Category: ठाणे

Thane news

शेतकऱ्यांनी कापूस बियाण्यांच्या ठराविक वाणांचा आग्रह धरु नये-कृषी संचालक विकास पाटील

ठाणे : महाराष्ट्र कापूस बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु शेतकऱ्यांनी कापसाच्या विशिष्ट वाणांसाठी आग्रह धरु नये, असे आवाहन कृषी संचालक (निविष्ठ व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्यात कापूस पीक क्षेत्र 40.20 लाख हेक्टर आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति हेक्टर 4.2 पाकिटे बियाण्याची आवश्यकता असते. या क्षेत्रासाठी 1 कोटी 70  लाख पाकिटाची आवश्यकता आहे. सर्व कंपन्यांचा आढावा घेतला असता, साधारपणे 1.75 कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कापूस बियाण्याची कमतरता नाही. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या काही वाणांना विशेष मागणी आहे. परंतु त्याबरोबर इतर कंपन्यांचे कापसाचे वाण सुद्धा अतिशय चांगले उत्पादन देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या ठराविक वाणांचीच मागणी करू नये, याबाबत कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. केंद्र सरकारने खरीप 2024 साठी कापूस BG II चा दर 864 रुपये निश्चित केला आहे. कापूस बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र तसेच कापूस उत्पादक कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) यांच्यामार्फत आदेश देण्‍यात आलेले आहेत. तसेच काही ठिकाणी कापूस जादा दराने विक्री केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कृषी विभागातील स्थानिक कृषी सहाय्यक यांच्या मदतीने संबंधित कापूस बियाण्याचे वाटप कृषी विभागाच्या कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण एच.टी. बीटी कापूस बियाणेबाबत चंद्रपूर जिल्ह्यात चार ठिकाणी कारवाई करण्यात आल्या. त्यामध्ये 4568.30 किलो (एकूण किमत 66.85 लाख) बियाणे साठा जप्त करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात 30 क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले. तसेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात तीन ठिकाणच्या कारवाईत 1807 एच.टी.बीटी कापूस बियाणे पाकिटे (37.96 लाख किमतीचे) साठा जप्त करण्यात आला. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात तीन ठिकाणी 113 बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली असून त्याची किमत 1.55 लाख रुपये आहे. सर्व जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर भरारी पथकामार्फत मोहिम स्वरुपात तपासणी करण्यात आली असून त्याअनुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठ व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी कळविली आहे.

उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी- अशोक शिनगारे

ठाणे : उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनसाठी दि.31 मे, 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारची “व्हीआयपी दर्शन”सुविधा देण्यात येणार नसल्याचे एका पत्राद्वारे सर्व राज्यांना कळविले असून पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वासाठी नोंदणी अनिवार्य आहे. तरी सर्व भक्तांनी चारधाम यात्रा 2024 च्या नोंदणीसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी केलेल्या यात्रेकरुंनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल. तसेच वरिष्ठ नागरिकांनी चारधाम यात्रेपूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.आरोग्य  विभागाच्या  मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन  करावे, असे आवाहन उत्तराखंड शासनाने केले आहे. उत्तराखंड शासनाने केलेल्या आवाहनानुसार ठाणे जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

ठाण्यात पाणी कपातीचा धोका लांबला

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहरातील काही भागात शुक्रवारी २४ तासासाठी पाणी पुरवठा बंद राहणार होता. परंतू, काही अपरिहार्य कारणांमुळे दुरुस्तीचे हे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी पाणी पुरवठा नियमित होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली. एमआयडीसीच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत बारवी गुरुत्व जलवाहिनीच्या कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून २४ तासासाठी बंद राहणार होता. या कालावधीत महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ व ३१ येथील काही भाग वगळता ), कळवा, वागळे इस्टेट, रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक दोन, नेहरुनगर तसेच कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. त्यानंतर, पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. परंतु, दुरुस्तीचे काम काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे शहरात शुक्रवारी पाणी पुरवठा नियमित होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली.

अंजुरच्या संस्कार इंग्लिश स्कूलचा सलग नवव्यांदा १०० टक्के निकाल

सिद्धी माळी ९१ टक्के गुणांसह प्रथम भिवंडी : ज्ञानज्योत समाज प्रबोधन मंडळाच्या अंजुर येथील संस्कार इंग्लिश मिडियम स्कूलने सलग नवव्यांदा १०० टक्के निकालाची अखंड परंपरा कायम ठेवली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत सिद्धी माळी ही ९१ टक्के गुणांसह प्रथम आली असून, संस्थेचे अध्यक्ष राम माळी व सचिव दीपक म्हणेरा यांनी अभिनंदन केले आहे. अंजूर, भरोडी, अलिमघर, सुरई, सारंगगाव, वेहेळे, भाटाणे, माणकोली, अंजुरदिवे या ९ गावातील तरुणांनी एकत्र येऊन संस्कार इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना केली होती. या शाळेत अल्प शुल्कामध्ये इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जाते. या शाळेत १४०० विद्यार्थी असून, शाळेचा स्थापनेपासून दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लागत आहे. यंदाच्या परीक्षेत ह्रदेश वर्मा याने ९० टक्के, एलिना पाटील हिने ८९ टक्के, आर्यन पाटील याने ८८.२० टक्के, राणी भोईर हिने ८८ टक्के गुण मिळविले. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे.

एका बापाचे पोस्टर फाडले आणि दुसर्‍या बापाला अडचणीत आणले – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : किरण शिखरे यांच्यावर दबाव दडपशाही वापरायची गरजही नाही. जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या कारवाई प्रकरणी मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करतो. कळवा मुंब्र्यात २०१४ व २०१९ पेक्षा २०२४ ला सर्वाधिक मतदान झाले आहे. यामुळे आव्हाड यांचा दावा चुकीचा. आव्हाड यांनी एका बापाचे पोस्टर फाडले आणि दुसर्‍या बापाला अडचणीत आणले. आभाराचे ट्विट करणाऱ्या छगन भुजबळसाहेबांनाच आव्हाड गद्दार म्हणाले होते. सरड्यापेक्षाही रंग बदलणारे आव्हाड आहेत, अशी सणसणीत आरोप माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहेत, धीरज शर्मा यांच्याबरोबर किरण शिखरे हेएकटे आले होते आणि एकटेच परत गेले आहेत.दिल्या घरी तु सुखी रहा अशा शुभेच्छा देऊन यापेक्षा अधिकचे महत्व त्यांना देण्याची गरज नाही.२ जुलै २०२३ रोजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांनी वेगळा राजकीय निर्णय घेतला त्यांच्याबरोबर तेव्हा मी पहिला जिल्हाध्यक्ष होतो जो २ जुलैलाच देवगिरीवर गेलो होतो आणि ठाण्यातील ९५ टक्के कार्यकर्ते हे अजितदादांबरोबर आले. महाराष्ट्रातील ठाण्याचे आमचे पहिले कार्यालय होते ज्याचे उद्घाटन ९ ऑगस्टला अजितदादांच्या हस्ते झाले होते. आमच्यावर तर कधी कोणी दबाव आणला नाही. जगातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्या फक्त कळवा मुंब्र्यातच होतात अशाप्रकारचे चित्र भासविण्याची कायम जितेंद्र आव्हाड यांना सवय आहे. यामुळेच आजकाल मी त्यांना रिसर्चचे डाॅक्टर झालेले न म्हणता, नौटंकीकार, नकलाकार, नाटककार असे म्हणतो. लोकसभेचे २० मे ला मतदान झाल्यानंतर असा काही त्यांनी प्रचार केला की कळवा मुंब्राकडे मुद्दामहून मतदानाचा स्पीड कमी करण्यात आला होता. कळवा मुंब्र्यातील मतदानाची आकडेवारी पाहता, २०१४ व २०१९ पेक्षा २०२४ ला सर्वाधिक म्हणजे २ लाख १६ हजार मतदान झाले आहे. मतदानासाठी मुंबई ठाण्यातही रांगा लागल्या होत्या व पिण्याची पाण्याची, पंख्याचा आदी सोईसुविधा जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून केली गेली नसल्याने मतदारांची गैरसोयहो झाली होती, ही वास्तविकता आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी फक्त कळवा मुंब्र्यात कमी झाली हे आव्हाड यांचे म्हणणे आकडेवारीच खोडून काढते आहे. जे जितेंद्र आव्हाड यांनी कृत्य केले, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर येथे फाडले याच्यावर शासनाने कारवाई केलेली आहे, महाड येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत, याबद्दल  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांचे मनापासूनआभार व्यक्त करतो मला फासावर लटकवा असा ड्रामा आता त्यांनी केला. माझी त्यांना विनंती आहे की बस्स झाले, चुकून झाले, अनवधानाने झाले हे कुठलेच शब्द त्यांनी वापरणे त्यांनी बंद करावे. अशाच प्रकारचे त्यांनी शिर्डीच्या अधिवेशनात बोलताना भगवान श्रीरामाबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. आणि पक्षाला अडचणीत आणले होते. त्यानंतर धनगर समाजाचे दैवत मल्हाररव होळकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. याबद्दल त्यांना धनगर समाजाची माफी मागावी लागली होती. औरंगजेबाने हिंदू देवदेवतांची मंदिरेही तोडली… असे बोलून ते वाक्य कट करुन पुन्हा बाईट दिल्याचे लोकांनी पाहिले. काल मनुस्मृती जाळण्यासाठी आव्हाड महाड येथे गेले होते त्या पोस्टरवर परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता ते पोस्टर फाडले आणि पायाशी फेकले हे आख्या जगाने बघितले, त्यांच्या एका सहका-याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला शेवटी कपाळावर हात मारला तरीही त्यांनी व त्यांच्या आजुबाजुच्या सहका-यांनी तरीही पोस्टर फाडले त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. माझी पोलीसांना विनंती आहे की कायदेशीर कारवाई केली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, वंचित आघाडी, आरपीआय, शिवसेना यांनी आव्हाड यांच्या निंदनीय प्रकाराबद्दल त्यांचा निषेध करत आहेत. सर्वांची मागणी हीच आहे की यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.बाबासाहेब यांचे जे पोस्टर आव्हाड यांनी फाडले ते डिझाईन त्यांच्या कार्यालयात झाले होते, सोशल मिडियाचा कार्याध्यक्ष असलेल्या मोहसिन शेख याने ते डिझाईन केले होते. पोस्टर चे डिझाईन बघितले गेले असेल, कोणी डिझाईन केले,कुठून प्रिंट झाले, कोणाच्या गाडीतून ते त्या स्थानापर्यत नेण्यात आले याची सर्वांची चौकशी करण्यात यावी. भाषणात म्हणायचे परमपूज्य, बोधिसत्व, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर हा माझा बाप आहे.आणि त्या बापाचेच पोस्टर त्यांनी फाडले, ज्यांना ते आपल्या विचारांचे वारसदार समजतात ते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब ज्यांना ते बाप संबोधतात त्या बापाला अडचणीत आणले. म्हणजे एका बापाचे पोस्टर फाडले आणि दुसर्‍या बापाला अडचणीत आणले. राष्ट्रवादीचे जयंत पाटीलसाहेबांनी शेवटी ट्विट करुन त्यांची बाजू मांडून सावरायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब यांनी ही भूमिका मांडली आहै की, याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे, कायदेशीर कारवाई झालेली आहे. मुळ मुद्दा आहे की, मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमात येता कामा नयेत ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे समर्थन करीत नाही, त्याचा विरोधच करीत आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांनी देखील स्पष्ट केलेले आहे की, कुठल्याही प्रकारे मनुस्मृतीमधील श्लोक हे पाठ्यक्रमात येणार नाहीत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण केवळ स्टंट करायचा आव्हाड यांनी प्रयत्न केला आणि यात परमपूज्य बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांनी अवमान केला.टीआरपीसाठी कुठल्या लेव्हलला जावू शकतो हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेले आहे. ही देखील आठवण करुन देतो की, २८ ऑगस्ट २०२३ रोजी छगन भुजबळसाहेब यांचा आव्हाड यांनी पुतळा जाळला होतात,त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता आणि हे आंदोलन तुमच्या पक्षकार्यालयाबाहेर तुम्ही केले होते आणि या आनंद परांजपे यांनी त्याच जुन्या पक्ष कार्यालयाबाहेर तुमचा पुतळा जाळला होता. त्यामुळे सरडा देखील रंग बदलत नाही त्याच्यापेक्षा जास्त रंग जितेंद्र आव्हाड बदलणारे आपण. ज्या आभाराचे ट्विट छगन भुजबळसाहेबांच्या नावे केले आहे हे तुमचे रंग बदलणे दाखवते, असा थेट आरोप प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे.

मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी थेराप्युटिक ऍक्टिव्हिटीचा वापर

ठाणे : सरकारी कार्यालयात फाईल्स, लेटर पॅड सारख्या स्टेशनरी साठी मोठा खर्च असला, तरी ठाणे मनोरुग्णालयात स्टेशनरी खर्चात बचत करण्यासाठी मनोरुग्णांचा हातभार लागतो आहे. मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेराप्युटिक ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. बुध्दीला चालना देताना व्यवसाय उपचाराचा उपयोग केला असून, मनोरुग्णांना स्टेशनरी तयार करण्याचे धडे दिल्यामुळे आता रुग्णालयासाठी लागणाऱ्या फाईल्स, डिस्चार्ज कार्ड व खावटी खर्च कार्ड  सारख्या गोष्टी रुग्णालय कामकाजासाठी उपयोगी पडत आहेत. ठाणे मनोरुग्णालयाचे नाव काढले की पटकन तेथील वातावरण डोळ्यासमोर येतं…  मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात. परंतु उपचारासोबत रुग्णांचे अंतर्गत कौशल्य शोधण्याचा प्रयत्न ही केला जातो आहे. मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेराप्युटिक ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जातात. व्यवसाय उपचार पद्धतीच्या सहाय्याने मानसिक आजारपणामुळे कमी झालेल्या शारीरिक व बौद्धिक कौशल्यांवर भर देऊन मानसिक आरोग्य सुधारवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील पुरुष व्यवसाय उपचार विभागात  स्टेशनरी साहित्या बरोबर पेंटिंग, शिवणकाम सारखे शिक्षण दिले जात असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. पायल सुरपाम यांनी दिली. रुग्णांनी तयार केलेल्या अनेक वस्तू ठाणेकरांच्या पसंतीला उतरताना दिसतात. सण  उत्सवाच्या काळात लागणाऱ्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण मनोरुग्णांना दिलं जात आहे. तर वर्षभर रुग्णालयासाठी लागणाऱ्या फाईलस, रुग्णालयात लागणारे डिस्चार्ज कार्ड व खावटी खर्च कार्ड बनवत आहेत. स्टेशनरी तयार करण्यासाठी कच्च साहित्य आणून दिलं जात,  त्यानंतर रुग्ण स्टेशनरी बनवत असल्याचे व्यवसाय उपचार तज्ञ  डॉ.प्रियतम दंडवते म्हणाले रुग्णालयात दर महिना पाचशे ते सहाशे फाईलस व तीनशे ते चारशे डिस्चार्ज कार्ड बनवले जातात या साहित्याचा उपयोग रुग्णालयीन तसेच कार्यालयीन कामकाजात केला जातो. यामुळे रुग्णालयावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होते व रुग्णांच्या पुनर्वसनास मदत होते. डॉ.अश्लेषा कोळी (व्यवसाय उपचार तज्ञ) मनोरुग्ण लवकर बरा होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी रुग्णालयाचे प्रयत्न असतात. व्यवसाय उपचार थेरपीने रुग्णाची हात डोळे आणि मेंदू यांची सुसूत्रता, आकलन क्षमता, एकाग्रता, आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. डॉ. नेताजी  मुळीक     (वैद्यकीय अधीक्षक, मनोरुग्णलय ठाणे)

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निषेध

ठाणे : मनुस्मृती प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाण्यात निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फडल्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड तसेच मनुस्मृतीचे श्लोक शिक्षणाच्या पाठ्य पुस्तकात आणू पाहणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि मनुस्मृतीची प्रतिमा फाडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. ठाण्यातील कोर्ट नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर बुधवार (ता.३०) दुपारी हे आंदोलन झाले. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षणाच्या पाठ्यक्रमात मनुस्मृती मधील काही श्लोकचा समावेश करण्याचा निर्णय जाहीर करताच त्या विरोधात आंबेडकरी जनतेमध्ये रोष पसरल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती पुस्तकाचे दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली. त्याविरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पसरले. वंचित बहुजन आघाडीने बुधवारी ठाण्यात निदर्शने केली. यावेळी आव्हाड यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मनुस्मृती यांच्या प्रतिमा झळकावून त्या फाडण्यात आल्या. आमदार जितेंद्र आव्हाड हे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याचसोबत पाठ्यक्रमात मनुवाद घुसवणे हे देखील निषेधार्थ आहे. त्यामुळे हे सरकारही आंबेडकर आणि संविधान द्रोही असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष भोला मंडल, शरणंम् फाऊंडेशन चे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहर जिल्हा उप अध्यक्ष भोला मंडल, शरणं संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, उद्धव पळसपगार, सुनील कांबळे, भास्कर जाधव, साबळेताई, सोमनाथ पाटील, फुलचंद हौसमल, सुनील कडाळे, उषा काटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे नगर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

आपत्ती निवारण आराखडा तयार करावा- अशोक शिनगारे

मान्सून कालावधीतील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी ठाणे : पावसाळ्यात होणाऱ्या आपत्ती टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आतापासून आपत्ती निवारण आराखडा तयार करावा. तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रादेशिक आपत्ती नियंत्रण कक्ष उभारावे. तसेच संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने प्राथमिक उपाययोजनासंदर्भात प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आल्या. मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने पूर्व तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, ठाणे महानगरपालिका उपायुक्त जी.जी. गोदापुरे, महामार्ग पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपअधीक्षक विजय डोबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सिद्धार्थ तांबे, लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक निकम, भिवंडी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र वरर्णीकर यांच्यासह दूरसंचार विभाग, नागरी संरक्षण दल, वाहतूक विभाग, महावितरण, एनडीआरएफ, एसडीआरएफ व टीडीआरएफचे अधिकारी, नगरपालिका/नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, प्रादेशिक परिवहन विभाग आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मान्सून काळात जिल्ह्यात कोणतीही आपत्ती घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. तसेच संभाव्य आपत्ती निवारणासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्याच्या कालवधीत पावसाची आकडेवारी नोंदविण्यासाठी पर्जन्यमापक यंत्रे सुव्यवस्थित ठेवणे, दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी गोळा करणे, आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू ठेवावे, धोकादायक पूल, रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. मान्सून कालावधीत साप, विंचू दंश यावरील प्रभावी औषधांचा साठा उपलब्ध करावा. साथीच्या रोगांवरील उपाययोजना करण्यासाठीही औषधे/लसींचा साठा पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावा. जनावरांना होणारे आजारांसाठी लागणारे औषधे उपलब्ध होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. महापालिका, रेल्वे विभागांनी समन्वयाने नालेसफाई, गटारांची सफाईची कामे वेळेआधी पूर्ण करावीत. महापालिका, नगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची माहिती तयार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

ठाणे जिल्ह्यातील ११ बारचे परवाने निलंबित

ठाणे : ठाणे उत्पादन शुल्क विभागाने नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या हाॅटेल, बार-रेस्टाॅरंटवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली. ठाणे जिल्ह्यातील ११ हाॅटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले आहेत. अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री…

चुक झाली, माफी असावी- आव्हाड

 अनिल ठाणेकर ठाणे : मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनवधानाने फाडण्यात आले.मी याबद्दल जाहीर माफी मागतो अशी खंत ट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…