Category: मुंबई

Mumbai news

दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी साजरी केली दिवाळी

नवी मुंबई : सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सक्षम करणारे केंद्र म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे ईटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र संपूर्ण देशभरात नावाजले जात असून महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी ईटीसी केंद्राला दिवाळी सणानिमित्त भेट देत दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींसमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्या चेह-यावर दिसणारा आनंद अत्यंत समाधान देणारा असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, ईटीसी केंद्र संचालक तथा उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त श्री.सागर मोरे व केंद्राच्या प्रमुख व विशेष शिक्षक आणि पालक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी व उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींना फराळ देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी सुसंवाद साधतांना आयुक्तांनी दिव्यांगांना मदतीचा हात देत सक्षम करण्याची जबाबदारी ही प्रशासन, विशेष शिक्षक व पालक अशी सर्वांचीच असल्याचे सांगत एकत्र येउुन अधिक चांगले कल्याणकारी काम जबाबदारीने करुया असे सांगितले. दिव्यांग मुलांचे पालक हे देखील विशेष शिक्षक असल्याचे नमूंद करीत आयुक्तांनी ईटीसी केंद्रात मुलांसमवेत येणा-या पालकांसाठीही विशेष उपक्रम राबवावेत असे निर्देर्शित केले. तंत्रज्ञानात झपाटयाने बदल होत असून दिव्यांगांसाठीच्या अद्ययावत उपचार पध्दतींचा समावेश ईटीसी केंद्रात करावा असेही आयुक्तांनी सूचित केले. ईटीसी केंद्रातील विविध शैक्षणिक कक्षांना व वर्गांना भेट देत आयुक्तांनी तेथील विशेष शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला. यावेळी आयुक्तांनी दिव्यांग मुलांच्या कौशल्य विकासावर लहानपणापासूनच भर देण्याची सूचना करीत त्यादृष्टीने नियमित शिक्षणासोबतच विविध प्रकारचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचीही सुविधा उपलब्ध्‍ करुन देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिले. यावेळी उपस्थित पालकांपैकी 10 पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना ईटीसी केंद्रामुळे त्यांच्या पाल्यांच्या जीवनात घडलेल्या आमुलाग्र बदलाबद्दल गौरवोद्गार काढले. अनेक पालकांना बोलताना आनंदाश्रू अनावर झाले. ईटीसी केंद्रातील वेगवेगळया उपचार पध्दतींचा मुलांच्या वर्तनावर होणारा सकारत्मक परिणाम पालकांनी अत्मियतेने सांगितला. आयुक्तांनी दिव्यांग मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याचा राबविलेला उपक्रम दिलासा देणारा असल्याचे पालकांनी सांगितले.

अनामत रक्कमेत भरली दहा हजारांची नाणी

  वाशी : मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि विश्‍वासू सहकारी विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी मंगळवारी अखेरच्या दिवशी ऐरोली विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पोखरकर यांनी भरलेला उमेदवारी अर्ज सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. अर्ज दाखल करतेवेळी त्यांनी लहान मुलांकडून गोळा करून आणलेली दहा हजार रुपयांची अनामत रक्कम म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांना दिली; परंतु वेळेअभावी निवडणूक अधिकाऱ्यांनी केवळ एक हजार रुपयांची नाणी स्वीकारून उरलेली रक्कम नोटांमध्ये स्वीकारली. नवी मुंबई शहराचा सर्वांगीण विकास, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी, तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, स्त्रियांचे संरक्षण, अल्प उत्पन्न गटातील मुलांना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि नागरिकांच्या कराच्या पैशांची चाललेली उधळण रोखण्यासाठी तसेच शहरातील स्थानिक भूमिपुत्र, मराठा समाजासह सर्वच जाती- धर्मातील लोकांना घेऊन एकत्र विकास करणे, हाच ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा माझा अजेंडा असल्याचे मत विनोद पोखरकर यांनी व्यक्त केले.

अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी मुंबई : अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी आली असून त्यात धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली आहे. वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक पोलिसांना मंगळवारी याबाबत संदेश प्राप्त झाला आहे. आरोपीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असून दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यापूर्वीही सलमानला अशा प्रकारे धमकी देण्यात आली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमकीचा संदेश आला असून संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय भाजी विक्रेत्याला वरळी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचून वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एक संदेश पाठवून आरोपीने माफीही मागितली होती. तसेच आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातही धमकी देणाऱ्याला नुकतीच अटक करण्यात आली. आरोपीने झिशान सिद्दिकीसोबत सलमानलाही धमकावले होते.

– गजानन मार्केटमधील कपड्यांच्या दुकानाला आग

कपड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगरच्या गजबजलेल्या कॅम्प दोन मधील गजानन मार्केटमध्ये अचानक लागलेल्या भीषण आगीने खळबळ उडवली आहे. या आगीत एका कपड्याचे दुकान जळून खाक झाले असून, दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य काही क्षणातच राख झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने दाखल झाल्या असून, जवानांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले आहे. सकाळी अचानक आगीची घटना घडली, आणि ती पाहताच मार्केटमधील व्यापारी आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आगीच्या तीव्रतेमुळे गजानन मार्केटच्या इतर दुकानदारांनी त्यांच्या दुकानांमधील माल बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच आग एवढी पसरली की दुकानातील संपूर्ण कपड्यांचे साहित्य जळून खाक झाले. मार्केटमधील व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले असून, पुढील काही दिवसांमध्ये त्यांचा व्यवसाय कसा उभा राहणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. मोठ्या प्रयत्नांनंतर काही प्रमाणात आग आटोक्यात आली असून, जवळपासच्या इमारतींना कोणताही धोका पोहोचू नये याची खबरदारी घेतली जात आहे. मात्र, या आगीच्या दुर्घटनेने मार्केटमधील अन्य दुकानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर विचार सुरू झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे, आणि प्रशासनाने मार्केटमधील दुकानदारांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

९ आणि १० नोव्हेंबर रोजी ठाण्यात सायन्स ऑफ हिलिंग शिबिर

मुंबई : शक्तीशाली मंत्रसाधनेद्वारे मधुमेह, हृदयविकार, फ्रोजन शोल्डर, मणक्यांचे विकार इ. जुनाट आजारांवर तात्काळ सकारात्मक बदल घडवून आणणारे तसेच प्रत्येकातील रोगनिवारण शक्ती जागृत करणारे, ‘अंतर योग’ या फोर्ट, मुंबई स्थित…

 राज्यपालांच्या हस्ते ‘वस्त्ररत्न’, ‘वस्त्रभूषण’ ‘वस्त्र शिरोमणी’ पुरस्कार प्रदान,

भारतीय वस्त्रोद्योगाला पुढील १०० वर्षे उत्तम भवितव्य : राज्यपाल अशोक गायकवाड मुंबई :कृषीनंतर वस्त्रोद्योग हे सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. शिक्षित तसेच अशिक्षित लोकांना सामावून रोजगार मिळवून देणारे हे देशातील महत्वाचे क्षेत्र आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात आधुनिकीकरण व कालानुरूप बदल केल्यास पुढील किमान १०० वर्षे भारतीय वस्त्रोद्योगाला उत्तम भवितव्य राहील. मात्र जोवर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक होत नाही तोवर या वस्त्रोद्योग क्षेत्रात आघाडीवर राहता येणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉटन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (टेक्सप्रोसिल) या संस्थेचा ७० वा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा हॉटेल जे डब्ल्यू मॅरिअट, सहार मुंबई येथे सोमवारी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेच्या संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला टेक्सप्रोसिलचे अध्यक्ष सुनील पटवारी, केन्द्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, टेक्सप्रोसिलचे उपाध्यक्ष विजय अग्रवाल, कार्यकारी संचालक डॉ. सिद्धार्थ राजगोपाल आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.जगातील प्रत्येक प्रगतिशील देशांच्या विकासात वस्त्रोद्योग क्षेत्राचे योगदान मोठे असल्याचे सांगून देशांची अर्थव्यवस्था वाढते तेंव्हा दुर्दैवाने वस्त्रोद्योग क्षेत्रावरच प्रथम विपरीत परिणाम होतो असे राज्यपालांनी सांगितले. वस्त्रोद्योग क्षेत्रात अनेक हितधारक असतात. त्यामुळे प्रत्येक हितधारकाची काळजी न घेतल्यास उद्योग कोसळेल असे राज्यपालांनी सांगितले. आपण स्वतः वस्त्रोद्योग निर्यात संस्थेचे सदस्य होतो. सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना वस्त्रोद्योग क्षेत्र मोठे योगदान देईल असा विश्वास वाटतो. या संदर्भात वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना काही अडचण आल्यास आपण केंद्र सरकारकडे व्यक्तिशः पाठपुरावा करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.राज्यपालांच्या हस्ते भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कॉटन मॅन ऑफ इंडिया’ सुरेश कोटक यांना ‘वस्त्र शिरोमणी’ पुरस्कार देण्यात आला. संजय जयवर्थनलू (वस्त्र विभूषण) व राजेंद्रकुमार दालमिया (वस्त्र भूषण) यांना देखील सन्मानित करण्यात आले. अनिल कुमार जैन, एम. नाचिमुथू, दीपाली गोयंका, राजिंदर गुप्ता, एस पी ओसवाल, कुलिन लालभाई आदींना यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वस्त्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मतदार जागरुकतेच्या कार्यक्रमांना वेग

वाशी : विधानसभा निवडणूक मतदार जागरूकता कार्यक्रमांतर्गत ऐरोली व बेलापूर या नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात स्वीप कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वीपचे नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्यात येत आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील ऐरोली सेक्टर १७ येथील पोस्ट ऑफिसमध्ये स्वीप पथकाने जाऊन तेथील अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांचे मतदान करण्याविषयी प्रबोधन केले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयातही डॉक्टर, नर्स, तेथील रुग्णालयीन कर्मचारी यांना भेटून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशीही संवाद साधून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तुर्भे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातही स्वीप पथकाने भेट देऊन डॉक्टर, नर्स व तेथे उपस्थित असलेल्यांना मतदान करण्याविषयी प्रोत्साहित केले. घणसोली रेल्वे स्थानकावरील रिक्षाचालकांशी सुसंवाद साधत त्यांना मतदान करण्याविषयी आवाहन करत रिक्षावर मतदानाचा संदेश असलेले स्टीकर्स लावण्याविषयी सांगण्यात आले. मतदानाची प्रतिज्ञा ग्रहण, रॅली स्वीप पथकाने ऐरोली येथे फटाके विक्रीच्या स्टॉलला भेट देऊन विक्रेते व ग्राहक यांनाही मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बेलापूर विधानसभा मतदारसंघातही सेक्टर २५ येथील समाजमंदिर सभागृह, जुईनगर, नेरूळ या ठिकाणी उपस्थित नागरिकांना २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करत त्यांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले. तुर्भे गाव सेक्टर २३ व सेक्टर २२ या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर रॅली काढली व उपस्थितांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. सर्व ठिकाणी मतदानाची प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली.

अहो, माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे

राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची जागा मनसेने मागितली होती. या दोन्ही जागांवरुन शिंदे गटाचे उमेदवार निवडून येणार नाहीत, असे आम्ही तेव्हाच सांगितले होते. या दोन्ही जागा निवडून आणणे तुमच्या हातातील गोष्ट नाही, या जागा तुम्हाला लागणार नाहीत, असे आम्ही सांगितले होते. या दोन्ही जागा मनसेला लढवू द्या. आम्ही त्या जागा 100 टक्के जिंकल्या असत्या. पण त्यावेळी शिंदे गटाकडून मनसेच्या उमेदवारांनी आमच्या चिन्हावर लढावे, असे सांगितले. निवडणूक आमच्या निशाणीवर लढली गेली पाहिजे. त्यावर मी बोललो की, अहो आमच्या पक्षाची निशाणी कमावलेली आहे, ती ढापलेली नाही. आमची निशाणी ही निवडणुकीच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात मिळाली आहे. लोकांच्या मतदानामुळे ही निशाणी आम्हाला मिळाली, ती कोर्टातून आलेली नाही, असा टोला राज ठाकरे  यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीविषयी नाराजी व्यक्त केली. असा प्रकार कोणत्याही पक्षासोबत होता कामा नये. मी अशी गोष्ट केलेली नाही. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा शक्य असूनही आमदार फोडले नाहीत. मग मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. मला अशाप्रकारे फोडाफोडी करुन कधीही सत्ता नको, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. अमित ठाकरेंना उद्धव यांचा पाठिंबा नाही, राज ठाकरे म्हणाले… आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुकीला उभे राहिले होते, तेव्हा मी विचार केला की, विरोधातील पक्ष असला तरी मी नातेसंबंध जपणारा आहे. मी त्या विचारात वाढलेला आहे. मला त्यावेळी वाटलं की, वरळीत मनसेची 38-39 हजार मतं आहेत,तरीही आदित्य तिकडे लढतोय, मग तिकडे मनसेचा उमेदवार नको देऊयात. मी जो विचार करतो, तेवढ्याच सुज्ञपणे समोरचा विचार करेल, ही माझी अपेक्षा नाही. मी चांगल्या हेतूने जी गोष्ट केली, तीच गोष्ट दुसरा माणूस करेल किंवा त्याने करावी, असे नाही. आदित्यविरोधात वरळीत उमेदवार द्यायचा नाही हे मी ठरवले, तेव्हा मी फोन करुन कोणाला सांगितले नाही. मला तेव्हा आदित्यविरोधात उमेदवार देऊ नये, असे वाटले, मला या निर्णयाचा कोणताही पश्चाताप नाही. अमित विरोधात माहीममध्ये उमेदवार देणे हा, हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असं नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

३८ हजार कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा,

एक लाख ११ हजार १६९ कामगारांची कागदपत्रे सादर मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ११ हजार १६९ कामगारांनी कागदपत्रे सादर केली आहेत. यापैकी ९९, १६० गिरणी कामगार आणि त्यांचे वारस पात्र ठरले आहेत. मागील तीन ते चार महिने कागदपत्रे जमा होण्याच्या प्रक्रियेचा वेग मंदावला असून ३८ हजारांहून अधिक कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा आहे. गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेसाठी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी मुंबई मंडळाकडे अंदाजे पावणेदोन लाख अर्ज सादर केले होते. यापैकी दीड लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती होणे शिल्लक होते. मुंबई मंडळाच्या धोरणानुसार सोडत जाहीर झाल्यानंतर विजेत्या कामगारांची पात्रता निश्चिती केली जात होती. मात्र यावर आक्षेप घेत गिरणी कामगार संघटनांनी सोडतीआधीच सर्वच्या सर्व गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती पूर्ण करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून राज्य सरकारने दीड लाख गिरणी कामगार, वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक विशेष मोहीम हाती घेतली. मुंबई मंडळाने या मोहिमेअंतर्गत ऑनलाइन आणि उपस्थित राहून पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेण्यास सुरुवात केली. या मोहिमेला गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी चांगला प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने कागदपत्रे जमा होऊ लागली. तर दुसरीकडे जमा कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चितीचे काम कामगार विभागाने सुरू केले होते. या मोहिमेअंतर्गत मे २०२४ पर्यंत एक लाख ११ हजार ८९ कामगारांनी कागदपत्रे सादर केली होती. सहा महिन्यांत ७० जणांचीच कागदपत्रे सादर मे महिन्यानंतर कागदपत्रे जमा करण्याचा वेग मंदावला. त्यामुळेच मे ते २४ ऑक्टोबर या कालावधील अंदाजे ७० जणांनीच कागदपत्रे सादर केली आहेत. मंडळाला मेपासून ३८ हजारांहून अधिक कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा आहे. मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२४पर्यंत एक लाख ११ हजार १६९ जणांनी कागदपत्रे जमा केली आहेत. ऑनलाइन पद्धतीने एक लाख ७८६ तर उपस्थित राहून १० हजार ३८३ जणांनी कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी ९९ हजार १६० गिरणी कामगार आणि त्यांचे वारस पात्र ठरले. तर ६९३ कामगारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. एकूणच आता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस कागदपत्रे जमा करण्यासाठी पुढे येत नसल्याने ३८ हजारांहून अधिक अर्जदार कामगार गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

डोंबिवलीत फडके रोडवर ढोलताशाला बंदी,  डिजेला परवानगी

डोंबिवली : दिवाळी सणानिमित्त गुरुवार, शुक्रवार डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर तरुणाईचा जल्लोष असतो. फडके रस्ता तरुणाईने गजबजून गेलेला असतो. या कालावधीत चेंगराचेंगरी किंवा अन्य कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी, तसेच विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी फडके रस्ता भागात ढोलताशा वादनास पोलिसांनी बंदी घातली आहे. असं असतांना डीजे लावून कार्यक्रमाला परवनागी देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ध्वनी मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या एका कार्यक्रमाला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ढोलताशाला बंदी असं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे फडके रस्त्यावर वर्षानुवर्ष होणारे डीजे लावणे आणि त्या गाण्यांवरील नृत्याचे कार्यक्रम पार पडणार आहेत. आचारसंहितेमुळे पक्षीय नेते या कार्यक्रमात किती सहभागी होतात याविषयी अनेकांनी अनभिज्ञता दर्शवली. श्री गणेश मंदिर संस्थानने दिवाळी पहाट कार्यक्रम शांतते पार पडेल या दृष्टीने नियोजन केले आहे. दरम्यान “दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त काही संस्था फडके रस्त्यावर डीजे लावून कार्यक्रम सादर करतात. या संस्थांनी ध्वनी मर्यादाचे पालन करून डीजे लावायचे आहेत. ध्वनी मर्यादेचे पालन, इतर कोणालाही कर्णकर्कश आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यायची आहे. आचारसंहितेचे पालन हा यात महत्वाचा विषय आहे” असं रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले. तसंच त्यांनी डोंबिवली परिसरातील ढोलताशा पथकांना नोटीस पाठवून ढोलताशा वादन बंदीचे पालन करण्याचे सूचित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. फडके रस्ता, नेहरू रस्ता, अप्पा दातार चौक, मदन ठाकरे चौक भागात ढोलताशा वादनास बंदी असणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील फडके रस्त्यावर जमवून दिवाळी सणाच्या आप्तस्वकीय, मित्र, मैत्रिणींना शुभेच्छा देण्याची जुनी परंपरा आहे. डोंबिवलीसह बदलापूर, कल्याण, ठाणे, पलावा परिसरातून तरुण, तरुणी दिवाळी सण साजरा करण्यासाठी फडके रस्त्यावर येतात. या उत्साही तरुणांमुळे फडके रस्ता गजबजून जातो. सन २०२३ मध्ये दिवाळी पहाटनिमित्त फडके रस्त्यावर तरुणांची गर्दी जमली होती. याचवेळी या रस्त्यावर ढोलताशा पथकांचे वादनाचे कार्यक्रम सुरू होते. हे ढोलताशा वादन बघण्यासाठी खूप गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. हा प्रकार टाळण्यासाठी, तसेच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी, परिसरातील शांततेचा भंग होऊ नये म्हणून दिवाळी पहाटच्या दिवशी फडके रस्ता परिसरात रामनगर पोलिसांनी ढोलताशा पथकांना वादनास बंदी केली आहे. दिवाळी सण आनंदाचा दिवस आहे. या दिवशी कोणतीही दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडणे योग्य होणार नाही. ढोलताशा पथकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती करू नये. वादन बंदीच्या नोटिशीचा ढोलताशा पथकांनी भंग करू नये. तसा प्रकार कोणी केल्यास त्यांच्यावर कायदेशीवर कारवाई केली जाईल. ही नोटीस न्यायालयीन पुरावा म्हणून अंमलात आणण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. फडके रस्ता भागात रुग्णालये आहेत. काही घरांमध्ये आजारी रुग्ण, लहान बाळ असतात. त्यांना ढोलताशा पथकांच्या कानठळ्या बसणाऱ्या वादनाचा सर्वाधिक त्रास होतो. अशा तक्रारी यापूर्वीच या भागातील नागरिकांंनी केल्या आहेत. वाहतुकीस बंदी फडके रस्त्यावर दिवाळी पूर्व संध्या, दिवाळी पहाट हे कार्यक्रम होणार असल्याने वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत फडके रस्त्यावरील वाहतूक नागरिकांच्या सोयीसाठी, फडके रस्त्यावरील उत्सवी कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पर्यायी मार्गाने वळवीली आहे. फडके रस्त्यावरील बाजीप्रभू चौकातून आप्पा दातार चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फडके रस्ता आप्पा दातार चौक येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. फडके रस्त्याकडे येणारी वाहने जोशी हायस्कूल, नेहरू रस्त्याने डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येतील. एमआयडीसी परिसरातून डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने टिळक रस्ता, सावरकर रस्ता, इंदिरा चौकमार्गे रेल्वे स्थानकाकडे जातील. 0000