Category: होम

विहंगच्या विजयात संदीपची चमक

विहंगच्या विजयात संदीपची चमक ठाणे : डावखुरा मध्यमगती गोलंदाज संदीप यादवच्या प्रभावी माऱ्यामुळे विहंग इंटरप्राइजेस संघाने टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट संघावर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत सुवर्ण महोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या क गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सुनीलने सात धावांत चार बळी मिळवून प्रतिस्पर्ध्यांना ६६ धावांवर रोखले. त्यानंतर विजयी संघाने ३ बाद ६८ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट संघाच्या एकाही फलंदाजाला संदीपसह शुभम शेवाळे आणि लोहित सुराणाने खेळपट्टीवर टिकू दिले नाही. वेदांत सिंगने सर्वाधिक १५ धावा बनवल्या. तर आनंदराव भोईटेने ११ धावा केल्या. शुभम आणि लोहितने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. त्यानंतर जितेंद्र देशमुखने नाबाद २७ आणि सुधीर यादवने नाबाद १४ धावांची भर टाकली. प्रथमेश कदम आणि फरहान खानने प्रत्येकी १३ धावांची खेळी केली. या डावातील तिन्ही बळी विश्वदीप जाधवने मिळवले. संदीप यादवला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. संक्षिप्त धावफलक : टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट: १९.४ षटकात सर्वबाद ६६ (वेदांत सिंग १५, आनंदराव भोईटे ११, संदीप यादव ५-२-७-४, शुभम शेवाळे ४-११-२, लोहित शर्मा २.४-४-२) पराभूत विरुद्ध विहंग इंटरप्राइजेस : १३.२ षटकात ३ बाद ६८ (जितेंद्र देशमुख नाबाद २७, सुधीर यादव नाबाद १४, प्रथमेश कदम १३, फरहान खान १३, विश्वदीप जाधव ७-१-२९-३).

पी. एम. बाथतर्फे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन

पी. एम. बाथतर्फे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई :  पीएमबाथ अँड बोट क्लब ट्रस्टच्यावतीने आणि मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चर्नी रोड २८ फेब्रुवारी व १ मार्चला मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबई जिल्ह्याला संलग्न असलेल्या क्लब मार्फत खेळाडूंनी आपली नावे शुक्रवार २० फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, दादर येथे नोंदवावीत.

भाषा गौरव दिनानिमित्त ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’

भाषा गौरव दिनानिमित्त ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’ ‘सुंदरा’ फेम मीना नेरुरकर यांचा कलाश्रमच्या उपक्रमात सहभाग अभिनेते राजा परांजपे यांना अभियान सन्मान पुष्पात नृत्यांजली अर्पण ‘कलाश्रम’ या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबवला जातो. यंदा या फेब्रुवारी महिन्यात होणारे हे ७४ वे पुष्प आहे. स्वातंत्र्यसैनिक डॉ. पशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम डॉ. मीना नेरुरकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका अशी त्यांची ओळख आहे. शुक्रवार, २७ मार्च ‘मराठी भाषा गौरव दिनी’ सायंकाळी ४ वाजता. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर चौथा मजला, चित्रकला दालन, प्रभादेवी येथे हा कार्यक्रम होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दिवंगत झालेल्या प्रज्ञावंतांचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या गुणीजनांना ‘दखलपत्र’ देऊन त्यांचा सन्मान करणारा हा उपक्रम असतो. नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची पत्नी आणि नाट्यसंपदा संस्थेचे व्यवस्थापन जबाबदारी स्वीकारणाऱ्या दिवंगत विजया पणशीकर, चित्रकार, सजावटकार वसंत तोडणकर, वृत्त निवेदक, लेखक अनंत भावे या दिवंगतांचे स्मरण यावेळी केले जाणार आहे. यांच्या नावाचे ‘दखलपत्र’ सुप्रिया प्रोडक्शन या नाट्यसंस्थेला गती देणाऱ्या अनिता चव्हाण, चित्रकार, सजावटकार प्रकाश लहाने, वृत निवेदक, पत्रकार विशाल पाटील, ज्या गिरणी कामगार पुत्राने कलेच्या प्रांतात यश मिळवले आहे. त्यांना ‘अव्वल पुरस्कार’ देऊन गौरवांकित करण्यात येते. रोख रक्कम, दखलपत्र असे त्याचे स्वरूप असते. दिवंगत आदर्श श्रमिक पांडुरंग परब, आदर्श गृहिणी रुक्मिणी परब यांच्या नावाचा हा मान यंदा  रंगभूषा, प्रकाश योजना, नेपथ्यकार सुनील देवळेकर यांना प्राप्त झालेला आहे. परब यांचे सुपुत्र, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक परब यांचे मार्गदर्शन या पुरस्काराला लाभलेले आहे.  प्रत्येक महिन्याला महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजा परांजपे यांना निवृत्त पोलीस अधिकारी, गायक हरिश्चंद्र ठोंबरे आणि नृत्यांगना अनघा देसाई ‘बाई मी विकत घेतला शाम’ या गाण्यावरती भावमुद्रा सादर करून नृत्यांजली अर्पण करणार आहेत. २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’चे निमित्त घेऊन संस्थेने ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’ या ६७ व्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. चित्रपट निर्माते, पर्यावरण तज्ञ, संपादक डॉ. किशोर भोईर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. डॉ. कामिनीदेवी भोईर यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माते सतीश रणदिवे हे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी होणार आहे. ज्योती शिंदे, शेजल जाधव, मानसी धारप, रोहन वानखेडे, सुजाता गोलटकर, सलोनी बोरकर, मृण्मयी मोडक आदींचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. नंदकुमार पाटील हे या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आहेत तर नंदिनी पाटील या संचालिका आहेत.

  वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ठाणे – महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या वतीने २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप  ठाण्यातील शेठ एनकेटी हॉल, खारकर आळी या ठिकाणी करण्यात आले. गेल्या २४ वर्षापासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इ. जिल्ह्यातील व तालुक्यातील आदिवासी, मागासवर्गीय, भटके-विमुक्त जाती जमाती, बालमजूर, निराधार, अनाथ, आणि बालसुधारगृहातील गरीब व गरजू मुलामुलींसाठी विनामूल्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संस्था राबवीत आहे. यावर्षी देखील ३००० मुलामुलींसाठी विनामूल्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम (गणवेश, नोटबुक, चप्पल-बूट, बॅग, पाटी-पेन्सील, कंपास पेटी, पेन, व इत्यादी शैक्षणिक साहित्य) आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. निरंजन डावखरे हे उपस्थित होते. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन  डावखरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या प्रसंगी महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर  वेल्फेअरचे   चेअरपर्सन बुधाजी पाटोळे, सुरेखा राऊत, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मनीषा झेंडे, चाईल्ड लाईन हेल्पच्या सोनाली पुफळा, प्रियेश साबळे पाटील, बालाजी इंजिनियरिंगचे सर्वेसर्वा प्रीतम रॉय आणि ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा,पालघर जिल्हा, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील बालशिक्षण सुधार केंद्रातील व शाळांतील शिक्षक कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य विधवा व निराधार श्रमिक महिला संघटनेचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आदिवासी, मागासवर्गीय, गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कामामध्ये प्रकल्पाचे सर्वेसर्वा प्रियेश साबळे पाटील यांचा मोठा वाटा असून अतिशय मोलाचे योगदान आहे. त्यांच्या अनुषंगाने आणि अथक प्रयत्नाने २०२१ पासुन या प्रकल्पाने आतापर्यंत १ करोड ८२ लाख मुला मुलींची शिक्षणाची विनामूल्य सेवा केली असून या सर्वे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला.

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दिव्यात गोरबंजारा समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दिव्यात गोरबंजारा समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती दिवा- संत सेवालाल गोर बंजारा समिती (दिवा) यांच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. प्रेरणा टॉवर, दिवा महोत्सव मैदानाजवळ, दिवा शिळ रोड (पूर्व) येथे रविवारी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर गोरबंजारा समाजाने संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमा रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण दिव्यात फिरवण्यात आली. तसेच भोग विधी कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता संपन्न झाला. उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. संत सेवालाल गोरबंजारा समिती (दिवा) कमिटी अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार, खजिनदार मिथुन आडे, तर कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, शिवसेना दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, स्नेहा अमर पाटील, नगरसेविका दर्शना म्हात्रे, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, समाजसेवक कैलास भगत, बालाजी कदम उपस्थित होते. त्यावेळी प्रमुख अतिथी चंदर राठोड, वासु सेठ राठोड, बाबू राठोड, देविदास राठोड हे सर्व मान्यवरांनी उपस्थीती दाखवून जयंती कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय पवार, प्रविण राठोड, लक्ष्मण चव्हाण, रामदास चव्हाण, रमेश राठोड, रामेश्वर पवार, चंदू चव्हाण, गुंडू राठोड, शंकर राठोड, श्याम राठोड, गणेश पवार, संतोष पवार, रमेश राठोड, वशिया राठोड, रामू राठोड, रामदास चव्हाण तसेच संत सेवालाल महाराज गोरबंजारा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 ओम म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन

ओम म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन दिवा (आरती परब) – दिव्यातील म्हातार्डी गावात असलेल्या ऊॅ म्हातार्डेश्वर शिव मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे शिव मंदिर दिवा आणि कोपर स्थानका दरम्यान खाडी किनारी असलेले पुरातन मंदिर आहे. या मंदिरात दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणची सगळी आगरी, कोळी आणि कोकणी माणसे श्रद्धेने पूजा करायला येतात. या महाशिवरात्री महोत्सवात पहिल्या दिवशी सकाळच्या वेळी दातिवलीच्या प्रवचन गुरुभक्त प्रकाश महाराज दळवी यांचे प्रवचन झाले. दुपारच्या वेळी ह.भ.प. गुरुवर्य शरद महाराज म्हात्रे यांच्या विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ, दातिवलीचे सुस्वर भजन होते. तसेच संध्याकाळी माऊली महिला हरिपाठ मंडळ (दातिवली) यांचे भजन तर गावदेवी भजन मंडळ, बेतवडे यांचे ही भजन झाले. तसेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, बेतवडे यांचे भजन झाल्यावर महादेवाची महा आरती मोठ्या उत्साहात पार पडली. त्या नंतर महाप्रसाद सर्वांसाठी ठेवण्यात आला होता. हा महाशिवरात्री महोत्सव विना विघ्न पार पडण्यासाठी ऊॅ म्हातार्डेश्वर ट्रस्टी मंडळ व समस्त ग्रामस्थ (म्हातार्डी) अध्यक्ष सदाशिव शंकर पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत शंकर पाटील, सचिव जयदास कान्हा शेलार, खजिनदार गोवर्धन पाटील, सदस्य दिपक कान्हा शेलार, अशोक शेलार, वैद्यनाथ शेलार, मंगेश शेलार, शांताराम पाटील, भोलाराम शेलार, सुदेश पाटील यांनी मेहनत घेतली होती. तसेच स्वयंपाकी ग्रुप बेतवडे, द्वारकानाथ पाटील, जयदास पाटील, बाळाराम पाटील, नारायण पाटील, गणेश दळवी, नामदेव नाईक, गणेश पाटील आणि टीम यांनी ही जेवणाचे योग्य नियोजन करून नागरिकांसाठी प्रसाद आणि जेवण बनवले होते. त्यावेळी आमदार राजेश मोरे, दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक दिपक जाधव, नगरसेविका दर्शना म्हात्रे, साक्षी मढवी, विभाग प्रमुख राजेश पाटील, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, उपविभाग प्रमुख शंकर पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

शिवरायांचे महिला विषयक धोरण आणि आजची स्थिती

रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केल्याचे समजताच त्याचे हातपाय तोडून चौरंग केला. आज मात्र माता भगिनींची अब्रू लुटणारे हजारो नराधम न्यायालयाच्या छत्राखाली स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत आहेत ! म्हणून आजही शिवरायांच्या स्वराज्याची छाप…

संसदेतील लक्ष्मणरेषा !

कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्यामुळे संसदेमध्ये देशाच्या धोरणात्मक विषयांवर तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी; परंतु अलिकडच्या काही वर्षांमध्ये संसदेचा आखाडा व्हायला लागला आहे. अलिकडे तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधानांना आभारदर्शक…

पूजन आराध्यदेवतेचे

पूजन आराध्यदेवतेचे आपल्याकडे शिव ही अनेकांची आराध्यदेवता आहे. आपल्याकडे त्रिमूर्ती म्हणतात त्यात ब्रम्हा सृष्टीकर्ता, विष्णू पालनकर्ता आणि शिव हा संहारक अशी माहिती येते पण पुराणाच्या आधीदेखील वेदवाड्मयामध्ये शिवाचा उल्लेख रुद्र…

रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगारांना १४ हजारांची विक्रमी वेतनवाढ

रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगारांना १४ हजारांची विक्रमी वेतनवाढ अनिल ठाणेकर ठाणे,  ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनचा रायगड जिल्ह्यात झंझावात सुरु झाला असून, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील सुमारे १०५ कायम कामगार सभासदांना तब्बल १४ हजार रुपयांची थेट पगारवाढ मिळाली आहे. ‘धर्मराज्य’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकक्षेत्रातील ज्वलंत कामगार-नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली; तसेच, त्यांच्या कामगारक्षेत्रातील चळवळीला साजेशी ही भरघोस पगारवाढ झाल्याने, रायगड जिल्ह्यात अभिमानास्पद असा औद्योगिक चमत्कार घडला आहे. ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे नुकताच संपन्न झालेल्या, पगारवाढीच्या या पहिल्यावहिल्या त्रैवार्षिक कराराप्रसंगी, व्यवस्थापनाच्या वतीने एचआर प्रमुख लतेश मिरकर, प्रोडक्शन मॅनेजर आशिष दगडे, व्यवस्थापनाचे वकील ॲड. मोहित कपूर; तर, युनियनच्या वतीने उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव महेशसिंग ठाकूर, सचिव समीर चव्हाण, युनिट अध्यक्ष प्रदीप जंगम, उपाध्यक्ष निखिल वरणकर, सेक्रेटरी मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर आणि रामदास साखीळकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पगारवाढीच्या या करारात, कामगारांना ६० टक्के डीए बेसिकमध्ये आणि ४० टक्के अलाऊन्समध्ये वाढ मिळाली आहे. त्यामुळे याआधी ३० ते ३५ हजार पगार घेणारे कामगार आता, दरमहा ४५ ते ५० हजार पगार घेणार आहेत. त्याचबरोबर, नव्याने भरती होऊन कायम होणाऱ्या कामगाराला, २२ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात होणार आहे, जो आधी एंट्री लेव्हलच्या कामगाराला १३ ते १४ हजार रुपये इतकाच तुटपुंजा पगार मिळत होता, त्यातदेखील या कराराअंतर्गत समाधानकारक वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील कामगारांना, व्यवस्थापनाने गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी वेतनमानावर झुलवत ठेवले होते. मात्र, राजन राजे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासदत्व स्विकारल्यानंतर, कामगारांना सन्मानजनक वेतन व त्यांचे हक्क मिळावेत यासाठी, युनियनकडून कंपनी व्यवस्थापनासोबत बोलणी सुरु करण्यात आली. परंतु, व्यवस्थापन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच, राजन राजे यांनी, कामगार सभासदांना आपल्या न्याय्यहक्कासाठी संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे आदेश दिले. त्यासंदर्भात, कंपनी व्यवस्थापनाला “संपाची सूचना” देण्यात आली होती. अखेर व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, युनियनने पाठवलेला सेवाशर्तींचा मसुदा मंजूर करुन, पगारवाढीचा त्रैवार्षिक करार संपन्न केला. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने ‘डीआरटी अँथिया’च्या कामगार सभासदांचे अभिनंदन करताना राजन राजे यांनी म्हटले की, “कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं तर, भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही. कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे. कारण, कारखान्यात घाम गाळून उत्पादन काढणारा कामगार, राष्ट्रीय संपत्ती निर्माण करीत असतो. आज कामगारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे, तुमच्या आतले दिवे आता कुठे पेटायला सुरुवात झालीय, ते तसेच धगधगत ठेवलेत तर, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा जाज्ज्वल्य शब्दांत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि रोहा-धाटाव परिसरातील उर्वरित कामगार-कर्मचारीवर्गाने या करारातून फार मोठा धडा घेण्याचे संकेत यानिमित्ताने दिले.