Category: ठाणे

Thane news

दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन संपन्न!

ठाणे : मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि स्वराज्य सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांचे विनामूल्य प्रदर्शन ठाणे पूर्व येथील महापालिकेचे खुले कलादालनात संपन्न झाले. प्रदर्शनाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव मंडलिक यांनी हस्ते केले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक सावंत हे आवर्जून उपस्थित होते. प्रदर्शनात महाराष्ट्रातून विविधांगी सुमारे २५० हून अधिक दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात आले होते. दिवाळीअंक वाचकांची याप्रसंगी लक्षणीय उपस्थिती होती. निशिकांत महांकाळ, विनोद भोईर, हेमंत आळवे, विनोद ठाणेकर आदी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक मनोहर चव्हाण यांनी प्रास्ताविकातून दिवाळी अंकांची माहिती व महती सांगून संस्था हा उपक्रम अनेक वर्ष एक सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक लोकांना निदान एकाच ठिकाणी चाळता  यावेत, हाताळता यावेत यासाठी संस्था हा उपक्रम अनेक वर्ष राबवीत आहे असे प्रतिपादन केले. स्वराज सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.

 कर्णबधिर मुलेही गिरवू लागली ए.आय.चे धडे !

देशातील पहिलाच प्रयोग दापोलीत; अद्ययावत लॅबची उभारणी     ठाणे : नियतीने केलेल्या अन्यायामुळे बोलता आणि कानाने ऐकता न येणार्‍या मुलांसाठी आज अनेक संस्था धडपडत आहेत. या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. शिकून हिच मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली पाहिजेत म्हणून काही संस्था, व्यक्तींचे काम सुरू आहे. भारतातील पहिली कर्णबधीर मुलांसाठीची ‘ए.आय. आणि रोबोटिक्स’ लॅब स्थापन झाली आहे. दापोली येथील इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयातील 30 कर्णबधिर विद्यार्थी ए.आय. (कृत्रीम प्रज्ञा) आणि रोबोटिक्सचे धडे घेऊ लागले आहेत. स्काय रोबोटिक्स पुणे यांच्या माध्यमातून भारतातील ही पहिली कर्णबधिर मुलांसाठीची लॅब निर्माण करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. स्काय रोबोट़िक्सचे संचालक अभिजीत सहस्त्रबुद्धे व कृष्णमूर्ती बुक्का यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. दापोली या ठिकाणी इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ही मोठी उपलब्धी झाली आहे. आज अनेक मोठ्या शाळांमध्ये देखील ए. आय. आणि रोबोटिक्सचे शिक्षण मिळत नाही. मात्र, या संस्थेने बोलता आणि ऐकता न येणार्‍या या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी हे शिक्षण सुरू केले आहे. त्यासाठी अद्ययावत लॅब तयार करण्यात आली असून आवश्यक संगणक, अभ्यासक्रमाचे सर्व साहित्य उपलब्ध केले आहे. या शाळेतील शिक्षिका श्रद्धा गोविलकर या विद्यार्थ्यांना ए.आय. आणि रोबोटिक्सचे धडे देत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी स्वत: पुणे येथे जाऊन प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ए.आय. व रोबोटिक्सचे धडे देत आहेत. या कर्णबधिर विद्यालयात दहावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांमधील सर्जनशिलता, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यांना वाव देण्यासाठी स्काय रोबोटिक्सने कर्णबधिर विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या मुलांना एकविसाव्या शतकातील कौशल्यांच्या विकासासाठी प्रेरित करावे, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन व्हावे या हेतूने या ठिकाणी ही सुविधा मोफत देण्यात आली आहे. येथील मूकबधिर विद्यार्थी आता ए.आय. व रोबोटिक्सचे धडे घेत असून त्यांनी कोडिंगचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे. या पुढच्या काळात अ‍ॅप डेव्हलपिंग, गेमिंग असे अभ्यासक्रम देखील त्यांना शिकविले जाणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्याने प्रकाश निर्माण होणार आहे. दापोली येथील डॉ. गंगाधर विनायक काणे यांनी 1984 मध्ये स्नेहदीप संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या अंतर्गत इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय हे गेली अनेक वर्षे सुरू आहे. या विद्यालयातून आजपर्यंत 280 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले आहेत. कर्णबधिर असूनही यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वत:चे उद्योग व स्वयंरोजगार सुरू केला आहे. या विद्यालयात कर्णबधिरांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अद्ययावत आहेत. साऊंड प्रूफ रूम, ऑडिओ मीटर, डॉक्टर स्पीच, समूह श्रवण यंत्र या शिवाय आता संगणक लॅब देखील अद्ययावत झाली आहे. कोट स्नेहदीप़ संस्थेच्या अध्यक्ष म्हणून स्मिता सुर्वे या कार्यरत आहेत तर कर्णबधिर विद्यालयाचे अध्यक्ष म्हणून दीपक हर्डीकर हे यशस्वीपणे काम करीत आहेत. नव्या ए.आय. व रोबोटिक्स लॅब संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या शाळेतील विद्यार्थी खरेतर नशिबवान आहेत. आज अनेक चांगल्या प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेतदेखील ए.आय. आणि रोबोटिक्सची लॅब नाही. मात्र, आमच्या कर्णबधिर मुलांना हे शिक्षण घेण्याचे भाग्य मिळाले आहे. ही मुले सामान्य मुलांपेक्षा कुशाग्र बुद्धीमत्तेची असतात. त्यांना आता ए.आय. आणि रोबोटिक्सची आवड लागली आहे. डॉ. दीपक हर्डीकर, दापोली ०००००

 जिद्द आणि चिकाटीच्या जीवावर कुणाल खरात सीए परीक्षेत उत्तीर्ण

 पनवेलमधील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव   राज भंडारी पनवेल : लहानपणापासूनच एखादी जिद्द आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत कशी पोहोचवू शकते, याचे द्योतक उदाहरणं म्हणजे नवीन पनवेल येथील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात. कुणाल याने आपल्या जिद्दीच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत यश संपादन केलं आहे. त्याच्या या यशानंतर परिसरातील नागरिकांनी कुणाल याला भेटून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कुणालचे पिता सिद्धार्थ खरात हे वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये राहत होते. ते पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कार शेडमध्ये शासकीय सेवेत होते. सन 1994 साली ते पनवेलमध्ये राहण्यास आले. त्यांना एकूण 3 मुलगे आहेत. मोठा शशांक आणि त्याच्या पाठीमागे कुणाल आणि मृणाल ही जुळी भावंडे असा त्यांचा परिवार. कुणाल आणि मृणालचा जन्म सन 1998 साली पनवेलमध्येच झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार असणारा कुणाल हा नक्कीच उच्च स्थानी जाईल असा विश्वास घरातील सर्वांनाच होता. सुरुवातीचे शिक्षण हे नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर येथून सुरु केले आणि दहावीपर्यंत कुणाल एकाच शाळेत शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्याने पोतदार महाविद्यालयात प्रवेश घेतला. कुणाल याला लहानपणापासूनच सीए बनण्याची इच्छा होती. तशी इच्छा त्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना सांगितली होती. घरातील संस्कार आणि कुणालची जिद्द त्याला सीए च्या पदापर्यंत जाण्यासाठी कारणीभूत ठरली. कुणालने आपली जिद्द खरी करण्यासाठी त्याने आपल्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच सीएच्या अभ्यासक्रमाची तयारी सुरु केली होती. पदवीपर्यंतच्या शिक्षणामध्ये तो साईटीची परीक्षा देऊन उत्तीर्ण देखील झाला. यानंतर त्याने पोतदार महाविद्यालयातील आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि 3 वर्षांसाठी नवीन पनवेल येथील जैन अँड सन्स या फर्ममध्ये त्याने प्रशिक्षण (एंटरशिप) घेतले. नुकत्याच पार पडलेल्या सीएच्या परीक्षेत त्यांनी प्रयत्न केले. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत सीएच्या परीक्षेतील आपल्या सहाव्या प्रयत्नाचे सातत्य राखत त्याने यश संपादित करून तो उत्तीर्ण झाला. कुणालच्या या यशामध्ये त्याचे आई – वडील, भाऊ, मित्र परिवार, तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या जैन अँड सन्स मधील सहकाऱ्यांचा मोठा हातभार लागला असल्याचे त्याने बोलताना सांगितले. कुणालच्या या नेत्रदिपक यशानंतर त्याच्यावर नातेवाईक, मित्र परिवारासह पनवेलमधील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ००००००

नववर्षाच्या स्वागतानिमित्त अंनिसचा ‘चला बनूया जबाबदार वाहन चालक’ उपक्रम

ठाणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा, घाटकोपर व रोटरी क्लब ऑफ मुंबई, घाटकोपर यांनी ‘चला बनूया जबाबदार वाहन चालक’ (Don’t Drink & Drive) असा मजकूर असणारे पत्रके घाटकोपर येथील…

ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय स्थलांतरित

ठाणे : बेलापूर येथील कोकण भवनात असलेले ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय आता खारेगाव कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे स्थलांतरीत झाले आहे. अर्जदार यांनी…

३ आठवडे चाललेल्या करंजाडे महोत्सवाची लावणी नृत्याच्या कार्यक्रमांनी सांगता

राज भंडारी पनवेल : गेली 7 वर्षे करंजाडेमधील नागरिकांसाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्यावतीने करंजाडे महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षीही जवळपास तीन आठवडे हा महोत्सव विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला. करंजाडे वासियांनी या महोत्सवाला उदंड प्रतिसाद देत आपली हजेरी नोंदविली. करंजाडे महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. तसेच मिस करंजाडे ही स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यामध्ये करंजाडे येथील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीला. मंगळवारी 31 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी सिने तारका लावणी नर्तिका राधा पाटील मुंबईकर हिच्या दिलखेचक अदांनी करंजाडे महोत्सवाची सांगता पार पडली. आपल्या दिलखेचक अदा आणि नृत्यांनी तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील अख्या महाराष्ट्राला माहित आहे. पण आता गौतमी पाटीलला टक्कर देण्यासाठी राधा पाटील मुंबईकर ही मैदानात उतरली आहे. अवघ्या 4 महिन्यापूर्वी प्रकाश झोतात आलेल्या राधा पाटील मुंबईकर हिने आपल्या नृत्याने तरुणांना वेड लावलं आहे. करंजाडे महोत्सवाच्या सांगता समारंभातील तिच्या मनमोहक आणि दिलखेचक अदांनी करंजाडे सह पनवेलमधील तरुणांना देखील वेडं केलंय. करंजाडेचे माजी सरपंच तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या महोत्सवात तरुणाईने अख्ख मैदान तुडुंब भरून गेलं होतं. कातिलोंकी कातिल आणि राधा पाटील असा सुर यावेळी तरुणांच्या तोंडी घुमताना दिसला. तब्बल 3 आठवडे चाललेल्या या महोत्सवामध्ये करंजाडे वासियांसाठी दर्जेदार मेजवानीसह विविध वस्तूंच्या खरेदीचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच बच्चे कंपनीसाठी याठिकाणी बालनगरी उभारून यामध्ये मुलांच्या हौशी मौजीचे खेळ ठेवण्यात आल्यामुळे करंजाडेसह पनवेलमधील नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला. एकूण 23 दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने नागरिकांनी आपली उवस्थिती दाखविली होती. ०००००

 ठाणे महापालिकेच्या पाणी बिलाची थकबाकी असलेल्या २६०६ नळ जोडण्या खंडित

 २३३० थकबाकीदारांना पाठवल्या नोटीसा   ठाणे : ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात २६०६ नळ जोडण्या खंडित केल्या असून ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच, ७३ पंप रुम सील करण्यात आले आहेत. तर, २३३० थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एप्रिल ते डिसेंबर या काळात ७७.९८ कोटी रुपयांची बील वसुली करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागातर्फे राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात २१.८५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत आहेत. बील न भरल्यास पाणी पुरवठा खंडित होणार पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. …तर कारवाई होणार प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच, पाणी बील वसुलीत हयगय करणारे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि मीटर रिडर यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरी, नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बील भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे. थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ही योजना ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच, ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही. 000000

 अग्निशमन दलात चालक घोटाळा

एमबीएमसीमध्ये 127 चालकांऐवजी केवळ 40 ते 50 चालक कार्यरत आहेत.   अरविंद जोशी मीरा- ईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलात (अग्निशमन दल) चालक घोटाळ्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हा अधिकारी पवन घरत यांनी केला…

सर्व प्रकरण सेट केल्यानंतर वाल्मिक कराडचे पोलिसांसमोर सरेंडर – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : ‘गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेंड वाल्मिक कराड हा सरेंडर करणार होता हे मी अगोदरच सांगितले होते. यापूर्वीच मी ट्विट केले आहे,’ सर्व प्रकरण सेट करण्यासाठी इतके दिवस घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड पुणे पोलिसांसमोर शरण आल्यानंतर केला आहे. संतोष देशमुख हे भाजपचे होते आमच्या पक्षाचे नव्हते, पण माणुसकी जिवंत राहावी यासाठी आम्ही लढतो आहोत.संतोष देशमुखांच्या कुटुंबाला सरकारी वकील देताना त्यांच्या कुटुंबाला विश्वासात घेणं आवश्यक आहे. माझी फडणवीसांना विनंती आहे की, मागच्या दोन-तीन वर्षात झालेल्या हत्यांची चौकशी करावी आणि त्यांच्याही कुटुंबियांना बोलवून घ्यावं. त्यावेळी कळेल की कोणी कोणाची जमीन बळकावली आणि कोणी कोणाची हत्या केली.” असाही घणाघात आव्हाड यांनी केला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची तुलना बिहारशी करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या जनतेला जोपर्यंत वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जनतेने शांत बसू नये असं आवाहनही यावेळी केलं. आव्हाड यांनी आणखी एका प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, एक हत्या तर भयंकर आहे त्याची माहिती माझ्याकडे आहे, पोरीला फोन लावून दिला गेला आणि फोनवरून मुलीला सांगितलं की एक तर तू गोळी मारून घे नाही तर याला गोळी मारून घ्यायला सांग. याचा संपूर्ण तपशील त्यांनी यावेळी दिला नाही. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत गंभीर आरोप करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “नैतिकदृष्ट्या मी समाजतील, राजकारणातील घडामोडी वाचत असतो, लक्षात ठेवत असतो. त्यावरुन राजकारणात आत्तापर्यंत एवढे मोठे आरोप कोणत्याही मंत्र्यावर झाले नाहीत. ०००००

 वामन म्हात्रेंची खेळी, किसन कथोरेंना धक्का

बदलापुरात भाजपचा माजी नगरसेवक शिवसेनेत बदलापूरः विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाला भाजपात प्रवेश देत आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांनी चक्क भाजपच्या माजी नगरसेवकालाच गळाला लावले असून हा किसन कथोरे यांना धक्का मानला जातो. विशेष म्हणजे आमदार कथोरे यांचे निवासस्थान याच प्रभागात येते. गेल्या काही दिवसात बदलापुरात कथोरे विरूद्ध म्हात्रे वाद टोकाला पोहोचला असून एकमेकांवर शाब्दीक हल्ले करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतो आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या किसन कथोरे यांचा पाचव्यांदा विजय झाला. मात्र त्याचवेळी बदलापुर शहरात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे किसन कथोरे यांच्यातील वाद टोकाला गेला. कथोरे यांच्या उमेदवारीला म्हात्रे यांनी निवडणुकीआधीच विरोध सुरू केला होता. त्यामुळे ऐन प्रचार रंगात येत असताना म्हात्रे यांनी प्रचारापासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यातच आमदार कथोरे यांनी वामन म्हात्रे यांचा प्रभाव असलेल्या भागातील उपशहर प्रमुख तेजस म्हस्कर यांनाच भाजपात प्रवेश दिला. त्यामुळे शिवसेनेत संताप वाढला होता. म्हात्रे यांनी याबाबतची नाराजी थेट तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली होती. तरीही शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळत कथोरे यांचाच प्रचार करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर हा वाद टोकाला पोहोचला. विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात आमदार किसन कथोरे यांनी वामन म्हात्रे यांच्यासह सर्व पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधकांना थेट आव्हान दिले होते. म्हात्रे यांनी कथोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे यांच्यात वाकयुद्ध वाढल्याचे दिसत होते. मात्र वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजीत आगरी महोत्सवात पहिल्याच दिवशी भाजपचे बदलापूर गावातील माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर मंगळवारी चतुरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. माझा प्रवेश यापूर्वीच झाला होता. आता फक्त सदिच्छा भेट घेतल्याची प्रतिक्रिया हेमंत चतुरे यांनी दिली. मी १३ वर्ष शिवसेनेचा शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होतो. मी शिवसेनेकडून निवडणुकही लढवली होती. माझी बहीण शिवसेनेची नगरसेविका होती. मध्यंतरी मी भाजपात होतो. मात्र दोन वर्षांपासून मला प्रभागात काम करताना अडचणी येत होत्या. माझी घुसमट होत होती, त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया हेमंत चतुरे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. हा प्रवेश आमदार किसन कथोरे आणि भाजपासाठी धक्का मानला जातो आहे. आमदार किसन कथोरे यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातून चतुरे नगरसेवक आहेत. त्यामुळे म्हात्रे यांनी विधानसभेतील फोडाफोडीची परतफेड केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ही तर घरवापसी शिवसेनेचा कार्यकर्ता आत शिवसेनेत आला. हा पक्षप्रवेश नाही तर घरवापसी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे. हेमंत चतुरे शिवसैनिकच होते. त्यांचा परिवार शिवसेनेशी संबंधित आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बदलापुरात शिवसेना आणखी मजबूत होईल, असेही म्हात्रे  बोलताना म्हणाले.