Category: होम

पहिल्या पावसानंतर भातपेरणीला सुरुवात

  डहाणू, : तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील गावात सोमवारी (ता. १०) मध्यरात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटात मॉन्सूनच्या पहिल्या पावसाचे आगमन झाले. त्यानंतर मंगळवार (ता. ११)पर्यंत पावसाने विश्रांती घेतली, मात्र शेतकऱ्यांनी पावसाच्या पहिल्या…

क्षयरोगाने पिडीत २५ वर्षीय महिलेने दिला बाळाला जन्म

मुंबई, ता. ११: गर्भधारणेनंतर क्षयरोगाची लागण झालेल्या २५ वर्षीय महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. झायनोव्हा शाल्बी रुग्णालयात या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. बाळाचे वजन २.२ किलो इतके असून प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. सलोनी मुरूडकर असे या महिलेचे नाव असून गर्भधारणेच्या ३४ आठवड्यांनंतर त्यांना श्वास लागणे, तीव्र खोकला आणि थकवा जाणवू लागला होता. वैद्यकीय चाचणीदरम्यान महिलेला क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले. अशा स्थितीत प्रसूती करणे खूप अवघड असते. क्षयरोग हा पसरणारा आजार असल्याने आईच्या गर्भातील बाळालाही क्षयाची लागण होऊ शकते, मात्र डॉक्टरांच्या यशानंतर बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला क्षयरोगाचा संसर्ग झालेला नाही. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता लालगुडी म्हणाल्या की, गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात या महिलेला श्वास घेताना त्रास जाणवू लागला होता. छातीचा एक्सरे केल्यानंतर महिलेला क्षयरोग असल्याचे निदान झाले. गरोदर महिलांना क्षयरोग होण्याचे प्रमाण भारतात २१ टक्‍के आहे. क्षयरोगाचे अंदाजे प्रमाण १००० गर्भवती महिलांमध्ये २.३ आहे. गर्भधारणेदरम्यान क्षयरोगामुळे महिलेला अशक्तपणा, वेळेआधीच प्रसूती, प्रसूतीपूर्व रक्तस्राव, प्रसूतीपूर्व मृत्यू होण्याचा धोका असतो. छातीचा एक्स-रे अहवाल आल्यानंतर लगेचच क्षयरोगविरोधी औषधोपचार सुरू करण्यात आले. या महिलेची मुदतपूर्व प्रसूती झाली, असे त्‍यांनी सांगितले. सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रिया साधारणतः १८ तास चालली. रुग्णाने २.२ किलो वजनाच्या एका निरोगी बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर उच्च-रिझोल्यूशन कंप्युटेड टोमोग्राफी चाचणी केली गेली. या चाचणीत आईमधील क्षयरोगाची लक्षणे नियंत्रणात आली होती.

वृक्ष प्राधिकरणाकडून १० नियंत्रण कक्ष स्थापन

वसई : पावसाळ्यात वादळी वारे वाहून सोसायट्यांतील खासगी जागेतील मोठे वृक्ष उन्मळून पडणे अथवा त्यांच्या फांद्या तुटणे आदी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिककडून प्रभाग समितीनिहाय वृक्ष प्राधिकरण विभागाचे १० नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहेत. वृक्ष उन्मळून पडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. या वेळी अनेकदा मालमत्तेची हानी होते, रस्त्यावर झाड पडल्यास वाहतूक ठप्प होते. या वेळी महापालिकेकडून वृक्ष बाजूला करण्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जाते. पावसाळ्यात अशा घटना घडू शकतात, यासाठी नागरिकांना सतर्क करण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र १० कक्ष तयार करण्यात आले असून संपर्क क्रमांकदेखील जाहीर केले आहेत. सोसायटीतील खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यास त्वरित दखल घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पावसाळ्यात वृक्षांसबंधांत काही समस्या उद्‍भवल्यास नागरिकांनी वसई-विरार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अथवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा. नागरी समस्यांची तत्काळ उकल करण्यात येईल. – प्रियंका राजपूत, उपायुक्त, वृक्ष प्राधिकरण विभाग

‘दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका’

 राज ठाकरेंची खा. नरेश म्हस्केंना सूचना मुंबई : लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सक्रीय उतरले होते. त्याशिवाय राज ठाकरे यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी काही सभा घेतल्या होत्या. त्यात निकालानंतर ठाण्यात २ लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी दिल्लीत गेलात म्हणून मराठी माणसाला विसरू नका अशी सूचना म्हस्केंना केली आहे. या भेटीबाबत खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, विद्यार्थी दशेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली विद्यार्थी सेनेचे काम करत असताना साहेबच आमचे बॉस होते. या निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज साहेबांना भेटायला गेलो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी खास माझ्यासाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यात सभा ही घेतली त्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. साहेबांचे भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षण बिंदू असतं. त्या सभेने आम्हाला जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास दिला. सभा संपल्यावर पाठीवर हात ठेवत त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्याचं फलित आज समोर आहे असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्यासाठी आज राज साहेबांची भेट घेतली. सोबत माझे सगळे कार्यकर्ते आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे सुद्धा होते. साहेबांनी दिलखुलास गप्पा मारत दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका. मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला दिल्लीत पाठवलं आहे अशी दरारायुक्त सूचना केली. त्यांची प्रत्येक सूचना आम्हाला मोलाची आहे. राज साहेब मराठी माणसाचा आवाज तर आम्ही बुलंद करूच पण आपल्या या मातीतल्या माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न समस्या आणि विषय यांना वाचा फोडण्याचं काम नक्कीच करू आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवू असंही खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.

अनिता मेस्त्री यांच्या ‘आनंदयात्री मी’ काव्यसंग्रहाचे मॉरिशसमध्ये प्रकाशन

नवी मुंबई : सानपाडा येथील मिलेनियम टॉवरमध्ये राहणाऱ्या व महिला मंडळ बाल विकास केंद्र प्राथमिक शाळा, कुर्ला ( प.) येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री सौ. अनिता मेस्त्री यांच्या ‘आनंदयात्री मी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मॉरिशस येथे नुकतेच पार पडले. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ इंडियन स्टडीज, डिपार्टमेंट ऑफ मराठी स्टडीजच्या सहकार्याने स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र, अक्षर विश्व मराठी साहित्य  संमेलन ३१ मे २०२४ रोजी सब्रमणिय भारती लेक्चर थिएटर, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मोका, मॉरिशस येथे पार पडले. या संमेलनात मराठी गझल कार्यक्रम, काव्यगायन सादरीकरण झाले. संमेलनात प्रमुख मान्यवर डॉ.श्रीम.मधुमती कुंजुल (मराठी अभ्यास विभाग प्रमुख, मॉरिशस), श्री. रामपरताब (सी.एस.के. महासंचालक, एम्.जी. आय. अँड आर.टी.आय. मॉरिशस )  श्री.नितीन बापू (राजकीय नेते मॉरिशस), श्री.एम. के. गोंधळी (माजी शिक्षण सहसंचालक,कोल्हापूर ) डॉ. दिलीप पांढरपट्टे व श्रीम.कल्पना गवरे (अध्यक्ष, स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी ) तसेच अजमेर लेखिका मंच अवाम सामाजिक सेवा संस्था या सर्वांच्या उपस्थितीत भारताच्या मुंबईतील कवयित्री सौ.अनिता मेस्त्री  यांच्या  ‘आनंदयात्री ’मी या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले. याच काव्यसंग्रहातील  हेचि दान या कवितेचे सादरीकरणही त्यांनी केले. श्री.रामचंद्र मेस्त्री व सौ. अनिता मेस्त्री यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आपला पहिला काव्यसंग्रह ‘आनंदयात्री मी’ मॉरिशस येथे प्रकाशित झाला याचा आनंद निश्चितच अवर्णनीय आहे; असे मनोगत उभयतांनी व्यक्त केले.

माथेरानमध्ये हातरीक्षा चालकांना ई रिक्षा सुपूर्द

  माथेरान : मागील वर्षभर ठेकेदारामार्फत ई रिक्षा सुरू असल्याने ज्या हातरीक्षा चालकांनी एक तपाहून अधिक काळ ई रिक्षा सुरू होऊन स्वतःची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी यासाठी कठोर संघर्ष केला होता. अनेक आव्हाने आणि काही नेहमीच्या विरोधक मंडळींच्या विरोधाचाही सामना केला होता.अखेरीस आज एकूण वीस हातरीक्षा मालकांना पायलट प्रोजेक्ट म्हणून सहा महिने या ई रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सायंकाळी चार वाजता शास्त्री हॉल याठिकाणी गावातील काही राजकीय पक्षांची मंडळी त्याचप्रमाणे सर्व ई रिक्षा समर्थक उपस्थित होते. याप्रसंगी छोटेखानी कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, अजय सावंत, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, प्रदीप घावरे, राजेश चौधरी,स्मिता गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले. २०१२ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांनी नगरपरिषदेच्या सभागृहात ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर केला होता.त्यानंतर माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका पार पाडली होती. तर राजकारण बाजुला ठेऊन गावामध्ये ई रिक्षाच्या माध्यमातून पर्यटन क्रांती होणार आहे हा दुरदृष्टिकोन समोर ठेवून कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता मनोज खेडकर, शिवाजी शिंदे यांनी ई रिक्षाच्या लढ्यात सहभाग घेतला होता. तर काहींनी मतांच्या राजकारणापायी यातून काढता पाय घेत ई रिक्षाच्या विरोधात असणाऱ्या मंडळींना सहकार्य केले आहे आणि आजही त्यांची तीच भूमिका कायम दिसत आहे. परंतु आता अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळणार असल्याने हातरीक्षा चालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.नगरपालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी नव्याने दाखल झालेल्या ई रिक्षांना झेंडा दाखवून पहिल्याच दिवशी संघटनेच्या वतीने मोफत प्रवास देण्यात आला याचा पर्यटकांननी मोठया प्रमाणावर लाभ घेतला.गावात एकूण ९४ हातरीक्षा असल्याने उर्वरित ७४ हातरीक्षा मालकांना लवकरच टप्प्याटप्प्याने या ई रिक्षा ताब्यात मिळणार आहेत त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ————————————————————————– हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी या संघर्षाला मिळालेले अभूतपूर्व यश आहे. 94 हात रिक्षा चालकांपैकी 20 चालकांनी  दि.१० पासून ई रिक्षा सुरू केल्या आहेत उर्वरीत 74 हातरिक्षा चालकांना परवानगी मिळे पर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे. सुनिल शिंदे, याचिकाकर्ते व सचिव श्रमिक रिक्षा संघटना —————————————————————————– ई रिक्षा आमच्या ताब्यात मिळाल्यामुळे जे समाधान आम्हा सर्व हातरीक्षा चालक मालक वर्गात आहे ते शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही. आमच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे.या जोखडातून मुक्ती मिळून आमची पुढील पिढी तरी सन्मानाने जीवन जगू शकते. रुपेश गायकवाड –ई रिक्षा चालक माथेरान —————————————————————————- गावात अनेक मुले आजही सुशिक्षित बेकार आहेत. अजूनही उर्वरीत एकूण ७४ ई रिक्षा लवकरच येणार आहेत.त्यामुळे सर्वमिळून ९४ मालकांसह अन्य मुलांना या व्यवसायामुळे आपल्या कुटुंबाला आधार प्राप्त होणार आहे.ई रिक्षामुळे पर्यटन वाढून याच माध्यमातून गावातील सर्वाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. संतोष लखन —-हातरीक्षा मालक माथेरान

ॲड अनिल परब यांच्या पदवीधर मतदारांसाठीच्या संकल्पपत्राचे विमोचन आज

 मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विमोचन मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार ॲड अनिल परब यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक संकल्पपत्राचे विमोचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्या बुधवारी दिनांक १२ जून २०२४ रोजी होणार आहे. हा कार्यक्रम मातोश्री येथे उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. याद्वारे परब हे त्यांच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. या संकल्पपत्राच्या माध्यमातून माझा आजपर्यंतचा राजकीय प्रवास, केलेली विविध विकास कामे, सामाजिक कार्यातील सहभाग यासह पदवीधर मतदारांसाठीचे संकल्प यामध्ये मांडले आहेत. येणाऱ्या काळात पदवीधर युवकांच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठविणार आहे आणि पदवीधर युवकांचा बुलंद आवाज बनून काम करणार असल्याचे परब यांनी याप्रसंगी सांगितले. गेली १८ वर्षे विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार असलेले ॲड अनिल परब यावेळी मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. परब यांनी ३ जून रोजी शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण पदवीधर आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. या मतदारसंघासाठी २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. परब यांनी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा विश्वास यापूर्वी व्यक्त केला आहे. महामुंबईमध्ये शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे मतदार नोंदणी केली आहे. तसेच, मी प्रत्यके लढाईत पूर्ण ताकतीनिशी उतरतो. प्रत्येक लढाई हि माझ्या, पक्षाच्या, शिवैनिकांच्या ताकतीवर आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादावर लढत असतो. त्यामुळे समोर प्रतिस्पर्धी कोण, तो किती तुल्यबळ आहे, याची तमा न बाळगता शिवसैनिक ताकतीने लढत असतो, असेही त्यांनी सांगितले.

 ठाणे स्थानकात चिखल, राडारोडा, गोण्यांच्या ढिगांमुळे प्रवाशांची कसरत

पुलांवर गर्दुल्ले, भिक्षेकऱ्यांचे ठाण ठाणे : गेले काही दिवस विविध बांधकामे, दुरुस्त्या आणि अस्वच्छतेमुळे ठाणे रेल्वे स्थानकाला बकाल रूप आले आहे. फलाटांवर आणि स्थानकाबाहेर गोण्यांमधील राडारोडा, पावसामुळे स्थानक परिसर चिखलमय झाला आहे. तर, पादचारी पूल, विश्रांतीगृह आणि तिकीट खिडक्यांलगत गर्दुल्ले, भिक्षेकरुंनी ठाण मांडल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेले काही दिवस स्थानकात पादचारी पुलांची उभारणी सुरू आहे. तर काही पुलांच्या दुरुस्तीची कामे केली जात आहेत. फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले. स्थानकाच्या पूर्वेला तिकीटघर तोडून सॅटीस पुलाची निर्मिती केली जात आहे. सध्या या साऱ्या अडथळ्यांना पार करून प्रवाशांना उपनगरी गाड्या पकडाव्या लागत आहेत. बांधकामातील टाकाऊ साहित्य (राडारोडा) स्थानक परिसरात गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात आला आहे. फलाट क्रमांक दोनजवळील विश्रांती कक्षाच्या मागील बाजूस राडारोड्याने भरलेल्या गोण्यांचा ढीग रचण्यात आला आहे. याच भागात विटा, खडी इतरत्र विखुरलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळून प्रवासी तिकीट घराच्या दिशेने जातात. सध्या राडारोड्याच्या गोण्या प्रवाशांसाठी अडथळा ठरू लागल्या आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे स्थानक भागात पाणी तुंबले होते. त्यातून सध्या प्रवाशांना वाट काढावी लागत आहे. फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या विटा, तसेच काही राडारोडा फलाटावर ठेवण्यात आला आहे. शिवाय स्थानकातील पादचारी पुलांलगत दुपारच्या वेळेत भिक्षेकरुंचा वावर वाढत चालला आहे. अनेकदा भिक्षेकरू फलाट क्रमांक दोन येथे असलेल्या विश्रांती कक्षातही शिरकाव करीत आहेत. रोज आठ लाख प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वे आणि नवी मुंबईत जाण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गाच्या रेल्वेगाड्यांची वाहतुक होत असते. ठाणे शहरात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी ठाण्यासह कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, मुलुंड, नाहूर, भांडूप या भागातील प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकात येतात. त्यामुळे स्थानकातून दररोज सुमारे सात ते आठ लाख प्रवाशी प्रवास करतात.

कल्याणमध्ये बारावे जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी फुटली

कल्याण: कल्याण पूर्व, पश्चिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावे  जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी मंगळवारी रात्री शहाड येथे फुटली. वाहिनी फुटल्याने शेकडो लीटर पाणी फुकट गेले. जलवाहिनी लगतचा परिसर जलमय झाला होता. कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन दुरुस्तीच्या कामाचे नियोजन केले. मध्यरात्री जलवाहिनी फुटल्याने काळोखात दुरुस्तीचे काम करणे अवघड होते. तसेच जलवाहिनीतील पाण्याच्या प्रवाहाला उच्चतम वेग असल्याने हे पाणी तात्काळ थांबविणे अशक्य होते. जोपर्यंत जलवाहिनीतील पाणी खाली होत नाही, तोपर्यंत पालिका पाणी पुरवठा अधिकारी, ठेकेदार यांना दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य नव्हते. सकाळी सहा वाजताच्या दरम्यान जलवाहिनीतील पाण्याचा वेगवान प्रवाह कमी झाल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनी फुटल्याचा कल्याण पूर्व, पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यावर मंगळवारी संध्याकाळपर्यंत परिणाम होईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मध्यरात्रीपासून पालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी जलवाहिनीतील पाण्याची पातळी कधी खाली होते यासाठी फुटलेल्या जलवाहिनी भागात ठिय्या देेऊन होते. उल्हास नदीतून शहाड येथे पाणी उचलून ते बारावे येथे जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते. जलवाहिनीतील अतिउच्चत दाबामुळे किंवा व्हाॅल्व्हमध्ये तांत्रिक बिघाड झाला की अशा घटना घडतात, असे अधिकारी म्हणाला. जलवाहिनीतील पाण्याची पातळी सकाळी सहा वाजता कमी झाल्यानंतर पालिका अधिकारी, ठेकेदाराने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण केले. कल्याण शहराला पाणी टंचाईची झळ बसणार नाही यादृष्टीने तात्काळ जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू केला. सकाळच्या वेळेत कल्याण शहराला पाणी पुरवठा झाला नसला तरी आता दुपार आणि संध्याकाळी नियमित पाणी पुरवठा होईल, असे अधिकारी म्हणाला.

भिवंडीत कापड गोदामाला भीषण आग

ठाणे : भिवंडी येथील गोवा नाका भागात मंगळवारी पहाटे कापड गोदामाला भीषण आग लागली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे. सहा तासांपासून येथील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य अग्निशमन दलाच्या पथकांकडून सुरू आहे. गोवा नाका येथील सरवली भागात कापड निर्मितीचे गोदाम आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या गोदामाला अचानक भीषण आग लागली. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे आग अधिकच पसरत गेली. घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर भिवंडी, कल्याण आणि ठाणे महापालिका अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाले. सकाळी उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य पथकांकडून सुरू आहे. गोदामात कोणीही अडकले नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.