रमेश औताडे

मुंबई : आपली भौतिक कार्ये आणि मनःशांती याची सांगड जगाला विविध संभाव्य  संकटापासून वाचवण्यासाठी कामी येणार आहे. त्यामुळे मानवाने विचारपूर्वक वागत जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. असे विचार सद्गुरू ओशो यांचे लहान बंधू डॉ. स्वामी शैलेंद्र सरस्वती यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत मांडले.

राजस्थानमधील सोजत येथे २८ एकरांमध्ये १ लाख चौरस फुटाचे बांधकाम २० कोटी रूपये खर्च करून शिखरचंद जैन समाजसेवक ओशो ध्यान केंद्र उभारणार आहेत. हे ध्यानकेंद्र १८ महिन्यांत तयार होणार आहे. या ध्यान केंद्राच्या माध्यमातून ध्यान व योग मानवाला कसे आनंदी ठेऊ शकते याची माहिती देत असताना डॉ. स्वामी शैलेंद्र सरस्वती बोलत होते.

सोजत स्वर्ण भवनच्या मुंबईतील काळबादेवी येथील इमारतीचे  उ‌द्घाटन त्यांच्या हस्ते होणार असल्याने ते महाराष्ट्रात आले आहेत. उद्घाटन नंतर ओशो मेडिटेशन, प्रवचन आणि मानवी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती हिंदुस्तान चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि फिक्कीचे कार्यकारी समिती सदस्य शिखरचंद जैन यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि न्यायाधीश के. के. ताथेड हे असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *