Category: होम

लाल बावट्याच्या राजुर लॉंग मार्चची यशस्वी सांगता, कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसह आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत निर्णय

Unit-4 अनिल ठाणेकर अकोले, किसान सभा व सीटू कामगार संघटना यांच्या वतीने दिनांक २४ फेब्रुवारी रोजी अकोले तालुक्यातील राजुर येथून निघालेल्या मोर्चाची संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर येथे २७ फेब्रुवारी रोजी दुपारी यशस्वी सांगता झाली.अर्धवेळ परिचरांना २ हजार रुपये व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये वेतनवाढ, भंडारदरा धरणाचे पाणी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व सिंचनासाठी शासकीय योजनेतून उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश, वन जमिनी व घरांच्या तळ जमिनी श्रमिकांच्या नावे करण्यासाठी झालेल्या राज्यस्तरीय निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी, बांधकाम कामगारांना शस्त्रक्रिये बरोबरच इतर सर्व आजारांसाठी कुटुंब मेडिक्लेम योजना मान्य करण्यात आल्याने लॉंग मार्चची यशस्वी सांगता करण्यात आली. माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्य मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले, अशोक थोरात, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, पदाधिकारी जितेंद्र चोपडे, उद्धव पौळ, रामेश्वर पौळ, दीपक लिपणे, धर्मा शिंदे, नवनाथ मोरे, तबरेज शेख यांनी सहभागी होत सहकार्य केले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नंदू डहाणे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, गणेश ताजणे, संगीता साळवे, हेमलता शेळके, तुळशीराम कातोरे, सुमन विरनक, राजाराम गंभीरे, ताराचंद विघे, मथुरा बर्डे, आदींनी मेहनत घेतली.तीन दिवस ५८ किलोमीटरचा पायी प्रवास करून हा  लॉंग मार्च नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावाच्या वेशीवर धडकला होता. लॉन्ग मार्चमध्ये आदिवासी शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लॉन्ग मार्चच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न सोडवण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालयामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, आदिवासी विकास मंत्री अशोक  उईके, व विविध खात्याचे अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत काही प्रश्न अनिर्णित राहिले होते. वेतन वाढीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय मांडण्याची आवश्यकता होती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मान्यतेची आवश्यकता होती. त्यामुळे बैठकीनंतरही लॉंग मार्च सुरूच ठेवण्यात आला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या दिवशी भेट घेऊन या बाबतचा विषय उपस्थित केला. तसेच त्याच दिवशी सायंकाळी २६ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हे विषय ठेवण्यात आले. यानुसार आर्थिक तरतूद करत अर्धवेळ  परिचरांना दोन हजार रुपये व प्रस्तावातील अपूर्णता पूर्ण करून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये वेतन वाढ जाहीर करण्यात आली. शासनाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी संघटनेला दिली.  राधाकृष्ण विखे पाटील व दादासाहेब भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित मोर्चेकरांशी संवाद साधला व शासनाने घेतलेल्या सर्व 18 निर्णयांची माहिती संघटनेला दिली. वृद्ध, अपंग, निराधार यांची मानधन वाढ, आशा, अंगणवाडी, अर्धवेळ परिचर, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, आदिवासी शेतकरी या सर्वांचे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. मान्य मागण्यांच्या  अंमलबजावणीबाबत वारंवार खात्री करून घेत अखेर लोणी गावाच्या सीमेवर असलेल्या निझरणेश्वर मंदिर परिसरात लॉन्ग मार्च स्थगित करण्याची घोषणा केली.

इराणवरील हल्ल्यांचा निषेध करा – माकप

अनिल ठाणेकर अमेरिका आणि इस्राइल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करा, हे हल्ले इराणचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, संयुक्त राष्ट्राची सनद तसेच सर्व आंतरराष्ट्रीय करार यांना निर्लज्जपणे धाब्यावर बसवून करण्यात आले आहेत, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणबरोबर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णतः डावलून हे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमधून तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांतून स्पष्ट होते की त्यांचा या चर्चांवर कधीच विश्वास नव्हता. अमेरिका ही एका आक्रमक दबंग शक्तीप्रमाणे वागत असून, सार्वभौम देशांवर मनमानीपणे हल्ले करत आहे. इराणवरील हा हल्ला अलीकडेच व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आणि क्यूबाला दिलेल्या धमक्यांनंतर झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा संपवल्यानंतर तात्काळ इराणवरील हा हल्ला करण्यात आला आहे. भारत सरकारने आपला मैत्रीपूर्ण देश असलेल्या इराणवरील या हल्ल्यांचा ठामपणे निषेध करून तात्काळ युद्धखोर कारवाई थांबवण्याची मागणी केली पाहिजे, असे आवाहन माकपने केले आहे.

ओमान क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी सुलक्षण कुलकर्णी यांची नियुक्ती मस्कॅट : आधुनिक ओमान क्रिकेटची व्याख्या करणाऱ्या युगाने एका नवीन अध्यायाला मार्ग दाखवला आहे. दुलीप मेंडिसच्या नेतृत्वाखाली जवळजवळ १४ वर्षांच्या परिवर्तनानंतर, ओमान क्रिकेट संघटनेने राष्ट्रीय संघाची सूत्रे सुलक्षण कुलकर्णी…

 उदय गायकवाड व अविनाश गोडे यांची राष्ट्रीय मास्टर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप निवड स्पर्धा २०२५-२६ मध्ये ठाण्याच्या उदय गायकवाड आणि अविनाश गोडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड मिळवली आहे.…

संजीवन तज्ञांची मुंबईत परिषद  

रमेश औताडे मुंबई : प्रत्येक हृदय शस्त्रक्रियेमागे एक डॉक्टर टीम असते आणि त्या टीमच्या केंद्रस्थानी परफ्यूजनिस्ट (संजीवनी तज्ञ) असतो, जो पेशंटचे  हृदय  चालू आहे की नाही याची खात्री करत असतो. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर टीम निघून जाते. मात्र परफ्यूजनिस्ट (संजीवनी तज्ञ) पेशंट शुद्धीवर येईपर्यंत असतो. त्यांची सध्या देशात संख्या फार कमी आहे. ती कशी वाढेल यासाठी इंडियन सोसायटी ऑफ एक्स्ट्राकॉर्पोरियल टेक्नॉलॉजीची २६ वी वार्षिक परिषद मुंबईत सुरू झाली आहे. इंडियन सोसायटी ऑफ एक्स्ट्राकॉर्पोरियल टेक्नॉलॉजी ची २६ वी वार्षिक राष्ट्रीय परिषद आघाडीच्या कार्डियाक केअर तज्ञ, परफ्यूजनिस्ट, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरू झाली. परिषदेचे नेतृत्व आय एस इ सी टी चे अध्यक्ष राजेंद्र कोकणे  लोकनाथ तिवारी, जगन्नाथ काळुगडे, विकास माळी, रवींद्र सावर्डेकर, शशिकांत मेमाणे, योगेश लुडबे, रफिक शेख, आयसेक्टॉनचे सचिव रवींद्र सावर्डेकर यांच्यासह वरिष्ठ कार्यकारी सदस्य करत आहेत.

शिमग्यासाठी कळव्यातून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने सोडल्या मोफत बस

अनिल ठाणेकर ठाणे- कावेरी सेतु ,कळवा येथे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून सालाबाद प्रमाणे या ही वर्षी शिमगोत्सवासाठी कोकणातील नागरिकांना मोफत बस सेवा पुरविण्यात आली. शनिवारी रात्री जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या बसगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला. शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या असते. मात्र, एसटी आणि रेल्वेचे आरक्षण अनेकांना मिळत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डॉ.जितेंद्र आव्हाड हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांसाठी मोफत बससेवा पुरवित असतात. त्याच अनुषंगाने शनिवारी रात्री कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयापासून बसगाड्या सोडण्यात आल्या. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह नगरसेवक अभिजीत पवार, युवती कार्याध्यक्ष पुजा शिंदे, दिपा गावंड, सपना पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मनोज प्रधान यांनी सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

 भरत कोळी व नीलांश चिपळूणकर उपांत्य फेरीत

पीएम बाथ कॅरम स्पर्धा मुंबई: जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पी. एम हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लब, चर्नी रोड येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या…

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन कल्याण :  कल्याण पश्चिम येथील गौरीपाडा परिसरातील भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोगांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक प्रभाकर जाधव आणि मुख्याध्यापिका सोनाली धाकराव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विज्ञान प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले. या प्रदर्शनात एकूण ४८ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण, अंतराळ विज्ञान, रोबोटिक्स तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयांवर प्रात्यक्षिके सादर करून आपली गुणवत्ता दाखवून दिली. कार्यक्रमास इतर विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग पाहून त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रसंगी मुख्याध्यापिका सोनाली धाकराव यांच्यासह शिक्षिका वैशाली दळवी, जयंश्री वानी, अर्चना अर्कल, प्रीती गौड, पल्लवी जायसवाल, कविता घेवादे तसेच शिक्षक राजेश परमार, संगीता सिंह आणि प्रणाली काळे उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड आणि जिज्ञासा अधिक वाढली आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वासही बळकट होतो, असे मत व्यक्त करण्यात आले.

भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा –  प्रताप सरनाईक

भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा –  प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर- ‘राज्याच्या सुरक्षेची धुरा भविष्यात ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, त्या तरुण उमेदवारांना आज मिरा-भाईंदरमध्ये उघड्यावर रात्र काढावी लागणे, ही प्रशासनासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे,’ अशा कठोर शब्दांत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या हजारो युवक-युवतींच्या निवासाची आणि मूलभूत सुविधांची तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यात नियोजनाचा अभाव असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे. सोबतच मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सभागृहे, एमएमआरडीए (MMRDA) आणि बीएसयूपी (BSUP) अंतर्गत असलेल्या रिक्त सदनिका पोलीस भारती देण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी तात्काळ खुल्या कराव्यात, अशी सूचना देखील आयुक्तांना करण्यात आली आहे. प्रशासकीय दिरंगाई होत असतानाच, उमेदवारांच्या भोजनाची संपूर्ण जबाबदारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः आणि त्यांच्या शिवसेना संघटनेच्या वतीने स्वीकारली असल्याचे हि या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.यासंपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात कि, ‘दोन-दोन दिवस उन्हातानात तग धरून हे तरुण आपल्या भविष्याची परीक्षा देत आहेत. जे उद्या कायदा व सुव्यवस्था राखणार आहेत, त्यांनाच आज सुरक्षित आसरा न मिळणे हे वेदनादायी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा ही अनास्था खपवून घेतली जाणार नाही. तसेच भविष्यातील भरती प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी ‘समन्वय आराखडा’ तयार करावा” प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक पावले न उचलल्यास, उमेदवारांच्या हक्कासाठी अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

केडीएमसी-धर्माधिकारी प्रतिष्ठानची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी

केडीएमसी-धर्माधिकारी प्रतिष्ठानची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने  संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन आज करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेत महापौर हर्षाली चौधरी ,आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील  इतर पालिका सदस्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली तर डोंबिवली पूर्वेत महापालिका कार्यालयानजीकच्या परिसरात उपमहापौर राहुल दामले व इतर पालिका सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सह १०० पोलिसांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिकेच्या प्रभागांतही मनपा स्वच्छता अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य तसेच पालिका सदस्य यांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. आमदार राजेश मोरे व सुलभा गायकवाड यांनी देखील इतर पालिका सदस्यांसमवेत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यावरील कचरा, धुळ ,माती साफ सफाई करून घंटागाडी,डंपर मार्फत संकलित करण्यात आली. सुमारे १७५८० किलो ओला कचरा आणि ४६९९६ सुका कचरा यावेळी संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेकरिता महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जवळपास ४००० सदस्य व महापालिकेचे जवळपास १००० कर्मचारी तसेच पालिका सदस्य सहभागी झाले होते.