निकालावर होणार थेट परिणाम विरार : नालासोपारा व बोईसर मतदारसंघातील तब्बल दीड लाख मतदात्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याचे निरीक्षण बहुजन विकास आघाडीने नोंदवले आहे. यात नालासोपारा मतदारसंघातून 1,09,069 तर, बोईसर विधानसभा मतदारसंघातून 55,332 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. ही नावे जाणीवपूर्वक व हेतूपुरस्सर वगळण्यात आली आहेत. त्यामुळे 2024 च्या पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. निवडणूक प्रशासकीय यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि डोळेझाक या सगळ्याला कारणीभूत आहे, असे मत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, मतदानापासून वंचित राहिलेल्या शेकडो मतदात्यांनीही याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 2019 साली नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या 5,12,425 इतकी होती. 2024 मध्ये यातील 1,09,069 नावे काढून टाकण्यात आली आहेत. 2024 मध्ये 5,57,547 इतकी मतदारांची नोंद आहे. या वर्षी यात 1,53719 इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. बोईसर मतदारसंघात 2019 साली 3,14,213 इतकी मतदारसंख्या होती. त्यापैकी 55,332 इतकी नावे या वर्षी काढून टाकण्यात आलेली आहेत. तर, 2024 मध्ये बोईसर मतदारसंघातील मतदारसंख्या 3,84,201 इतकी नोंदवण्यात आलेली आहे. यात या वर्षी 1,26,245 इतके मतदार वाढलेले आहे, असे निरीक्षण बहुजन विकास आघाडीने नोंदवले आहे. मात्र, या याद्या मागील वर्षीच्या तुलनेत या वेळी जास्तच सदोष आहेत. त्यामुळे या वर्षी तब्बल दीड लाखाहून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. याचा थेट प्रभाव मतदान टक्केवारी आणि निकालावर होणार आहे. निवडणूक यंत्रणाचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. मतदारयादीत प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घेतले जात नाही. त्यांच्या सूचना अथवा मार्गदर्शन घेतले जात नाही. सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सी अथवा शासकीय कर्मचारी यांच्या मार्फत सर्व्हे करून या याद्या तयार केल्या जातात. त्यामुळे मतदाराची निश्चित माहिती त्यांना प्राप्त होत नाही. याचे परिणाम म्हणून त्रोटक माहितीआधारे ही नावे वगळण्यात किंवा काढून टाकण्यात येतात. मतदार याद्या निर्दोष बनवायच्या तर स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींचा त्यातील सहभाग वाढविला गेला पाहिजे, असे मतही बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, नालासोपारा व बोईसर मतदारसंघातून गावनिहाय काढून टाकण्यात आलेल्या मतदारांची संख्याही बहुजन विकास आघाडीने समोर आणली आहे. विशेष म्हणजे या मतदारांनी मागील वर्षी मतदान केले होते. मात्र, त्यांची नावे आता या यादीत नाहीत. शिवाय एकाच कुटुंबातील काही व्यक्तींची नावे सापडत असतील तर इतरांची सापडत नसल्याच्या मतदात्यांच्या तक्रारी आहेत. पतीचे नाव असेल; तर त्याच्या पत्नीचे नाव सापडत नव्हते. मृत व्यक्तीचे नाव यादीत सापडत होते; पण जिवंत व्यक्तीचे नाव सापडत नव्हते. त्यामुळे नालासोपारा मतदारसंघांतील बहुतांश मतदार मदत कक्षांबाहेर मतदात्यांच्या संतप्त प्रतिक्रया उमटताना दिसत होत्या. या मतदार यादी ज्यांच्यामार्फत व ज्यांच्या माध्यमातून बनविण्यात आल्या; त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या मतदात्यांनी लावून धरली आहे. विशेष करून यात मराठी व्यक्तींची नावे मोठ्या प्रमाणात काढून टाकण्यात आली आहेत, असे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.