राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांना पाठिंबा – डॉ. उदय नारकर

अनिल ठाणेकर

ठाणे : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा दिल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डाॅ उदय नारकर यांनी दिली आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज, वाढता जनाधार, सर्व जनविभागांच्या उपजीविकेसाठी केलेले जोमदार सातत्यपूर्ण लढे आणि प्रभावी उमेदवार या जोरावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. जे. पी. गावीत यांना दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची रास्त अपेक्षा आणि मागणी होती. त्यासाठी  राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील ४८ पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी माकपची मागणी होती. तथापि, पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरच्चंद्र पवार) पक्षास दिली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांतील मैत्रीपूर्ण लढत माकपने स्वीकारलेल्या उद्दिष्टास घातक ठरू शकते. वस्तुतः सर्वत्र सत्ताधारी भाजप आणि दिंडोरी मतदारसंघातील त्याच्या उमेदवाराविरुद्ध मतदारांत कमालीचा असंतोष आहे. त्याचे रूपांतर त्या पक्षाच्या आणि दिंडोरीतील उमेदवाराच्या पराभवात होणे अटळ आहे. पण महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्यास जनतेच्या इच्छेचा अनादर होईल. जनतेच्या संभाव्य कौलाचा असा अवमान होऊ नये, भाजप उमेदवाराचा पराभव आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय यावर शिक्कामोर्तब करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हे ध्यानात घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघातील कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार  भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी करत आहे असे डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *