Category: ठाणे

Thane news

बाल विवाह मुक्त भारत अभियानाचा जिल्ह्याधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे : बालविवाह ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची सुरुवात आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालविवाहविरोधी जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. 27 नोव्हेंबर हा बालविवाह प्रतिबंध दिन म्हणून विविध उपक्रमाद्वारे या प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान राबविले जाते. जिल्ह्यातील हे अभियान ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सेवा संस्था/महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट (डॉ. कैलास सत्यर्थी फाऊंडेशन संलग्न भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. बालविवाह या अनिष्ट प्रथेविरुध्द जिल्ह्यात 27 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संस्थेचे अशोक पवार, देवय्या आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शिनगारे यांनी बालविवाह ही अनिष्ट प्रथा संपविण्यासाठी जाणीवजागृती महत्त्वाची असून जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. तसेच समाजातील सर्व अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्याची गरज अधोरेखित केली. सुर्यवंशी यांनीही बालविवाह प्रथेमुळे समाजात होत असल्याच्या दुष्परिणाम सांगून ही प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी समाजात विशेषतः ग्रामीण भागात प्रचार प्रसिद्धी आवश्यक असल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी यासह ग्रामीण भागात चित्ररथाद्वारे बालविवाह प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

‘स्पर्धा परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जा, प्रयत्नात सातत्य ठेवा!’

 पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन   ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल तर भावनिक बुध्दिमत्ता महत्त्वाची आहे. सर्व परीक्षार्थींनी या परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जावे आणि त्या प्रयत्नात सातत्य ठेवावे, असे प्रतिपादन मुंबई लोहमार्ग, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार स्पर्धा परीक्षेच्या परीक्षार्थींसाठी नुकतेच डॉ. रवींद्र शिसवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी डॉ. शिसवे यांचे स्वागत केले. सन २००१च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले डॉ. रवींद्र शिसवे यांनी यावेळी ठाणे आणि मुंबईतून स्पर्धा परीक्षांना बसलेल्या परीक्षार्थींशी संवाद साधला.  अभ्यासाबाबत संवेदनशीलता, सकारात्मकता महत्त्वाची आहे. त्याचवेळी, समाजातील नकारात्मक लोकांपासून दूर राहणे, अभ्यासाचे योग्य पध्दतीने नियोजन करणे, त्यासाठी वेळेची आखणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले. केलेल्या  अभ्यासाची पेन्सिल उजळणी करणे, विचार करण्याची पद्धत कशी विकसित करायची, महत्त्वाचे मुद्दे कसे काढायचे याच्याबद्दलही डॉ. शिसवे यांनी मार्गदर्शन केले. तसेच, अभ्यासाच्या नोट्स काढताना शॉर्ट हॅण्ड कौशल्याचा वापर करण्याचीही सूचना त्यांनी केली. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संयम, प्रामाणिकपणा, सातत्य, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, असेही डॉ. शिसवे म्हणाले. विविध उदाहरणे देत डॉ. शिसवे यांनी हा संवाद साधला. परीक्षार्थींच्या प्रश्नोत्तरांनी या सत्राची सांगता झाली. संस्थेचे गिरीश झेंडे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

स्वच्छ प्रतिमेच्या संजय केळकरांना मंत्रिपद द्या – राजेश गाडे

अनिल ठाणेकर ठाणे : शहर विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून येत, विजयी हॅट्रिक साधणारे भाजपाचे संजय केळकर हे, स्वच्छ प्रतिमा असणारे आणि तळागाळातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारे लोकप्रतिनिधी, अशी त्यांची ओळख असून, अशा बहुजनहित जपणाऱ्या संजय केळकर यांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान देत, त्यांच्या ज्येष्ठत्त्वाचा सन्मान राखण्यात यावा, अशी आग्रही मागणी भाजपाचे ठाणे शहर/जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी केली आहे. पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदारकी भूषविल्यानंतर, संजय केळकर यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक साधून आपले निर्विवाद नेतृत्त्व सिद्ध करुन दाखविलेले आहे. माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला, भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षात जी काम करण्याची संधी मिळालीय, ती केवळ संजय केळकर यांच्यामुळेच. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा नेता, अशी सर्वमान्य ओळख असणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी, सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक अशा श्रीस्थानकाला लाभलेला आहे आणि म्हणूनच ठाणे शहरातील आंबेडकरी जनतेची अशी मागणी आहे की, ठाणे विधानसभा मतदारसंघाचे ‘हॅट्रिक’वीर अशी ओळख निर्माण झालेल्या संजय केळकर यांना, मानाचे मंत्रिपद भूषविण्याची संधी देण्यात यावी. असेही राजेश गाडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान,आमदारकीची हॅट्रिक साधून, ठाण्यासारख्या सांस्कृतिक शहरात भाजपाची मुळे पूर्वीपेक्षाही अधिक घट्ट झाली असून, ठाणे महानगरपालिकेत आता कमळ फुलविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन राजेश गाडे यांनी यावेळी केले. गेल्या तीस वर्षांपासून राज्यात भाजपा-शिवसेना युती असूनही, ठाणे शहराचा महापौर, भारतीय जनता पक्षाच्या नशिबी नव्हता; मात्र, संजय केळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास, महापालिकेवर भाजपाचाच महापौर बसेल, याबाबत आपल्या मनात कोणताही संदेह नसल्याचा आत्मविश्वास गाडे यांनी यावेळी बोलून दाखवला. संजय केळकर हे उच्चशिक्षित, संयमी आणि अठरापगड जाती-समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे सुसंस्कृत नेतृत्त्व असून, त्यांचे आजोबा बॅरिस्टर  बर्वे हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक आणि सहकारी होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, बर्वे यांनी बाबासाहेबांना साथ दिल्यामुळे तत्कालीन कर्मठांनी, त्यांना वाळीतही टाकले होते. कोकणस्थ ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यात स्नेहभोजन आयोजित करुन, सामाजिक समतेच्या आड येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केल्याबाबत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ‘बहिष्कृत भारत’ या नियतकालिकात बॅरिस्टर बर्वे यांचे कौतुकही केलेले आहे. अशा, खऱ्याअर्थाने पुरोगामी वारसा लाभलेल्या घराण्यातून आलेल्या संजय केळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास, ठाणे शहराचा विकास, मुलभूत सुखसोयी व नागरीसमस्या चुटकीसरशी सुटतीलच, त्याचबरोबर भविष्यातील खरीखुरी ‘स्मार्टसिटी’ म्हणून नावारुपाला येण्यासाठी, संजय केळकर यांना, ठाण्यातून मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी करतानाच, यासंदर्भात आपण एक ‘स्वाक्षरी-मोहीम’ राबविणार असल्याचेदेखील भाजपाचे ठाणे शहर/जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी, शेवटी स्पष्ट केले आहे. 000

पुरुषांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी नसबंदी पंधरवडा – रोहन घुगे

ठाणे : कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा (Vasectomy Forthnight २०२४) राबविण्यात येत आहे.…

 ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे ठाण्यात शुक्रवारी व्याख्यान

 विश्वास सामाजिक संस्थेतर्फे आयोजन   ठाणे : महायुतीच्या विजयासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार, निवडणूक अभ्यासक भाऊ तोरसेकर यांचे व्याख्याने ठाण्यात शुक्रवारी होणार आहे. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने नौपाड्यातील हितवर्धिनी सभेच्या मैदानावर शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या विजयाची खात्री सर्वप्रथम दिली होती. या पार्श्वभूमीवर `कारणं महायुतीच्या विजयाची, भाजपाच्या यशाची’ या विषयावर भाऊ तोरसेकर यांचे शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेलगतच्या हितवर्धिनी सभेच्या मैदानात व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाला नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे.

 ठाणे शहरातील बोगस शिक्षणसंस्थांवर कारवाईसाठी पोलिस आयुक्तांना साकडे

भाजपा महिला मोर्चा मंडलाध्यक्षा वृषाली वाघुले यांचे निवेदन   ठाणे : ठाणे शहरात सुरू असलेल्या बोगस शिक्षणसंस्थांकडून सामान्य व गरीब कुटुंबातील तरुण व तरुणींची फसवणूक होत असल्याप्रकरणी चौकशी करुन संबंधित शिक्षणसंस्थांच्या संचालकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा मंडलाध्यक्षा वृषाली वाघुले यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ठाणे रेल्वे स्टेशन, राम मारुती रोड, नौपाडा परिसरासह शहरातील महत्वाच्या गजबलेल्या भागात काही बोगस शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रसिद्ध विद्यापीठातील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचे शुल्क कर्जरुपाने उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यानंतर गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थीनींची कागदपत्रे मिळवून त्यांना कर्जाच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. या तरुण-तरुणींची भविष्यातही फसवणूक होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप या निवेदनात म्हटले आहे. ठाणे शहरातील राम मारुती रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पहिल्या मजल्यावरील बनावट सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटबाबत तक्रारी आल्यानंतर भाजपा व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संबंधित संचालकांना जाब विचारला. त्यावेळी तेथे जनरल नर्सिंग कोर्सचे शिक्षण देण्याच्या नावाखाली सुरू असलेले फसवणुकीचे रॅकेट महिनाभरापूर्वी उघडकीस आले होते. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फसवणूक झालेल्या ८ मुलींना १ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम मिळवून दिली. या वेळी संबंधित तरुण-तरुणींची महत्वाची शैक्षणिक कागदपत्रे, मूळ आधारकार्ड व इतर कागदपत्रे ठेवून शैक्षणिक शुल्काची मागणी केली जात असल्याचेही आढळले होते. `सीईडीपी’ संस्थेप्रमाणेच ठाणे शहरात अनेक बनावट शिक्षणसंस्थांमध्ये दहावी नापास व अल्पशिक्षित तरुण-तरुणींनाही चांगल्या अभ्यासक्रमानंतर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. गुणवत्ता यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना टार्गेट केले जाते. त्यातून हजारो रुपयांचे शैक्षणिक शुल्क वसूल करुन शेकडो जणांची फसवणूक होत आहे. तरी या प्रकाराची दखल घेऊन आपण ठाणे शहरातील काही संशयास्पद शिक्षण संस्थांकडील मान्यता व इतर कागदपत्रांची तपासणी करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरूत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात आहे. त्यामुळे, गुरूवार, २८ नोव्हेंबर रात्री १२.०० वाजल्यापासून…

संपूर्ण कोकणावर आता महायुतीचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध -रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्ग : राज्यातल्या महायुती सरकारच्या गेल्या अडीच वर्षाच्या काळात अनेक लोक कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या शिवाय राज्यात एक विचाराचे सरकार यावे हे जनतेने ठरवल्यामुळेच मतदानाचा टक्का वाढला आणि महायुतीला घवघवीत…

 ‘सदगुरुंनी निर्माण केलेली विश्वप्रार्थना म्हणजे गीतेचे सार आहे’

 कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली जीवनविद्या मिशन ची प्रशंसा   कर्जत : सदगुरु वामनराव पै यांनी निर्माण केलेली  विश्वप्रार्थना म्हणजे  गीतेचे सार आहे, अशा शब्दांत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  जीवनविद्या मिशन ची प्रशंसा केली. थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कर्जत येथील ज्ञानपीठात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंद मेळाव्यातील आजच्या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी जीवनविद्या मिशन च्या कार्याचा गौरव केला. सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना मंगलप्रभात लोढा यांनी विनम्र अभिवादन केले. धर्मरक्षणासाठी, मानवी जीवन सुखी करण्यासाठी चांगले संस्कार समाजाला मिळायला हवेत. हे चांगले संस्कार समाजाला जीवनविद्या मिशनसारख्या संस्था निस्वार्थपणे देत आहेत. याबद्दल त्यांनी सदगुरु आणि प्रल्हाद पै यांची विशेष कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद पै म्हणाले की, प्रत्येक मुल हे वेगवेगळं असतं. त्याच्यातील कौशल्य शोधून त्याला योग्य वाव देणं म्हणजे आनंदी पालकत्त्व. मुलांना संस्कार देणे म्हणजे त्यांना योग्य शिक्षण, शिकवण आणि अनुभव देणे होय. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी आधी स्वतःमध्ये योग्य बदल करायला हवेत. दुपारच्या सत्रात सदगुरुंचे पालकत्त्वावर विशेष मार्गदर्शन झाले. त्याचप्रमाणे एका नाविण्यपूर्ण चर्चासत्रात आदरणीय श्री प्रल्हाद पै यांच्यासोबत पत्रकार दक्षता ठसाळे घोसाळकर आणि प्रोफेसर पूजा पवार जांभळे यांनी मुक्त संवाद साधला. पालकत्त्व या विषयावर त्यांनी प्रल्हाद पैंना विविध प्रश्न विचारले. ज्यामध्ये आजच्या आधुनिक काळात पालकांना जाणवणाऱ्या विविध समस्या आणि प्रश्न होते. त्यांना उत्तर देताना प्रल्हाद पै यांनी आनंदी पालकत्त्वाच्या विविध टीप्स सर्वांसोबत शेअर केल्या. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी एक सहज सोपी पालकत्त्वाची व्याख्याच सर्वांना सांगितली. “प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या स्वभावाचे असते. त्यामुळे प्रत्येक मुलात एक वेगळे कौशल्य दडलेलं असतं. आपल्या मुलामधील ही कौशल्ये शोधून त्यांना योग्य संधी देणे म्हणजे आनंदी पालकत्त्व होय.” मुलांमधील ही कौशल्ये शोधण्यासाठी पालकांनी मुलांना योग्य वेळ द्यायला हवा. मुलांच्या आवडी निवडी जपायला हव्या. विशेष म्हणजे आपल्या मुलांना चांगले नागरिक बनविण्याचा प्रयत्न करा. त्यांचे मालक नाही तर पालक बना असे त्यांनी यावेळी सांगितले. मुलं ही पालकांचे निरिक्षण करून मोठी होत असतात. संस्कार कऱण्यासाठी त्यांना योग्य शिक्षण, शिकवण आणि अनुभव देणे गरजेचे आहे. मुलांवर चांगले संस्कार कऱण्यासाठी पालकांनी स्वतःमध्ये योग्य बदल करणेही तितकेच गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. मुलांना संस्कार देताना मुलांसोबत पालकांचा चांगला बॉन्ड तयार झाला पाहिजे. कारण त्यामुळे तुमची मुलं तुम्हाला न घाबरता त्यांच्या समस्या सांगतील आणि त्यांच्या जीवनातील आव्हाने तुम्हाला कमी करणं शक्य होईल. मुलांना चांगले नागरिक बनविण्यासाठी, उत्तम माणूस करण्यासाठी त्यांना जीवनविद्येचे संस्कार त्यांना द्या. तुम्हाला जर दोन जुळं मुलं असली तरी ती मुलं वेगवेगळी आहेत हे स्विकारा. त्यांच्यात एकमेकांशी तुलना करू नका. त्यापेक्षा प्रत्येकातील विशेष कौशल्य ओळखा आणि त्याच्या कौशल्यांना वाव द्या. कारण प्रत्येकाला या जगार परमेश्वराने एक विशेष उद्देशासाठी पाठवलं आहे. यासाठीच प्रत्येकामध्ये असलेलं हे वेगळं कौशल्य आईवडिलांनी ओळखणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात सकाळी ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, श्रीसदगुरु पूजन, मानसपूजा आणि विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थनेची साधना अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आय़ुष्यभर निस्वार्थपणे जीवनविद्या मिशनचे कार्य करणाऱ्या काही शिष्यमंडळींना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदा हा पुरस्कार जेष्ठ प्रसारक कल्याणी पोतनीस, ज्येष्ठ नामधारक काशिनाथ पवार आणि प्रदीप सुभेदार यांना प्रदान करण्यात आला.

अंबरनाथच्या शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण

ठाणे : अंबरनाथ जिल्ह्यातून वडोदरा राष्र्टीय महामार्ग जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनी संपादीत केलेल्या आहे. त्यानुसार अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचीही शेतजमीन संपादीत झाली आहे. पण त्या बदल्यात त्यांना मोबदला मिळाला नसून तो परस्पर काढून…