Category: मुंबई

Mumbai news

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा `पाऊसवेळा’ कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार दिनांक ८ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता `पाऊसवेळा’ हा कार्यक्रम डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला असून रसिकांसाठी खुला आहे. पावसाआधीचा पाऊस ते परतीचा पाऊस, शैशवातला पाऊस ते प्रौढपणीचा पाऊस, पहाटेपासून मध्यरात्रीपर्य॔तचा पाऊस, आतला नि बाहेरचा पाऊस…..अनुभवा ही यामागची संकल्पना आहे. मराठीतील नव्या जुन्या साहित्यिकांच्या शब्दातून झरणाऱ्या पावसाची अनंत रूपे यावेळी रसिकांना अनुभवता येतील. या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन डॅा. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे आहे तर अभिवाचन गिरीश दातार आणि श्रीमती गौरी देशपांडे करतील. त्यांना धनश्री गणात्रा संगीतसाथ देतील.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पहिल्या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर यांच्या सहयोगाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथे १ जून २०२४ रोजी महाराष्ट्रातील कॅरम खेळाडूंसाठी पहिले वातानुकूलित प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रात एकंदर ८ कॅरम बोर्ड मांडण्यात आले असून सायंकाळी ५ ते रात्रौ ९ दरम्यान हे केंद्र सराव व प्रशिक्षणासाठी खुले असणार आहे. महाराष्ट्रातील नोंदणीकृत खेळाडूंसाठी हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय व अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेपूर्वी  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरुष व महिला गटातील खेळाडूंचे शिबीर या केंद्रात आयोजित केले जाणार आहे. विशेष करून ज्युनिअर गटातील मुला मुलींना या प्रशिक्षण केंद्रात खेळाच्या प्रशिक्षणासोबतच नियमांची माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड वेणू नायर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी कॉम्रेड वेणू नायर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गरजू खेळाडूंना या उपक्रमाचा विशेष फायदा व्हावा व महाराष्ट्रात अधिक गुणी खेळाडू तयार व्हावेत म्हणून या केंद्रासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिशनला स्पर्धा आयोजित करण्यासाठी संस्थेचा हॉल व इतर सहकार्य करण्याची ईच्छा व्यक्त केली. असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमासाठी कॉम्रेड वेणू नायर यांनी रुपये १ लाख देणगी जाहिर केली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने  मानद सचिव अरुण केदार यांनी नॅशनल मजदूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड वेणू नायर, युनियनचे सहाय्यक चिटणीस कॉम्रेड विनय सावंत तसेच इन्स्टिट्यूटचे सचिव कॉम्रेड चेतन सावल यांचे कॅरमचे घड्याळ भेट देऊन स्वागत केले. तसेच प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्धल आभार मानले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार उपस्थित होते. शिवाय अनेक कॅरम खेळाडूंनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला प्रतिसाद नोंदविला. अधिक  माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क करावा.

पावसाळ्यात इनडोअर क्रिकेटच्या सुविधांचा लाभ घ्या – वेंगसरकर

मुंबई : या वर्षीचा क्रिकेट मौसम आता संपला असून लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. मात्र पाऊस आहे म्हणून चार महिने घरात बसून न राहता या वेळेचा सदुपयोग करताना शारीरिक फिटनेस आणि क्रिकेटचं तंत्र पक्कं कारण्यासाठी इनडोअर क्रिकेटच्या सुविधांचा लाभ करून घ्या असे आवाहन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी एजिस फेडरल इन्शुरन्स कप या १५ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केले. तुम्ही जर असे केलेत तर ऑक्टोबर मध्ये जेव्हां नवीन मोसमाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही फॉर्मात राहू शकाल. मुंबईतील युवा क्रिकेटपटूनसाठी  पावसाच्या चार महिन्यात इनडोअर क्रिकेटच्या सुविधा या महत्वपूर्ण ठरू शकतात असेही त्यांनी पुढे सांगितले. माहुल, चेंबूर येथील वेंगसरका क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पोर्टींग्स क्लब कमिटी ठाणे संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी मुंबई क्रिकेट क्लब संघावर ९९ धावांनी विजय मिळविला. मुंबई क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र याचा लाभ उठवत स्पोर्टींग्स क्लब कमिटी संघाने निर्धारित ४० षटकांत ७ बाद २५७ धावांचे लक्ष्य उभारले.  त्यांच्या प्रणव अय्यंगार याने सर्वाधिक ७९ धावा करताना तिसऱ्या विकेटसाठी रुद्र बन्दीछोड (४४) याच्या साथीने ९१ धावांची तर नंतर युग पाटील (४५) यांच्यासह चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भर टाकली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई क्रिकेट क्लबच्या अरहाम शहा (४७) आणि आरव ठाकर (४६) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली त्यावेळी हा संघ जोरदार लढत देणार असेच वाटत होते. मात्र हे दोघे बाद होताच त्यांच्या अन्य फलंदाजांनी देवांश शिंदेच्या अचूक गोलंदाजीसमोर सपशेल शरणागती पत्करली. देवांशने केवळ १८ धावांत ७ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवत त्यांचा डाव ३३ षटकांत १५८ धावांतच गुंडाळला. देवंशाला युग पाटीलने २६ धावांत २ बळी मिळवत चांगली साथ दिली.  अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अपेक्षेप्रमाणेच देवांश शिंदेची निवड करण्यात आली.  स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणून कृष्णा पोस्वाल (१३ बळी) याला गौरविण्यात आले तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून अरहाम शहा (१६२ धावा) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून श्लोक शिगवण (५ झेल) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एम.सी.ए.चे खेळपट्टी बनविण्यात विशेषज्ञ  नदीम मेनन आणि एजिस फेडरलचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय गंगार्डे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक –  स्पोर्टींग क्लब कमिटी ठाणे – ४० षटकांत ७ बाद २५७ ( विवान हजारे २५, रुद्र बन्दीछोड ४४, प्रणव अय्यंगार ७९, युग पाटील ४५) वि वि. मुंबई क्रिकेट क्लब – ३३.१ षटकांत सर्वबाद १५८ (अरहाम शहा ४७, आरव ठाकर ४४; देवांश शिंदे १९ धावांत ७ बळी , युग पाटील २६ धावांत २ बळी )

मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडा – जिल्हाधिकारी संजय यादव

निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून अशोक गायकवाड मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी,आढावा घेताना दिल्या. मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. ४ जून, २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी शनिवार,(दि.१ जून २०२४) रोजी शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करून मतमोजणीसाठी आवश्यक उपाययोजना आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे,पोलीस उपायुक्त संजय लाटकर, मुंबई राज्य वातावरणीय कृती कक्षाचे स्ट्राँग रूम संचालक तथा समन्वय अधिकारी अभिजीत घोरपडे,तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था,माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणी पथके, आपत्कालीन कंट्रोल रूमची पाहणी करून चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि अखंडित व सुरळीत वीजपुरवठा राहील यादृष्टीने सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या. मतमोजणी केंद्राच्या परिसरातील स्वच्छता आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुरक्षा उपाययोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. मतमोजणी केंद्रातील नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष, चौकशी कक्ष आणि वैद्यकीय कक्ष उपलब्ध असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत संबंधितांना सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार ॲड अनिल परब उद्या उमेदवारी दाखल करणार मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार ॲड अनिल परब हे उद्या सोमवारी, ३ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबईतील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल कीर्तिकर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेस लोकसभा उमेदवार भूषण पाटील तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी १२ वाजता अनिल परब हे कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे उमेदवारी दाखल करतील. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. उमेदवारी दाखल  करतेवेळी तीन हजार शिवसैनिक, युवसैनिक तसेच पदवीधर मतदार यांची उपस्थिती राहणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधान परिषदेच्या चार जागांसाठी ८ मे रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार म्हणून अनिल परब यांच्या नावाची घोषणा मागच्या आठवड्यात केली. महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित झालेला नसल्यामुळे परब यांनी निवडणुकीत विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. यासंदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले की, ‘गेली तीस वर्ष मुंबई पदवीधर मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे. मतदार नोंदणी आणि प्रचार यामध्ये शिवसेनेने आघाडी घेतली आहे. यावेळीसुद्धा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून माझा विजय विक्रमी मताधिक्यांनी  निश्चित आहे.’ २००४ तसेच २०१२ आणि २०१८ असे तीन वेळा अनिल परब हे विधानपरिषदेचे शिवसेना आमदार राहिलेले आहेत. यावेळी प्रथमच ते मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. या मतदार संघात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी १ लाख १६ हजार ९२३ मतदार आहेत. विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ असे मतदान आहे. १ जुलै रोजी मतमोजणी आणि निकाल घोषित होणार आहे. ज्या ४ जागांसाठी निवडणूक होत आहे, त्या मतदारसंघातील चार विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

६ आणि ७ जून रोजी पाणीपुरवठा बंद

करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळमध्ये मुंबई : महानगरपालिकेने शहर विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जुन्या व जीर्ण जलवाहिनींच्या बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. याअंतर्गत ‘जी दक्षिण’ विभागातील रेसकोर्स येथे प्रत्येकी १ हजार ४५० व्यासाच्या तानसा (पूर्व) व तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. परिणामी, जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा ६ जून रोजी रात्री ९.४५ वाजल्यापासून ७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या दुरुस्तीकामासाठी १७ तास १५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या दुरुस्ती कामादरम्यान जी दक्षिण विभागातील करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल रोज, बीडीडी चाळ, लोअर परळ या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. तसेच, पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मुंबई स्वच्छता मोहिमेत

१५७ मेट्रिक टन राडारोडा व ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन मुंबई : महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांतील विविध ठिकाणी शनिवारी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यातून सुमारे १५७ मेट्रिक टन राडारोडा, २३ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू आणि ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, जवळपास २८३ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. मुंबईत गेल्या २८ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत शनिवारी सर्व प्रशासकीय विभागात लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी सुमारे १५७ मेट्रिक टन राडारोडा, २३ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, सुमारे २८३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर ब्रशिंग करून धूळ काढण्यात आली. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर, फायरेक्स यंत्र, मिस्टींग यंत्र आणि अन्य अद्ययावत यंत्रणासह तब्बल १ हजार ३३२ कामगार व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम पूर्ण केली. पालिकेच्या ए विभागातील बोरा बाजार, सर फिरोजशाह मेहता मार्ग, पेरी नरिमन मार्ग, डी विभागात नाना चौक, ताडदेव सर्कल, जावजी दादाजी मार्ग, जी दक्षिण विभागात धोबीघाट, सुदाम काळू अहिरे मार्ग, जी उत्तर विभागात शाहूनगर, धारावी, एच पूर्व विभागात सांताक्रुज येथे इंडियन ऑईल कंपनी प्रवेशद्वार ते हनुमान टेकडी परिसर, के पूर्व विभागात प्रभाग ८३ मधील झोपडपट्टी व आसपासचा परिसर, के पश्चिम विभागात वेसावे येथील मत्स्य पालन विद्यापीठ मार्ग, सुंदरवाडी, एल विभागात साकीनाका येथील एस. जे. स्टुडिओ ते खैरानी मार्ग, एम पूर्व विभागात सोनापूर मार्ग, पी दक्षिण विभागात महात्मा गांधी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, पी उत्तर विभागात मालाड पश्चिम येथील जोड रस्ता, आर दक्षिण विभागात कांदिवली पूर्व येथे आकुर्ली मार्ग, आर उत्तर विभागात दहिसर पश्चिम, आर मध्य विभागात अमरकांत झा मार्ग, ब्रह्मा विष्णू महेश मार्ग, शिंपोली मार्ग, मल्हारराव कुलकर्णी मार्ग, टी विभागात मुलुंड आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्याच्या येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहावे

लेखा व कोषागारे संचालनालयाचे आवाहन मुंबई : अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमधून निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान…

रवीना टंडनबरोबर भररस्त्यात बाचाबाची

कार पार्किंगवरून वाद, प्रकरण थेट पोलिसांत! मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन सध्या चित्रपटसृष्टीपासून काहीशी लांब गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मात्र, शनिवारी रात्री घडलेल्या एका प्रसंगामुळे रवीना टंडन चर्चेत आली…

ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात वृक्षारोपण

 ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात चाणक्य सिग्नल जवळ पूर्वेकडील बाजूस…