अकोला : विदर्भाला अवकाळी पाऊसासह गारपीटीचा तडखा बसलाय. विदर्भातील अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झालीय. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसलाय. आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान

अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील मळसुर भागात गारपीटीसह जोरदार वादळी पाऊस झाला. गारपीट आणि पावसामुळं आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. सलग अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मोठा पाऊस झाला. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झालीय. खामगाव तालुक्यातील रोहणा, गानेशापुर परिसरात गारपीट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय.

परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आज विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच सर्वत्र उकाडा प्रचंड वाढला होता. त्यातच सायंकाळच्या सुमारास परभणी, पूर्णा, गंगाखेड, पालम या 4 तालुक्यांसह इतर ठिकाणीही जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसला. यामुळे परभणीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

लातूर शहर आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस

काही वेळापूर्वी लातूर शहर आणि परिसरामध्ये वातावरण ढगाळ झालं होतं. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झालीय. मागील दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली होती. प्रचंड उकाडा जाणवत होता. काही वेळापासून ढगाळ वातावरण तयार झाला आहे. पावसाच्या हलक्या सरीमुळं वातावरणात गारवा निर्माण झालाय. मागील काही दिवसापासून उकाड्यांना हैराण असलेल्या लातूरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यानुसरा विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा शेती पिकांना चांगलाच फटका बसलाय.

उष्णतेपासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा

दरम्यान, एका बाजूला राज्यात उन्हाचा चटका वाढला होता. बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंशावर गेला होता. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 42 अंशाच्या आसपास गेला होता. त्यामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली सुरु झाली होती. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता काही प्रमाणात पावसानं हजेरी लावल्यामुळं उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *