नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा अत्यावश्यक सेवासुविधांवर भर
नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा अत्यावश्यक सेवासुविधांवर भर मुकुंद रांजणे माथेरान :पर्यटक आणि नागरिकांना भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी, समस्या त्याचबरोबर प्रलंबित प्रश्नांची उकल करण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी अत्यावश्यक सेवासुविधांवर लक्ष केंद्रित केले असून गावातील विविध ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी शौचालयांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहेत त्याबाबत पाहणी करून ती अद्ययावत करण्याबाबत संबंधित अधिकारी वर्गाला सूचना केल्या आहेत. मुख्य पॉईंट असणाऱ्या एको पॉइंट वर पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी असते त्याठिकाणी वनखात्याच्या अंतर्गत शौचालय बांधण्यात आलेले आहेत परंतु त्या शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.त्यामुळे ती वापर करण्यास अयोग्य आहेत. याचा नाहक त्रास पर्यटकांना विशेष करुन महिला पर्यटकांना प्रकर्षाने जाणवत आहे. अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत सुविधांचा अभाव याठिकाणी भासू नये यासाठी खुद्द नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्गासोबत प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली आहे.वनखात्याच्या संबंधित अधिकारी वर्गास सुध्दा त्यांच्या अखत्यारीत असलेल्या शौचालयांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी असे सूचित केले आहे. प्रशासकीय राजवटीत अनेक महत्वपूर्ण कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत.त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून नागरिक आणि पर्यटकांना भेडसावत असणाऱ्या समस्या मार्गी लागतील असा नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे. ———————————————- जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केलेले आहे. प्रथम नागरिक या नात्याने आम्हाला समस्त नागरिकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.आमच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारची महत्वपूर्ण कामे यामध्ये पर्यटक आणि नागरिकांना अभिप्रेत असणारी कामे,सेवासुविधा प्रलंबित न राहता ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व सदस्यांसोबत प्रयत्नशील आहोत. चंद्रकांत चौधरी—नगराध्यक्ष माथेरान
