हेमंत करकरेंवर कसाबने नव्हे पोलिसांनीच गोळ्या झाडल्या
विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज खळबळजनक दावा केलाय. २६/११ हल्ल्यात शहीद झालेले आयपीएल अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर कोणत्याही दहशतवाद्याने नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समर्थक असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या आणि ही गोष्ट देशद्रोही उज्ज्वल निकम यांनी लपवून ठेवली. देशद्रोही व्यक्तीला तिकीट देणारा भाजप देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा पक्ष आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करुन एकच खळबळ उडवून दिली.
यंदाच्या लोकसभा निवडुकीत भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी उत्तर मध्य मुंबईतून निवृत्त सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. निकम यांच्यामुळेच दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा झाली. निकम यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. आता इतक्या वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस निकम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, उज्ज्वल निकमसारख्या देशभक्ताला आम्ही तिकीट दिले, त्यामुळे काँग्रेस नेते उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केल्याचे सांगतात. म्हणजे काँग्रेसला मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्या अजमल कसाबची चिंता आहे. आमची महायुती उज्ज्वल निकमांसारख्या देशभक्तासोबत आहे, तर महाविकास आघाडी अजमल कसाबसारख्या दहशतवाद्यांसोबत आहे. कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे मतदाराने ठरवावावे.
