अशोक गायकवाड
नवी मुंबई, :
*कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील खासगी आस्थापनेवरील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी २६ जून, २०२४ रोजी मतदान कालावधीत दोन तासांची विशेष सवलत देण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.*
भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी दिनांक ०१ जुलै,२०२४ रोजी होणार आहे. विधानपरिषद शिक्षक/पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी पदवीधर/शिक्षक निवडणूकीमध्ये खासगी आस्थापनेवर काम करणाऱ्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा लागू होत नसल्याने अशा व्यक्तींना मतदान कालावधीत दोन तासांची विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. खासगी आस्थापनेवर काम करणाऱ्या मतदारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष दोन तासाच्या सवलतीचा लाभ घेऊन पदवीधर/शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे.
००००००
००००
