Category: महाराष्ट्र

Maharashtra News

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अधिसभा खेळीमेळीत संपन्न

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अधिसभा खेळीमेळीत संपन्न हरिभाऊ लाखे नाशिक: -महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सन २०२६ मधील प्रथम अधिसभा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस विद्यापीठाचे कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा.डॉ. संजीव…

बल्लाळेश्वर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ २०२५  पुरस्कार प्रदान

बल्लाळेश्वर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ २०२५  पुरस्कार प्रदान पुणे: सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि दिशादर्शक कार्य करणाऱ्या बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या संस्थेला  सन २०२५ चा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी प्रदान करण्यात आला, अशी माहीती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्यन रिव्हरवुड रिसॉर्ट, जांभळी,  वेल्हे रोड, भोर, पुणे येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सोहळा २०२५ (उर्वरित) तसेच एकदिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर म्हणून  सतिश मराठे (संचालक – भारतीय रिझर्व्ह बँक) तसेच उदय जोशी (राष्ट्रीय अध्यक्ष – सहकार भारती) उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे, संचालक दामाजी डोंगरे व सरव्यवस्थापक संजय घोगरे यांनी  हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून महासचिव  शशिकांत राजोबा व खजिनदार  दादाराव तुपकर यांनी जबाबदारी पार पाडली. फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी व कार्याध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. सहकार क्षेत्रात पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सभासदाभिमुख कार्यपद्धती यामुळे बल्लाळेश्वर पतसंस्थेने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी वाटचालीत सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतकांचे मोलाचे योगदान असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. हा पुरस्कार आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान आहे. हा गौरव संपूर्ण बल्लाळेश्वर परिवाराचा आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा चौकशी

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा चौकशी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा इशारा अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करण्यात येणारी कामे ही दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत. दिलेली डेडलाईन पाळली गेली पाहिजे अन्यथा, संबंधित विभाग प्रमुखाची चौकशी केली जाईल. कामाच्या दर्जाबाबतही चौकशी केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ बाबत आज जिल्हाधिकारी जिंदल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी सादरीकरण करुन विभागनिहाय माहिती दिली. जिल्हाधिकारी जिंदल यांनी विभागनिहाय आढावा घेतला. झालेली कामे, आलेली मागणी, दायित्व याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. ते म्हणाले, दायित्वाची मागणी करावी. ५ मार्चपर्यंत मागणी न आल्यास चौकशी केली जाईल. प्रशासकीय मान्यता घेताना घातलेल्या अटी, शर्ती प्रमाणे पाहिले जाईल. करदात्यांचा हा पैसा आहे, तो व्यवस्थित दर्जात्मक कामांसाठी वापरला गेला पाहिजे, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. बाह्य संस्थेमार्फत दर्जाबाबतदेखील तपासणी केली जाईल. १५ मार्चपर्यंत खर्च करावा, ज्याच्यासाठी निधी दिला जातो, ते काम देखील वेळेवर पूर्ण झाले पाहिजे, तुम्ही सर्वजण १०० टक्के निधी खर्च करणार अशी मला खात्री आहे. असे सांगतानाच त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

भुमरेंचा ‘समृद्ध’ घोटाळा

भुमरेंचा ‘समृद्ध’ घोटाळा  समृद्धी महामार्गात ११५० कोटींचा महाघोटाळा ० ड्रायव्हरच्या नावे हिबानामा ० अंबादास दानवेंचा पुराव्यानिशी आरोपाने खळबळ छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचा समृद्ध घोटाळ्याचा आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते…

रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार घोषित

रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार घोषित पुणे : बलराज साहनी – साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे  देण्यात येणारा प्रतिष्ठेचा बलराज साहनी पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र देवधर यांना घोषित झाला असून,…

राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट

अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट पुण्याच्या अनुभवी बॅडमिंटनपटूंचे जागतिक स्तरावर वर्चस्व अबू धाबी, युएई – अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ मध्ये भारतीय ध्वज अभिमानाने फडकवला गेला. अनुभवी भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विविध वयोगटातील अनेक पदके पटकावली. पुण्याचे राज सिंग यांनी या मोहिमेचे नेतृत्व करताना आपल्या चिकाटीचा आणि कौशल्याचा परिचय देत तब्बल तीन पदकांवर आपले नाव कोरले. रौप्य पदकाची कमाई ६०+ पुरुष दुहेरी गटात अव्वल स्थानासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राज सिंग आणि धनंजय देशपांडे या जोडीने रौप्य पदक पटकावले. संपूर्ण स्पर्धेत या जोडीने उत्कृष्ट समन्वय आणि रणनीतीचा वापर केला. अंतिम सामन्यात थोडक्यात सुवर्णपदक हुकले असले तरी, त्यांच्या खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भरभरून कौतुक झाले. ऐतिहासिक पदार्पण आणि कांस्य विजय या स्पर्धेत रेखा धुपर यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण स्वप्नवत ठरले. ६०+ मिश्र दुहेरी गटात राज सिंग यांच्यासोबत खेळताना या जोडीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मानाचे कांस्य पदक मिळवले. इतकेच नव्हे तर, राज सिंग यांनी आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवत ४५+ पुरुष दुहेरी गटात प्रताप मेकाला यांच्यासह खेळताना आणखी एक कांस्य पदक प्राप्त केले. या गटातील उपांत्य फेरीचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला: पहिला गेम: सिंग आणि मेकाला यांनी १५-८ असा एकतर्फी विजय मिळवला. निर्णायक खेळ: दुसऱ्या सेटमध्ये १८-२० अशा अटीतटीच्या संघर्षानंतर, तिसऱ्या सेटमध्ये (९-१५) या जोडीने झुंजार खेळ करत कांस्य पदक निश्चित केले. जागतिक दर्जाचे नियोजन आणि सोयी-सुविधा मैदानातील खेळासोबतच, २०२६ च्या या स्पर्धेचे नियोजन आणि खेळाडूंना दिलेल्या सुविधांचे मोठे कौतुक झाले. आयोजकांनी खेळाडूंसाठी विशेष व्यवस्था केली होती. प्रवास सुविधा (Pick-up & Drop): खेळाडूंना निवासाच्या ठिकाणाहून मैदानापर्यंत नेण्या-आणण्यासाठी २४ तास वाहन सेवा उपलब्ध होती, ज्यामुळे खेळाडू वेळेवर आणि ताजेतवाने होऊन पोहचू शकले.…

 कांदा दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

कांदा दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन चांदवडला बेमुदत उपोषणाला सुरुवात हरिभाऊ लाखे नाशिक : कांदा व मक्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे कांदा व मका उत्पादक शेतकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत योग्य बाजारभावाच्या मागणीसाठी सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत बेमुदत उपोषण सुरू केले. खासदार भास्कर भगरे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते जयंत पाटील यांच्याशी मोबाइलवरून चर्चा करून शेतकऱ्यांचा दराचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची विनंती केली. चालू अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. सध्या बाजारात कांद्याला प्रतिकिलो केवळ ७ ते ८ रुपये दर मिळत आहे, तर मक्याची सुरू असलेली शासकीय खरेदी अतिशय धिम्या गतीने सुरू असून, तातडीने उपयोजना कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करून जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. …या आहेत मागण्या -कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव द्यावा -आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्यास प्रतिक्विंटल पंधराशे रुपये प्रमाणे अनुदान द्यावे -कांद्यासह इतर शेतीमालास योग्य बाजारभाव मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात -कांदा निर्यातीसाठी वाहतूक अनुदान देण्यात यावे व रेल्वे वाहने उपलब्ध करून द्यावी -शेतकऱ्यांना मका हमीभावाचा फरक देण्यात यावा ‘तो’ निर्णय शेतकरीविरोधी राज्य कांदा उत्पादक संघटनेची भूमिका केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आरओडीटीईपी (निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि करांची सवलत) योजनेतील दर ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी निषेध केला आहे. ‘आरओडीटीईपी’दर कपातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, कृषी व कृषी प्रक्रिया उत्पादनांसाठी स्वतंत्र उच्च दर निश्चित करावा. कांदाप्रक्रिया उद्योगासाठी किमान ४ टक्के ‘आरओडीटीईपी’दर लागू करावा व निर्यात प्रोत्साहन धोरणात स्थैर्य आणावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली.

 बिटको रुग्णालयात कोट्यवधींची यंत्रसामग्री धूळ खात!

बिटको रुग्णालयात कोट्यवधींची यंत्रसामग्री धूळ खात! १५० कोटींच्या रुग्णालयाचा कारभार रामभरोसे? हरिभाऊ लाखे नाशिक: येथील बिटको रुग्णालयात कोट्यवधी रुपयांची आधुनिक वैद्यकीय यंत्रणा मागील तीन वर्षांपासून वापराविना धूळ खात पड़न असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेली मॉलिक्युलर लॅब तसेच अत्याधुनिक व्हेंटिलेटर यंत्रणा आणि रक्तपेढी सध्या बंद अवस्थेत असून, याबाबत अस्वच्छता हे मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोरोना काळात नवीन संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी मोठ्या खर्चातून मॉलिक्युलर लॅब उभारण्यात आली होती. त्या काळात या लॅबचा वापर मोठ्या प्रमाणात झाला; मात्र कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर ही लॅब बंद पडली. त्यानंतर कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री आणि व्हेंटिलेटर खाटा देखील निष्क्रिय अवस्थेत पडून आहे. सरकारने सुमारे १५० कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या या भव्य रुग्णालयाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय असे नामकरण करण्यात आले. या रुग्णालयात सुसज्ज रक्तपेढी उभारण्यात आली असली, तरी ती अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली नाही. सध्या जुने बिटको रुग्णालयातच रक्तपेढी कार्यरत असून, दरमहा सुमारे ७०० ते ८०० लिटर रक्ताचा पुरवठा रुग्णांना केला जातो. नव्या रक्तपेढीत रक्त विलगीकरणाची आधुनिक व्यवस्था उपलब्ध असतानाही ती सुरू करण्यात उशीर का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात सुविधा सुरू होत नसल्यामुळे केवळ श्रेयवादामुळेच कामे रखडली आहेत का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील हे सरकारी पातळीवरील सर्वात मोठे रुग्णालय असले, तरी काही विभाग अद्याप पूर्णपणे कार्यरत नाहीत. अनेक रुग्णांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय किंवा वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटल येथे हलवावे लागते. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेबाबतही गंभीर तक्रारी समोर येत आहेत. एमआरआय विभागासमोर ड्रेनेज तुंबल्याने डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही अशी परिस्थिती का निर्माण झाली, असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.

 रत्नागिरी जिल्ह्यात सामूहिक गीतगायन

 हिंद की चादरला मानवंदना  रत्नागिरी जिल्ह्यात सामूहिक गीतगायन नाचणे येथे जिल्हाधिकाऱ्यांची, तर दामले विद्यालयात अपर जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती अशोक गायकवाड रत्नागिरी : शिखांचे नववे गुरु हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्ष निमित्ताने आज सकाळी ९ वाजता जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सामुहिक गायन झाले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर, नाचणे शाळा क्र.१ येथे जिल्हाधिकारी मनुज जिंदल तसेच रत्नागिरी नगरपरिषदेच्या दामले विद्यालयात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत हे गायन झाले. हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या अनुषंगाने आज सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर, नाचणे शाळा क्र. १, दामले हायस्कूल येथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनकाळावर आधारित सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज सिंग यांनी गायलेले गीत समूह गीत म्हणून गाण्यात आले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर, नाचणे शाळा क्र.१ येथील कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षक दीपक नागवेकर, सौरभी पवार, विनोदिनी कडवईकर, विद्या कोकजे उपस्थित होते. ग्रंथभेट देऊन जिल्हाधिकारी जिंदल यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी जिंदल यांनी सर्व उपक्रमांची माहिती घेतली. तसेच, निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, स्वच्छता अभियान, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुशा आदी स्पर्धा राबवाव्यात. विद्यार्थ्यांनीही शालेय जीवनात राबविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, अशा स्पर्धांमध्ये स्वत:च्या शाळेचे, आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. दामले हायस्कूल येथील कार्यक्रमात मुख्याध्यापक भगवान मोटे, उपमुख्याध्यापक जुलेखा काझी, मंडळ अधिकारी प्रताप कोल्हे यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गलांडे म्हणाले, श्री गुरु तेग बहादूर यांचे बलिदान, त्यांचे कार्य आताच्या पिढीला माहित व्हावे, यासाठी हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.  २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी खारघर, नवी मुंबई येथे पंतप्रधान यांच्या उपस्थित मोठा कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमात दामले शाळेतील मुलांनी घेतलेला भाग आणि त्यामध्ये मिळविलेले यश हे खूप कौतुकास्पद आहे. यापुढेही १ मार्चपर्यंत शाळेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सहभाग घ्यावा, आपल्या शाळेचे नाव उंचावर न्यावे, अशा शुभेच्छा यावेळी गलांडे यांनी दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागीय आयुक्त यांनी हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने दिलेला संदेश सर्वांना ऐकविण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र शिंदे यांनी केले.

स्वाभिमान व समता शिवरायांच्या स्वराज्याचे सूत्र – कैलाश देसाई

स्वाभिमान व समता शिवरायांच्या स्वराज्याचे सूत्र – कैलाश देसाई अनिल ठाणेकर सांगली – ‘बंधुता, स्वाभिमान व समता हेच शिवरायांच्या स्वराज्य पायाभरणीचे सूत्र होते. शिवरायांनी घालून दिलेली स्वराज्याची आदर्श नैतिक मूल्ये आजच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारावीत’, असे प्रतिपादन शिवशंभु प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक  कैलाश देसाई यांनी केले. मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या इतिहास विभागामार्फत आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी राजांचे सांस्कृतिक धोरण व आजची दशा’ या विषयावरील व्याख्यानामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर होते.  कैलाश देसाई पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते.  शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही.  आपल्या राजकीय विरोधकांच्या आईचा, पत्नीचा, मुलांचा, बहिणींचा आदर, सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते. परंतु आजचे राज्यकर्ते अगदी खालच्या पातळीवर येऊन विरोधकांच्या कुटुंबीयांवर टीका करतात. जाती-जाती धर्मा-धर्मात द्वेष पसरवण्याचे काम करतात. वतनदारी व जहागीरदारी व्यवस्था शिवरायांनी संपविली. परंतु आजचे राज्यकर्ते नवसरंजामदार बनले आहेत. आजची राज्यव्यवस्था शिवरायांच्या स्वराज्याच्या विचाराला व लोकशाहीला घातक आहे. राजकारण करणाऱ्यांनी शिवरायांच्या नावे मतांचा जोगवा मागू नये. सर्व जाती धर्मीयांचा मानसन्मान ठेवावा. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे आधुनिक लोकशाहीचा पायाच होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांच्या स्वराज्याचे संविधानात रूपांतर केले. शिवरायांचा ध्वज गेरू व मातीच्या रंगाचा आहे तो ध्वज वारकरी आहे. वारकरी परंपरेचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.” अध्यक्ष डॉ. बेलवटकर म्हणाले. “पर्यावरण रक्षण, शेती सुधारणा व लोककल्याणकारी कामे शिवाजी राजांनी घडवून आणली. त्यांच्या आज्ञापत्रातून स्वराज्याची आदर्श मूल्ये दिसून येतात.स्वराज्याला नैतिक अधिष्ठान शिवरायांनी मिळवून दिले. त्यांनी कधीच आत्यंतिक धर्मवाद जोपासला नाही. कर्मकांड व अंधश्रद्धा विरोध केला.”कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. राम घुले यांनी केले. या निमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कल्याणी साळुंखे, द्वितीय क्रमांक अक्षय पाटील व तृतीय क्रमांक तृप्ती गोंधळी यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षक प्रा. संध्या साठे व प्रा. स्वाती चौधरी होते. बीए भाग एकच्या विद्यार्थ्यांनी  शिवबाचा पाळणा व पोवाडा सादर केला.छत्रपती शिवाजी राजे व स्वराज्याची राजचिन्हे या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.  त्यामध्ये प्रथम क्रमांक आरती चव्हाण, द्वितीय क्रमांक श्रावणी पाटील व तृतीय क्रमांक करुणा काळे यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. शैलजा पाटील व प्रा. उत्तरा पाटील यांनी केले. प्रथम तीन क्रमांकांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व रोख रक्कम देण्यात आली. विद्यार्थिनींनी शिवकालीन वेशभूषा परिधान केली. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन करुणा काळे यांनी केले. प्रा. के. बी. पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिव पदयात्रा इस्लामपूर शहरात काढण्यात आली. प्रा वर्षा पाटील यांनी पदयात्रेचे संयोजन केले. महाविद्यालयाचा शिक्षक वर्ग व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.