Month: March 2024

बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा

अखेर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा मुंबई :बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या माध्यमातून या अगोदरच रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांची अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती. आणि आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी तर त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहितीसुद्धा सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रीय समाज पक्षाला जागा देताना महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असून त्यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाची एक चळवळ, आरक्षणाचा लढा उभा केला आहे. त्यांचे योगदान समाजासाठी मोठया प्रमाणात असल्यानेच परभणीची उमेदवारी घोषित करत असून अतिशय चांगल्या फरकाने ते विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. हा निर्णय घेताना परभणी जिल्हयातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राजेश विटेकर, बाबाजानी दुर्रानी, प्रतापराव देशमुख यांच्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची प्रदीर्घ चर्चा केली आहे. त्या चर्चेनंतर आज महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणाही सुनिल तटकरे यांनी केली. राजेश विटेकर हे अतिशय चांगले पदाधिकारी आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा थोडाशा फरकाने पराभव झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत एका तरुण कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड नक्की घेणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. या पत्रकार परिषदेला रासपचे नेते महादेव जानकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.

आरटीओने ई-रिक्षाचे दर निश्चित करावे

स्थानिकांची मागणी माथेरान : श्रमिक हातरीक्षा चालकांच्या ताब्यात ई रिक्षा द्याव्यात असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले असताना देखील सनियंत्रण समितीच्या हेकेखोर वृत्तीमुळेच  सध्या पायलट प्रोजेक्टवर केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी या समितीने ई रिक्षाचा ठेका दिलेला असून दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन दरम्यान प्रति माणसी ३५ रुपये दर आकारण्यात येत आहे.सहा ते सात मिनिटांत हे अडीच किलोमीटर अंतर ई रिक्षाच्या प्रवासासाठी लागते.तर शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी फक्त पाच रुपये इतका माफक दर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही महिने येथील शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाला दस्तुरी माथेरान दस्तुरी या प्रवासासाठी दर दिवसाला केवळ पाच रुपयांत मासिक पास देण्यात आले होते. ज्यांना  लाख रुपये मासिक पगार मिळतो अशा शासकीय अधिकारी वर्गाला ही सवलत देण्यात आल्यामुळे अनेकदा ३५ रुपये दर भरणाऱ्या प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. परंतु या शासकीय अधिकारी वर्गाला नागरिकांच्या तक्रारी वरून या सुविधे पासून बंद करण्यात आले आहे.ज्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना इथे शासकीय खोल्या उपलब्ध आहेत अशी मंडळी सुध्दा नेरळ अथवा कर्जत याठिकाणी राहून ई रिक्षाच्या साहाय्याने नोकरीसाठी येतात. तर येथील  निमशासकीय कर्मचारी सुध्दा आपल्या स्वतःच्या खोल्या असताना माथेरान परीसरात वास्तव्यास आहेत.काही दिवसांनी जवळपास वीस नवीन ई रिक्षांची सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी आरटीओ ने या ई रिक्षाचे परवडणारे दर निश्चित केल्यास सर्वाना सोयीस्कर होऊ शकते अशी मागणी जोर धरू लागली आहे.

श्रीरंग आप्पा बारणे यांना निवडून देण्यासाठी शिवसैनिक सज्ज

माथेरान : खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. कर्जत – खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वात श्रीरंग आप्पा बारणे यांना बहुसंख्य मताने निवडून देण्यास शिवसैनिक सज्ज आहेत. सलग दोनदा खासदारकीचा प्रदीर्घ अनुभव पाठिशी असणारे आणि पाच वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त झालेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले बारणे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय संपादन केला होता. याही वेळेस त्यांना विकास कामाच्या जोरावर आणि समस्त शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा एकदा विजयश्री मिळवून देण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसैनिक सज्ज झाले असून श्रीरंग बारणे कर्जतमध्ये आले असता त्यांचे शिवसेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. बाळासाहेब भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी औक्षण केल्यावर  जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी बारणे यांना हॅट्रिक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात जेष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन यांना जीवन गौरव

ठाणे : ठाणे जिह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या जेष्ठ- श्रेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा भव्य पत्रकार मेळावा मोठ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. या मेळाव्यात ६० वर्षांपासून आजतागायत पत्रकारिता करणारे…

बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर यांना प्रदान

भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार २०२४ मुंबई : लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2024 वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पार पडला. यावेळी…

रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विले पार्ले येथे सुरु असलेल्या रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने आयोजित उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत ४ थ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्य सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या रहिम खानला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २३-६, १९-२३ व २५-१३ असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर मुंबईच्या पंकज पवारने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर तीन सेटमध्ये ४-२५, १४-१३, १६-१३ असा निसटता विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे. संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) वि वि अशोक गौर ( मुंबई ) २५-५, २१-७ प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि झैद अहमद फारुकी ( ठाणे ) २१-५, २१-१५ महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल प्राजक्ता नारायणकर ( मुंबईत उपनगर ) वि वि उर्मिला शेंडगे ( मुंबई ) ५-१६, २५-६, २५-५ समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि मेधा मठकरी ( पुणे ) २५-०, २५-० श्रुती सोनावणे ( पालघर ) वि वि अंबिका हरिथ ( मुंबई ) १५-१०, २५-२२ काजल कुमारी ( मुंबई ) वि वि आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) २५-१२, २४-१३

अमरावती किंवा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आम्हाला द्या-  आनंदराव अडसूळ

मुंबई : अमरावती किंवा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आम्ही लढणारच आणि त्यासाठी आम्ही सह्यांची मोहीम राबवणार असून त्या सह्यांची निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देणार आणि आपली ताकद दाखवणार असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये केले. ते पुढे म्हणाले विद्यमान खासदार नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र अगदी भोगत असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे यावर लवकरच जजमेंट येऊन त्यांना पुन्हा निवडणुकीला उभे राहता येणार नाही. अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या सर्वेनुसार तेथील जनता नवनीत राणा यांचे ढोंग माजीला कंटाळली असून त्यांना पुन्हा खासदार करणार नाही तसेच त्यांचे हे ढोंग लवकरच बंद होईल. परंतु शिवसेना भाजप युतीने   त्यांना पुन्हा एकदा संधी दिल्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेमध्ये प्रचंड नाराज आहे. राणा यांचा प्रभावाकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनता त्यांचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. उत्तर पश्चिम मतदारसंघांमध्ये आमची ताकद फार मोठ्या प्रमाणात असून आमच्या युनियनचे अनेक सभासद आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जोमाने कामाला लागले आहेत. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा आम्हाला सोडावी ती जागा आम्ही नक्कीच जिंकून दाखवू अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिली. या बैठकीमध्ये को-ऑपरेटिव बँक एम्प्लॉइज  युनियनचे सुनिल साळवी, प्रमोद पारटे, जनार्दन मोरे असंख्य र्कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत

५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा दिल्ली : येथे सुरु असलेल्या 56 व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिला गटात तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) संघाचा पराभव करत वर्चस्व राखले. हि स्पर्धा करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे काॅलनी, पहारगंज येथे १ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. सकाळच्या सत्रात रंगलेल्या अ गटातील महिला सामन्यात आयटीबीपी  संघावर (54-10)  एक डाव 44  गुणांनी एकतर्फी धुव्वा उडवत विजय मिळवला. महाराष्ट्रा कडून अश्विनी शिंदे (3.10 मि. संरक्षण व 2 गुण), प्रियांका इंगळे (3.50 मि. संरक्षण व 10 गुण), काजल भोर (2.50 मि. संरक्षण व 4 गुण), पूजा फरगडे (12 गुण ),  अपेक्षा सुतार (२.४० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. आयटीबीपी कडून  पुनमने (१ मि. संरक्षण) चांगला खेळ केला. महिला गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 26-14 असा एक डाव 12 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रा तर्फे काजल भोर  (3.20 मि.  संरक्षण व 4 गुण ),  प्रियंका इंगळे  (1.30, 2.10 मि.  संरक्षण  व 8 गुण ), सानिका चाफे 3.10 मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ करताना धमाकेदार विजय साजरा केला. तर उत्तर प्रदेश संघातर्फे  खुशबू  (1.10 मि. संरक्षण ), शिवानी (6 गुण ) यांनी चांगला खेळ केला. हे दोन्ही सामने जिंकून महाराष्ट्र संघ गटात अव्वल राहीला आहे. पुरुष गटात महाराष्ट्राने तामिळनाडूचा 28-10 असा दहा गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रा कडून प्रतीक वायकर  (2.10 मि. संरक्षण ), अक्षय मासाळ (2 मि. संरक्षण ), लक्ष्मण गवस (नाबाद 1.30 मि. संरक्षण व 8 गुण ) यांनी उत्कृष्ट खेळ केला. तामिळनाडू कडून गिरी (1,  1 मि. संरक्षण व 4 गुण ), सुब्रमणी  (4 गुण) यांनाच  चांगला खेळ करता आला.

महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित

कल्याण : महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ दरम्यानच्या १०० केव्ही वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर चारच्या काही भागांमधील महावितरणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास झालेला बिघाड महापारेषणकडून दुरूस्त होईपर्यंत संबंधित भागात भार व्यवस्थापन करून वीजपुरवठा करण्यात आला. महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातून अंबरनाथकडे येणाऱ्या १०० केव्ही उच्चदाब वाहिनीत रविवारी सकाळी बिघाड झाला. परिणामी या वाहिनीवरून वीजुपरवठा होणाऱ्या महावितरणच्या बदलापूर पूर्व आणि पश्चिम, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम तसेच उल्हासनगर चार उपविभागातील कांही भागांचा वीजपुरवठा बाधित झाला. महापारेषणकडून बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सूरू होते. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत बिघाड दुरूस्त होऊ शकला नव्हता. त्यामुळे पडघा ते मोहने या उच्चदाब वाहीनीद्वारे उपलब्ध स्त्रोताच्या आधारे भार व्यवस्थापन करून बदलापूर, अंबरनाथ व उल्हासनगर चार उपविभागात चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा सुरू होता. दरम्यान सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मुख्य बिघाड निदर्शनास आला असून महापारेषणकडून सायंकाळी साडेपाचपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी (२९ मार्च) रात्रीही महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील सीटीमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर आणि परिसरातील महाविरतणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता.