Month: April 2024

विकासकामांची माहिती घेणे हा पाहणी दौऱ्याचा उद्देश- आयुक्त सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे : महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकासकामे सुरू आहेत त्यांची पाहणी, तसेच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीने जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची माहिती घेणे हे या दौऱ्याचे प्रयोजन आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील, याची माहिती घेणे हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचे ठाणे महापालिका आयुक्त व प्रशासक सौरभ राव यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सोमवारपासून सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली. सोमवारी सायंकाळी झालेल्या या पाहणी दौऱ्यास आनंदनगर, कोपरी येथून सुरूवात झाली. ठाण्याचे प्रवेशद्वार, सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ यांची आयुक्तांनी पाहणी केली. दीपस्तंभ अधिक प्रकाशमान असावा आणि त्याची नियमित देखभाल केली जावी, अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यानंतर, ठाणे पूर्व सॅटीस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामाची माहिती घेतली. या कामाच्या पुढील आराखड्याबाबत सादरीकरण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. ज्ञानसाधना महाविद्यालयालगतच्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यावर आयुक्तांनी पूर्व द्रुतगती महामार्गालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानास भेट दिली. त्यानंतर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देऊन तेथील कला दालने व व्यवस्था यांची माहिती घेतली. महापालिकेने उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या असून त्यांच्या निगा व देखभालीचा खर्च निघेल  अशा पद्धतीने या वास्तूंची भाडे आकारणी केली जावी, अशा सूचना त्यांनी स्थावर विभागाला दिल्या. अशा प्रकारच्या वास्तूंच्या देखभालीची जबाबदारी जाणकारांच्या हाती देऊन तसा रितसर करारनामा करण्यात यावा, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तीन हात नाक्यावरील वाहनांचा होणारा खोळंबा हा ठाणेकराच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन उपायांबाबत विचार सुरू असल्याचेही, तीन हात नाका, मॉडेला मिल नाका येथील वाहतुकीच्या परिचलनाची माहिती घेतल्यावर, आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील चौक आणि रस्ते अरुंद झाले आहेत. ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे. त्या दृष्टीकोनातून सिग्नल रिडिझायनिंग, चौक रिडिझायनिंग  करण्याची आवश्यकता असून त्यांची नोंद घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर, आयुक्तांनी रायलादेवी तलावाच्या एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली. किसन नगर येथील मिनाताई ठाकरे प्रसूतीगृहाचे बळकटीकरण आणि अत्याधुनिकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्याचीही आयुक्तांनी पाहणी केली. तसेच, त्या गर्भवती मातांचा विचार करून येथे लिफ्ट सुविधा देण्यासाठी आराखडा सादर करण्यास बांधकाम विभागाला सांगितले.  वागळे इस्टेट भागात पडवळनगर येथील शौचालय, रोड. नं. २२ येथील सुशोभीत करण्यात आलेले सर्कल यांची आयुक्तांनी पाहणी केली. त्याचबरोबर, जयभवानी नगर येथील स्मशानभूमीत सुरू असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली. किसननगर येथील क्लस्टर योजनेतील कामांच्या प्रगतीचा आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. क्लस्टरसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यात सुरू आहे, याचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी महापालिकेकडून जे सहकार्य लागेल ते देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. क्लस्टरबाबत आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत. शहराचा चेहरामोहरा तसेच येथील नागरिकांचे राहणीमान बदलण्यासाठी क्ल्स्टर ही महत्त्वपूर्ण योजना आहे. त्यामुळे, या प्रकल्पाच्या कालबद्ध पूर्णत्वासाठी लवकरच सिडकोच्या अधिकाऱ्यांसह बैठकही आयोजित करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. वर्तकनगरमधील सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन आयुक्तांनी तेथील कामकाजाची पाहणी केली. ग्रंथालय, अभ्यासिका आदी सुविधांची माहिती घेत त्यांनी तेथील प्रशिक्षणार्थी, ग्रंथपाल यांच्याशी संवाद साधला. उपवन येथील घाट, कारंजे यांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला भेट दिली. तेथील सुविधा आणि व्यवस्था यांची त्यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त मनीष जोशी, अनघा कदम, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सी. डी. देशमुख प्रशासकीय संस्थेचे संचालक महादेव जगताप, घाणेकर नाट्यगृहाचे व्यवस्थापक अजय क्षत्रिय आदी अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टलचा’ वापर करा –  अशोक शिनगारे

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी  सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in  चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. शिनगारे वेळोवेळी आढावा घेत असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांकडून केलेल्या कार्यवाहीची ते नियमितपणे माहिती घेत आहेत. उमेदवारास वैयक्तिक स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घेता येते. निवडणूकसंबंधी कोणत्याही विषयात आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने पूर्ण कराव्यात, असेही जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना मिळणार सुट्टी

अनिल ठाणेकर ठाणे :लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहे. शासनाने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानांचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील. वर नमूद केल्यानुसार  उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यात देण्यात आला आहे. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक 202403221710362810 असा आहे.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25-ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेथनी…

उद्धव ठाकरे, राहुल गांधींना मतदारच तडीपार करतील

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात मुंबई : भ्रष्ट नेत्यांच्या अटकेविरोधात एकत्र येत दुखवटा साजरा करण्यासाठी रामलीला मैदानावर जमणा-या सर्व भ्रष्ट नेत्यांना त्यांच्या पराभवाची गॅरंटी असल्यानेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. अशा लायकी नसलेल्यांना मतदारच निवडणुकीत तडीपार करतील अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, संजय राऊत यांच्यावर मंगळवारी घणाघात केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. राजकीय उंची आणि बौद्धीक कुवत नसलेल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करणे थांबवावे अन्यथा भाजपा कार्यकर्त्यांना त्यांची लीला दाखवावी लागेल असा इशारा ही श्री.राणे यांनी विरोधकांना दिला. श्री.राणे म्हणाले की अब की बार भाजपा तडीपार म्हणणा-यांनी स्वत:ची लायकी तपासून पहावी. कोरोना काळात गरीबांच्या टाळूवरचे लोणी खाणा-यांना सूज्ञ मतदारच यावेळी घरी बसवतील. मोदी सरकारवर मॅच फिक्सिंग चा आरोप करणारे उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व विरोधक, भ्रष्ट नेत्यांच्या समर्थनासाठी एकत्र येतात ही संतापजनक बाब आहे. तपास यंत्रणांच्या धाडी दरम्यान अव्वाच्या सव्वा रोकड मिळत असताना, अनेक घोटाळे समोर येत असताना भ्रष्ट मंत्र्यांवर होणा-या कायदेशीर कारवाई विरोधात ही मंडळी गळे काढत आहेत. लोकशाही तत्वांनुसार कायद्याचे पालन करत सर्व भ्रष्ट नेत्यांवर कारवाई होत असून गरीब सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचा पैसा पंतप्रधान मोदी मिळवून देतील असा विश्वास श्री.राणे यांनी व्यक्त केला. मोदींच्या कार्यकाळातील देशाची होणारी प्रगती विरोधकांना सहन होत नसल्यानेच जळफळाटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर  बिनबुडाची टीका होत आहे असेही ते म्हणाले. श्री.राणे यांनी देशाच्या प्रगतीचे द्योतक असलेली अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारीच पत्रकार परिषदेत सादर केली. पंतप्रधान मोदीजींच्या समर्थ नेतृत्वाखाली देशाच्या विकासाची तुफान वेगाने घोडदौड सुरू असून यंदा ‘अब की बार ,400 पार’ चे  उद्दीष्ट एनडीए नक्की साध्य करेल असा विश्वास श्री.राणे यांनी बोलून दाखवला.

वसई न्यायालयात ऐतिहासिक नाण्यांना उजाळा

वसई : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी फार पूर्वीपासून नाणी चलनात आहेत. प्राचीन साम्राज्य, राजवटींसह स्वातंत्र्यपूर्व काळातील नाणी वसईकरांना पाहता यावी, यासाठी वसई न्यायालयाच्या आवारात असलेल्या बार असोसिएशन रूम येथे नाणी प्रदर्शनाचे आयोजन (ता. २) करण्यात आले होते. या वेळी प्राचीन नाणी व त्याचा इतिहास समजण्यासाठी न्यायाधीश, वकिलांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली. शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बार असोसिएशनचे अॅड. भरत पाटील, अॅड. आनंद घरत, अॅड. पूनम जाधव यांनी नाणी संग्रह प्रदर्शनाचे आयोजन केले होते. मुंबई कॉईन्स सोसायटी न्यूमिसमॅटिक सभासद जोसेफ लोपीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, व्यंकोजी राजे भोसले, पेशवेकालीन व पोर्तुगीज, तसेच बसिन (वसई) अशी दुर्मिळ नाणी जमा केली आहेत. जोसेफ लोपीस यांच्या मदतीने नाणी प्रदर्शन भरविण्यात आले. सुमारे एक हजार नाणी प्रदर्शनात होती. तोफगोळेदेखील नागरिकांना पाहण्याची संधी मिळाली. या वेळी न्यायाधीश आर. डी. देशपांडे, न्यायाधीश खोंगल, नाथानी, वाळके आदींनी भेट दिली, तर ज्येष्ठ वकील अविनाश विद्वांस, नंदन भगत बार असोसिएशनचे अध्यक्ष परमानंद ओझा, दिगंबर देसाई, साधना धुरी यांच्यासह मोठ्या संख्येने वकील मंडळी सहभागी झाली होती. जग तंत्रज्ञानात पुढे जात आहे. नव नवी संशोधने होत आहेत, अशावेळी प्राचीन इतिहासालादेखील तितकेच महत्त्व आहे. नाणी प्रदर्शन म्हणजे जगात पूर्वी घडलेल्या घडामोडी आणि तेव्हाच्या राजे- महाराजे, नागरिकांनी…

बदलापूर एमआयडीसीमध्ये डी.के. फार्मा या केमिकल कंपनीला आग!

बदलापूर : बदलापूरच्या एमआयडीसी परिसरात प्लॉट नंबर १५ येथील डी.के फार्मा या केमिकल कंपनीला दुपारी १२ च्या सुमारास अचानक भीषण आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. दुपारी अचानक एमआयडीसी परिसरातून धुराचे लोळ दिसू लागल्यावर सगळीकडे एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले कारण यापूर्वी जानेवारी महिन्यातच पहाटेच्या सुमारास विके केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाने लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा दोन महिन्याच्या फरकानेच येथील डी.के. फार्मा या कंपनीला देखील आज भीषण आग लागली. डी.के.फार्मा या कंपनीत वैज्ञानिक प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे व औषधांसाठी वापरात वापरात येणाऱ्या केमिकल चे रसायन प्रक्रिया होत असते. दुपारी अचानक कंपनीच्या ८/३२ या प्लॉटच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रिॲक्टर आणि प्रोसेसर या भागात ही आग लागली. यावेळी आगीचे स्वरुप पाहता अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम ने पाऊण तासात या आगीवर नियंत्रण मिळवले. यापूर्वी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनीतील आग प्रतिबंधक यंत्रणेचा वापर करण्यात आल्याने आग जास्त प्रमाणात वाढली नाही अशी माहिती सोनोने यांनी दिली. या कंपनीत एकूण १५० कर्मचारी असून, शिफ्ट नुसार ड्युटी असल्याने, घटना घडली तेव्हा कंपनीत साधारण १०० माणसे असल्याचा अंदाज कंपनी व्यवस्थापक अजित बेहरे यांनी दिली. या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, कंपनीत असलेल्या आग प्रतिबंधक यंत्रणेने आग विझवताना कंपनीतील एक कर्मचारी व नंतर अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून, केमिकल आणि आगीचे डोळ्यांना रिअँक्शन झाल्याने त्यांच्यावर बदलापूर पूर्व ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापकानी यांनी दिली. ही आग शॉर्ट सर्किट होऊन लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी, केमिकल ची गळती होऊन आग लागल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. आगीचे कारण आम्ही नेमके आता सांगू शकत नाही. त्या कारणांचा आम्ही शोध घेत आहोत. आमच्या कंपनीत एकूण १५० कर्मचारी कार्यरत आहेत मात्र, शिफ्ट ड्युटी असल्याने आगीची घटना घडली तेव्हा कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या जास्त नव्हती म्हणून आम्हाला लवकर सगळ्यांना सुखरूप बाहेर काढता आले. यात कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नसून, लवकरच आगीचे कारण स्पष्ट होईल – अजित बेहरे व्यवस्थापक डी.के. फार्मा कंपनी.

ठामपा महिला व पुरुष कबड्डी संघाला विजेतेपद

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा   ठाणे : तामिळनाडू, बंगलोर, पाचगणी, वर्धा, मध्यप्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले.आयुक्त सौरभ राव यांनी संघाचे अभिनंदन केले. महापालिकेच्या कबड्डी संघांच्या कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला व पुरूष कबड्डी संघाचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, क्रीडाअधिकारी तथा प्र. उपआयुक्त मीनल पालांडे, तसेच महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापक नीना गोळे, प्रशिक्षक संतोष शिर्के, पुरूष कबड्डी संघाचे व्यवस्थापक गणेश म्हात्रे, प्रशिक्षक जसपालसिंग राठोड उपस्थित होते.

सामाजिक भान देणारी आध्यात्मिक चळवळ!-शामसुंदर महराज सोन्नर

शेतकरी कीर्तन महोत्सव! शेतक-यांच्या व्यथा -वेदनांवर संत विचारांची हळूवार फुंकर घालून त्यांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत आहे. व्यवस्थेने केलेल्या अन्यायाची जाणीव करून देत असताना त्याविरोधात लढण्याचे…

एनडीए’मध्ये मुजोरी; ‘इंडिया’त कुरघोडी

मागोवा भागा वरखडे लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे अर्ज भरून दुसर्‍या टप्प्याचे अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ‘इंडिया’ आघाडीत अनेक पक्ष सामील झाले, तरी त्यांची काँग्रेसवर कुरघोडी चालू आहे. एकीकडे साधन, संपत्ती,…