस्थित आहेत. या बैठकीत प्रामुख्याने रस्त्यावरील मुले व त्यांचे कुटुंब यांच्या समस्यांविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष श्री. प्रियंक कांगजू यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, वर्ष 2016 पासून या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली, राज्य शासन आणि विविध सामाजिक संस्था यांच्या एकत्रित समन्वयातून मार्गदर्शक कार्यपद्धती आखण्यात आली आहे. फक्त एका मुलाचे पुनर्वसन हा या समस्येवरील परिणामकारक उपाय नसून त्या मुलासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे शाश्वत पुनर्वसन गरजेचे आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रस्त्यावरील मुले व त्यांचे कुटुंब यांची आर्थिक क्षमता वाढविणे आवश्यक असून या मुलांना शाळेत भरती करणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व समस्यांवर “सहकारी तत्त्वावरील निवारागृहे” हा एक परिणामकारक उपाय होवू शकतो, असेही त्यांनी सुचविले. याबाबत भोपाळ येथील प्रकल्पाचे त्यांनी उदाहरण दिले. ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही सामाजिक संस्थांसह या प्रकल्पास भेट देवून तेथील कार्यपद्धतीचा अभ्यास करावा आणि ठाणे जिल्ह्यातही अशा प्रकारचा प्रकल्प उभारावा, असेही श्री. कांगजू यांनी सुचविले. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.महेंद्र गायकवाड यांनी महिला व बाल विकास विभागाने बाल हक्क संरक्षण संदर्भात केलेल्या कामकाजाची माहिती अध्यक्ष महोदयांना दिली. त्याबद्दल श्री.कांगजू व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व महिला बालविकास विभागाने केलेल्या कामांचे विशेष कौतुकही केले. शेवटी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
शेतकऱ्यांनी कापूस बियाण्यांच्या ठराविक वाणांचा आग्रह धरु नये-कृषी संचालक विकास पाटील
ठाणे : महाराष्ट्र कापूस बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु शेतकऱ्यांनी कापसाच्या विशिष्ट वाणांसाठी आग्रह धरु नये, असे आवाहन कृषी संचालक (निविष्ठ व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्यात कापूस पीक क्षेत्र 40.20 लाख हेक्टर आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति हेक्टर 4.2 पाकिटे बियाण्याची आवश्यकता असते. या क्षेत्रासाठी 1 कोटी 70 लाख पाकिटाची आवश्यकता आहे. सर्व कंपन्यांचा आढावा घेतला असता, साधारपणे 1.75 कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कापूस बियाण्याची कमतरता नाही. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या काही वाणांना विशेष मागणी आहे. परंतु त्याबरोबर इतर कंपन्यांचे कापसाचे वाण सुद्धा अतिशय चांगले उत्पादन देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या ठराविक वाणांचीच मागणी करू नये, याबाबत कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. केंद्र सरकारने खरीप 2024 साठी कापूस BG II चा दर 864 रुपये निश्चित केला आहे. कापूस बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र तसेच कापूस उत्पादक कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) यांच्यामार्फत आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच काही ठिकाणी कापूस जादा दराने विक्री केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कृषी विभागातील स्थानिक कृषी सहाय्यक यांच्या मदतीने संबंधित कापूस बियाण्याचे वाटप कृषी विभागाच्या कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण एच.टी. बीटी कापूस बियाणेबाबत चंद्रपूर जिल्ह्यात चार ठिकाणी कारवाई करण्यात आल्या. त्यामध्ये 4568.30 किलो (एकूण किमत 66.85 लाख) बियाणे साठा जप्त करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात 30 क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले. तसेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात तीन ठिकाणच्या कारवाईत 1807 एच.टी.बीटी कापूस बियाणे पाकिटे (37.96 लाख किमतीचे) साठा जप्त करण्यात आला. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात तीन ठिकाणी 113 बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली असून त्याची किमत 1.55 लाख रुपये आहे. सर्व जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर भरारी पथकामार्फत मोहिम स्वरुपात तपासणी करण्यात आली असून त्याअनुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठ व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी कळविली आहे.
उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी- अशोक शिनगारे
ठाणे : उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनसाठी दि.31 मे, 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारची “व्हीआयपी दर्शन”सुविधा देण्यात येणार नसल्याचे एका पत्राद्वारे सर्व राज्यांना कळविले असून पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वासाठी नोंदणी अनिवार्य आहे. तरी सर्व भक्तांनी चारधाम यात्रा 2024 च्या नोंदणीसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी केलेल्या यात्रेकरुंनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल. तसेच वरिष्ठ नागरिकांनी चारधाम यात्रेपूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उत्तराखंड शासनाने केले आहे. उत्तराखंड शासनाने केलेल्या आवाहनानुसार ठाणे जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
विविध प्राधिकरणांनी पावसाळा कालावधीत समन्वयाने काम करा – आयुक्त डॉ. कैलास शिंदे
अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणे कार्यरत असून या सर्वांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीत काम करावे व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे सूचित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेसह इतर सर्व प्राधिकरणांनी पावसाळ्यात सतर्क रहावे असे निर्देशित केले. शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी समितीच्या विशेष बैठकीत सर्व प्राधिकरणांच्या उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी केलेल्या पावसाळा पूर्वतयारीचा आढावा घेतला तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगाही काढला. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत तायडे तसेच विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता हे प्रत्यक्ष विशेष समिती सभागृहात तसेच सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नवी मुंबई पोलीस व वाहतुक पोलीस, एपीएमसी, रेल्वे, महावितरण, एमटीएनएल, मोबाईल प्रोव्हायडर, एपीएमसी, आरएएफ, नागरी संरक्षण दल, महानगर गॅस लिमी., टीबीआयए, मच्छीमार संघटना आदी विविध प्राधिकरणांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र समुद्रसपाटीपासून खाली वसलेले असल्याने अतिवृष्टी आणि मोठ्या उधाण भरतीची वेळ जुळून आल्यास काही सखल भागात पाणी साचते. अशा साधारणत: १४ ठिकाणांची माहिती असून त्याठिकाणी पाणी उपसा पंपांची आवश्यक त्या प्रमाणात आत्ताच तजवीज करून ठेवण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. यावर्षी साधारणत: १० जून पासून पावसाला सुरूवात होईल असा हवामान खात्याचा अंदाज असून अंतिम टप्प्यात असलेली नालेसफाईची कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत असे निर्देश देण्यात आले. विशेषत्वाने एमीएमसी मार्केटमधील नाले व गटारे सफाईची कामे तत्परतेने पूर्ण करून घ्यावीत अशा सूचना करण्यात आल्या. पावसाळा कालावधीत भाजीपाला, फळे यांच्या कच-याची योग्य रितीने विल्हेवाट लागेल याची विशेष काळजी घ्यावी व पदपथावर विक्रीस परवानगी देऊ नये असे निर्देशित करण्यात आले. रेल्वे प्लॅटफॉर्म, रूळ तसेच रूळांच्या बाजूला असलेले नाले यांची सफाई लगेचच पूर्ण करावी त्याचप्रमाणे रेल्वेचे अंडरपास व सबवेही स्वच्छ करून घ्यावेत तसेच रेल्वेची उद्घोषणा प्रणाली तपासून घ्यावी अशा सूचना सिडको आणि रेल्वे प्रशासनास करण्यात आल्या. रेल्वे हद्दीत लागलेल्या होर्डींगचे संरचनात्मक लेखापरीक्षण तातडीने करून घ्यावे असे सूचित करतानाच होर्डींगला स्थानिक नियोजन प्राधिकरणाची परवानगी घ्यायला हवी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.एमआयडीसी क्षेत्रातील नालेसफाईवर संबंधित विभाग अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लक्ष द्यावे व ती पूर्ण करून घ्यावी असे निर्देशित करण्यासोबतच आयुक्तांनी एमआयडीसी क्षेत्रात रस्त्याच्या कडेला पडलेले डेब्रीज ड्रेनेजमध्ये येऊन पाणी तुंबण्याची घटना घडणार नाही याकडे प्राधिकरणाने लक्ष द्यावे असे सूचित केले. नवी मुंबईतील डेब्रीज पडण्याच्या संभाव्य स्थळांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करावे अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी पोलीस विभाग तसेच वाहतुक पोलीस विभाग यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने वाहतुक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेणेबाबत आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास सूचना केल्या. कालच दिघा व ऐरोली विभागातील नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिलेल्या सूचनांची सर्वच विभाग अधिकारी यांनी अंमलबजावणी करावी व तातडीने नालेसफाई पूर्ण करून घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी देत प्रत्येक ठिकाणी विभाग अधिकारी यांनी स्वत: भेट देत प्रत्यक्ष पाहणी करावी व काम झाल्याची खातरजमा करून घ्यावी असे निर्देश दिले. या सर्व कामांवर त्रयस्थ परीक्षण असावे यादृष्टीने आठही विभागांसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमलेल्या विभागप्रमुख दर्जाच्या अधिका-यांसोबत ३ अधिकारी, कर्मचारी देऊन या पथकाने नेमून दिलेल्या विभागातील नाले व गटार सफाई, स्वच्छता, रस्त्यांची स्थिती अशा बाबींची काटेकोर तपासणी करून कामे व्यवस्थित झाल्याची खात्री करून घ्यावी आणि तशा प्रकारचा अहवाल द्यावा असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणे असून त्यांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीत काम करावे व महानगरपालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्राशी संपर्कात राहून काम करावे अशा सूचना नमुंमपा आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.कैलास शिंदे यांनी देत नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी २७५६७०६० / २७५६७०६१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
