Category: ठाणे

Thane news

निवडणूक मशीन्सची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर लागणाऱ्या ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभानिहाय मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी पुरविण्यात येणाऱ्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट…

डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढीव मताधिक्यासाठी प्रयत्न करा – दशरथ पाटील

अनिल ठाणेकर कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांचा विजय शंभर टक्के आहे म्हणून हुरळून जाऊ नका तर यश किती टक्क्यांनी मिळतो आहे याला महत्व आहे. यामुळे डाॅ श्रीकांत शिंदे यांना वाढीव मताधिक्य कसे मिळेल याकडे लक्ष द्यायला हवे. असे मत शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी व्यक्त केले. तर कल्याण मतदारसंघात ४८८ कोटींची विकास कामे करणार्‍या डॉ.श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या खारीगाव पारसिक नगर येथील निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात दशरथ पाटील व उमेश पाटील हे बोलत होते. यावेळी  माजी नगरसेवक दिनेश कांबळे, विभाग प्रमुख शाम पाटील, उपविभाग प्रमुख रवि नाटील उपविभाग प्रमुख नरेंद्र पाटील, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, भाजपचे सचिव चंद्रहास मोरे, मनसे शहरप्रमुख सुशांत सूर्यराव, कळवा मुंब्रा महिला आघाडी सहसंघटक रचना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांच्या काळात काश्मीरमधील ३७० कलमाबाबतचा झालेला निर्णय स्वागतार्ह आहे. सर्वधर्मीयांसाठी एकच समान नागरी कायदा आणण्यात यावा, यासाठी मोदी सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांना एखाद्या कामाबाबत फोन केला तर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याची दखल घेत काम तडीस नेतात. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी जितका निधी कल्याणमध्ये आणला तितका निधी संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही मतदारसंघात आला नाही. श्रीकांत शिंदे संसदेत अभ्यासपूर्ण भाषण करतात. विकासाला त्यांचे नेहमी प्राधान्य असते. यामुळे महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांना वाढीव मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी या परिसराचा विकास केला आहे. ४८८ कोटींची विकास कामे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मार्गी लावली आहेत, यात खारीगाव-पारसिक परिसरातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे. ४ तारखेला खासदार म्हणून निवडून आल्यावर डॉ.श्रीकांत शिंदे यांना खारीगाव पारसिक परिसरातील शिल्लक विकास कामांच्या सोडवणूकीसंदर्भात चर्चा करणार आहोत. यामुळे येत्या २० मे रोजी कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्काने विजयी करुया, असे आवाहन शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश मोबाईल नंबर आणि पर्यायी नंबर सुरू राहील याची अधिकाऱ्यांनी घ्यावी दक्षता ठाणे : नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा, त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचेच मूल्यांकन होईल, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केले. ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसेच, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन गुरूवारी सायंकाळी नागरी संशोधन केंद्र, माजिवडा येथे करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख आदी उपस्थित होते. त्याचबरोबर, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, तहसिलदार, शासकीय रुग्णालय, मध्य रेल्वे, हवाई दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महावितरण, टोरंट पॉवर, एमआयडीसी, एमएमआरडीए, एसटी महामंडळ, ठाणे मनपा परिवहन सेवा, महानगर गॅस, अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, लायन्स क्लब, जमाते इस्लामी हिंद, इंडियन रेड क्रॉस यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबद्दल सादरीकरण केले. उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली. तर, बैठकीची सांगता अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केली. ‘प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत’ पावसाळा सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी आहे. या वेळेचा उपयोग करून सर्व यंत्रणांनी त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत. आवश्यक तेथे महापालिकेच्या यंत्रणेला सोबत घेऊन समस्यांमधून मार्ग काढण्यात यावा, अशी सूचना आयुक्त राव यांनी केली. आपत्तीच्या काळात अफवा पसवल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर तत्काळ त्याचे खंडन करून वास्तव स्थिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यासाठी बल्क एसएमएस, समाज माध्यमे, प्रसारमाध्यमांची मदत घेण्यात यावी, असेही राव यांनी सांगितले. एकत्रित नियंत्रण कक्षात पालिका, पोलीस, महावितरण यांचे प्रतिनिधी २४ तास वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये हजर राहतील. त्यामुळे यंत्रणांमधील समन्वय साधणे सोपो होईल, असेही राव यांनी सांगितले. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेले महापालिका आणि पोलीस यांचे १६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नेटवर्क पूर्णपणे कार्यरत राहील, त्याची दुरुस्ती तत्काळ केली जाईल, यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात यावी, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. रेल्वे मार्गावरील पुलाची दुरुस्ती कोपरी येथे रेल्वेमार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्याची आवश्यकता असून त्याबद्दल रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांनी परवानगी दिल्यास या दुरुस्तीचे काम महापालिकेमार्फत करण्यात येईल, असेही राव यांनी सांगितले. भंगार, बेवारस वाहनांच्या विरोधात मोहीम रस्त्यावर असलेली बेवारस वाहने हटविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका यांनी संयुक्त मोहीम हाती घ्यावी. ही वाहने ठेवण्यासाठी जागा शासनाकडून उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे रहदारीस असलेले अडथळे दूर होतील. पुढील १५ दिवसात ही मोहीम व्हावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. मेट्रो, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पावसाळ्यात कोणतेही मोठे खोदकाम टाळावे. खोदलेला भाग पूर्ववत करून वाहतूक योग्य करावा. खोदकाम अत्यावश्यक असल्यास त्यासभोवती व्यवस्थित बॅरिकेडिंग केले जावे, अशा सूचनाही आयुक्त राव यांनी या बैठकीत दिल्या. माजिवडा-कापूरबावडी फ्लायओव्हरचे काम करण्यात आले असून मानपाडा आणि पातलीपाडा फ्लायओव्हरच्या कामासाठी परवानगी मिळालेली नसल्याचे एमएसआरडीसीच्या प्रतिनिधींनी सांगितले. तर, गायमुख येथील घाट रस्त्याचे कामही वन विभागाच्या परवानगीमुळे सुरू होऊ शकलेले नाही. या पावसाळ्यात हा मार्ग सुस्थितीत राहील याची दक्षता बांधकाम विभागाने घ्यावी, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेतर्फे शुक्रवारी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार वाहून अभिवादन केले. त्याप्रसंगी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठाणेकर नागरिक उपस्थित होते.

मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदान जनजागृतीसाठी हिरानंदानी  परीसरात ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी काल ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट परिसरात मतदार जोडो पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. सदर हिरानंदानी इस्टेट परीसरात १४८ विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक मधील कर्मचारी मोठ्या उत्साहात मॅस्कॉट या मनोरंजक कार्टून पात्राला सोबत घेऊन मतदान करा,मतदान करा लोकशाहीचा विजय करा आणि २० मे को सब काम छोडो मतदान करो या घोषणा मोठ्या आवाजात देऊन व हातात मतदान जनजागृतीचे संदेश यावेळी नागरिकांनी दिले. संपूर्ण हिरानंदानी इस्टेट परीसरात मॅस्कॉटच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजन करत उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देवून येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा बाजूकडील नागरिक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदार लोकांना या रॅलीतून मतदान करण्यासाठी जागृती करण्यात आली.. रॅलीमधील मॅस्कॉट सोबत स्वीप कर्मचारी जनजागृती करीत असल्याचे पाहून मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता. मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप मॅस्कॉटच्या हस्ते सर्व नागरिकांना करण्यात आले आणि लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी त्याचप्रमाणे मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहान सर्व नागरिकांना करण्यात आले.

उल्हासनगरात डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विकास रथाचे पप्पू कलानी, कुमार आयलानी सारथी

उल्हासनगर : महायुती मधील सर्व धर्मीयांसोबत उल्हासनगरातील तमाम सिंधी नेते आणि राजकीय वैरी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना पुन्हा तिसऱ्यांदा जिंकून देण्यासाठी एकवटले असून डॉ.शिंदे यांच्या विकास रथाचे माजी आमदार पप्पू कलानी,आमदार कुमार आयलानी सारथी बनल्याचे चित्र उल्हासनगरातील रॅलीत बघावयास मिळाले आहे. या सुखावून टाकणाऱ्या चित्रांमुळे संपूर्ण शहरातून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना रेकॉर्डब्रेक मते मिळणार आणि ते विजयाची हॅटट्रिक मारणार असा विश्वास कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी 8 तारखेला सायंकाळ पासून शहरातून दोन टप्यात डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या रॅली काढण्यात आल्या.पहिला टप्पा हा अंबरनाथ विधानसभा व कल्याण पूर्व विधानसभेतील कॅम्प नंबर 5 नेताजी चौक ते कॅम्प नंबर 4 ओटी सेक्शन. या रॅलीत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सोबत जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,आमदार डॉ.बालाजी किणीकर,आमदार कुमार आयलानी,शिवसेनेचे चंद्रकांत बोडारे,अरुण आशान,राजेंद्र चौधरी,रमेश चव्हाण,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी,टीम ओमी कलानीचे कमलेश निकम,मनोज लासी,पीआरपीचे प्रमोद टाले,महिला आघाडी यांनी मोठया संख्येने भाग घेतला. पप्पू कलानी-कुमार आयलानी एकत्र रात्रीचा उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील दुसरा टप्पा हा लक्षवेधक ठरला.या रॅलीत डॉ.श्रीकांत शिंदेंसोबत सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे प्रणेते,चारदा आमदार म्हणून निवडून आलेले व जन्मठेपेच्या शिक्षेतून बाहेर आलेले माजी आमदार पप्पू कलानी,विद्यमान आमदार कुमार आयलानी,आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव,भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री,मनसेचे शहराध्यक्ष संजय घुगे आदी सहभागी झाले होते. राजकीय वैरी एकवटले विशेष म्हणजे युथ आयकॉन ओमी कलानी यांच्या टीम ओमी कलानी सोबत कुमार आयलानी,प्रदीप रामचंदानी,भगवान भालेराव,भारत गंगोत्री यांचे राजकीय गणित जुळत नसून त्यांचे राजकीय वैर हे अनेकदा मासमीडियावर उघड होते.असे असले तरी डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सोबत पप्पू कलानी,कुमार आयलानी,भगवान भालेराव,प्रदीप रामचंदानी,भारत गंगोत्री हे एकाच रथावर एकवटल्याने डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रथी महारथिंची मोट बांधली असा सकारात्मक सूर उमटू लागला आहे. डॉ.श्रीकांत शिंदे-ओमी कलानी यांचे दोस्ती का गठबंधन ओमी कलानी यांची पत्नी पंचम ओमी कलानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आहेत.मात्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी मैत्रीचे नाते असल्याने ओमी कलानी यांनी डॉ.शिंदे यांच्यासोबतचे दोस्ती का गठबंधन जाहीर केलेले आहे.त्यासाठी त्यांनी 5 हजार स्टिकर्स तयार केले असून त्याचे अनावरण डॉ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत.याशिवाय डॉ.शिंदे यांच्या प्रचारासाठी दोन प्रचार रथ सज्ज केलेले आहेत.

रोमहर्षक लढतीत अंबरनाथ रायझिंगने मारली बाजी

१२ वी ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ठाणे : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने  गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाचा ३ धावांनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  विजयासाठी  १२५ धावांचा पाठलाग करणाऱ्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला १२२ धावांवर रोखत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या करंडकावर नाव कोरत ९९,९९९ रुपयांचे रोख बक्षीस मिळवले. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगीरी करणाऱ्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबच्या सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला ५५,५५५ रुपयांवर समाधान मानावे लागले. अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करून मोठे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली होती. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यावरअपेक्षेप्रमाणे फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या अंबरनाथ क्रिकेट क्लबला पहिला धक्का पहिल्याच चेंडूवर मिळाला. अंजदीप लाडने सलामीची जोडी फोडत धावांचे खातेही न उघडलेल्या अंबरनाथ क्रिकेट क्लब ब संघाला अडचणीत आणले. पण या धक्क्यानंतर श्रीराज घरतने नाबाद ५० आणि परीक्षित वळसंगकरने २० धावा करत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली. अमित पांडे, धृमील मटकर, अमन खानने प्रत्येकी दोन आणि अंजदीप लाड, हेमंत बुचडे आणि अर्जुन शेट्टीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. माफक आव्हानाला सामोरे जाताना अमन खानने २२ धावांची खेळी करत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पण त्यानंतर थोड्या थोड्या क्रमाने फलंदाज बाद झाल्याने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाची मधली फळी दडपणाखाली आली. या नाजूक परिस्थितीत विकी पाटीलने ३१ आणि आशय सरदेसाईने १८ धावा करत संघाला विजयाची आस दाखवली. पण हे दोघे बाद झाल्यावर जेत्या संघाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही. फलंदाजाना दबावाखाली ठेवताना परिक्षीत वळसंगकर आणि कर्णधार प्रथमेश महालेने प्रत्येकी तीन बळी मिळवले. दशरथ चव्हाणने दोन आणि सौद मंसूरीने एक फलंदाज बाद केला. संक्षिप्त धावफलक : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : १९.४ शतकात सर्वबाद १२५ ( श्रीराज घरत नाबाद ५०, परिक्षीत वळसंगकर २०, अमित पांडेय ४-३३-२, अमन खान २-१६-२, धृमील मटकर ४-२४-२  हेमंत बुचडे ४-१४-१, अंजदीप लाड २-१८-१, अर्जुन शेट्टी २.४- १५-१) विजयी विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) : २० षटकात ९ बाद १२२ ( विकी पाटील ३१, अमन खान २२, आशय सरदेसाई १८, परिक्षीत वळसंगकर ४-१-१५-३, प्रथमेश महाले ४-२३-३, दशरथ चव्हाण ४-२६-२, सौद मंसुरी १-९-१ ). सर्वोत्तम खेळाडू फलंदाज : आदित्य रावत ( बॉईज क्रिकेट क्लब, १८१ धावा). गोलंदाज : धृमील मटकर (अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब, ९ बळी). क्षेत्ररक्षक : अतुल सिंग ( एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब), ५ झेल).

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

महिला गटात चार व व पुरुष गटात चार संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश ठाणे : श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी  महिला गटात प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे), स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), कर्नाळा क्रीडा (रायगड) व शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर)या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पुरुष गटात मिडलाईन कर्जत (ठाणे), विजय काल्हेर (ठाणे), शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) व स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) ह्या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला गटातील पहिल्या उप-उपांत्य लढतीत मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाने धुळ्याच्या शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाचा अटीतटीच्या लढतीत ३३-३१ असा २ गुणांनी पराभव करून  उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाच्या याशिक पुजारीने उकृष्ट चढाया करीत आपल्या संघाला मध्यन्तराला १९-१० अशी ९ गुणांची आघाडी मिळवून दिली. तिला समृद्धी मोहितेने पक्कडीत सुरेख साथ दिली. मध्यन्तरानंतर   शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाच्या विद्या दोलताडे व ज्योती उफळे यांनी चतुरस्त्र खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवण्यात यश मिळवले. परंतु शेवटच्या दोन मिनिटात  राज्य स्पोर्ट्स क्लब संघाने अतिशय परिपक्व खेळाचे प्रदर्शन करीत सामना आपल्या बाजूने झुकवला . महिला गटातील दुसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या लढतीत पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने ठाण्याच्या आर एफ नाईक  संघाचा ४९-१८ असा ३१ गुणांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ह्या सामन्यात  प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघानेसुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत मध्यन्तराला २३-८ अशी १५ गुणांची घेतली ती अंकिता पिसाळ व हर्षी शेट्टी यांच्या उत्कुष्ट खेळामुळे.  मध्यन्तरानंतरही   प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने सामन्याची पक्कड घट्ट ठेवीत सामना ३१ गुणांनी जिंकला . महिला गटातील तिसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात ताकदवर अश्या मुंबई शहरच्या शिवशक्ती महिला संघाने ठाण्याच्या होतकरू मित्र मंडळाचा २८-२० असा ८ गुणांनी पराभव करीत गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवीत श्री मावळी मंडळ स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. ह्या सामन्यात दोन्ही तुल्यबळ संघानी सुरुवातीपासूनच अतिशय सुंदर खेळाचे प्रदर्शन करीत सामन्यात रंगत आणली. मध्यन्तराला शिवशक्ती महिला संघाने प्रतीक्षा तांडेल व समृद्धी भागात यांच्या अष्टपैलू खेळामुळे १४-११ अशी ३ गुणांची नाममात्र आघाडी घेतली.  होतकरू मित्र मंडळाच्या   प्राजक्ता पुजारी व चैताली बोराडे यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. परंतु या दोघी आपल्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत. पुरुष गटातील उप-उपांत्य फेरीच्या लढतीत ठाण्याच्या मिडलाईन कर्जत संघाने वाशिंदच्या जय बजरंग क्रीडा मंडळाचा २४-२० असा ४ गुणांनी पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुरुवातीपासून सामना अतिशय दोलायमान असा झाला व गुणसंख्येचे पारडे दोन्ही संघाकडे फिरत होते. मिडलाईन कर्जत संघाच्या पवन अडेच्या  उत्कुष्ट चढाया, वैभव पाटील व वैभव मोरे ह्यांच्या सुंदर पक्कडीमुळेमध्यंतराला मिडलाईन कर्जत संघाने  १२-१० अशी २ गुणांची नाममात्र आघाडी घेतली.  मध्यन्तरानंतर दोन्ही संघानी अतिशय सावध खेळ करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न करीत होते. जय बजरंग क्रीडा मंडळाच्या दर्शन पवार व आशिष पाटील यांनी आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. परंतु आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. उत्कुष्ट चढाईपट्टू (पुरुष) : आर्यवर्धन नवले (ओवळी क्रीडा मंडळ,मुंबई उपनगर), उत्कुष्ट पक्कड (पुरुष)  : वैभव मोरे (मिडलाईन कर्जत, ठाणे), उत्कुष्ट चढाईपट्टू (महिला)  : विद्या दोलताडे (शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब, धुळे), उत्कुष्ट पक्कड (महिला )  : समृद्धी मोहिते (स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगर) शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) X  बंड्या मारुती सेवा मंडळ (मुंबई शहर)  ४१ X २७ स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) X ओवळी क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर)  ३७ X२२ विजय काल्हेर (ठाणे)  X  श्री विठ्ठल क्रीडा मंडळ (ठाणे) ४४ X ३९

२६ मित्रपक्षांची ही खिचडी निष्ठावंतांची – भास्कर बैरीशेट्टी

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात २६ मित्रपक्षांच्या आघाडीचा खिचडी म्हणून उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी, ही खिचडी निष्ठावंतांची असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या भाषणामध्ये इंडिया अलायन्सचा उल्लेख २६ मित्र पक्षांच्या आघाडीचा खिचडी म्हणून केला होता. आमची ही खिचडी निष्ठावंतांची आहे.हे लक्षात ठेवा. ही आमची खिचडी एनडीए बरोबर असलेल्या महायुतीतील तीन पक्षांच्या बिर्याणीपेक्षा कितीतरी पटीने स्वच्छ, चवदार व पारदर्शक आहे. भारतातील नागरिकांना बिर्याणीपेक्षा खिचडी अधिक आवडते कारण ती पचविणे सोपे असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासारख्या अनुभवी वक्त्याने कोणतेही वक्तव्य करताना थोडे तरी भान बाळगावे, असा सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा उपशहरप्रमुख भास्कर  बैरीशेट्टी यांनी दिला आहे.

तलावपाळी येथील बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे शहरात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून मंगळवारी  तलावपाळी परिसरातील बसस्थानकांवरील प्रवाशांमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली. ‘मतदान जनजागृती’ विषयक माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या. २५ ठाणे- लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ प्रयत्नशील आहे. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप’ अंतर्गत सदर मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. मी मतदान करणारंच…. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा. या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले. तसेच बसस्थानकात स्वीप पथकाने सर्व प्रवासी नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून देत मतदानाची शपथ दिली. ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देखील यावेळी देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन तलावपाळी बसस्थानकातील सर्व प्रवासी नागरिकांना करण्यात आले.