आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
अनिल ठाणेकर
ठाणे : मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजना’ लागू होणार आहे. गरजू महिलांना प्रति महिना १५०० रुपये इतका आर्थिक लाभ या योजनेअंतर्गत मिळणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
महिलांच्या शिक्षण, स्वयंरोजगार, आरोग्य व त्यांच्या सर्वांगीण प्रगती, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात मदत करून प्रत्येक महिला सक्षम होईल यासाठी यशस्वी प्रयत्न केले आणि महिला शक्तीचीही आपल्याला वेळोवेळी साथ लाभली आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या आरोग्य आणि पौष्टिक पातळीत सतत सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी, मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात ‘मुख्यमंत्री लाडली बहना योजना’ सुरु करून गरजू महिलांना आर्थिक लाभ देण्याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्रांकडे पत्राद्वारे विनंती केली होती. या योजनेसाठी निधीची तरतूद, या योजनेच्या अंमलबजावणीचे संपूर्ण नियोजन, निकष, नियमावली हे सर्व आपण निश्चित करावे. महिलांना या योजनेचा तात्काळ लाभ मिळण्यासाठी निकष व प्रक्रिया साधी, सरळ, सोपी ठेवावी तसेच वेबसाईट व मोबाईल ऍप द्वारे याचे फॉर्म भरून घ्यावेत. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्तरामध्ये सतत सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे या दृष्टीने ही योजना अत्यंत प्रभावी ठरेल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे केवळ महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा दिसून येणार नाही, तर स्त्रिया त्यांच्या आवडीनुसार खर्च करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक आर्थिकदृष्ट्या मुक्त होतील. मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे, स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा वापर करून महिला केवळ स्वयंरोजगार/उपजीविकेच्या साधनांचा विकास करतील असे नाही तर कौटुंबिक स्तरावर निर्णय घेण्यातही त्या प्रभावी भूमिका बजावू शकतील त्यामुळे ही योजना लागू होणे आवश्यक आहे. गरीब गरजू महिला, विवाहित, ज्यामध्ये विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांचा देखील समावेश असेल. वय वर्षे २१ ते ६० पर्यंतच्या तरुणी व महिलांना याचा लाभ देण्यात यावा. महाराष्ट्र राज्यात किमान १५०० रुपये महिलांना दिले जावे व टप्प्या टप्प्याने ही रक्कम ३ हजार पर्यंत नेली जावी अशी सूचना करून मुख्यमंत्र्यानी महिलांच्या हिताकरिता महाराष्ट्र राज्यात ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजनेला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आभार मानले.
