हिंद-दी-चादर’ समागम सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज

नवी मुंबई : खारघर येथील ओवे मैदानावर शनिवारी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचा मुख्य कार्यक्रम या शनिवार-रविवारी (२८ फेब्रुवारी-१मार्च) पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. देश-विदेशातून सुमारे २० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सुविधा, आरोग्य, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पूर्ण करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर येथील ओवे मैदान सेक्टर २९ येथे मुख्य कार्यक्रम होणार असला तरी, मोठ्या प्रमाणावरील गर्दी लक्षात घेऊन नवी मुंबई शहरातही विविध तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी ओवे मैदान परिसरात तात्पुरती पायाभूत सुविधा उभारण्यात आली आहे. भाविकांसाठी १००० शौचालये उभारण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून जेटिंग मशीन व सक्शन युनिट सतत कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. मुख्य रस्ते आणि कार्यक्रमस्थळ परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

आरोग्य सुविधांच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी बाह्यरुग्ण सेवा कक्ष उभारण्यात आला असून २५ डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेसाठी १०६ एनएमएमटी बस भाविकांच्या सेवेत ठेवण्यात आल्या असून प्रमुख मार्गांवर वाहतूक नियंत्रणासाठी नियोजन करण्यात आले आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांवर मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत.


याशिवाय, दोन हजारांहून अधिक भाविकांच्या निवासाची व्यवस्था विविध ठिकाणी करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणाही सतर्क असून कार्यक्रम सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी सर्व विभागांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवार-रविवारी होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असून, सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा समागम यशस्वी करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *