Category: ठाणे

Thane news

‘आरटीई’त मिळणारे मोफत शिक्षण खासगी इंग्रजी शाळांमधून बंद

भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी वेधले लक्ष ठाणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधून गरीब मुलांना मिळणारे मोफत शिक्षण यंदाच्या वर्षापासून बंद झाले आहे. या निर्णयामुळे गरीब मुलांना नामांकित इंग्रजी शाळांमधून मिळणाऱ्या मोफत शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रश्नाची दखल घेऊन भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन दिले. तसेच खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण कायम ठेवण्याची मागणी केली आहे. या वेळी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचीही उपस्थिती होती. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २००९ पासून मुलांना मोफत शिक्षण दिले जात होते. मात्र, या वर्षी बदललेल्या नियमानुसार `आरटीई’मध्ये महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा समावेश करण्यात आला आहे. तर खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्यात आल्या आहेत. त्याचा फटका इंग्रजी शिक्षणासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या प्रश्नावर पालकांच्या भावना तीव्र असून, राज्य सरकारने पूर्वीच्या नियमांप्रमाणेच `आरटीई’मधून गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण द्यावे, अशी मागणी अनेक पालकांनी माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या निर्णयामुळे राज्यभरात शेकडो गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना इंग्रजी शिक्षण मिळण्यास अडचणी येणार आहेत. काही जणांना नाईलाजाने इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, याकडे श्री. चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले. या प्रश्नावर निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

‘स्वच्छ सर्वेक्षणमधील उद्दिष्टपूर्ती साधणे हे सगळ्यांचे कर्तव्य’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन स्वच्छ सर्वेक्षण २०२४ साठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून काम करण्याचे निर्देश ठाणे : स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत साध्य करायची सगळी उद्दिष्ट ही महापालिका म्हणून आपली प्राथमिक कर्तव्य आहेत. त्यामुळे ती साध्य करण्यासाठी संपूर्ण महापालिकेने एक टीम बनून योग्य रणनीती आखून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची तयारी सुरू झाली आहे. त्याची माहिती देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिकाऱ्यांचे क्षमता वृध्दी सत्र महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये, ठाणे महापालिकेने २०२३मध्ये केलेली कामगिरी, त्यातील त्रुटी, सुधारणा यांची माहिती देण्यात आली. तसेच, २०२४साठी अपेक्षित असलेली उद्दिष्ट, त्यासाठी तयारी, जनजागृती आणि लोक सहभाग याबद्दल सविस्तर सादरीकरण घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले. प्रास्ताविक उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला केंद्र सरकारने शास्त्रोक्त स्वरूप दिले आहे. इंदोर, नवी मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड आदी ठिकाणी त्यांचे सकारात्मक परिमाण दिसले आहेत. तेथील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्या महापालिका क्षेत्रात त्यातील कोणत्या गोष्टी घेता येतील याचा अभ्यास करण्याच्या सूचना या सत्रात आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. या अभियानात चांगले गुण मिळवणे हे एक प्रमुख साध्य आहेच, परंतु, या सगळ्या गोष्टी नागरिकांचे जीवनमान उंचावण्याशी निगडित आहे. महापालिकेची जी प्राथमिक जबाबदारी आहे तीच या अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. सहायक आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्या टीमने काम करावे. मुख्यालयातून त्यासाठी आवश्यक धोरण ठरवले जाईल. त्याशिवाय, स्थानिक पातळीवर नावीन्यपूर्ण उपक्रम करावेत, अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यासाठीच, प्रभाग समिती स्तरावर स्वच्छ वॉर्ड ही स्पर्धाही आयोजित केली जात असल्याची घोषणा यावेळी आयुक्त राव यांनी केली. त्यावेळी, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, दिनेश तायडे, वर्षा दीक्षित, सर्व सहायक आयुक्त, सर्व विभाग प्रमुख आदी अधिकारी उपस्थित होते.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी दोन उमेवारांचे अर्ज

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या 20 मे 2024 रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री राजन बाबुराव विचारे व ओबीसी जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत 21 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहे. यात अपक्ष 10, दिल्ली जनता पार्टी 3, लोकराज्य पक्ष 1, हिंदू समाज पार्टी 3, धर्मवीर आनंद दिघे साहेब विचार आणि सेवा मंच 1,बहुजन समाज पार्टी 2, भारतीय राष्ट्रवादी पार्टी 1 आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.

ठाकरे गटाच्या मढवींना पोलीस कोठडी

ठाणे : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एम के मढवी आणि अनिल मोरे यांना खंडणी विरोधी पथकाकडून त्यांना अटक करण्यात…

ठाण्यात कोण ? सस्पेंस कायम

ठाणे: एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेंस रविवारीही कायम राहीलाय. अवघ्या २२ दिवसावर मतदान येऊन ठेपलेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे यांनी…

पावसाळ्यापूर्वी रखडलेली कामे पूर्ण करण्याचे निर्देश

उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि ठेकेदारात बैठक उल्हासनगर – महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या एकून घेतल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश देऊन यापुढे रस्ते न खोदण्याच्या सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी महापालिका सभागृहात कंत्राटदार व ठेकेदार असोसिएशनची बैठक बोलाविली होती. पावसाळा तोंडावर आला असून त्यापूर्वी शहरातील विकास कामे पूर्ण करा. असा सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला केले. तसेच त्यांच्या समस्या एकून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महापालिका बांधकाम विभागामार्फत रस्त्याची तर पाणीपुरवठा विभागामार्फत मलनिस्सारण योजनेची कामे सुरू आहेत. दोन्ही विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवून कामे केल्यास समस्या निर्माण होणार नाही. असा सल्ला महापालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना आयुक्त शेख यांनी दिला. पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत करण्यात यावीत, तसेच नवीन खोदकाम करण्यात येवू नये, रस्त्यावर धूळ होणार नाही. याची खबरदारी घ्यावी, नागरिकांना वाहतूक कोंडीची त्रास होणार नाही. यासह दक्षता व सुरक्षा विषयक साधनांचा वापर करावा. अशा सूचना यावेळी आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. महापालिका ठेकेदाराच्या बैठकीत आयुक्त अजीज शेख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे यांनी ठेकेदारांच्या समस्यांबाबत आढावा घेतला. यावेळी उपायुक्त किशोर गवस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तरुण शेवकानी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लडाख, सोनु खटवाणी, शशी जगत्यांनी, प्रभु चंद्राणी यांच्यासह अन्य ठेकेदार उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार असेही आयुक म्हणाले.

सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधून

लोकसभा निवडणूका शांततेत पार पडतील या दृष्टीने काम करा.. ठाणे : देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून शेवटच्या पाचव्या टप्यातील निवडणुका येत्या 20 मे 2024 रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24-कल्याण, 25-ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुका नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय साधावा, असे निर्देश ठाण्यात दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी आज बैठकीत दिले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. अशोक  शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृह, नियोजन भवन येथे निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस 23 भिवंडी मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, 24 कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक श्री. चंद्र प्रकाश मीना व श्री.राहील गुप्ता उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) डॉ. धोंडोपंत स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी 23-भिवंडी संजय जाधव, 24-कल्याण सुषमा सातपुते, 25-ठाणे मनिषा जायभाये, नोडल अधिकारी कायदा व सुव्यवस्था दीपक क्षीरसागर, नोडल अधिकारी आदर्श आचारसंहिता विजयसिंह देशमुख तसेच आयकर विभाग,  पोलीस विभाग- ठाणे नवी मुंबई, मिरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालय, केंद्रीय वस्तू व सेवाकर, महसूल, गुप्तचर संचालनालय, सीमा शुल्क व केंद्रीय उत्पादन शुल्क, अंमली पदार्थ नियंत्रक ब्युरो, अंमलबजावणी संचालनालय, राज्य उत्पादन शुल्क, वस्तू व सेवाकर, राज्य परिवहन विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक ठाणे, खर्च संनियंत्रण समिती 23-भिवंडी, 24-कल्याण, 25-ठाणे आदी सर्व विभागांचे जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व  विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही निरीक्षकांनी घेतला. लोकसभा निवडणूक 2024 या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले. तसेच मुंबईची जीवनवाहिनी ही लोकल सेवा असून ठाणे, कल्याण, उल्हासनगर या परिसरात अनेक रेल्वे स्टेशन्स आहेत या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.  मतदानाचे शेवटचे चार दिवस हे  अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीएफची कुमक वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले. 137 भिवंडी, 146 ओवळा, 150 ऐरोली हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीत असताना जर एखादी बाब आपल्या अखत्यारित नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आल्यास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कळविण्यात यावे. आपण सर्वजण करीत असलेले निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकांने काम करावयाचे आहे, असेही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व खर्च निरीक्षकांचे स्वागत केले. प्रास्ताविक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सत्यवान उबाळे यांनी केले. सूत्रसंचलन मुख्य वित्त व लेखा अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी केले. बैठकीच्या शेवटी एकत्रित मीडिया कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी उपस्थित केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक आणि उपस्थित नोडल अधिकाऱ्यांचे आभार मानले.

‘निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करा’

अशोक गायकवाड कर्जत : मावळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे व कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाही बळकटीसाठी समाजातील सर्व स्तरातील जनतेचा सहभाग आवश्यक आहे .संपूर्ण भारत देशात सध्या लोकशाहीचा उत्सव निवडणुकीच्या माध्यमातून साजरा होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करणे या दृष्टीने स्वीप (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्राम) कार्यक्रमांतर्गत सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी ३३ मावळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे व कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघ १८९ कर्जत मधील नेरळ तलाठी कार्यालयापासून नेरळ बाजार पेठ मध्ये भव्य प्रभात फेरी (रॅलीचे) आयोजन करण्यात आले होते.तसेचं नेरळ येथील धारप सभागृहात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वीप अंमलबजावणी अंतर्गत ३३ मावळ लोकसभा मतदारसंघामधील १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील कर्जत,नेरळ, चिंचवली,कडाव, कशेळे, कळंब पाथरज या महसुली मंडळात शहरी व ग्रामीण भागात आदिवासी वाडी वस्तीवर मतदार जनजागृती साठी प्रत्यक्ष दिव्यांग मतदार व ८५ अधिक वयोमान असणाऱ्या मतदारांच्या गृहभेटी घेऊन त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच सायकल रॅली व विविध रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करून मतदान विषयी मतदारास प्रोत्साहन देण्याकरता विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत नेरळ येथे काढण्यात आलेली प्रभात फेरी( रॅली) मध्ये कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, नेरळ पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे , मंडळ अधिकारी नेरळ संतोष जांभळे , कळंब मंडळ अधिकारी अरुण विशे, चिंचवली मंडळ अधिकारी वैशाली पाटील, विकास गायकवाड अनिल कांबळे, उमेश कुमार भोरे, वैशाली मांटे माधुरी चौधरी तलाठी , नेरळ ग्रामसेवक कार्ले , अंगणवाडी सेविका ,अशोक भगत, दिपक पेरणे ,शासकीय कर्मचारी, महिला बचत गटातील महिला व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृतीच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

भाईंदर : परदेशात नोकरी देण्याचा बहाण्याने विविध राज्यांतील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील एक इमारतीत ईगल प्लेसमेंट सर्व्हिसेस यांचे कार्यालय होते. या कार्यालयाकडून परदेशात नोकरी देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. त्याला भुलून विविध राज्यातील गरजूंनी कंपनीशी संपर्क साधला. या प्रत्येकाकडून ७० ते ८० हजार रुपये उकळण्यात आले. या सर्वांना विमानाची तिकिटे आणि व्हिसाही देण्यात आला. त्यांचा पासपोर्ट मात्र काढून घेण्यात आला. पासपोर्ट विमानतळावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र विमानतळावर गेल्यावर तिकीट रद्द झाले असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व फोन बंद व कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आले. आपण फसविले गेल्याचे समजल्यावर शंभरहून अधिक लोकांनी तक्रार केल्यानंतर नवघर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका वास्तूंच्या सुरक्षा आणि सौंदर्यासाठी कायापालट मोहीम

ठाणे : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वागळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला. त्यावेळी, नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची नवीन इमारत आणि कोपरी उप समिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्याने हाती घेण्यात याव्यात. त्याचा प्रस्ताव जलद गतीने सादर करून आचारसंहिता पूर्ण झाल्यावर त्याच्या मंजुरीची, निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी. नागरिकांना चांगले प्रशासकीय कार्यालय मिळणे आवश्यक असल्याचेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.तसेच, महापालिकेच्या ज्या वास्तू जुन्या झाल्या आहेत त्यांचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक आहे. म्हणूनच, नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी. इमारतीची दुरुस्ती, अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी, प्रवेश आणि निकास मार्गिका, पार्किंग, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्या बद्दलचा सविस्तर आराखडा येत्या महिनाभरात बांधकाम विभागाने तयार करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांना महापालिकेच्या वास्तूंमध्ये यावेसे वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले. कोपरी आणि नौपाडा क्षेत्रातील सी वन या अतिधोकादायक वर्गवारीतील २६ इमारती अजूनही व्याप्त आहेत. त्यात, १७८ कुटुंबे आणि ६७ दुकाने आहेत. यांचे निष्कासन करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात यावा. त्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली जावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. तत्पूर्वी, परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहायक आयुक्त सोपान भाईक यांनी कोपरी – नौपाडा प्रभाग समिती क्षेत्राबद्दल सादरीकरण केले. तसेच, उपनगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे, विनोद पवार, शुभांगी केसवानी यांनी विविध प्रकल्प, पाणी पुरवठा, वीज व्यवस्था यांचा आढावा घेतला. या बैठकीला, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे आदी प्रमुख अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.