Category: होम

नाल्यावरील गाळ्याची भिंत पडली

सुदैवाने जीवितहानी नाही   ठाणे : लोकमान्य पाडा नं. ३ या भागातील लाकडीपुलाजवळील नाल्यावर असलेल्या गाळ्याची भिंत पडल्याची घटना रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने गाळे बंद असल्याने कोणत्याही स्वरुपाची जिवीतहानी झाली नाही. मात्र या गाळ्याच्या बाजूला असलेले तीन गाळे देखील धोकादायक झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून येथील चारही गाळे तोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री १.०२ वाजताच्या सुमारास लोकमान्य पाडा नं. ३ येथील लाकडी पुलाजवळील नाल्यावर असलेल्या अमित म्हात्रे यांच्या दुकानाच्या गाळ्याची भिंत नाल्यात पडल्याची घटना घडली. सुदैवाने रात्रीच्या सुमारास गाळे बंद असल्याने जिवीतहानी टळली आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व इतर यंत्रणांनी धाव घेत, परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु ज्या गाळ्याची भिंत पडली होती. त्या गाळ्याच्या बाजूला असलेल्या इतर गाळयांची स्थिती देखील धोकादायक झाली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील चारही गाळे तोडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर नाल्यात पडलेले डेब्रीज आणि नाल्याच्या आजूबाजूला पडलेले डेब्रीज देखील काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यापूर्वीच महापालिकेच्या माध्यमातून नाल्यावरील व नाल्या शेजारी असलेल्या बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्यापही नाल्यावरील रहिवासी स्थलांतरीत झालेले दिसून आलेले नाही. त्यामुळे आता प्रभाग समिती निहाय सर्वच ठिकाणांच्या नाल्याशेजारील व नाल्यावरील बांधकामांचा सर्व्हे केला जाणार असून जे अतिधोकादायक स्थितीत असतील त्यांना स्थलांतरीत करण्याच्या सुचना देण्यात येतील अशी माहिती उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली. तरी देखील रहिवासी स्थलांतरीत झाले नाही तर महापालिका त्यांनी तेथून स्थलांतरीत करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील तब्बल ३० ठिकाणी दरड कोसळण्याची भीती

 महापालिका बजावतेय केवळ नोटीस   ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत २०२० मध्ये दरड कोसळणाऱ्या ठिकाणांची यादी ही २६ च्या आसपास होती. त्यानंतर २०२१ पासून ही संख्या १४ वर आली होती. मात्र यंदा पावसाळा सुरु होत असतांना ही संख्या थेट ३० वर गेली आहे. त्यामुळे आता येथील रहिवाशांना संबधींत प्रभाग समिती मार्फत केवळ नोटीस बजावण्याची कारवाई केली जात आहे. मात्र याठिकाणी राहणाऱ्यांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी, असेही पालिकेने सांगितले आहे. दुसरीकडे येथील घरे देखील रिकामी करण्यास रहिवासी तयार होत नसल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे दरवर्षी पावसाळ्यात कळवा, मुंब्य्रातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याची घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. किंबहुना दरवर्षी पावसाळ्यात दोन ते तीन घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा देखील पालिकेने सुरवातीला यादी जाहीर केली होती. त्यात पूर्वीचीच म्हणजेच १४ ठिकाणेच होती. मात्र आता पालिकेने पुन्हा सर्व्हे करुन सुधारीत यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ही ठिकाणे आता तब्बल ३० एवढी झाली आहेत. याचाच अर्थ आधीच्या यादीत १६ ठिकाणांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून कळवा प्रभाग समिती हद्दीत दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. तसेच मुंब्रा भागातही अशा प्रकारच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसीद्वारे सुरक्षितेची हमी मात्र पालिकेने दिलेली नाही. पावसाळ्यात काही दुर्घटना घडल्यास महापालिका त्याला जबाबदार असणार नसल्याचे पालिकेने सांगत आपले हात यातून झटकल्याचे दिसत आहे.दरम्यान, येथील रहिवासी देखील ऐन पावसाळ्यात कुटुंब घेऊन कुठे जाणार असे सांगत घरे रिकामी करण्यास तयार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाणे महापालिकेने जाहीर केलेली सुधारीत यादी महापालिकेने जाहीर केलेल्या सुधारीत यादीत वागळे प्रभाग समिती – ०४, वर्तकनगर – ०१, माजिवडा मानपाडा – ०३, कळवा – ०७, मुंब्रा – १५ आदी भागांचा यात समावेश आहे. याचाच अर्थ कळवा आणि मुंब्य्रातच दरड कोसळणाऱ्या ठिकाणांचा अधिक समावेश असल्याचे या यादीवरुन स्पष्ट होत आहे. ००००

मुंबईत आठवलेंचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

मुंबई :  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे केंद्रात सलग तीन वेळा केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवत आहेत. तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर रामदास आठवले यांचे मुंबईत आगमन झाले. त्यावेळी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे आठवलेंचे जोरदार स्‍वागत केले. मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. रिपाइं कार्यकर्त्यांनी भव्य रथातून मिरवणूक काढून वाजत-गाजत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर आठवले चैत्यभूमी येथे रवाना झाले. चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रामदास आठवले यांनी विनम्र अभिवादन केले. कार्यकर्त्यापासून मंत्रिपदापर्यंत जे आहे ते सर्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला लाभले असल्याची कृतज्ञ भावना आठवलेंनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. यावेळी रामदास आठवलेंवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पवर्षाव केला. यावेळी सीमाताई आठवले, कुमार जित आठवले, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे उपस्थित होते. ००००००

राज्यात माकप १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक?

 पवारांसोबत झाली सकारात्मक चर्चा!   मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाने महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  शरद पवार व  जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. या प्रतिनिधीमंडळात डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, मा. आ.  नरसय्या आडम, मा. आ. जे. पी. गावीत, आ. विनोद निकोले, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, व डॉ. सुभाष जाधव यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेल्या यशाबद्दल आणि त्यातील शरद पवार यांच्या असामान्य योगदानाबद्दल माकपच्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले.लोकसभा निवडणुकीत माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे, आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षांचे शरद पवार व जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केले. आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत ५५ मिनिटे चर्चा केली. माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या १२ विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली. यासंबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले.दूध प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी प्रकर्षाने व्यक्त केली. येत्या विधानसभा सत्रावर कामगारांच्या मोर्चाची चर्चा झाली.

काही संस्थांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’!

 मुख्यमंत्र्यांचा दावा   ठाणे : लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे खोटे कथानक पसरविले. त्यामुळे नक्षलवाद केवळ गडचिरोलीत नसून शहरी नक्षलवादी काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शिरले आहेत, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. ठाण्यात टीप टॉप प्लाझा येथे कोकण पदवीधर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराकरिता आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात अनेक संस्था चांगले काम करत आहेत. पण, काही संस्था सरकारविरोधात आहेत. अशा संस्था आणि महाविकास आघाडी खोटे कथानक लोकांपर्यत पोहचवण्यात यशस्वी ठरली. यामुळे डोळ्यात अंजन घालण्याची वेळ आता आली आहे. लोकसभा निवडणुकीत चारशेचा आकडा पार होणार म्हणून कार्यकर्ते आरामात राहिले आणि तेच निवडणुकीत आम्हाला भोवले, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला तडीपार करण्याची गर्जना करणाऱ्यांच कोकणवासीयांनी तडीपार केले, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याना लगावला. लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्हा आणि कोकण विभागात महायुतीला प्रचंड यश मिळाले. येथील सहा पैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या. भिवंडीची जागा मिळू शकली नसून इथे काय घडले हे सर्वांनाच माहीत आहे. मुंब्रा येथे जे झाले, तेच भिवंडीत झाले, असे फडणवीस म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अभिजीत पानसे यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांचे आभारही मानले. शहरी नक्षली असलेल्या संस्थांनी पंतप्रधानांना हटविण्याचा नारा दिला. मात्र विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारे मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. त्यामुळे या संस्थांची चिंता आता वाढली आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 00000

डोंबिवलीतील पुष्कर ब्याडगीला एमएच-सीईटी परीक्षेत १०० टक्के

डोंबिवली : डोंबिवलीतील रहिवासी असलेला पुष्कर विनय ब्याडगी या विद्यार्थ्याने तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या राज्यस्तरिय एमएच-सीईटी परीक्षेत १०० टक्के श्रेयांक (पर्सेंटाईल) मिळविला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातून पुष्करने आपले शिक्षण घेतले आहे. डोंबिवली पश्चिमेतील माॅडेल इंग्लिश स्कूलमधून पुष्करने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राॅयल ज्युनिअर महाविद्यालयातून त्याने अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. अभियांत्रिकीतून पुढील शिक्षण घ्यायचे नक्की असल्याने त्या दिशेने अभ्यास केला. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंंडळाच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांचे वाचन केले. तसेच एमएच-सीईटीच्या यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. याशिवाय खासगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याने आपणास हे यश मिळाले आहे, असे पुष्करने सांगितले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या जेईई (मुख्य) परीक्षा आपण दिली होती. या परीक्षेत आपणास ९९.०७ टक्के श्रेयांक (पर्सेंटाईल) मिळाले आहेत. या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर गुणवत्तेच्या यादीत आपण २०८ वे आहोत, असे पुष्करने सांगितले. या गुणांच्या आधारे आपण मुंबई आयआयटीमध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहोत. आपण नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचन केले. खेळामध्ये आपणास बॅडमिंटन आवडते. त्यामुळे त्याचा सराव नियमित करतो. पुष्करचे वडील डोंबिवलीत नेत्ररुग्ण चिकित्सक आहेत. आई गृहिणी आहे.

 कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरात शिवसैनिकांना प्रवेश बंदी

बकरी ईदच्या दिवशी कल्याण : बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाने कल्याणच्या दुर्गाडी किल्ला या भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा केली. यानंतर दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केलं. तसंच आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशीही भूमिका घेतली आहे. बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. मात्र ९० च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केलं. आज पुन्हा एकदा या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येतं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे तसंच त्याच परिसरात एक छोटी मशिदही आहे. त्या ठिकाणी मुस्लिम समुदाय बकरी ईदच्या निमित्ताने नमाज पठण करण्यासाठी येत असतो. त्या काळात हिंदू बांधवांना देवीचं दर्शन आणि पूजा ही काही काळासाठी बंद ठेवण्यात येते. याचा निषेध आनंद दिघेंनी सुरु केला होता. त्यांनी या विरोधात घंटानाद आंदोलन सुरु केलं होतं. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही या ठिकाणी घंटानाद करताना दिसत आहेत. आम्हाला दुर्गाडी देवीचं दर्शन करायचं आहे त्यामुळे मंदिरात जाऊ दिलं पाहिजे असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी मंदिरात जाण्यापासून रोखल्याने या ठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसनैकि जमले होते. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही काही कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे यांचे कार्यकर्ते एकमेकांत मिसळू नयेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे दोन्ही गट वेगळे ठेवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. या दोन्ही गटांनी दुर्गाडी किल्ला परिसरात काही काळ घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलकाचं म्हणणं काय? बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेश बंदी आणि घंटानाद करु दिला जात नाही. हे आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने सुरु झालं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी बंदीहुकूम मोडून देवीचं दर्शन घेतलं होतं. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार. कोणत्याही दिवशी देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बंदी असता कामा नये. देवीचं दर्शन घेणं हा हिंदूंचा हक्क आहे. असं आंदोलकांनी म्हटलं आहे.

 कल्याणमधील ठाकरे गटाच्या नव्या नेमणुका

सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी   कल्याण: कल्याण लोकसभा निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा पराभव झाला असला तरी त्यांना चांगली मते मिळाली. त्याचा विचार करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका केल्या आहेत. या नेमणुका निष्ठावंत, ज्येष्ठांना डावलून करण्यात आल्याचा आरोप करत सामान्य, निष्ठावंत शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी उघडपणे कुणीही बोलण्यास तयार नाही. शिवसेनातील बंडानंतर कल्याण परिसरातील अनेक जुने निष्ठावान, ज्येष्ठ शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांना साथ दिली. अशा शिवसैनिकांना नवीन नेमणुकांमध्ये पदस्थापना देऊन त्यांचा सन्मान करणे आवश्यक होते. परंतु त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे, असे ठाकरे गटातील ज्येष्ठ शिवसैनिकांकडून सांगण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांनी तीन लाख ८१ हजार मते मिळविली. त्याचा विचार करून ठाकरे गटाने आता आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकींच्या तयारीचा भाग म्हणून येथील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. कल्याण पश्चिम, मुरबाड विभागासाठी ॲड. अल्पेश भोईर यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भोईर हे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या नियुक्तीला कोणाचा विरोध नाही, पण त्यांना टप्प्याने पदोन्न्तीने पद देणे आवश्यक होते, असे सामान्य शिवसैनिकांचे मत आहे. कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंंबरनाथ शहरासाठी जिल्हाप्रमुख म्हणून धनंजय बोडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना हे पद दिल्याचे सांगण्यात येते. नगरसेवक, विभागप्रमुख, दोनदा विधानसभा उमेदवारी, उपशाखाप्रमुख पदे धनंजय बोडारे यांनी भुषविली आहेत. आता जिल्हाप्रमुख पदही त्यांंना देण्यात आले आहे. अनेक पदे एकाच व्यक्तिला किती वेळ देणार. इतरही अनेक ज्येष्ठ कृतीशील शिवसैनिक पक्षात आहेत. त्यांचाही विचार होण्याची गरज आहे, अश मागणी सामान्य शिवसैनिक करत आहेत. दरेकर यांचे मताधिक्य वाढविंण्यासाठी ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या पदरात नव्याने नेमणुका टाकण्यात आल्याची चर्चा सामान्य शिवसैनिकांमध्ये आहे. ठाकरे गटाचे नेते मात्र हा आक्षेप खोडून काढतात. डोंबिवलीत अभिजीत सावंत या ज्येष्ठ शिवसैनिकाला शहरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याविषयी सामान्य, ज्येष्ठ शिवसैनिक कुरबुर करत आहेत. संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या नेमणुका करण्यात आल्या. त्यांच्या कार्यपध्दतीविषयी शिवसैनिक नाराजी व्यक्त करत आहेत. एकीकडे सामान्य शिवसैनिक हाच शिवसेनेचा कणा आहे, असे सांगायचे आणि निष्ठावंत, सामान्य ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलून नियुक्त्या करायच्या, यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कल्याण, मुरबाड, डोंबिवली परिसरातील नेमणुकांमध्ये लक्ष घालण्याची मागणी सामान्य शिवसैनिकांकडून केली जात आहे. अधिक माहितीसाठी ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कोट पक्षाकडून करण्यात आलेल्या नव्या नेमणुकांमध्ये कोणतीही नाराजी नाही. याऊलट पक्षाने युवा कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याने शिवसैनिक आनंदात आहेत. सदानंद थरवळ (जिल्हाप्रमुख, कल्याण जिल्हा)

श्री गणेश आखाड्याचे उन्हाळी निवासी कुस्ती शिबिर संपन्न

मुंबई : मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर आयोजित २१ दिवसांच्या उन्हाळी निवासी कुस्ती, संस्कार शिबिराचा  सांगता समारंभ नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला. या शिबिरात ४० पेक्षा जास्त युवा कुस्तीपटू सहभागी झाले होते. त्यामध्ये काही मुलींचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे कर्नाटक, म्हैसूर येथील काही कुस्तीपटूंनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात एन. आय. एस. कुस्ती प्रशिक्षक  विवेक नयकल, महेंद्र जाधव, वैभव माने, कोमल देसाई, वस्ताद रूपचंद माने यांनी कुस्तीपटूंना मार्गदर्शन केले. शिबिरातील सर्व कुस्तीपटूंना प्रमाणपत्र, चषक, ट्रेक सुट देऊन गौरविण्यात आले. यंदाचे शिबिराचे दुसरे वर्ष होते. शिबिरातील कुस्तीपटूंची २१ दिवस नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय सुभाष घाटवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. शिबिराच्या समारोप सोहळ्याला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नझरुद्दीन नायकवडी, व्यापारी हुकमीचंद जोशी, डॉ. जितकुमार यादव, उद्योजक श्री. यादव, पै. राजाराम पाटील, प्रकाश वाठारकर, गणपती जाधव (मुंबई पोलीस), माणिक पाटील NSG कमांडो, सुधाकर गायकवाड, श्री साई ज्वेलर्सचे मालक आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती. यावेळी एशियन क्रीडा, आरोग्य , नर्सरी प्रकल्प शिंदे स्पोर्ट्स , टिळक रोड , पुणे  यांच्यावतीने वस्ताद वसंतराव पाटील यांना  “महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२४” मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल सर यांनी केले.

कर्जत तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत

पोलीस निरीक्षक कारवाई करतील का?   कर्जत : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. मात्र स्थानिक पोलीस निरीक्षक याबाबत कोणतीच भूमिका घेताना दिसून येत माहित. खरंतर अवैध धंद्यांना आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. आपली सद्सदविवेक बुद्धी वापरून अधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे अधिकारी यामध्ये काही आर्थिक हितसंबंध ठेऊन आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ नुसार राज्यात विनापरवाना खेळल्या जाणाऱ्या जुगारास प्रतिबंध करणे हा मुख्य उद्देश ठेऊन राज्यात जुगार,मटका यावर कारवाई होत आहेत. मात्र कर्जत तालुक्यात अशा प्रकारच्या कारवाई होताना दिसून येत नाहीत.   सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा, गांजा, अमली पदार्थ, अवैध दारू यांची विक्री होताना दिसून येत आहे.  तरुणाई याच्या आहारी जात आहे. मोठ्या प्रमाणात मटका, जुगार सुरू असून याला अभय कुणाचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मोठमोठ्या इंटरनॅशनल महाविद्यालय परिसरात अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे सुद्धा येथील स्थानिकांच्या निदर्शनास येत आहे.  सामान्य शेतकरयांना त्रास देणारे अधिकारी अशा ठिकाणी आपली सदसदविवेक गहाण टाकतात का असा प्रश्न सुद्धा जाणकारांना पडला आहे. अलीकडे फेब्रुवारी महिन्यात कर्जत शहरातील नाना मास्तर नगर येथील एका फॉर्म वर जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड यांनी धाड टाकून लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत केला. शहरामध्ये अनेक दिवस सुरू असलेल्या या जुगार अड्ड्याबाबत कर्जत पोलीस स्टेशन मात्र अनभिज्ञ कसे हा प्रश्न देखील शिल्लकच राहिला. कर्जत पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आपली सदसदविवेक बुध्दी वापरून यावर कायदेशीर कारवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 000000