ठाणे : लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सर्व अध्यक्ष व सचिव मतदारदूत’ म्हणून आमची भूमिका बजवणार असून प्रत्येक सोसायटीत १०० टक्के मतदान कसे होईल यासाठी प्रयत्नशिल राहून मतदान जनजागृती मध्ये सहभागी होऊ, असा निर्धार ठाण्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी केला. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघातर्फे स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा अशा सूचना मतदार नोंदणी अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांनी दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार व अतिरिक्त सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.आसावरी संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन येथे केले होते. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम ७९ अन्वये सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांना केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित केले असल्याची माहिती अतिरिक्त सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संसारे यांनी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिव यांना दिली. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे असून सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांच्या माध्यमातून जास्तीतजास्त मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अध्यक्ष व सचिव यांचे सक्रिय सहकार्य घेऊन मतदानाचा टक्का वाढविणे हे आपले ध्येय आहे. विशेष म्हणजे मतदान टक्केवारी वाढविण्याचे काम करणाऱ्या सोसायटीच्या वार्षिक लेखा अहवालामध्ये या कामाची नोंद करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. या कामामध्ये अध्यक्ष व सचिवांनी चांगले सहकार्य करून मतदार टक्का कसा वाढेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. मतदान जनजागृती संबंधित वेगवेगळे उपक्रम राबवून नवीन मतदारांची नोंदणी कशी वाढवता येईल हे पहावे. मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवावे, असे आवाहन अतिरिक्त सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संसारे यांनी केले. या कार्यशाळेत सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांनी विचारलेल्या प्रश्न व शंकाचे त्वरित निरासन करण्यात आले. या कार्यशाळेत स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक व स्वीप पथकामधील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेला सोसायटी पॅनलचे अध्यक्ष सीताराम राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *