Category: ठाणे

Thane news

ठामपाचा नवीन विकास आराखडा कळवा – खारीगांव उद्ध्वस्त करणारा- डॉ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : महापालिकेने नवीन प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला आहे. विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, माणसे संपवून केला जाणारा विकास काय कामाचा? ठामपाच्या या विकास आराखडय़ात संपूर्ण कळवा – खारीगांव उद्ध्वस्त होणार आहे. आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून पाचशे ते हजार इमारतींवर वरवंटा फिरवण्याचा कट आखला असून  यात तब्बल ४५ हजार रहिवाशी बेघर होणार आहेत.  कोणाच्या भल्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे?  असा सवाल करून या आराखडय़ाच्या विरोधात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा मुंब्रा कळव्याचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. नव्या प्रारुप विकास आराखड्यात कळवा आणि खारीगांव भागातील तब्बल १ हजारांच्या आसपास इमारती बाधीत होणार आहेत. गावठाण भागही उद्ध्वस्त होणार आहे. कळवा खाडी पुलापुढील भागात असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवाशी बेघर होणार आहेत. कळव्यातील ४५० इमारती या विकास आराखडय़ामुळे बाधीत होणार असून खारीगावात देखील ५५० च्या आसपास इमारती बाधीत होऊन येथील तब्बल ४५ हजारांच्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत. येथील मंदिरे, मैदाने, बाधीत होत असल्याचेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले. विकास आराखडा तयार करताना ज्या काही करामती केल्या आहेत; त्याचाही पर्दाफाश आपण करणार असून कावेरी सेतूची मालकी कोणाकडे आहे. त्याचा एफएसआय वापरता येतो का? ते देखील आता पाहणार असल्याचे ते म्हणाले.कळवा- खारीगांव येथील रहिवाशांना मारुन असा विकास होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे.  ठाणे महानगरपालिकेने खारीगांवमधून डीपी रोडचा प्रस्ताव टाकला आहे. हा डीपी रोड पुढे नाशिक महामागार्ला जोडला जाणार आहे. या डीपी रोडमुळे खारीगांवची मूळ संस्कृती नष्ट होणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या खारीगांवातील १७ रहिवासी इमारती, ग्रामपंचायतपासूनची १८ जुनी घरे तसेच खारीगांवची ग्रामदेवता जरीमरीचे प्राचीन मंदिरही या विकास आराखडय़ामुळे तोडले जाणार आहे.  त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आता सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन उभे केले जाईल,  असा इशाराही त्यांनी दिला. तसेच लोकांना उद्ध्वस्त करणारा हा विकास आराखडा एक इंचही पुढे जाऊ दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले. इथे विकास आराखड्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र कळवा, मुंब्रा या भागातील विकास आराखड्यातील रस्त्यांवरच अतिक्रमणे उभी राहत आहेत. येथील पालिका अधिकारी प्रति चौरसफुटामागे  ३०० रुपये घेऊन आपले खिसे भरत आहेत. परंतु कारवाई करण्यासाठी पालिका पुढे येत नसल्याचा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. ००००

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा                                      

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खडकपाडा , वायले नगर, कल्याण पश्चिम येथील वरटेक्स सॉलिटेअर ए.१ या इमारतीला आग लागल्याची वर्दी श्री अविनाश या इसमाने भ्रमणध्वनी क्रमांक ९८९२४०९२६० द्वारे दिनांक २६ नोव्हेंबर…

 स्वर्गीय वसंतराव डावखरेंच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवारी शिक्षकांना वसंतस्मृती पुरस्कार

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम   ठाणे : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील १२५ आदर्श शिक्षक व १० आदर्श संस्थाचालकांचा वसंतस्मृती पुरस्कारासह सन्मान करण्यात येणार आहे. ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये रविवारी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असेल. कोकणातील शहरी, सागरी आणि डोंगरी भागात नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थी हितासाठी दक्ष असलेले आदर्श शिक्षक व आदर्श संस्थाचालकांचा गौरव व्हावा, यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी २०१८ पासून वसंतस्मृती शिक्षक पुरस्कार सोहळा सुरू केला आहे. यंदाही कोकणातील शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित केले जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र चव्हाण असतील. तर स्वागताध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आहेत. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे खासदार हेमंत सवरा, आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपा ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजनक विकास पाटील, एन. एम. भामरे, सचिन बी. मोरे, ज्ञानेश्वर घुगे उपस्थित असतील. या कार्यक्रमाची किशोर पाटील, विनोद शेलकर, संभाजी शेळके, सुभाष सरोदे, रमेश शर्मा, मुकेश पष्टे यांच्याकडून तयारी करण्यात येत आहे. 000000000

मतदान बंद झाल्यानंतर मतटक्केवारीत वाढ होते कशी?

जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न ठाणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मते मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणे अपेक्षित होते. परंतु मतमोजणीत तसे झाले नाही, असे सांगत राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे. तसेच मतदान बंद झाल्यानंतर म्हणजेच सायंकाळी ६ ते ११ यावेळेत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी आणि वाढीव मतदान येते कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी कळवा येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१४ पासूनच मी मतदान यंत्राच्या धोक्याबाबत बोलत आहे. आताही आमच्या लोकांना मी हेच सांगत होतो की, छोटी राज्य देतील आणि मोठी राज्य ताब्यात घेतील. त्याकडे आमच्या लोकांचे दुर्लक्ष झाल्याचे आव्हाड म्हणाले. मतदान यंत्र हे मानव निर्मित असल्यामुळे त्यात बदल करणे शक्य आहे. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रामध्ये मतदानाचा आकडा लगेचच उपलब्ध होतो. तरीही मतदानाची आकडेवारी देण्यास उशीर कसा काय होतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मतदान बंद झाल्यानंतरही म्हणजेच सांयकाळी ६ ते रात्री ११ या कालावधीत राज्यात तब्बल ७६ लाख मते वाढली असल्याचा दावाही त्यांनी केली. जास्तीत जास्त दिड ते दोन टक्के मतदान सहा नंतर वाढू शकते. मात्र काही जिल्ह्यात तब्बल १० टक्यापर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदान बंद झाल्यानंतरही म्हणजेच सांयकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी, वाढीव मतदान येते कुठून असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते जवळपास एकसारखीच मिळाली असून एखाद्या पॅर्टनशिवाय हे शक्यच नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. नांदेडमध्ये लोकसभेची जागा आम्ही जिंकतो आणि विधानसभेच्या सहा जागांवर पराभव होतो. असे वेगळे निकाल एकाच जिल्ह्यात कसे लागू शकतात, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मते मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणे अपेक्षित होते. परंतु मतमोजणीत तसे झाले नाही. प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणुकींचे निकाल द्यायचे असतील तर संविधान आणि लोकशाहीचा काय उपयोग आहे. अशाने लोकशाही संपुष्टात येईल आणि भारताचा रशिया होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. उतरत्या वयात शरद पवार यांना आत्मक्लेश होईल अशा पद्धतीने एकटे पाडले जात आहे. मातोश्रीबाबतही तीच रणनीती आखली जात असल्याचे ते म्हणाले.

गायमुख घाट रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावा –  सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे : घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले आहेत. घाटातील कामासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असून ती डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील चार महिन्यात घाट रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी  महापालिकेसह विविध यंत्रणा, जस्टीस फॉर घोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरूवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गायमुख घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी असून संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. दूचाकी वाहनांसाठी हा घाट मार्ग अजूनही धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात, भविष्यात कॉंक्रिटीकरण होणार आहे म्हणून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसाच ठेवता येणार नाही. त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी, असे आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना सांगितले.घाट रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा कार्यादेश तयार असून वन विभागाच्या मान्यतेसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. डिसेंबरअखेरपर्यंत ही परवानगी मिळाल्यास जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात घाट रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली.कापूरबावडी आणि कॅडबरी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यावर, कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात त्यावर बोलणी सुरू असून तेही काम लवकरच पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले.घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, मेट्रो आदी यंत्रणा दक्ष आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने बऱ्याच समस्या दूर झाल्या आहेत. चांगल्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया बैठकीच्या सुरुवातीला जस्टीस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपायुक्त मनीष जोशी, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुंभागी केसवानी, घोडबंदर रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वयक आणि कार्यकारी अभियंता संजय कदम, वृक्ष अधिकारी केदार पाटील, जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे प्रतिनिधी, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाहतूक पोलिसांच्या सहाय्यासाठी नेमण्यात आलेले वॉर्डन आणि बस चालक यांचे सध्या रस्ता सुरक्षेबाबत प्रशिक्षण सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले. आवश्यकता असल्यास आणखी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वॉर्डनना काही ठिकाणी त्रास दिला जातो, वाहन चालक त्यांचे ऐकत नाहीत, अशी निरिक्षणे नागरिकांच्या वतीने मांडण्यात आली.स्थानिक अवजड वाहने, मुंबईकडून येणारी अवजड वाहने यांची वर्दळ बंदीच्या काळातही सुरू असते. तसेच, बाहेरील वाहने रोखून ठेवण्यावरही मर्यादा येत असल्याने या अवजड वाहनांबाबत कोणती व्यवस्था करायची यावर वाहतूक पोलीस विचार करत असल्याची माहिती उपायुक्त शिरसाठ यांनी दिली. आनंद नगर सिग्नल येथे एकूण ११ ठिकाणी रस्ते ओलांडले जातात. त्यामुळे सिग्नल असूनही वाहतूक संचलन नीट होत नाही. त्याकरता सिग्नलची जागा बदलावी अशी सूचना नागरिकांच्या वतीने करण्यात आली. त्यासंदर्भात, पालिकेचा विद्युत विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तोडगा काढावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी केले. रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या बेवारस वाहनांची मोठी समस्या घोडबंदर परिसरात आहे. त्यावर उपाय करण्यासाठी महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी एकत्रितपणे मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही वाहने हटविण्यात यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

वेतन न मिळाल्याने शासकीय सेवेतील कंत्राटी कामगारांची उपासमार – जगदीश खैरालिया

अनिल ठाणेकर ठाणे : प्रादेशिक मनोरूग्णालय, ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्यापही न मिळाल्याने कामगारांची आर्थिक कोंडी होऊन कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना दरमहा सात तारखेच्या आत किमान वेतन अधिनियम नुसार वेतन अदा करण्याचे आदेश ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेले असतांनाही रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार मे. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि, पुणे कामगारांची पिळवणूक करीत आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे  सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जेटिंग गाड्यांवरील सफाई कामगारांना मे. एक.एम रामचंदानी, उल्हासनगर यांनी ही अद्यापही वेतन अदा केले नाही. इतकेच नव्हे तर या ठेकेदाराने कामगारांच्या वेतनातून दरमहा बेकायदेशीर कपात करून कामगारांची फसवणूक केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घंटागाडी प्रकल्पातील ठेकेदार मे. सेक्यूर वन सेक्युरिटी सर्व्हिसेस यांनी देखील सफाई कामगार आणि वाहनचालक यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा केले नाही. हे सर्व ठेकेदार बिलाची रक्कम मिळाली नसल्याचे कारण पुढे करून कामगारांना दरमहा वेळेवर वेतन अदा करत नाही. खरं तर वेतन प्रदान अधिनियम नुसार ठेकेदाराने कामगारांना सात तारखेच्या आत वेतन अदा करणे कायद्याने बंधनकारक आहे. करारनामा करतांना किमान दोन तीन महिने वेतन अदा करण्याची ठेकेदाराची क्षमता असल्याची अट असतांनाही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने सर्व कायदे गुंडाळून कंत्राटी कामगारांची पिळवणूक सर्रासपणे सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर देखील ठाणे मनोरूग्णालय प्रशासन यांनी कामगारांना वेतन अदा केले नाही. कंत्राटी कामगार कायद्याच्या कलम २१ (४) नुसार ठेकेदार यांनी कामगारांना वेळेत वेतन अदा केले नाही तर मूळ मालकाने कामगारांना वेळेत वेतन अदा करण्याची जबाबदारी बंधनकारक करण्यात आली आहे. कामगार उप आयुक्त ठाणे यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवली जात आहे. ठेकेदारांना राजाश्रय असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदार जुमानत नसल्याचा आरोप श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी केला आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत भारतीय संविधानाचा मसुदा सादर करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषणात सांगितले होते की, आज समाजात सामाजिक, आर्थिक विषमतेची दरी प्रचंड असल्याने शोषण ही प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे भविष्यात या संविधानातील मुल्यांची विधायिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका कशी अंमलबजावणी करणार यावर संविधानाचे महत्व ठरेल. या संवैधानिक मुल्यांचे स्मरण राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणा करेल का असा सवालही श्रमिक जनता संघाचे  सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी उपस्थित केला आहे.

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हाच आदर्श  – उमेश पाटील

अनिल ठाणेकर ठाणे : समाजवादी नेते दशरथ पाटील यांच्या वक्तव्यानुसार, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हाच आदर्श मी राजकारणात वावरताना ठेवला आहे, असे मत माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी आपल्या वाढदिवशी बोलताना व्यक्त केले. उमेश पाटील यांचा वाढदिवस, फटाक्यांच्या आतिषबाजीत  ढोलताशांच्या गजरात, भावभक्तिगीतांच्या वातावरणात आणि परिसरातील रहिवाशांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या माताभगिनिंनी व लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीत, केक कापून, अपूर्व उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवसेना उपनेते दशरथ पाटील, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, विभागप्रमुख शाम पाटील, विजय शिंदे, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक मनोहर साळवी, मनोहर डुंबरे, प्रकाश बर्डे, पवन कदम, रविंद्र पाटील, दिनेश कांबळे, मालती पाटील  प्रमिला केणी, मिनल संख्ये, राधिका फाटक, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार, अपोलो जिमचे कमलाकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, काॅग्रेसचे राजू शेट्टी, सम्राजसेवक राकेश पाटील, रचना पाटील, जयदिप पाटील, सुनील गौरी तसेच पारसिक नगर, सह्याद्री सोसायटी व खारेगाव परिसरातील सोसायटीतील अध्यक्ष, सेक्रेटरी आणि पदाधिकारी व सभासद तसेच रहिवाशी  ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी व लाडक्या बहिणींनी उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशिर्वाद देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी अधिकारी-कर्मचा-यांचे  प्रशिक्षण

ठाणे : जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने काल जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. NSDL (Protean) कार्यालयात सहाय्यक प्रबंधक या पदावर कार्यरत असणारे सुर्यकांत तरे यांनी उपस्थित सर्वांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्यालय, ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील निवृत्तीवेतन योजना संदर्भांतील  कामकाज हाताळणारे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यावरील जमा रक्कमेतून गुंतवणूक करण्याबाबत विविध पर्यांय, अंशतः रक्कम आहारीत करणे, सेवा निवृत्ती वेतन योजनेचे विविध पर्याय, कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याचे कुटुंब निवृत्ती वेतन, राजीनामा, रुग्णतः निवृत्ती वेतन या सर्व योजनेबाबत सखोल मार्गदर्शन सुर्यकांत तरे यांनी केले.परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) ची योग्य पद्ध तीने अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी तसेच अनेक शंकाबाबत अधिकारी-कर्मचारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.

बोगस शिक्षणसंस्थांवर कारवाई करा

ठाणे : शहरात सुरू असलेल्या बोगस शिक्षण संस्थांकडून सामान्य व गरीब कुटुंबातील तरुण व तरुणींची फसवणूक होत आहे. त्यामुळे याची चौकशी करून संबंधित शिक्षण संस्थांच्या संचालकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ठाणे रेल्वे स्टेशन, राम मारुती रोड, नौपाडा परिसरासह शहरातील महत्त्वाच्या गजबजलेल्या भागात काही बोगस शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. राज्यातील प्रसिद्ध विद्यापीठातील अभ्यासक्रमांत प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तसेच, अभ्यासक्रमाचे शुल्क कर्जरूपाने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यानंतर गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची कागदपत्रे मिळवून त्यांना कर्जाच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. या तरुण-तरुणींची भविष्यातही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप या निवेदनातून केला आहे.

– ठाणे महापालिकेत घेण्यात आली बालविवाह मुक्त भारताची शपथ

– ठाण्यातील बचत गटांच्या महिला, अधिकारी आणि कर्मचारी यांचा कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग ठाणे : बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानास आज दिल्ली येथे प्रारंभ झाला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थितांनी बालविवाह मुक्त भारताची शपथही घेतली. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे या अभियानाचा आरंभ करण्यात आला. त्यात देशभरातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकही सहभागी झाले. बालविवाह मुक्त भारत या पोर्टलचेही याप्रसंगी अनावरण करण्यात आले. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात, अतिरिक्त आयु्क्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप आदी उपस्थित होते. यावेळी, ठाणे महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिला, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी  बालविवाह मुक्त भारताची सामुहिक शपथ घेतली. तसेच, शाळा, आरोग्य केंद्र येथेही शपथ घेण्यात आली.