Category: ठाणे

Thane news

ध्यानधारणेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ध्यानधारणेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कल्याण : विद्यार्थ्यांना ध्यानाच्या माध्यमातून एकाग्रता वाढवणे, स्मरणशक्ती सुधारणा तसेच मोबाईलचा अतिरेक सोशल मीडिया, टेलिव्हिजनमुळे एकाग्रता भंग होणे, मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी व ताण-तणाव नियंत्रण याबाबत ध्यानधारणा क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक व सर्च विदिन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल काजरोळकर यांनी मार्गदर्शन केले. लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रवीण काजरोळकर व विश्वस्त लता परब, कैलास रेडीज यांच्या पुढाकाराने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, परळी, वाडा, जिल्हा–पालघर येथे विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय ध्यान (मेडिटेशन) शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विलास बंजारा यांनी सर्च विदिन फाउंडेशनचे कोकण विभाग समन्वयक संजय हुंबरे तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व इतर कर्मचारी यांचे आभार मानले.

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. यावेळी आयोजित  महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना झापले. महापालिकेची पहिली महासभा ही आज पार पडली. ती खऱ्या अर्थाने गाजली, या महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लिक शेट्टी यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना झापले. या महासभेत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही,  बोलू नका, नाहीतर बाहेर पडा असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. अधिकाऱ्यांना खूप माज आलाय असं ही ते म्हणाले.  महापौर निवडीनंतर भाषणा दरम्यान अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि मल्लेश शेट्टी यांच्यामध्ये वाद पहायला मिळाला.

दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी

दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी आरती परब दिवा : दिवा रेल्वे स्टेशन ते पडले बीएसयुपी तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गांवरील ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसची संख्या व फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसे दिवा शहराचे सचिव प्रशांत प्रभाकर गावडे यांनी ठाणे महानगर पालिकेच्या वाहतूक व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. दिवा रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पडले बीएसयुपी व डोंबिवली या मार्गांवर परिवहन सेवेच्या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही सध्या या मार्गांवरील बसची संख्या अपुरी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी या मार्गावर केवळ दोन बसेस असून त्यामधून फक्त सहा फेऱ्या होत असल्याने दोन फेऱ्यांमधील अंतर एक ते दीड तासांपर्यंत जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गावरही फक्त दोन बसेस असल्याने फेऱ्यांमधील अंतर मोठे असून अनेक वेळा ऐनवेळी बस रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. विशेषतः रविवारी अचानक बस फेऱ्या रद्द केल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून याबाबत प्रवाशांना कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने प्रशासनाबाबत नाराजी वाढत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. दिवा शहर व परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक नागरिक डोंबिवली एमआयडीसी, खिडकाळी आदी भागात जाण्यासाठी या परिवहन सेवेवर अवलंबून आहेत. भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता संबंधित मार्गांवरील बसची संख्या व फेऱ्या वाढवणे अत्यावश्यक असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होऊन परिवहन सेवेचे उत्पन्न व विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून दिवा शहरातील वरील मार्गांवरील बस सेवा तातडीने सुधारावी, अशी मागणी मनसे दिवा शहराच्या वतीने प्रशांत प्रभाकर गावडे यांनी केली आहे.

  विनय चंद्रकांत शाह, परिचर, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या सेवानिवृत्ती सोहळयास प्रकाश नरसाणा,तुषार परब, रजनीकांत काजरोळकर यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.

 `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिननिमित्त `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणे -भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या श्री गणराज नृत्य…

शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड

शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आज पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत ठाणे शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची, तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केली. मंगळवारी, ३ फेब्रुवारी, सकाळी ११.३० वाजता ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन व स्वागत केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सीएसआर निधीतून तिसरा सोलर हायमास्ट

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सीएसआर निधीतून तिसरा सोलर हायमास्ट कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शाश्वत विकासावर भर देवून शहराचा विकास करण्याचा महापालिका आयुक्त अभिनव गोयल, यांचा मानस आहे. तसेच महापालिका क्षेत्रात लोकोपयोगी उपक्रम हे कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून कामे हाती घेण्यात यावी व त्यासाठी महापालिका अधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे महापालिका आयुक्त यांचे धोरण आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सहजानंद चौक कल्याण (प) येथे तिसरा सोलार हायमास्ट हा मे. बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीने कॉरपोरेट सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध करुन दिला असून सोलार हायमास्ट फिटींग्सचे लोकार्पण सोमवारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याहस्ते संपन्न झाले. उदघाटनावेळी विद्युत यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उप अभियंता भागवत पाटील व मे. बजाज इलेक्ट्रिकल कंपनीचे रिजनल हेड सरोज कुमार व ओरीया हेड तरण कोहली उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत तीन सोलार हायमास्ट कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून उभारण्यात आलेले आहेत. कल्याण (प) गणपती चौक गांधारे, इंदिरानगर चौक डोंबिवली (पूर्व) व सहजानंद चौक, कल्याण (प) या ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत. सोलार हायमास्ट हे सुर्याच्या किरणांवर कार्यान्वित होणार असून त्यास विजेची गरज नाही तसेच महावितरण कंपनीची विज खंडीत झाल्यानंतर सुध्दा हे सोलार हायमास्ट कार्यान्वित राहतील, त्यामुळे चौकात प्रकाश राहणार असल्याने नागरीकांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील १४४ हायमास्ट पैकी उर्वरीत १४१ हायमास्ट हे सोलार हायमास्ट करण्यासाठी  नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

 डोंबिवली पश्चिमेतील कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याकडे भाजपाने वेधले लक्ष

डोंबिवली पश्चिमेतील कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याकडे भाजपाने वेधले लक्ष पाणीपुरवठा नियमित करण्याची प्रकाश भोईर यांची  मागणी कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील काही प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून याकडे भारतीय जनता पार्टीने लक्ष वेधले आहे. माजी नगरसेवक तथा भाजपाचे प्रकाश भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन जास्त दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. डोंबीवली पश्चिमेतील प्रभाग क्र २२ सहयाद्री नगर, राजूनगर, सरोवर नगर, गरिबाचा वाडा, साई नगर, शंकेश्वर नगर तसेच महालक्ष्मी चौक, या परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणावर पाणी पुरवठा कमी दाबाने येत असून काही ठिकाणी दिवसातून एका तासापेक्षा कमी पाण्याचा वेळ मिळत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. तसेच केडीएमसीचा टैंकर पुरवठा वेळेवर व पुरेसा होत नसल्याने दोन-अडीच हजार रु. देऊन खाजगी टैंकर आणावे लागतात. काही ठिकाणी दुपारच्या वेळेत पाणी असल्याने गृहिनींना घरची काम आटपून मुलांना शाळेत सोडणे तसेच बाकीच्या दैनंदीन कामातून वेळ काढणे कठीण होते. शासनाच्या माध्यमातून अमृत योजनेतून राजू नगर व गरिबाचा वाडा या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम अत्यंत प्रकाश धिम्या गतिने सुरू असल्याने भविष्यात हे काम कधी होईल हे सांगता येत नाही. तसेच हे झाले तरी डोबिंवली पश्चिमेला ह्या टाक्या भरण्यासाठी माझ्या माहिती प्रमाणे तशी वितरण व्यवस्थेला डोंबिवली पश्चिमेला अधिकची व्यवस्था करण्यासाठी जल वाहिन्यांची वितरण व्यवस्था दिसून येत नाही. तरी या  परिसरातील पाणी पुरवठा व्यवस्थित होई पर्यंत नागरिकांना त्यांच्या मागणी नुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर जास्त वाढवून नियमित व महापालिकेच्या दरात देण्याची व्यवस्था करावी शक्य असल्यास मोफत देण्याची मागणी भोईर यांनी केली आहे.

  केडीएमसीच्या महापौर पदी हर्षाली चौधरी थाविल तर उपमहापौरपदी राहुल दामले

केडीएमसीच्या महापौर पदी हर्षाली चौधरी थाविल तर उपमहापौरपदी राहुल दामले अखेर ६ वर्षाची प्रतीक्षा संपली कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची आज निवड झाली असून ६ वर्षापासून असलेली राजकीय राजवट आज संपुष्टात आली आहे. महापौर पदासाठी ऍड. हर्षाली चौधरी – थवील आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांची निवड करण्यात आली आहे. महापौर पदासाठी ऍड. हर्षाली चौधरी थविल  आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झालीच होती. मात्र आजच्या महासभेत मुंबई जिल्हाधिकारी आचल गोयल या पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या, त्यांनी औपचारिक घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, सचिव किशोर शेळके उपस्थित होते. कोरोना काळात नोव्हेंबर २०२० रोजी नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने राजकीय राजवट सुरु झाली होती. कोरोना तसेच विविध कारणांमुळे महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. गेल्या महिन्यात निवडणुका संपुष्टात येऊन अखेर ६ वर्षानंतर प्रतीक्षा संपली आहे. आज महापौर, उपमहापौर पदाची निवड झाली आहे. १९८३ नंतरची सर्वात मोठी असणारी प्रशासकीय राजवटही आता संपुष्टात आली आहे. १९८३ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर लागू झालेली प्रशासकीय राजवट तब्बल १९९५ पर्यंत म्हणजेच तब्बल १२ वर्षे होती. त्यानंतर कोविडमुळे २०२० मध्ये कार्यकाळ संपल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली होती. मात्र आता कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाल्याने गेल्या ६ वर्षांपासून असलेली ही प्रशासकीय राजवटही संपुष्टात आली आहे. या निवड प्रक्रियेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सभागृहाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान या महापौर आणि उपमहापौर पद निवडीच्या विशेष सभेमध्येच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमधील टोलवा टोलवी दिसून आली. आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असणारे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना उबाठाचे गटनेते यांना जोरदार टोला लगावला. “तुम्ही निवडून आले तेव्हा क्रिकेटची टीम होती, मात्र इकडे सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची झाली” या शब्दांत सचिन पोटे यांनी शाब्दिक कोटी केलेली पाहायला मिळाली. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

 महात्मा गांधींचा देशाच्या फाळणीला विरोधच होता -डॉ. विवेक कोरडे

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त, ठाण्यात ‘हुतात्मा दिन’ संपन्न महात्मा गांधींचा देशाच्या फाळणीला विरोधच होता -डॉ. विवेक कोरडे अनिल ठाणेकर ठाणे : महात्मा गांधी हे कधीही देशाची फाळणी व्हावी या विचाराचे नव्हते, उलट त्यांचा देशाच्या फाळणीला विरोधच होता. ज्या आरएसएसने कधीही राष्ट्रध्वज स्विकारला नाही, त्यांचाच द्विराष्ट्रवादाला पाठिंबा होता आणि विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे म्होरके होते. गांधीजी हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एकमेव पुरस्कर्ते होते, अहिंसेचे पुजारी होते, अशा शब्दांत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे यांनी आपले परखड मत मांडले. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त, धर्मराज्य पक्ष, ठाणे काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, ३० जानेवारीला, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात ‘हुतात्मा दिन’ साजरा करण्यात आला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे व डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे यांनी, “गांधीहत्या आणि आपण…” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करुन, उपस्थितांना मार्गदर्शन केले.’धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, आयटकचे काॅ. उदय चौधरी, वंदना शिंदे, मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे डॉ. जावळे, समाजवादी नेते संजय मं. गो., जगदीश खैरालिया, आंबेडकरवादी विचारवंत आनंदा होवाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, काँग्रेस ठाणे सचिव राहुल पिंगळे, ॲड. नाना अहिरे आदी मान्यवर मंडळींची प्रमुख  उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विवेक कोरडे यांनी, आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित करताना, गांधी हत्येमागील कारणे विषद करताना तथाकथित हिंदुत्ववादी व आरएसएसवर एकच शरसंधान साधले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंद तेलतुंबडे यांनीदेखील आरएसएसच्या विचारांवर एकच प्रहार केला. सद्यस्थितीत भारतातील जी राजकीय व सामाजिकव्यवस्था ढासळलेली आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची जातीयवादी विचारसरणीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले की, “पुढील  एकहजार वर्षे तरी भारतातून भाजपची सत्ता जाणार नाही, जोपर्यंत ते ठरवत नाहीत”, असा अपप्रचार होत असला; तरी त्यात बिलकूल तथ्य नाही…आपण सारे एकत्र आलो आणि त्यांचं सगळं साम्राज्य, हे फक्त आणि फक्त, खोटारडेपणाच्याच पायावर उभारलेलं आहे, हे ध्यानात घेऊन त्यावर एकत्रित व सनदशीर मार्गाने प्रहार केला; तर, ते सहजशक्य आहे. आज त्यांनी सर्व शासकीय व प्रशासकीय व्यवस्था ताब्यात घेतलेल्या आहेत. राजन राजे यांच्यासारखी जी काही हाताच्या बोटावर काम करणारी मोजकी माणसं समाजात आहेत, त्यामुळेच भाजप-आरएसएससारख्या धर्मविद्वेशीशक्तींवर काही प्रमाणात का होईना, अंकुश आहे यातच समाधान असल्याचे प्रतिपादन आनंद तेलतुंबडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी खास उपस्थिती लावून आपल्या पहाडी आवाजात कविता सादर केळी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष ढवळे यांनी केले तर, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.