Category: ठाणे

Thane news

टोलमुक्तीनंतर आनंदनगर टोलनाक्याची रचना बदलणार

ठाणे : मुंबईच्या प्रवशद्वारावरील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी संपूर्ण टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हलक्या वाहने कोंडीत अडकू नये यासाठी आता आनंदनगर टोलनाक्यावर नव्याने रचना करण्याचे नियोजन टोल कंपनीकडून सुरू आहे. त्यानुसार, टोलमुक्त मोटारी आणि इतर वाहनांसाठी वेगळ्या मार्गिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई शहरातून लाखो नोकरदार त्यांच्या वाहनांनी मुंबई गाठत असतात. या वाहन चालकांना टोल आकारला जातो. त्यामुळे दररोज वाहन चालकांना टोलचा फटका सहन करावा लागत होता. मुलुंड आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर टोलनाक्यावरून अधिक वाहनांची वाहतुक होत असते. टोलनाक्यावरील काही मार्गिका या फास्टॅग असलेल्या मोटारी आणि काही मार्गिका दैनंदिन टोल वसूलीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. टोल वसूली दरम्यान वाहतुकीचा खोळंबा झाल्यास कोंडीची समस्या चालकांना सहन करावी लागते. टोल वसूलीविरोधात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली होती. अखेर राज्य शासनाने आता हलक्या वाहनांसाठी मुंबईच्या पाचही टोलनाक्यावर वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दररोज मोटारीने मुंबई गाठणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. हलक्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय लागू झाल्याने आनंदनगर येथील टोलनाक्याची रचना बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यानुसार, आराखडा तयार केला जात असून येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेले दोन टोलनाके हटविले जाण्याची शक्यता आहे. तसेच मालवाहू वाहनांना किंवा टोलमाफीपासून वगळण्यात आलेल्या वाहनांना इतर मार्गिकेतून प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. टोल माफी करण्यात आलेल्या वाहनांना आता इतर मार्गिका उपलब्ध झाल्यास आनंदनगर टोलनाक्यावर होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी दिल्यानंतर लहान आकाराचे ट्रक, टेम्पो चालक देखील टोल नाक्यावर टोल देण्यास टाळाटाळ करत होते. हलक्या वाहनांनामध्ये आमची वाहने मोडतात असा दावा त्यांच्याकडून केला जात होता. तर टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून टोल मागितला जात होता. त्यामुळे चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत असल्याचे चित्र विविध टोलनाक्यांवर पाहायला मिळत आहे.  

ठाण्यात जागोजागी कचऱ्याचे ढिग

काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्याने कचराकोंडी ठाणे : संपुर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जागोजागी कचऱ्याचे ढिग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात साचलेला कचरा कुजून दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक हैराण आहेत. तसेच या कचऱ्यामुळे शहरावासियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्याने कचराकोंडी झाल्याचे सांगत येत्या दोन दिवसांत हा कचरा उचलण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नसल्यामुळे ठाणे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. परंतु त्यास विरोध झाल्यानंतर डायघर कचरा प्रकल्प सुरू होईपर्यंत पालिकेने शहराबाहेर म्हणजेच भांडर्ली येथे तात्पुरती कचराभुमी उभारली होती. डायघर कचरा प्रकल्प सुरु होताच भांडर्ली कचराभुमी बंद करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला डायघर प्रकल्प सुरळीतपणे सुरू होता. परंतु गेल्या काही डायघर प्रकल्प बंद पडल्याने कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील कचरा गाड्या वागळे इस्टेट येथील सी पी तलाव आणल्या जात होत्या. यामुळे या भागात वाहनांच्या रांगा लागल्याने त्यांच्या फेऱ्यांवर परिणाम झाला. एका वाहनांची दोन ते तीन वेळा फेरी व्हायची पण, वाहनांच्या रांगामुळे एकच फेरी होऊ लागली. दिवसाच्या सुमारे ५० ते ६० टक्के फेऱ्या रद्द होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे कचरा ओला होऊन तो कुजत आहे. या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी येत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या कचऱ्यामुळे शहरावासियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चौकट काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्याने कचराकोंडी झाली आहे. सी पी तलाव येथे कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांच्या रांगा वाढल्या. या वाहनकोंडीमुळे कचरा उचलणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या कमी झाल्या. त्यामुळे कचरा साचल्याचे दिसून येत आहे. परंतु डायघर प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला असून शहरातील कचरा आता उचलण्याचे काम सूरू झाले आहे. जादा वाहने आणि मनुष्यबळाचा वापर करून कचरा उचलण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली.

 टोलमाफी, माझी लाडकी बहीण,३ सिलेंडर वर्षभरात मोफत, बळीराजासाठी ७५० एचपीपेक्षा कमी मोटारपंप वीज माफी

सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे महायुतीच सत्तेत येणार – आनंद परांजपे अनिल ठाणेकर ठाणे : टोलमाफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माता-भगिनींसाठी ३ सिलेंडर वर्षभरात मोफत देण्याची योजना, माझ्या बळीराजासाठी ७५० एचपी पेक्षा कमी मोटारपंप वापरणाऱ्यांना वीज माफी आदी क्रांतीकारी व कल्याणकारी निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी घेतले. यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे राज्यातील शीर्ष नेतृत्व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. एका टप्प्यात होणार्‍या या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होईल. मला विश्वास आहे की महायुती पुन्हा एकदा बहुमताने सत्तेवर येईल. महायुती शासनाने, टोलमाफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माताभगिनिंना ३ सिलेंडर वर्षभरात मोफत देण्याची योजना, माझ्या बळीराजासाठी ७५० एचपी पेक्षा कमी मोटारपंप वापरणाऱ्यांना वीज माफी असेल. अश्या अनेक क्रांतीकारी व कल्याणकारी निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी घेतले. यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपचे राज्यातील शीर्ष नेतृत्व व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल. ह्या विधानसभेचा कार्यकाल हा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. त्याच्या आत नवीन विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे. २० नोव्हेंबरला मतदान आणि मतमोजणी २३ नोव्हेंबरला आहे आणि त्यामुळेच कार्यकाल संपायच्या आत विधानसभेची निवडणूक व निवडणूक निकाल दोन्ही पार पडत आहे. त्यामुळे कुठेही केंद्रीय निवडणूक आयोग २६ नोव्हेंबर नंतर निवडणूका घेत नाही. महाविकास आघाडी या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. कुठल्या मुद्द्यांवर महायुतीविरोधात प्रचार करायचा हा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडलेला आहे. तरुण मतदारांना खासकरुन १८ ते २५ वयोगटातील मतदारांना व पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना आवाहन आहे की, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा जो पवित्र हक्क आपल्याला दिलेला आहे तो हक्क आपण निभावला पाहिजे. जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रात मतदान कसे होईल यासाठी माझ्या तरुण मित्रांनी प्रयत्न करायला हवेत, असे अपील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे.

 पांढरीच्या लाकडांची तस्करीप्रकरणी संबंधितांवर

 शहापूर वन विभागाने काय कारवाई केली ? – सागर जोंधळे ठाणे : पांढरीच्या लाकडांची तस्करी केल्याप्रकरणी शहापूर तालुक्यातील डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर संबंधितांवर शहापूर विभागीय वन अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली ? असा प्रश्न डोंबिवली येथील स. है. जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांनी माहितीच्या अधिकारात विचारला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये पांढरीच्या लाकडांची तस्करी केल्याप्रकरणी वनविभाग शहापूर यांनी वअनिल देशमुख यांच्या डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर कारवाई केलेली होती व वन विभागाकडून धाड टाकून पांढरीची लाकडे जप्त करण्यात आली. पुढे आपण संबंधित व्यक्तीवर काय कारवाई केली ? आणि कारवाई केली असल्यास त्याची पूर्ण माहिती मला मिळावी ? असे प्रश्न स. है. जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांनी माहितीच्या अधिकारात विचारला आहे. सागर शिवाजीराव जोंधळे यांच्या या माहिती अधिकारातील प्रश्नाने शहापूर विभागीय वन अधिकाऱ्यांकडून उत्तरे देताना अनेक गुपीते बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. यामुळे सागर शिवाजीराव जोधळे यांच्या प्रश्नांना शहापूर विभागीय वन विभाग काय उत्तरे देतो याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे. चौकट पांढरीचे लाकुड खुप दुर्मिळ अशी वनस्पती आहे. ही वनस्पती मुख्यत: कोकण भागातील जंगलामधेच आढळते. पांढरीच्या लाकडाचे मुख्य वैशिष्टे म्हणजे या वनस्पतिचे लाकुड पाण्यात तळाशी बुडते.

अर्चना देशमुख यांच्या श्री ब्रम्हगुलाब तालवाद्य क्लासेस संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

ठाणे : श्री. ब्रम्हगुलाब तालवाद्य क्लासेस, ठाणे या संस्थेच्या प्रमुख अर्चना देशमुख यांनी आयोजित केलेल्या वार्षिक संमेलणाचा कार्यक्रम नुकताच द्वारका बँक्वेट हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. दर्शना योगेश जानकर, डॉ. अरुंधती भालेराव, तेजश्री सावंत, चंद्रकांत चौधरी, चेतन कोळी, आनंदी खोत, पत्रकार अनिल ठाणेकर आदी विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर उपस्थित होते. श्री ब्रह्म गुलाब क्लासेस यांचा स्नेहसंमेलन तसेच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता  हा सांस्कृतिक कार्यक्रम अर्चना देशमुख यांच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवत स्वतंत्र तबला वादन, ढोलकी वादन तसेच गायन नृत्य यांच्या सादरीकरणाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रेक्षकांनी व पालकांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी मान्यवरांचे योग्य असे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभले गेल्या पंधरा वर्ष विद्यादानाचे कार्य श्री ब्रह्म गुलाब क्लासेस मार्फत अर्चना देशमुख या करीत आहेत ठाणे, मुलुंड येथे ऑनलाइन वर्ग अर्चना देशमुख या घेत असतात.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कालवार मुंबई विभागात तिसरी

ठाणे : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा कालवार ता. भिवंडी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गटातून मुंबई विभागात तृतीय क्रमांक मिळावला…

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे,…

ठाणे स्थानकातील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला आळा बसणार

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली काही मुजोर रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे प्रवासी हैराण झाले होते. अखेर या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि रात्रीच्या वेळेत स्थानक परिसरात अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यास सुरूवात केली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरेक्षेच्या दृष्टीकोनातून शेवटचा प्रवासी असे पर्यंत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा मालकांना पांढरा गणवेश आणि चालकांना खाकी गणवेश परिधान करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या सर्व नियमांची अंमलबजावणी झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरातील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानक ओळखले जाते. ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. स्थानक परिसरात महापालिकेने सॅटीस पूलाखाली रिक्षा थांबा तयार केला आहे. काही रिक्षा चालक थांबा सोडून बाहेर उभे राहतात आणि स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून दुप्पट रिक्षा भाडे आकारून त्यांची लुट करतात. विशेष म्हणजे, या भागात वाहतूक पोलिसांची चौकी आणि ठाणेनगर पोलिसांचे वाहन उभे असते. पोलिसांदेखत हे सर्व घडत असतानाही ते कारवाई करण्याचे टाळत असल्याचे चित्र होते. या बाबत वाहतूक पोलिसांना तक्रारी प्राप्त होत्या. काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्थानक परिसराची पाहाणी केली. त्यानंतर येथील गावदेवी रिक्षा थांबा, स्थानक परिसरातील रिक्षा थांब्याविषयी नव्याने आराखडा तयार केला आहे. गर्दीच्या वेळेत रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूटमार किंवा रिक्षा चालक बेशिस्त पद्धतीने वाहन चालवित असतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सकाळी आणि रात्रीच्या वेळी १०- १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नेमणूक करण्यास सुरूवात केली आहे. वाहतूकीचे नियमन करण्यासाठी हे कर्मचारी उपलब्ध असतील. तसेच रात्रीच्या वेळेत अनेकदा महिला प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सॅटीस पुलाखालील रिक्षा थांब्यावर शेवटचा प्रवासी निघे पर्यंत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच रात्री संबंधित अधिकारी त्याठिकाणी उपस्थित आहे. याचे छायाचित्र काढून ते वरिष्ठांना पाठवावे लागणार आहे. या नियमामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळा आहे. गावदेवी परिसरातही रिक्षा चालक दुहेरी पद्धतीने रांग उभी करून वाहतूकीस अडथळा आणत होते. या समस्येबाबत काही दिवसांपूर्वीच वाहतूक पोलीस, व्यापारी आणि रिक्षा चालक संघटनेची बैठक पार पडली. रिक्षा चालकांना गर्दीच्या वेळेत आता एकेरी पद्धतीने वाहने उभी करण्याच्या सूचना केल्या आहेत. या नियमांची कडेकोट अंमलबाजवणी झाल्यास सॅटीस पूलाखालील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला आळा बसू शकतो असे प्रवाशांचे म्हणणे आहे. सॅटीस पूलाखालील वाहतूकीचे नियमन करण्यासाठी गर्दीच्या वेळेत सकाळी १० आणि रात्री १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पूलाखाली रिक्षा थांब्यावरील प्रवाशांसाठी एक अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातही नियमन केले जाणार आहे. – पंंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक पोलीस. 00000

लाडकी बहीणींना योजनेचा अर्ज घ्यावा लागतोय विकत

 दुकानदारांकडे हे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न उपस्थित ठाणे : माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाने १५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ दिली होती. परंतू, हे अर्ज केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका स्विकारतील असे सांगण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला अंगणवाडीत जाताच त्यांना शेजारील दुकानांमधून अर्ज विकत घेण्यास सांगितले जात असल्याचा प्रकार जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांवर उघडकीस आला आहे. दुकानदारांकडे सरकारी योजनेचे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सुरुवातीला हे अर्ज प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मार्फत भरले जात होते. त्यानंतर, या योजनेचे संकेतस्थळ तसेच ॲप्लिकेशन तयार करण्यात आले. त्यामुळे अनेक महिलांनी घरबसल्या या योजनेचा अर्ज भरला होता. अर्ज ऑफलाईन भरलेला असो किंवा ऑनालईन या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नव्हते. यापैकी ज्या महिलांच्या अर्जाला मंजूरी मिळाली, त्यांच्या खात्यावर ऑगस्ट महिन्यापासून योजनेचा हफ्ता येण्यास सुरुवाती झाली. परंतू, या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून सरकारने या योजनेचा अर्ज भरंण्यासाठी मुदत वाढ दिली. परंतू, हे अर्ज केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत भरता येतील, असे सांगण्यात आले. सरकारकडून १५ ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानुसार, अंगणवाडी केंद्रांवर सकाळी १० वाजल्यापासून महिलांच्या रांगा लागत होत्या. परंतू, ठाणे शहरातील काही केंद्रांवर महिलांना योजनेचा अर्ज शेजारील दुकानांमधून पाच किंवा दहा रुपयास विकत घेण्यास सांगितले जात होते. त्यामुळे महिलांची अंगणवाडी केंद्रावर तसेच दुकानांमध्ये गर्दी होत होती. परंतू, सरकारी योजनेचा हा अर्ज खासगी दुकान चालकांकडे पोहोचला कसा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सरकारने सुरुवाती या योजनेचा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचे शुल्क स्विकारले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. परंतू, आता याच योजनेचा अर्ज विकत घ्यावा लागला असल्यामुळे महिलांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. यासंदर्भात, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी संपर्क साधला असता, यांसदर्भात माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 टोल माफीवरून राजकीय श्रेयवादासाठी चढाओढ

lठाण्यातील टोलनाक्यावर मनसे, शिंदेसेना, भाजपचा जल्लोष ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांच्या टोल माफीचा निर्णय जाहीर करताच श्रेयवादावरून आता राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. या निमित्ताने ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यावर मनसेने जल्लोष करीत पेढे वाटले. तर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्यामागोमाग भाजप कार्यकर्त्यांनीही टोलनाक्याकडे धाव घेतली. टोलनाक्यावर खोळंबा टोलमाफीचा निर्णय सोमवारी सकाळी जाहीर झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर वाहन चालकांना लाडू  आणि पेढे वाटले. मनसेचे पदाधिकारी तेथून निघाल्यावर शिंदे सेनेचे पदाधिकारी तेथे पोचले आणि त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली.  या श्रेयवादामुळे टोलनाक्यावर सोमवारी वाहनांचा अक्षरश: खोळंबा झाला. १२ वर्षे आमचा टोलमाफीसाठी संघर्ष सुरू होता. आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी अंगावर केसेस घेतल्या. टोलमाफी व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सर्वप्रथम आवाज उठवला. कोणी आता काही बोलत असेल तरी खरे श्रेय राज ठाकरे यांचेच आहे. – रवी मोरे, शहराध्यक्ष, मनसे, ठाणे हे टोलनाके आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबई ठाण्यातील लोकांवर लादले. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष होता. २००९ साली मी पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार झालो. मी आणि शिंदे हे विरोधी पक्षाचे सदस्य असताना आम्ही आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन केले होते. पाच वर्षांपूर्वी जे वचन दिले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करून दाखविले आहे. -प्रताप सरनाईक, आमदार, शिंदेसेना     नऊ वर्षांपूर्वी मी याच आनंदनगर टोलनाक्यावर टोलमाफीसाठी आंदोलन केले होते. सत्ताधारी पक्षात असो वा विरोधी पक्षात असो, सातत्याने टोलमुक्ती करा आणि मुंबई एन्ट्री पॉइंटला टोल लावू नका, अशी वारंवार मागणी केली. आंदोलन आणि उपोषण केले. आज खऱ्या अर्थाने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला. – संजय केळकर, आमदार, भाजप