पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी आठ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. त्यात महाविकास आघाडीच्या तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या भारती कामडी यांचाही समावेश आहे. त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात आता अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीच्या तथा उद्धव गटाच्या भारती कामडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पालघर-बोईसर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यात माजी मंत्री आदित्य ठाकरे, कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा व आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांचीही उपस्थिती होती. यावेळी काढलेल्या रॅलीत तारपा नृत्य, ढोल-ताशांच्या गजरात मोठे शक्तिप्रदर्शन केले गेले.

जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या उपस्थितीत उमेदवार कल्पेश भावर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीतर्फे भरत वनगा, मार्क्सवादी लेनिन पार्टीतर्फे राहुल मेढा, सुरेश जाधव, दिनकर वाढान, भारत आदिवासी पार्टीतर्फे मोहन गुहे तसेच वासंती झोप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दोन दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीतर्फे आमदार राजेश पाटील वंचित बहुजन आघाडीतर्फे विजया मात्रे तर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे मीना भड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *