Category: ठाणे

Thane news

 ठाणे शहराचे नाव लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

ठाणे शहराचे नाव लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ७ वर्षीय ठाणेकर जलतरणपटू रेयांश खामकरची लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद ठाणेकरांसाठी अभ‍िमानाची बाब – महापौर शर्मिला पिंपळोलकर ठाणे, दि. १३…

पान दिवड सापाला मिळाले जीवदान

पान दिवड सापाला मिळाले जीवदान कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाडेघर, पाणबुडी नगर येथे निर्माणधीन चाळीच्या मागील भागात पान दिवड जातीचा साप भक्ष्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत होता. स्थानिक नागरिकांनी सर्पमित्र…

 अडिवली येथील ऑस्टिन नगर रस्ता व रस्तालगत गटर बनविण्याची मागणी

अडिवली येथील ऑस्टिन नगर रस्ता व रस्तालगत गटर बनविण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाचे केडीएमसी महापौरांना पत्र कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगरोडवरील अडिवली येथील ऑस्टिन नगर रस्ता व रस्तालगत गटर बनविण्याची, स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी करण्यात आली असून याबाबत आई एकविरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सोनी क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांची भेटून पत्र दिले आहे. गेल्या ६ ते ७ वर्षापासून अडिवली परिसरातील ऑस्टिन नगर, अंजनाबाई गॉर्डन, येथील रस्ता व रस्त्यालगत गटार बनविण्याकरिता व स्ट्रीट लाईट लावण्याकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त व शहरअभियंता तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे आई एकविरा महिला मंडळ वारंवार पत्राद्वारे पाठपुरवा करित आहे. मंडळाच्या वतीने पाठपुरावा करीत असताना वारंवार आयुक्त व शहर अभियंता यांच्याकडून निधीची कमतरता असल्याचे त्यांच्याकडून उत्तर येत असून ऑस्टिन नगर, अंजनाबाई गॉर्डन, अडिवली येथील रस्त्याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. मंडळाच्या वतीने दोन वेळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर निषेध व श्राध्द आंदोलन केले आहे. त्यामुळे या विभागाची पाहणी करुन तातडीने रस्ता व रस्त्यालगत गटार बनविण्याकरिता व स्ट्रीट लाईट लावण्याकरिता निधी उपलब्ध करण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली आहे.

मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज – गौरांग दास

मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज – गौरांग दास अनिल ठाणेकर ठाणे : आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे आर्थिक नुकसान होत आहे. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे.  भारतातही आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी ‘तणावमुक्ती आण‍ि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली’ या महत्वपूर्ण विषयावर केले. ठाणे महानगरपालिका आणि इस्कॉन ठाणे यांच्यावतीने ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी  यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन गुरूवारी (१२ फेब्रुवारी) डॉ. काश‍िनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मिताली संचेती, दिपक झिंजाड यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर,आुयक्त सौरभ राव यांच्या हस्ते गौरांग दास यांचा सन्मान करण्यात करण्यात आला.आज प्रत्येक व्यक्ती हा तणावातून जात आहे, मग तो  विद्यार्थी असो, गृहिणी असो की, नोकरदार वर्ग असो, प्रत्येकाला काही ना काही चिंता असते. यातून मार्ग काढणे गरजेचे असते. खरं आनंदी जीवन जगण्यासाठी संतुलन, समाधान आणि सकारात्मकतेची गरज भासत असल्याचे नमूद करीत महापालिकेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना अडचणी येत असतात, त्यामुळे तणाव  निर्माण होत असतो, दोष व्यवस्थेचा नसतो तर आपण कशा पध्दतीने प्रतिक्रिया देतो, येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जातो हे महत्वाचे असते. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणावमुक्त जीवन जगता यावे, तणावमुक्ती का आवश्यक आहे.संतुलित जीवनाचे नेमके सूत्र कसे अवलंबावे यासाठी इस्कॉनने ठाणे महापालिकेच्या अध‍िकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भगवद्गीतेतील शिकवणीचा संदर्भ देत तणावाचे मूळ कारण अपेक्षा आणि वास्तव यांतील अंतर आहे. “आपण सर्वजण सत्ता, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न करतो; पण परिणाम आपल्या हातात नसतो. आपल्या हातात केवळ प्रयत्न असतात, परिणामावर नियंत्रण नसते, ही जाणीव तणावमुक्तीची पहिली पायरी आहे,” असे गौरांग दास यांनी नमूद केले.जीवनातील स्पर्धा, बढती, यश-अपयश यामुळे निर्माण होणारा ताण वाढतो, अपेक्षा पूर्ण न झाल्यास मनावर ताण वाढतो आणि त्याचे परिणाम मानसिक आरोग्यावर होतात, असे सांगून भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.  सन्मान, सेवा आणि सामूहिक शक्तीचा स्वीकार हे तणावमुक्त जीवनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. “आपल्यापेक्षा मोठी शक्ती कार्यरत आहे, ही जाणीव ठेवून नम्रता आणि सेवा वृत्ती स्वीकारली तर मन शांत राहते,” असे मार्गदर्शन करण्यात आले. ‘चिंता सोडा आणि जगायला शिका’  (‘Stop Worrying and Start Living’ ) हा मंत्र दिला. बाह्य परिस्थितीवर आपले नियंत्रण नसले तरी, आपल्या जाणीवा आणि विचारांवर आपण ताबा मिळवू शकतो असे गौरांग दास यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेने इस्कॉनच्या सहकार्याने अशा प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

 रक्तदानातील उत्कृष्ट कार्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे एसएसटी महाविद्यालयाचा गौरव

रक्तदानातील उत्कृष्ट कार्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे एसएसटी महाविद्यालयाचा गौरव कल्याण : सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या एस.एस.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचा मुंबई विद्यापीठातर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रक्तदान शिबिरांच्या यशस्वी आयोजनाबरोबरच जनजागृतीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची ही दखल आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी भवन येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात विद्यापीठाच्या एनएसएस सेलचे ओएसडी प्रा.सुशील शिंदे, कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे आणि एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते. एस.एस.टी. महाविद्यालयाने रक्तदान शिबिरांसाठी व्यापक जनजागृती करत विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवले. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून रक्तदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून प्रत्यक्ष शिबिरांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी सांगितले की, एस.एस.टी. महाविद्यालय सामाजिक जबाबदारी जपत रक्तदानाबरोबरच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बालके, समाजातील उपेक्षित घटक आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रातही सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत समाजासाठी कटिबद्ध राहण्याचा महाविद्यालयाचा निर्धार आहे.

  दुबईत दिव्यातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान

दुबईत दिव्यातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान बालविकास क्षेत्रातील कार्याची आंतरराष्ट्रीय दखल दिवा : Early Childhood Development Forum यांच्या वतीने दुबई येथील ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित विशेष समारंभात दिवा शहरातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात विशेषतः बालविकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला. या समारंभात एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचे सचिव स्वप्निल मारुती गायकर आणि विश्वस्त प्रणाल मारुती गायकर यांनी सन्मान स्वीकारला. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानामुळे संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे. एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शैक्षणिक पद्धती, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि बालकेंद्रित उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे दिवा शहराच्या शैक्षणिक क्षेत्राचीही प्रतिष्ठा उंचावली आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा – मनोज प्रधान

गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे : गर्दीच्या वेळी धिम्या लोकलची संख्या न वाढविल्याने  गर्दी वाढत आहे. परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्देवी मृत्यू होत आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळेत धिम्या लोकलच्या चालवाव्यात, तसेच, दहावी , बारावी परीक्षार्थींसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, रेल्वे अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,  असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला. १० फेब्रुवारी २०२६ रोजी, बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा दिवा-मुंब्रा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहेत, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देण्यात आली. या प्रसंगी स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी झालेल्या चर्चेत मनोज प्रधान, नगरसेवक सुधीर भगत, नगरसेविका दिपाली भगत,  मनिषा भगत  यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. या समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन देवधर यांनी दिले. दरम्यान, सोहम कटरे या मुलाचा मृत्यू वाढत्या गर्दीमुळे झाला असल्याने ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी धिम्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी; पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांची निर्मिती केल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर धिम्या रेल्वेगाड्या चालविणे गरजेचे असताना त्यावर जलद गाड्या सोडण्यात येत आहेत. परिणामी, कोपर, ठाकूर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवरील गर्दी वाढत असते. त्यामुळे तिसऱ्या (अप)  व चौथ्या (डाऊन)  मार्गिकेवर गर्दीच्या वेळात ( अनुक्रमे सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्रौ नऊ ) धिम्या गाड्या चालवाव्यात;  पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्याऐवजी एसी लोकलची संख्या कमी करून धिम्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात;  दिवा स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मवरून लोकल सुरू करावी आणि  मुंब्रा येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने शक्य असल्यास मुंब्रा ते छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस लोकल सुरू करावी आदी मागण्यांचे स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांना  निवेदन देण्यात आले. हे निवेदन पुढे वर्ग करण्याबाबतही स्टेशन प्रबंधक देवधर यांनी शिष्टमंडळास सांगितले.पत्रकारांशी संवाद साधताना मनोज प्रधान यांनी,  मध्य रेल्वेवर वर्षाकाठी २१८० अपघाती मृत्यू होत आहेत. ठाणे स्टेशन परिसरात वर्षाला २८7 अपघात होत आहेत. म्हणजेच दररोज सरासरी सात मृत्यू होत आहेत. हे मृत्यू फक्त गर्दीमुळे होत आहेत. एसी ट्रेनची गरज असली तरी सलग एसी ट्रेन न चालविता दोन एसी ट्रेनदरम्यान दोन ते तीन साध्या लोकल सोडणे गरजेचे आहे. जेणेकरून गर्दीचा निचरा होणे सोयीचे होणार आहे.  मुंब्रा स्टेशन येथे कौसा, शिळपासूनचे लोक येत आहेत. तेथेही होम प्लॅटफाॅर्मची गरज आहे, असे सांगितले. तसेच, आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची वेळ गर्दीच्या काळातील नसावी, यासाठी विनंती शिक्षण खात्याला करणार असून परिक्षार्थींसाठी एक डबा राखीव ठेवण्यासाठीही रेल्वेकडे आपण मागणी केली असल्याचेही मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर,  वाढती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर स्लो लोकल चालविणे गरजेचे आहे, असे सुधीर भगत यांनी सांगितले. या वेळी  नगरसेविका दिपाली भगत, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान , जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम , मेहरबानो पटेल , गजानन चौधरी, ज्योती निबार्गी, शशिकला पुजारी, राजु चापले,विष्णू माने , जगत सिंग,  सुनील तिवारी , साहिल उदुगडे , श्रीकांत बर्वे, वनिता भोर, दिलीप नाईक, पद्माकर पाटील, शिवा कालू सिंह, रुबीना शेख, दिपा गावंड, बबन सांगळे, नथु चव्हाण, रेश्मा भानुशाली, निलेश जाधव, पुजा जाधव, चंद्रकांत गायकवाड, मेघराज पांडे, मंदार गांगळ, धर्मेंद्र अस्थाना, सायना आझमी, हाजी बेगम शेख आदी उपस्थित होते.

  जवाहरबाग अग्निशमन केंद्र पुनर्विकासाच्या कामामुळे बंद!

जवाहरबाग अग्निशमन केंद्र पुनर्विकासाच्या कामामुळे बंद! भाजपा नगरसेविका नम्रता कोळी यांनी वेधले लक्ष ठाणे : शहरातील सर्वात जुन्या जवाहरबाग अग्निशमन केंद्राचा कारभार सध्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे बंद करण्यात आला आहे. तर शहरातील महत्त्वाची व गर्दीची ठिकाणे लक्षात घेऊन दादोजी कोंडदेव स्टेडियच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वात जुने अग्निशमन केंद्र म्हणून जवाहरबाग येथील अग्निशमन केंद्राची नोंद आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपासून अवघ्या ५०० ते ७०० मीटर अंतरावर केंद्राची जागा आहे. ठाणे रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, ठाणे शहर पोलिस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक, जुनी बाजारपेठ, जांभळी नाका होलसेल मार्केट, शाळा व महाविद्यालये आहेत. या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास काही मिनिटांतच जवाहरबाग केंद्रातून अग्निशमन दलाची गाडी पोचत होती. त्यामुळे तत्काळ मदत कार्याबरोबरच आगीवर नियंत्रण मिळवता येत होते. दुर्घटनेची व्याप्ती पाहून अग्निशमन दलाचे जवान अन्य केंद्रातूनही कुमक बोलत असत. मात्र, केंद्राच्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे आता जवाहरबाग केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे तत्काळ मदतकार्यात अडचणी येत आहेत, याकडे नगरसेविका नम्रता कोळी यांनी महापालिका आयुक्त व मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी महागिरीतील दाभोळकरवाडी येथे आग लागल्यानंतर कळवा येथून अग्निशमन दलाला बोलाविण्याची वेळ आली. सुदैवाने आग आटोक्यात आल्यामुळे मोठी हानी टळली. या पार्श्वभूमीवर भविष्यातील आपत्तीतील संभाव्य हानी टाळण्यासाठी जवाहरबाग अग्निशमन केंद्र तात्पुरत्या स्वरुपात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये गेट क्र. १ जवळ सुरू ठेवावे. त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या ठेवाव्यात, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.

 महागिरी कोळीवाडा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महागिरी कोळीवाडा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोळी समाजाची संस्कृती व खाद्यपदार्थांची ओळख ठाणे: कोळी समाजाची परंपरा, संस्कृती आणि खाद्यपदार्थांची ओळख करून देणाऱ्या कोळी महोत्सवाला यंदा सलग १४ व्या वर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात हजारो नागरिकांनी सहभागी होण्याचा आनंद लुटला. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. महागिरी कोळीवाडा कोळी समाजाच्या उत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय पाटील यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते. कोळी समाजाच्या परंपरा जपण्यासोबतच पुढील पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या महोत्सवाला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, भाजपाचे शहर सरचिटणीस डॉ. राजेश मढवी, शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, संजय तरे यांच्यासह मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या महोत्सवात स्थानिक कलावंतांना कलांचा आविष्कार सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. तसेच खवय्यांना कोळी समाजातील पारंपरिक रुचकर खाद्यपदार्थांची मेजवानी मिळाली.

शिवमंदिर स्मशानभूमी पुनर्बांधणीसाठी राहणार बंद

शिवमंदिर स्मशानभूमी पुनर्बांधणीसाठी राहणार बंद कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली (पूर्व) विभागातील दत्तनगर येथील शिवमंदिर स्मशानभुमी (मोक्षधाम) ही जुनी स्मशानभुमी तोडून तेथे आधुनिक पध्दतीच्या नविन स्मशानभूमी प्रकल्पास महापालिकेने मंजुरी देऊन सन २०२४ मध्ये कार्यादेश प्रदान केलेला आहे. या स्मशानभुमीची पुर्नबांधणी करण्यासाठी, जुनी स्मशानभुमी तोडण्याचे काम रविवार १५ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शिवमंदिर स्मशानभुमीमध्ये फक्त गॅस शवदाहिनी सुरु राहिल, उर्वरित स्मशानभुमी संपुर्णपणे बंद राहील. तरी नागरीकांनी अंत्यविधीसाठी  डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा स्मशानभुमी, डोंबिवली पूर्वेतील ⁠पाथर्ली स्मशानभुमी, कल्याण रोड, आणि ⁠म्हसोबा चौक स्मशानभुमी, ठाकुर्ली या  स्मशानभुमींचा वापर करुन, महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.