Category: होम

दाढी, दंडा विरोधात महापालिकेत् एल्गार 

रमेश औताडे  मुंबई : काही वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभाराचा इतका कळस गाठतात की, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैतागून शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते. असाच प्रकार मुंबई महानगर पालिकेत घडला आहे.…

शिवाजीपार्कवर ‘सावरकर’ बीकेसीत ‘आंबेडकर’

स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुंबईत दोन हाय व्होल्टेज प्रचार सभा पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजीपार्कवरील एनडीएच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर तर बीकेसीतील इंडिया आघाडीच्या सभेत घटनाकार…

तुतारीचा आवाज झालाच नसल्याने वैफल्यग्रस्त अनिल देशमुखांनी गाठली खालची पातळी- सुनिल तटकरे

माझी आणि शरद पवार, जयंत पाटील यांची भेट होण्याचे कारणच असू शकत नाही… मुंबई  -पराजय समोर दिसत असल्याने तुतारीचा आवाज अजिबात झालाच नसल्यामुळे वैफल्यग्रस्त… निराश आणि हताश झालेले अनिल देशमुखांसारखे…

लोकसभा निवडणुकीसाठी लालपरी सज्ज

करणार लाखोंची कमाई मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे यंत्र, साहित्य व मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे आणि निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन आणण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे. यासाठी २४६ एसटी बसचे आरक्षण करण्यात आले असून त्यातून ९० लाखांचे उत्पन्न एसटीच्या मुंबई विभागाला मिळणार आहे. एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे ८५०० ते हजार रुपये मिळणार आहेत. तीन टप्पे झालेत. राज्यात मतदानाचा पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होत असून, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचाही त्यामध्ये समावेश आहे.

पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मोनोरेल गाडीची चाचणी सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेलच्या ताफ्यात पहिली स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी दाखल झाली आहे. या गाडीची जोडणी करून तिच्या चाचणीला आता सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर ही चाचणी चालणार असून त्यानंतर म्हणजेच जूनच्या मध्यावर ही गाडी सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्प तोट्यात असून या प्रकल्पास तोट्यातून बाहेर काढण्यासाठी, मोनोरेलची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मोनोरेलच्या ताफ्यात १० नवीन मोनोरेल गाड्या दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. भारतातच या गाड्यांची बांधणी करण्याचे निश्चित करून एमएमआरडीएने गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट मेधा सर्वो ड्राइव्हज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. या कंत्राटानुसार ही कंपनी १० मोनो गाड्यांची बांधणी करीत असून यासाठी ५९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी पहिली गाडी तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे. वडाळा कारडेपोत या गाडीची जोडणी करण्यात आली असून गेल्या आठवड्यापासून या गाडीच्या चचणीस सुरुवात करण्यात आली आहे. ही चाचणी रात्री करण्यात येत आहे. स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी रात्री धावत आहे. दरम्यान, महिनाभर ही चाचणी सुरू राहणार आहे. त्यानंतर ही गाडी सेवेत रुजू होणार आहे. उर्वरित नऊ गाड्या टप्प्याटप्प्याने डिसेंबरपर्यंत सेवेत दाखल होणार आहेत. या सर्व दहाही गाड्या सेवेत दाखल झाल्यास आजघडीला प्रत्येक १५ ते ३० मिनिटांनी सुटणारी मोनोरेल दर सहा मिनिटांनी सुटणार आहे. यामुळे प्रवासी संख्या आणि महसूल वाढेल, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त केला जात आहे.

कल्याणमधील गोविंद करसन चौकातील बस थांब्यामुळे वाहन कोंडी

कल्याण : कल्याण पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील गोविंंद करसन चौकात प्रवासी वाहतुकीच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन विभागाच्या बस उभ्या करून ठेवण्यात येतात. या बस मुख्य रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने या भागात दररोज वाहन कोंडी होते. या बस प्रवासी वाहतुकीसाठी गोविंद करसन चौकात वळविल्या जातात. या मोठ्या बस वळविताना अनेक वेळा वाहन कोंडी होते. या बसचा थांबा बाजारपेठ विभागातील आतील रस्त्यांवर, बाजार समिती भागातील रस्त्यांवर करण्यात यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. पत्रीपूल ते शिवाजी चौक दरम्यानचा रस्ता आता काँक्रीटचा आणि प्रशस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अलीकडे वाहन कोंडी होत नाही. परंतु, गोविंद करसन चौकात केडीएमटीच्या प्रवासी वाहतुकीच्या बस या भागात असतात. या बससाठी उभे असलेले प्रवासी चौकात मुख्य रस्त्यावर उभे असतात. एका पाठोपाठ बस रांगेत उभ्या करण्यात येत असल्याने रस्त्याचा मुख्य भाग व्यापला जातो. त्यामुळे पत्रीपुलाकडून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एका मार्गिकेतून जावे लागते. या रस्त्यावरून अवजड वाहन जात असेल तर ते या बसच्या कोंडीत अडकते. अनेक वेळा वाहने करसन चौकात वळण घेऊन वलीपीर रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा प्रयत्न करतात ही वाहने या बसमुळे अडकतात. आणि शिवाजी चौकातील वाहने या वाहनांचामागे अडकून पडतात. करसन चौकात केडीएमटीच्या बसमुळे दररोजची कोंडी होत असल्याने या चौकातील बस इतर भागातून प्रवाशांंच्या सोयीप्रमाणे सोडण्यात याव्यात, अशा मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. या चौकाच्या परिसरात राहणारे व्यापारी, रहिवासी या सततच्या कोंडीमुळे हैराण आहेत. कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पातून कामे सुरू आहेत. या प्रकल्पाच्या ठिकाणी अडथळा नको म्हणून केडीएमटीच्या बस करसन चौकातून सोडल्या जात असल्याचे समजते.

चार महिन्यात वाढले ८३ हजार नवमतदार

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात ३ जानेवारी २४ ते ३ मे २०२४ या कालावधीत करण्यात आलेल्या नव मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ८३ हजार ८०७ मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवली. हे नव मतदार प्रथमच कल्याण लोकसभा आणि पुढील होणाऱ्या निवडणुकांसाठी यापुढे मतदान करतील, अशी माहिती कल्याण लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी गुरूवारी सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील निवडणूक कार्यालयात दिली. ३ जानेवारीपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतदार संख्या १९ लाख ९८ हजार ४२४ होती. जानेवारी ते ३ मे या कालावधीत निवडणूक आयोगाकडून नव मतदार नोंदणी मोहीम विविध स्तरावर राबविण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात ८३ हजार ८०७ नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली. त्यामुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २० लाख ८२ हजार २३१ आहे, असे सातपुते यांनी सांगितले. मतदान केंद्रे कल्याण लोकसभा हद्दीतील सहा विधानसभा मतदारसंघात एक हजार ९६० मतदान केंद्रे आहेत. यावेळी या मतदार संघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. एकाच भागात १० पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या एक हजार १२ ठिकाणी वेब कास्टिंग आणि तेथे सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रातील मतदान प्रक्रियेचे (मतदान कक्ष वगळून) काम निवडणूक नियंत्रण अधिकारी कक्षात बसून पाहू शकणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर अपंगांसाठी रॅम्प, व्हिलचेअर सज्ज ठेवली जाणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह, पाणी, औषधांचा संच तयार ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी साहाय्यक म्हणून आशा सेविका, आरोग्य सेविकांची नेमणूक केली जाणार आहे. अपंगांना घर ते मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे. अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काही मतदार व्याधीग्रस्त असतात, हा विचार करून मतदारांना कोणताही त्रास नको म्हणून बहुतांशी मतदान केंद्रे इमारतीच्या तळ मजल्याला प्रस्तावित केली आहेत, अशी माहिती सातपुते यांनी दिली. कर्मचारी सज्ज कल्याण लोकसभा मतदारसंघात पोलीस, गृहरक्षक दलासह एकूण १० हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी योग्य त्या प्रशिक्षणासह सज्ज करण्यात आले आहेत. सहा विधानसभा मतदारसंघांतील काही ठिकाणी एक मतदान केंद्र महिला, एक केंद्र युवा आणि एक केंद्र अपंग व्यक्तिंच्या माध्यमातून चालविले जाणार आहे. या निवडणुकीतील हे वैशिष्टय आहे, असे सातपुते यांनी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील दिवंगत सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात होणार आहे. नाट्यगृह बंद सावळाराम महाराज क्रीडासंकुलाजवळ सावित्रीबाई फुले नाट्यगृह आहे. नाट्यगृहाच्या भुयारात मतपेट्या ठेवण्याची सुरक्षित व्यवस्था असल्याने कल्याण लोकसभेतील मतपेट्या याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था येथे आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सावित्रीबाई फुले नाट्यगृह परिसर करण्यात आला आहे. त्यामुळे ४ जूनपर्यंत सावित्रीबाई नाट्यगृहातील सर्व नाट्यप्रयोग, इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

कपिल पाटील यांच्या भव्य रॅलीने बदलापूर दुमदुमले 

बदलापूर : लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारानिमित्ताने कुळगाव-बदलापूर शहरात गुरुवारी काढलेल्या भव्य रॅलीने बदलापूर दुमदुमले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प करीत उत्साह व जल्लोषात महायुतीच्या प्रचारासाठी निघालेल्या कुळगाव-बदलापूरच्या रॅलीत जनसागर उसळला होता. बदलापूर शहरातील पूर्व भागापाठोपाठ पश्चिम भागातील बदलापूरवासियांनी महायुतीच्या कार्याला पसंती देत ठिकठिकाणी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरामध्ये जय श्रीराम व मोदी… मोदी…च्या घोषणांमध्ये वातावरण दुमदुमून गेल्याने कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीला विजय यात्रेचे स्वरुप आले होते. माऊली चौकातून सुरू झालेला महायुतीचा हा झंझावात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोचला. तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील घोरपडे चौक, उड्डाणपूल, रेल्वे स्टेशन, सानेवाडी, झेंडा चौक, पृथ्वी बिल्डिंग, रितू वर्ल्ड, स्वामी समर्थ चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पोचला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महायुतीच्या नेत्यांनी वंदन केले. या वेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले, प्रभाकर पाटील, भाजपाचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर पातकर, राजेंद्र घोरपडे, पूर्व विभागाचे अध्यक्ष  संजय भोईर, पश्चिम विभागाचे अध्यक्ष शरद तेली, मनसेचे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर, आरपीआयचे शहराध्यक्ष धनराज गायकवाड आदींसह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या आजच्या रॅलीमुळे बदलापूरकरांचे प्रेम व विश्वास अनुभवायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बदलापूर शहरातील हजारो नागरिकांना विकासाची प्रचिती आली. त्यामुळे आजच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या प्रेमाबद्दल नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीना विजयी करण्याचे आवाहन केले. या रॅलीला महायुतीच्या हजारो कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

अनधिकृत होर्डिंग विरोधी कारवाई दुसऱ्या दिवशीही प्रभावीपणे सुरू

नवी मुंबई: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात आली असून घणसोली, कोपरखैरणे व तुर्भे विभागातील पाच मोठे होर्डिंग हटवण्यात आलेले आहेत. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व त्यांचे अधिनस्त सहकारी यांनी तांत्रिक समुहासह अनधिकृत होर्डिंग हटाव मोहीम सलग दोन दिवस पहाटेपर्यंत प्रभावीपणे राबवली. घणसोली विभागात ठाणे बेलापूर सर्विस रोड येथे हॉटेल रामडा, औरम निवासी संकुल येथील 2 मोठे होर्डिंग निष्काषित करण्यात आले. त्याचप्रमाणे ठाणे बेलापूर रोडवर कोपरखैरणे विभागात एमआयडीसीच्या फायर ब्रिगेड जवळ असलेले फार मोठ्या आकाराचे होर्डिंगही हटविण्यात आले. तुर्भे विभागामध्ये एपीएमसी मार्केट येथील एक मोठे अनधिकृत होर्डिंग तसेच तुर्भे रेल्वे स्टेशन नजीकची पदपथावर असलेली दोन मोठी अनधिकृत होर्डिंग पहाटेपर्यंत काम करून निष्कासित करण्यात आली. आजही वाशी विभागात हायवेनजिकचे मोठे होर्डींग निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू आहे. विभाग कार्यालयांमार्फत त्यांच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येणार आहे असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी स्पष्ट केले.

‘ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल’

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची आगाऊ सूचना नागरिकांना मिळावी, यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता या प्राथमिक कृती आराखड्यामुळे अधोरेखित झाली आहे. एखाद्या आपत्तीचा इशारा मिळाल्यानंतर त्याच्याशी निगडित यंत्रणांनी कशाप्रकारे जलद गतीने त्या आपत्तीचा सामना करावा, त्याचे अपेक्षित परिणाम काय आहेत, याची एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यास ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्याची मदत होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याची प्राथमिक रुपरेषा गुरूवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूर सदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) ही वातावरण बदल क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था या कृती आराखड्याचे काम करत आहेत. याच संस्थेने महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका यांच्यासोबत ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता उपाययोजना कृती आराखडाही (Heat Action Plan) तयार केला आहे. आपत्ती नियंत्रणात प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणारे कर्मचारी यांचे अद्ययावत प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये कमालीची जागरूकता या दोन गोष्टींचाही उहापोह या कृती आराखड्यात करण्यात आला आहे. तो महत्त्वाचा असून एखाद्या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हाताशी असल्यास प्रतिसाद जलद देता येतो. त्याशिवाय, माध्यमांच्या मदतीने नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनाही आपत्तीबाबत सजग करता येते. आवश्यकता असल्यास त्यांचे तात्पुरते विस्थापन करता येते, असेही राव यांनी स्पष्ट केले. नाल्यात पडणारा कचरा ही शहराची मोठी समस्या आहे. हा कचरा रोखण्यासाठी काय आणि कसे उपाय करता येतील, नागरिकांचे प्रबोधन कसे करता येईल, त्यांना कचरा टाकण्यासाठी सोयीचे कोणते पर्याय देता येतील, याचा विचार करून उपाय सुचवण्याची सूचना आयुक्त राव यांनी ‘सीईईडब्ल्यू’च्या प्रतिनिधींना केली. सहा महिन्यांपासून या कृती आराखड्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभाग यांच्याकडून मिळालेली माहिती तसेच, आपत्ती व्यवस्थापनबाबतच्या शास्त्रीय संकल्पना आदींची सागंड घालून सीईईडब्ल्यू यांनी प्राथमिक कृती आराखडा तयार केला आहे. त्यात, पूर स्थितीस कारणीभूत घटक, त्यावरील अल्प आणि दीर्घ कालीन उपाय, त्यातून साध्य होणारा परिणाम आणि नागरिकांना त्याचा होणार उपयोग आदींबाबत मुद्द्यांचा समावेश आहे. हा प्राथमिक अहवाल आता महापालिकेच्या संबंधित सर्व विभागांना देण्यात आला असून त्यावर त्यांची मते आणि सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. सीईईडब्ल्यूचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नितीन बस्सी आणि विश्वास चितळे यांनी हा अहवालाचे सादरीकरण करून त्याची प्रत महापालिका आयुक्त सौरभ राव यांना प्रदान केली. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे,  सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आदी उपस्थित होते.